Friday, 2 April 2021

टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©

 टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©

मुख्य भारताला जवळपास ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर भारताचा भाग असलेली लक्षद्वीप, अंदमान- निकोबार बेट लक्षात घेतली तर त्यांना सुमारे ५४२२ किलोमीटर ची किनारपट्टी लाभलेली आहे. या शिवाय बंगाल चा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने वेढलेल्या पाण्यावर भारताचं अधिराज्य आहे. जगातला मुख्य व्यापार हिंद महासागरातून होतो आणि इकडे लक्ष ठेवण्यासाठी भारताला एका सक्षम नौदलाची गरज आहे. ब्लु वॉटर नेव्ही म्हणून भारताचं नौदल जगातील काही मोजक्या नौदलात समाविष्ट आहे. पण याच नौदलाकडे भारताने मधल्या काळात काही प्रमाणात दुर्लक्ष केलं हे नाकारून चालणार नाही. ज्या वेगाने चीन ने आपलं नौदल सक्षम केलं आहे आणि महासागरातील आपल्या कारवाया वाढवल्या आहेत ते बघता भारताला नौदल शक्तीत खूप वेगाने भर घालण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

आय.एन.एस. विराट सारखी विमानवाहू नौका निवृत्त झाल्यावर त्याची पोकळी भरून काढणारी विमानवाहू नौका नसल्याने भारताने रशिया कडून बाकू नावाची विमानवाहू नौका विकत घेतली व तिचं नामकरण आय.एन.एस. विक्रमादित्य असं केलं. सध्या भारताकडे ही एकच विमानवाहू नौका आहे. पण भारताने दुसऱ्या विमानवाहूनौकेची बांधणी पूर्ण केली असून येत्या काही काळात आय.एन.एस.विक्रांत या नावाने भारताच्या संरक्षणासाठी सिद्ध होईल. कोणत्याही विमानवाहू नौकेला संहारक बनवणारा हुकमाचा एक्का म्हणजेच त्यावर असलेली लढाऊ विमान. जमिनीवरून एखाद्या लढाऊ विमानाने उड्डाण अथवा लँडिंग करणं आणि एखाद्या विमानवाहू नौकेच्या डेक वरून तीच कसरत करणं यात जमीन आकाशाएवढं अंतर आहे. विमानवाहू नौकेच्या डेक वर उड्डाणासाठी असलेली धावपट्टी  अतिशय छोटी असते. त्या तेवढ्या अंतरात लढाऊ विमानाने उड्डाणाचा वेग घेणं अपेक्षित असते. त्याच सोबत त्या छोट्या धावपट्टीवर तितक्या कमी कालावधीत विमानाचा वेग कमी होणं अपेक्षित असते. या शिवाय सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही धावपट्टी स्थिर नसते. पाण्यातून प्रवास करत असताना या सगळ्या हवाई कसरती योग्य रीतीने होणं अपेक्षित असते. 

एखाद्या कुशल वैमानिकासोबत लढाऊ विमानामध्ये सुद्धा अश्या अडचणीच्या जागे मधे उड्डाण भरण्यासाठी आणि लँडिंग करण्यासाठी अनेक बदल गरजेचे असतात. एखाद्या विमानाचं इंजिन इतकं सक्षम असायला हवं की त्याने इतक्या कमी वेळात उड्डणांसाठी लागणार बल निर्माण करायला हवं. त्याचसोबत क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि इतर साहित्य त्यावर बसवण्यासाठी जागा हवी. त्याचवेळी उतरताना त्याच छोट्या धावपट्टीवर त्याचा वेग शून्य व्हायला हवा. तसेच जागा ही प्रमुख अडचण असल्याने जास्तीत जास्त विमान त्यावर राहण्यासाठी त्याचे पंख हे दुमडता यायला हवेत. असं सगळं क्लिष्ठ तंत्रज्ञान युक्त विमान असेल तेव्हाच एखादी विमानवाहू नौका शत्रूच्या गोटात अस्वस्थता निर्माण करू शकते. 

भारतात येत्या काळात दोन विमानवाहू नौका कार्यरत असणार आहेत. त्यावर वर उल्लेख केलेल्या तंत्रज्ञानाने सुसज्ज अश्या लढाऊ विमानांची गरज लागणार आहे. आजवर भारत अश्या पद्धतीची विमान रशिया कडून विकत घेत आला आहे. पण आत्मनिर्भर भारताने स्वबळावर अश्या एका लढाऊ विमानाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याच नाव म्हणजेच टी.ई.डी.बी.एफ. (Twin Engine Deck Based Fighter (TEDBF). या वर्षी झालेल्या ऐरो शो मधे एच.ए.एल. ने याच मॉडेल सादर केलं आहे. हे नावाप्रमाणे दोन इंजिन असलेलं कनार्ड विंग असलेलं तेजस च पुढलं व्हर्जन असणार आहे. विमानवाहू नौकेच्या छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करण्यासाठी यात अनेक तंत्रज्ञान समाविष्ट केलं गेलं आहे. भारताचं हे पाहिलं पाचव्या पिढीतील जवळपास स्टेल्थ असणारं लढाऊ विमान असणार आहे. याचे पंख हे दुमडणारे असणार आहेत. मॅक १.६ वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम असणार असून यावर विविध क्षेपणास्त्र ठेवण्यासाठी ११ हार्ड पॉईंट असणार आहेत. (हार्ड पॉईंट म्हणजे जिकडे आपण क्षेपणास्त्र विमानात भरू शकतो. जितके जास्ती हार्ड पॉईंट तितकी जास्ती क्षेपणास्त्र लढाऊ विमान एका उड्डाणात नेऊ शकते.) यावर ASRAAM (Advanced Short Range Air-to-Air Missile) आणि Astra beyond-visual-range (BVR) त्याशिवाय भारताने निर्माण केलेली Rudram-1 आणि Rudram-2 anti-radiation missiles नेऊ शकणार आहे. यातील अनेक गोष्टी या सध्या लोकप्रिय असलेल्या राफेल-एम या लढाऊ विमानाच्या जवळ जाणाऱ्या असून त्यापेक्षा हे विमान ०. ५ पट पुढल्या पिढीतील आहे असा एच.ए.एल. चा दावा आहे. 

गेल्या वर्षी जून २०२० मधे  भारत सरकारने या विमानाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आहे. जवळपास २०२६ मधे याच पहिलं उड्डाण अपेक्षित असून हे विमान नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हायला २०३० उजाडेल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. प्रत्यक्षात येईल तोवर दोन विमान नौदलाच्या पसंतीस उतरली आहेत. यातील एक म्हणजे  F/A-18E/F Super Hornet (-E is single seat, -F is two seat) आणि Rafale-M carrier fighter ही दोन्ही विमान ४.५ पिढीतील असून दोन्ही अतिशय अत्याधुनिक आहेत. पण राफेल-एम ला जास्ती पसंती मिळत आहे याच कारण राफेल एफ ३ व्हर्जन आधीच भारतीय वायू सेनेत दाखल झालं आहे. त्यावर उड्डाणाचा आणि देखभालीचा अंदाज भारताकडे आहे. शिवाय राफेल एम हे जवळपास त्याच्या भावांसारखं आहे. सध्या टी.ई.डी.बी.एफ. दाखल होईल तोवर ह्यातील एक विमान भारताच्या सुरक्षतेसाठी दाखल होईल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. सज्ज झालं की टप्प्याटप्प्याने या दोन्ही विमानवाहू नौकांवर सध्या असलेल्या मिग २९ विमानांना निवृत्त करण्यात येईल. टी.ई.डी.बी.एफ.ची निर्मिती भारताचा पुढला एक्का असणार आहे कारण हे विमान राफेल किंवा सुपर हॉर्नट पेक्षा एक पाऊल पुढे असणार आहेच त्याशिवाय आपण अश्या विमानांसाठी आत्मनिर्भर होणार आहोत. टी.ई.डी.बी.एफ. निर्माण करणाऱ्या टीम ला या भारतीयाकडून खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




1 comment:

  1. राष्ट्रभक्तिने आकंठ भरलेली राजकीय इच्छाशक्ति असेल तर काय काय होऊ शकतं हा त्याचा एक छोटासा नमुना आहे.
    आगे बढो बढते रहो।

    ReplyDelete