Wednesday 22 June 2022

सर्वोच्च स्थानाचा संघर्षमय प्रवास... विनीत वर्तक ©

 सर्वोच्च स्थानाचा संघर्षमय प्रवास... विनीत वर्तक ©

लहरों से डर कर नौका पार नहीं होती,

कोशिश करने वालों की हार नहीं होती.... 

सोहनलाल द्विवेदीनी ही सुंदर कविता रचलेली होती. या कवितेतून त्यांनी यश मिळेपर्यंत संघर्ष करण्याची मानसिकता खूप सुंदर शब्दांत गुंफलेली होती. आज या कवितेची आठवण व्हायला निमित्त झालं ते राष्ट्रपती पदासाठी एन.डी.ए. कडून निवड झालेल्या 'द्रौपदी मुर्मू' यांचं. त्यांचा संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास बघितल्यानंतर हे शब्द ओठातून हळूच बाहेर आले. 

परिस्थिती माणसाला कुठे नेऊन ठेवेल याचा अंदाज कोणालाच येत नसतो. १९६५ च्या वक्त चित्रपटात बलराज साहनी यांनी एक फेमस डायलॉग म्हटला होता,

"वक्त ही सबकुछ हैं, वक़्त ही बनाता हैं, और वक़्त ही बिगाड़ता हैं" 

द्रौपदी मुर्मू यांचं संपूर्ण आयुष्य या एका डायलॉगच्या भोवती फिरलेलं आहे. त्यामुळेच भारताच्या सर्वोच्च पदासाठी त्यांची होणारी निवड ही अनेक कारणामुळे विशेष असणार आहे. २० जून १९५८ रोजी मयूरगंज जिल्ह्याच्या बैदापोसी गावात संथाल या आदिवासी जमातीत त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंचायतीमध्ये सरपंच होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळालं असं म्हटलं तर ते योग्य ठरेल. पण त्यांचा राजकीय प्रवास सोप्पा नव्हता. घरची बेताची परिस्थिती यामुळे त्यांनी आपलं शिक्षण हलाखीत पूर्ण केलं. रामादेवी महिला कॉलेजमधून त्यांनी कला शाखेत पदवी घेतली. त्यानंतर त्यांना ओरिसा सरकारच्या इलेक्ट्रिकल आणि जलसिंचन विभागात क्लार्कची नोकरी मिळाली. नंतर त्यांनी अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन सेंटर मधे मानद शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचं लग्न श्यामचरण मुर्मू यांच्याशी झालं. दोन मुलगे आणि एक मुलगी असं हसतं खेळतं कुटुंब असा त्यांचा प्रवास सुरू असताना परिस्थितीने अशी काही वळणं घेतली की त्यात कोणतीही स्त्री कोलमडून जावी. 

१९९७ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ओरिसा राज्यात त्याच वर्षी नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. २००० साली ओरिसा सरकारमध्ये मंत्रीपदाची  शपथ त्यांनी घेतली. २००० ते २००९ मध्ये दोन वेळा आमदार म्हणून त्या निवडून आल्या. २००७ साली त्यांना निलकांता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ओरिसाच्या विधानसभेतील उत्कृष्ट आमदारासाठी हा पुरस्कार दिला जातो. एकीकडे राजकीय जीवनात यशाच्या पायऱ्या चढत असताना व्यक्तिगत आयुष्यात मात्र संकटांची मालिका सुरू होती. आपल्या जोडीदाराचा म्हणजेच श्यामचरण मुर्मू यांचा मृत्यू झाला. त्या धक्यातून सावरत नाही तोवर त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. यातून सावरत नाही तोवर पुन्हा एकदा काळाने एका अपघातात त्यांचा दुसरा मुलगा हिरावून नेला. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एक-दोन नाही तर तीन माणसाचं अचानक जाणं हे त्यांना संपूर्णपणे उध्वस्त करून गेलं. व्यक्तिगत आयुष्यात या अचानक आलेल्या वादळाने खरे तर कोणतीही स्त्री कोलमडून गेली असती, पण द्रौपदी मुर्मू या परिस्थिती पुढे झुकल्या नाहीत उलट अजून कणखर होऊन त्यांनी समाजसेवेत आपलं आयुष्य जगण्याचं नक्की केलं. 

आपलं समाजसेवेचं व्रत भारतीय जनता पक्षातून त्यांनी सुरू ठेवलं. त्यांच्या याच कार्याचा मान ठेवताना २०१५ साली पक्षाने त्यांच्यावर राज्यपाल बनण्याची जबाबदारी दिली. त्या झारखंड राज्याच्या ९ व्या राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि संपूर्ण भारतातून आदिवासी समाजातून राज्यपाल बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. राज्यपाल असताना त्यांनी आपल्या पक्षाने पास केलेला पण आदिवासी लोकांसाठी अडचण ठरणारा जमिनीच्या भाडेकराराचा कायदा रद्द केला. पक्षापेक्षा त्यांनी लोकहिताला आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्यपाल या पदाची शोभा वाढवली. त्यामुळेच ओरिसात बिजू जनता दलाचं सरकार असतानाही मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा त्यांच्या निष्पक्ष कारभाराची स्तुती केली होती. 

२० जून रोजी आपला ६४ वा वाढदिवस आपल्या घरी साजरा करत असताना आपला पक्ष त्यांना भारताच्या सर्वोच्च स्थानावर बसण्याची संधी देणार आहे याची छोटीशी पण कल्पना त्यांना नव्हती. २१ जून २०२२ ला भारतीय जनता पार्टीने त्यांना आपल्या पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली. एका संघर्षमय तितक्याच प्रेरणादायी प्रवासाचं एक वर्तुळ पूर्ण झालं. त्यांच्या नावाला पाठिंबा मिळण्यासाठी अनेक बाजू जमेच्या ठरल्या. एक आदिवासी समाजातून अतिशय कठीण परिस्थितीतून संघर्ष करत केलेला राजकीय प्रवास, स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यात इतके धक्के पचवून सामाजिक कार्याचा घेतलेला ध्यास याचसोबत सर्वांना सामावून घेत निष्पक्षपणे राजकीय निर्णय घेण्याची त्यांची ताकद एकट्या भारतीय जनता पार्टीचा नव्हे तर ओरिसातील जवळपास ३१,००० मतांचं बाहुबल असलेल्या बी. जे. डी. चा पाठिंबा मिळवून गेली. त्यामुळे त्यांचं भारताचं राष्ट्रपती होणं ही केवळ एक औपचारिकता मानली जात आहे. 

द्रौपदी मुर्मू या शांत, संयमी आणि आपलं काम चोख बजावणाऱ्या म्हणून त्यांच्या पक्षात आणि राज्यात ओळखल्या जातात. देशाच्या राजकारणात त्यांचं नाव नवीन वाटलं तरी पक्षाच्या आणि राज्याच्या राजकारणात त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला अगदी हाय कमांड ते विरोधी पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा मिळालेला आहे. येत्या २१ जुलै २०२२ ला भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड सर्वोच्च स्थानाकडे त्यांचा एक संघर्षमय प्रवासाचं अजून एक वर्तुळ पूर्ण करणारी असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment