Friday 24 June 2016


विसात एक .. विनीत वर्तक

कालपासून उत्सुकता ताणली गेली होतीच. तब्बल एक - दोन नाही तर २० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करण्यासाठी भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो ने कंबर कसली होती. २००८ ला तब्बल १० उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून इस्रो ने एक जागतिक विक्रम केला होता. त्या नंतर नासा, रशियन स्पेस एजन्सी नि तो मोडला पण तरीही अश्या प्रकारे एकाच रॉकेट मधून वेगवेगळ्या कक्षेतील उपग्रहाना त्यांच्या योग्य त्या कक्षेत स्थापन करणे खरोखर रॉकेट सायन्स म्हणजेच अतिशय किचकट अशी प्रक्रिया आहे.

एकाच रॉकेट च्या सहायाने वेगवेगळ्या वजनाच्या, आकाराच्या, वेगवेगळ्या उपयोगाच्या भारतीय नव्हे तर तब्बल ४ वेगवेगळ्या राष्ट्रांच्या उपग्रहाना त्यांना हव्या असलेल्या कक्षेत स्थापन करणे हे आपल्या रॉकेट डिझाइन च खूप मोठ यश आहे. आपल्या घरातील वस्तू आपण आपल्याला हव्या तश्या किंवा घराला पूरक होतील अश्या डिजाइन करू शकतो. पण दुसर्यांच्या वस्तू आपल्या घरात सामावून घेऊन त्यांना समोरच्याला हव्या त्या ठिकाणी ठेवण जितक कठीण तितकच जगाच्या दोन टोकांवर निर्माण झालेल्या उपग्रहाना एकाच रॉकेट वरून प्रक्षेपित करण.

२० उपग्रहान पेकी १ भारताचा २ भारतातील युनवरसिटी चे त्यातील एक पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग चा स्वयंम तर सत्याबामा स्याट हा सत्याबामा युनवरसिटी चेन्नई चा होता. तब्बल १७ उपग्रह अमेरिका, क्यानडा, जर्मनी, इंडोनेशिया चे होते. १७ उपग्रह कमर्शियल मार्केट मध्ये इस्रो चा वाढत चाललेला दबदबा दाखवून देतात. आत्तापर्यंत १००% यश मिळवणाऱ्या इस्रो ची किमत जगातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अनेक प्रायवेट उपग्रह पाठवणार्या संस्था जश्या एरियन, स्पेस एक्स वगरे ह्यांना प्रचंड अशी स्पर्धा निर्माण होत आहे. एकाच वेळी अनेक उपग्रह पाठवल्याने त्यामागचा खर्च प्रचंड कमी करण्यात इस्रो ला यश आल आहे.

अनेक उपग्रह पाठवताना अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. ह्यातील एक म्हणजे एकाच वेळी सगळ्या उपग्रहांच प्रक्षेपण होऊ नये तसच त्यांची एकमेकांशी टक्कर होऊ नये म्हणून प्रक्षेपित करताना अंतर ठेवावे लागते. तसेच वेगवेगळ्या कक्षेत जाण्यासाठी वेगवेगळ्या अंतरावर अग्निबाण प्रज्वलित होणे गरजेचे असते. समजा ४ उपग्रह ५०० किमी च्या कक्षेत स्थापन केले तर पुढचे ५ कदाचित ५४२ किमी च्या कक्षेत असू शकतात अश्या वेळी अग्निबाण पुन्हा प्रज्वलित होऊन रॉकेट च्या सहायाने उरलेल्या ५ उपग्रह ५४२ किमी च्या कक्षेत नेणे क्रमप्राप्त असते. अग्निबाणाला पुन्हा प्रज्वलित करून पुन्हा बंद करणे हि प्रक्रिया अतिशय जोखमीची असते. कारण हि उंची गाठायला ३-४ सेकंदाच प्रज्वलन फक्त गरजेचे असते. ते हि योग्य वेळेत म्हणजे गाडीच इंजिन नेमक्या वेळी फक्त ४ सेकंद चालू करायचं म्हंटल तर किती कठीण असेल ते हि चावी आपल्या हातात असताना तर मग काहीच कंट्रोल नसताना जमिनीवरून अवकाशात हे इंजिन सुरु करण किती क्लिष्ठ असेल ह्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.

जर उपग्रहांची मांडणी बघितली तर ती वर्तुळाकार स्वरूपात असते. म्हणजे हे २० उपग्रह वर - खाली गोलाकार पद्धतीने ठेवलेले असतात. ह्याचा अर्थ प्रत्येक उपग्रहाला कक्षेत सोडण्यासाठी रॉकेटला स्वताला ओरीयंट करावे लागते. म्हणजे जो उपग्रह सोडणार तो त्या दिशेने वळवावा लागतो. कक्षेची उंची आणि उपग्रहाची दिशा ह्याचा योग्य तो समन्वय साधल्या नंतरच त्याच प्रक्षेपण केल जात. अवघ्या २६ मिनिटात उड्डाण ते सगळ्या उपग्रहांची त्यांच्या कक्षेत मांडणी केली गेली. ह्यावरून किती प्रचंड गुंतागुंतीच्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर हे यश मिळते.

म्हणूनच विसात एक हे यश इस्रो , भारत आणि अवकाश संशोधनाच्या प्रचंड मोठा टप्पा आहे. येत्या काळात पी. एस. एल. व्ही च्या मदतीने एकाच वेळी अतिशय जास्त तफावत असणार्या कक्षेत उपग्रहांची मांडणी करण्याचा इस्रो च संशोधन चालू आहे. त्याच वेळी १००% यशासह पी. एस. एल. व्ही ने भारताची पताका अवकाशात खूप उंचीवर फडकत ठेवली आहे.

No comments:

Post a Comment