Friday 24 June 2016


इन्क्रेडिबल इंडिया - (अंगकोर वाट).... विनीत वर्तक

देऊळाचे द्वारी बघितल्यानंतर अंगकोर मंदिराने मनाचा ताबा घेतल्यागत झाल होत. विकिपीडिया आणि तत्सम लिंक वरून जी माहिती मिळाली ते वाचून तर सर्दच झालो. इतका मोठा अविष्कार तो हि भारतीय संस्कृतीच प्रतिनिधित्व करणारा इतका कसा काय दुर्लीक्षित राहू शकतो. इतकी मोठी प्रतिभा ह्या मंदिरात आहे कि वाचाव तेवढ अजूनच स्तिमित होत जातो. इतक प्रचंड असा सांस्कृतिक वारसा आजही तितक्याच दिमाखाने उभा आहे पण भारतीय त्या बद्दल अगदी अनभिज्ञ आहेत हे बघून क्लेश हि होतोच.

सहज विचार केला आणि एका चित्रकाराला आपण मंदिर चित्रित करायला सांगितल. त्याने ते केल ज्यात आपली संस्कृती दिसेल. आता आपण एका स्थापत्य शास्त्राला बोलावून त्याची खरोखरची मापे करून त्याचा प्लान तयार केला. आता एका गणिती ला बोलावून त्याच काळाच्या, सूर्याच्या, अंतराच्या मापाने प्रूफिंग केल. आता एका अभियंत्याला बोलावून त्याला हे बनवायला सांगितलं. आता कारागिरांना बोलावून जे चित्रकाराने दाखवलं आहे ते जिवंत करायला सांगितल. हे सगळ झाल्यावर कामगारांना हे बांधायला सांगितल. हे करताना अभियांत्रिकीच्या जवळपास सगळ्याच शाखेच्या विद्वान लोकांनी एकत्र येऊन कला, संस्कृती, त्या मंदिराचा आत्मा ह्याला धक्का न पोचवता त्याच निर्माण करायचं. बर नुसत बांधून नाही तर काळाच्या कसोटीवर म्हणजे उन, पाउस, वारा ह्या सोबत वादळ, भूकंप, स्तुनामी अश्या नैसर्गिक आपत्ती चा विचार करून जागा शोधायची. त्या जागे मध्ये तोच खडक, बांधकामाच साहित्य ह्याचा साठा निर्माण करायचा. मंदिर चोहोबाजूने पाण्याने वेढलेल आहे. तेव्हा माती भुसभुशीत होऊन मंदिराच्या वजनाने ते न धसता काळाच्या कसोटीवर उभ राहील हे बघायचं. हे सर्व पेलताना त्याची भव्यता राहिली पाहिजे. (फुटबॉलची तब्बल अडीचशे मैदाने सहज मावतील, एवढे प्रचंड मोठे क्षेत्रफळ असलेले मंदिरआहे. याच्या बाह्यभिंतींचा परीघ चार किलोमीटर आहे.)

इतकच नाही तर काळाच्या परिमाणावर वर पण हे मंदिर अगदी खरे उतरते. मग तो सूर्योदय असो किंवा वर्षातील कोणता दिवस चालू आहे हे अचूक रित्या ओळखण्याची शिल्पा द्वारे केलेली मांडणी असो. किती प्लानिंग आणि र्रीसोर्सेस ह्या साठी लागले असतील. बर त्या काळी कॉम्प्यूटर नसताना सगळी गोळा बेरीज डोक्यात करून मग समोरच्याला ते सांगणे किती अवघड असेल. म्हणजे बघा आपल्या डोक्यात असलेली एक साधी घराची कल्पना सांगण्यासाठी आज किती पर्याय आहेत. फोटो, थ्री डी मोडेल, थ्री डी व्यू ह्या सगळ्याचा उपयोग करू तेव्हा आपण कुठे जाऊन आपल्याला काय हवे आहे हे इंटिरियर डिझायनर ला कळते. तर तेव्हाच्या लोकांनी हे कस केल असेल. राजा च्या मनात असलेली प्रतिकृती तशीच्या तशी उतरवणे आणि हे दिव्य पेलणे म्हणजे प्रचंड अशी कलासाधना आहे. आपल्याला अवगत असेलल्या शास्त्राची ती पूजा आहे त्या शिवाय हे शक्यच नाही.

एक अभियंता असून माझ मन सुन्न झाल. हि भव्यता आज १००० पेक्षा जास्त वर्ष टिकून आहे. हे सगळ उभ केल अवघ्या ३५ वर्षात... आज सगळी टेक्नोलोजी उभी केली तरी ह्या भव्यतेची कलाकृती उभारायला कमीत कमी ६०- ७० वर्षाचा कालावधी लागेल. हे सगळ आम्हा भारतीयांना अजून माहित नाही. अंगकोर ला ४० लाख लोक दरवर्षी भेट देतात. त्यात १० हजार सुद्धा भारतीय नाहीत. हि गोष्टच कुठेतरी प्रचंड लागते. ज्या जगाला आम्ही शून्य दिल. ज्याच जग नाव काढते पण आम्ही मात्र त्याची वाट लावण्यात धन्यता मानतो. ज्यावर एक अमेरिकन बाई २५ वर्ष अभ्यास करून पुस्तक लिहिते पण आपण भारतीय कुठेच नाहीत. एक साधी डोक्युमेंट्री पण ह्यावर नाही हेच बरच काही सांगून जाते. कोहिनूर हिर्या साठी धडपडणाऱ्या आणि भारतीय अस्मितेचा ठेवा म्हणून त्या हिर्याची भिक मागण्यापेक्षा कलेचे, संस्कृतीचे, गणिताचे, विद्वत्तेचे विद्यापीठ असणारे अंगकोर वाट भारताची प्रतिभा जास्ती उजळवते ह्यात शंका नाही. हा वारसा आपण हरवून बसलो आहोत तो मिळवण्यासाठी पुन्हा एकदा अभ्यासाची गरज आहे. जगातील सात आश्चर्यात ताजमहाल सामील व्हावा म्हणून आम्ही वोट करतो पण त्या ताजमहाल पेक्षा १००००% पट प्रतिभा गेले १०० दशके दाखवून ठेवणाऱ्या अंगकोर बद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत हि सगळ्या भारताची शोकांतिका आहे.

काही नाही करता आल तरी ब्यांग्कोक, सिंगापूर, मलेशिया अशी साउथ इस्ट एशिया टूर करून धन्य पावणाऱ्या भारतीयांनी त्याच्याच बाजूला असलेल्या कंबोडिया ला भेट देऊन अंगकोर वाट सोबत तिथल्या मंदिरांबद्दल जाणून घेतल तर खर्या अर्थाने ती सहल इन्क्रेडिबल इंडिया विथ पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ऑफ साउथ इस्ट एशिया अशी होईल

No comments:

Post a Comment