Friday 24 June 2016


सैराट ... विनीत वर्तक

सध्या झिंग झिंग झिंगाट चा धुमाकूळ चालू आहे. नागीण डान्स ची आठवण करून देत पुन्हा एकदा अजय अतुल च्या गाण्यांनी महाराष्ट्राला ठेका धरायला लावला आहे. हे गाण आहे सैराट चित्रपटातील. झी मराठी च्या पुरस्कारापासूनच सैराट चित्रपटाभोवती वलय निर्माण झाल होत. नागराज पोपटराव मंजुळे सारखा दिग्दर्शक, झी स्टुडीओ चा ब्यानर सोबतीला अजय- अतुल च संगीत आणि दोन फ्रेश चेहरे ह्यामुळे सैराट बद्दल उत्सुकता होतीच. सैराट बघण्याची १७ कारणांपासून ते चित्रपटाच्या प्रोमोज मुळे काहीतरी... वेगळ आणि चांगल मराठी चित्रपटात घडते आहे ह्याची जाणीव होत होती.

पण अनेक विरुद्ध प्रतिक्रिया बघून आश्चर्य वाटते आहे. संस्कार, बालवयात वाईट संस्कार, संस्कृती ह्या सर्वांचा अनेकांना झालेला साक्षात्कार बघून कीव वाटली. अव्यक्त प्रेम, किशोरवयीन वयात हवीहवीशी वाटणारी प्रेमाची अनुभूती सगळ्यांनीच अनुभवली आहे. जे लोक गरळ ओकत आहेत त्यांनी स्वतः सुद्धा हा अनुभव घेतलाच असेल. कधीतरी बस च्या थांब्यावर, रेल्वेच्या प्ल्याटफोर्म वर तर कधी क्यानटीन च्या बाकावर तर कधी शाळा कॉलेज मध्ये तो कटाक्ष सगळ्यांना हवाहवासा वाटायचा आणि आजही वाटतोच. ह्या प्रेमासाठी कित्येकांनी किती खास्त्या खाल्ल्या हे प्रत्येकालाच ठाऊक. सगळ्याच प्रेम कथा यशस्वी होत नाही तसा प्रत्येकाचा शेवट वाईट होतो अस हि नाही न? आजही त्या क्षणाची आठवण झाली तर प्रत्येकाच मन आनंदी होतच. भले शेवट हवा तसा नसेल किंवा त्यात अनेक बोचरे अनुभव हि असतील पण ते क्षण स्पेशल असतात ह्यात वाद नसेल.

संस्कार, आदर्श समाज ह्या व्याख्या चित्रपटावरून ठरवायचा काळ कधीच मागे पडला अशी ओरड करणारी लोक आज त्याच चित्रपटाचा आधार घेऊन संस्कारांची बोंब करत आहेत. मुलांची मानसिकता घडवायला टीवी च माध्यम आज न च्या बरोबर आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हात्स अप च्या जाळात अडकलेली पिढी टीवी पासून खरे तर दूर गेली आहे. चित्रपट तर त्याही पलीकडे आहे. त्यातून मराठी चित्रपट संस्कार ठरवणार असेल तर उद्या नैवैद्य काढायला हवा तो ह्याच साठी कि मराठी बोलत नाही, जगत नाही म्हणून तरुण पिढी वर कितीतरी रोष टाकून झाले. त्याच पिढीवरच्या संस्काराची परिभाषा एक मराठी चित्रपट ठरवतो ह्यावरून हे बोंब किती तकलादू आहे ते सिद्ध होते.

मराठी माणूसच मराठी माणसाला खाली खेचतो खेकड्या सारख ते खरेच आहे. एक चांगली कलाकृती समोर आलेली असताना तिचा आस्वाद घ्यायचा सोडून आपण संस्कारांच्या गाळात डुंबण्यात आणि चिखलफेक करण्यात धन्यता मानतो आहोत. मला रिंकू राजगुरूच उदाहरण द्यावस वाटते. तिच्या मते तिने केलेल्या बुलेट स्वारी मुळे अकलूज सारख्या ठिकाणी मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन किंबहुना मुलींच्या आत्मविश्वासात बदल झाला आहे (रिंकू राजगुरू ला ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे). बुलेट सारखी बाईक पुरुषी रांगड समाजच प्रतिनिधित्व करत असताना एका मुलीने ती चालवावी हा मला वाटते तृप्ती देसाई नि १०० मंदिरात शिरून सुद्धा स्त्रियांच्या मानसिकेत आणि एकूणच समाजाच्या मानसिकतेत जो बदल होणार नाही तो झाला आहे.
चित्रपट सगळाच चांगला असेल असे नक्कीच नाही, सगळे मुद्दे पटतील असेहि नाही. प्रत्येकाच्या अपेक्षा त्यातून पूर्ण होतील असेही नाही पण नुसतच काहीही बघून मनोरंजन करण्यापेक्षा अव्यक्त प्रेम, किशोरवयीन प्रेम, त्यातील प्रवास, समाजाची मानसिकता, जातीपातीच राजकारण ह्या वर परखड भाष्य करणारा सैराट मला तरी चित्रपटगृहात जाऊन बघावासा वाटतो

No comments:

Post a Comment