Friday 24 June 2016


धर्मांध... विनीत वर्तक

कालच पाकिस्तान मध्ये बॉमस्फोट झाले. अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला. काल इस्टर च्या निमित्ताने अनेक ख्रिश्चन धर्मियांना निशाणा करता येईल अस समजून मुलांच्या बागेत हा स्फोट करण्यात आला. ५३ लोकांचा निष्पाप बळी १०० हून अधिक जण जखमी करून कोणत्या धर्माचा विजय झाला हा तो धर्म आणि त्याला मानणारे लोकच जाणो. पाकीस्तानांत झाला म्हणून अनेक भारतीयांना आनंद हि झाला असेल. बर झाल त्यांना आता कळेल. पण कोणाला आणि काय कळेल? त्या निष्पाप जिवांनी काय केल होत? राजकारणाच्या, ...देशाच्या, सीमेच्या भांडणात त्या लोकांचा काय दोष? तुमच्या आमच्या सारखेच सर्व सामान्य पण हा विचार आम्ही कधीच बाजूला ठेवला आहे.

स्वताच्या पलीकडे, माझ्या अस्तित्वा पलीकडे अजून काही आहे समजण्याची दृष्टीच आपण गमावून बसलो आहे आहे नाही का? देश तर दूरच राहिला. सुरवात आपल्या घरापासून करू. बायको, बहिण, भाऊ, काका, मामा अश्या अनेक नात्यात आपल्यापलीकडे आपला विचार जातच नाही. कधी कधी असेल हि बरोबर. पण दुसर्याला खड्डा खोदताना आपण हि त्यात बुडत जातो हे कळून सुद्धा असुरी आनंदासाठी आसुसलेले आपण दुःखाच्या खाईत स्वताला लोटताना त्याच आनंदाचा विचार करत स्वताला झोकून देतो. त्याच वाईट झाल न! त्याला शिक्षा मिळाली न! त्याला चांगला धडा शिकवला गेला न! ते त्याची चांगली जिरली. पण ह्या सगळ्यात मला काय मिळाल?, क्षणिक मानसिक समाधान कि जिंकल्याचा आनंद कि स्व ला मोठ केल्याच समाधान.

हीच छोटी पण स्वताच्या घरापासून झालेली सुरवात मग जात, धर्म, देश अस उग्र रूप धारण करते. शेवटी आपण एका क्षणाला त्या पासून स्वताला वेगळ करतो. जाऊ दे न माझ काही वाईट झाल नाही न जोवर मला त्या ज्वाळा लागत नाही तोवर मी नामानिराळा. मेले ते गेले. काल कोहली किती छान खेळला न तो विचार केला कि मला अलिप्त व्हायला वेळ लागत नाही. पाकिस्तानात झाला न मग जाऊन दे भारतात नाही न, भारतात झाला न मुंबईत नाही न मग जाऊन दे, ठाण्यात झाला न मग बोरिवलीत नाही न मग जाऊन दे, नंतर तो प्रवास ठाणे पश्चिम ते पूर्व अस करत तो प्रवास आपल्या दाराशी नाही न येत तोवर आपण अलिप्त राहतो.

संवेदनांची होळी आपण कधीच करून मोकळे झालो आहोत. कारण धर्माची झापड आपल्या डोळ्यावर इतकी घट्ट बसत चालली आहेत कि आपल्याला प्रकाशात पण अंधाराची सवय लागली आहे. मी काय करू शकतो? ह्याची अनेक उत्तर आहेत. आपल्या परीने शोधली कि सापडतील हि. जातीची , धर्माची , देशाची जोखड निदान स्वतापासून सुरवात करून आपल्या घरापर्यंत थांबवू शकलो तरी खूप काही होईल. जेव्हा जात, धर्म, देश ह्या पलीकडे माणूस म्हणून आपण आधी स्वतला प्रश्न विचारू तेव्हा देशापासून सुरु होऊन दिशे पर्यंत संपणाऱ्या प्रवासाचा उलट प्रवास सुरु होईल. कदाचित तेव्हा मग “ कोणता झेंडा घेऊ हाती”? हा प्रश्न विठ्ठलाला विचारायची गरज भासणार नाही.

कालच्या स्फोटात धर्म, जात, देश न बघता निष्पाप जीव बळी गेले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना आपल्या फसलेल्या धर्माची जाणीव लवकरच झाली असेल अशी अपेक्षा. कारण दुसऱ्या धर्मासाठी खोदलेल्या खड्यात त्याचं धर्म बुडाला आहे हे आपसूक समोर आलच आहे. आज तिकडे आहे उद्या आपल्याकडे असेल तेव्हा थांबवायचं आपल्या हातात नसेल तरी घडवायचं आपण आपल्यापुरती थांबवूया.

No comments:

Post a Comment