Monday 20 June 2022

The Good, the Bad and the Ugly... विनीत वर्तक ©

 The Good, the Bad and the Ugly... विनीत वर्तक ©

१९६६ साली हॉलिवूड मधे The Good, the Bad and the Ugly नावाचा एक चित्रपट आला. क्लिंट इस्टवूड ( द गुड), ली व्हॅन क्लिफ ( द बॅड) आणि एली वॉलाच ( द अग्ली ) यांच्या प्रमुख भुमिका त्यात होत्या. आज या चित्रपटाला ५६ वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. तरीपण या चित्रपटाचा समावेश सार्वकालिक सर्वोत्तम चित्रपटात आणि एकूणच चित्रपटाची दिशा बदलण्यात आजही केला जातो. या चित्रपटात अमेरिकन सिव्हिल वॉर चित्रित केलं गेलं आहे. १८६२ मधील ग्लोरिटा पास इकडे झालेल्या युद्धाची आणि तिथल्या लुटमारीची पार्श्वभूमी यात चित्रित केली गेली आहे. हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी बघितलेला असेल. त्याच कथानक हेच मुळी खूप सुंदर होतं आणि त्याचा लिजेंडरी साउंड ट्रॅक आजही अंगावर रोमांच उभं करतो.  

चित्रपटाची कथा साहजिक तीन व्यक्तिरेखां भोवती फिरते. हे तिघेही दोन लाख अमेरिकन डॉलर किंमत असलेल्या सोन्याच्या खजिन्याचा शोध घेत असतात. सगळ्यात पहिले समोर येतो तो द बॅड. तर या बॅड ला माहित पडते की बिल कार्सन नावाच्या माणसाला या खजिन्याचा पत्ता माहित आहे. तो त्याच्या शोधात निघतो. इकडे द गुड आणि द अग्ली एकत्र मिळून फसवून पैसे कमवत असतात. द अग्ली जरी द गुड सोबत काम करत असला तरी मनातून तो त्याला मारण्याचा विचार करत असतो. अशातच त्यांची गाठ मरणाला टेकलेल्या बिल कार्सन शी पडते. हा बिल कार्सन द गुड च्या कानात त्या सोनाच्या खजिन्याचे रहस्य सांगतो. मग इकडून सुरु होतो एक रोमांचकारी प्रवास ज्यात हे तिघे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. मग याचा शेवट कसा होतो ते चित्रपटात पाहणं उत्तम. 

 The Good, the Bad and the Ugly हा एक चित्रपट नाही तर ती एक दंतकथा आहे. जिने चित्रपट कसा बनवला जाऊ शकतो याची नवीन परिमाणं जगापुढे ठेवली. या चित्रपटानंतर 'वेस्टर्न' हा शब्द हॉलिवूड च्या चित्रपटात आला. आज इतकी वर्ष उलटून गेली तरी या चित्रपटाची जादू काही कमी झालेली नाही. आज  क्लिंट इस्टवूड ने ९२ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाला साज चढवला असेल तर तो हाच चित्रपट होता. 

आज ही हा चित्रपट खूप काही शिकवून जातो. आपल्या आजू बाजूला असेच खूप सारे लोक असतात. द गुड, द बॅड आणि द अग्ली. अनेकवेळा परिस्थितीमुळे किंवा नाईलाजाने आपल्याला त्यांची सोबत करावी लागते. सोबत काम करावं लागते. तिकडेही आपल्यावर प्रत्येक क्षणाला कुरघोडी करण्याचे प्रयत्न आजही लोक करत असतात. अश्या लोकांपासून कसं सावध राहायचं कधी कोणते आणि कसे डावपेच आखायचे आणि शहास प्रतिशह कसा द्यायचा हे आपण ठरवू शकतो. अनेकदा आपल्या आजूबाजूला असणारी माणसं नक्की कोणत्या ग्रुप मधे येतात हे आपण ठरवू शकतो. द गुड , द बॅड का द अग्ली. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment