Thursday 30 June 2022

तेजोमय तेजस... विनीत वर्तक ©

 तेजोमय तेजस... विनीत वर्तक ©

१९८३ मधे भारताला लढाऊ विमानात आत्मनिर्भर करण्यासाठी तत्कालीन सरकारने  Aeronautical Development Agency (ADA) ची स्थापना केली. मग Aircraft Research and Design Centre (ARDC) of Hindustan Aeronautics Limited (HAL) च्या साह्याने Light Combat Aircraft (LCA) हे प्रोजेक्ट हाती घेण्यात आलं. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही अनुभव नसताना अगदी ड्रॉईंग बोर्ड पासून प्रत्यक्षात विमान उतरवण्याच्या या प्रक्रियेला अनेक कारणांनी उशीर झाला. जवळपास २८ वर्षाच्या कालावधी नंतर तेजस ला पहिल्यांदा उड्डाणासाठी प्राथमिक मान्यता मिळाली. नंतर अनेक चाचण्या आणि बदलातून जात २०१९ साली तेजस ला लढाईसाठी सज्ज असल्याचं प्रमाणपत्र किंवा ज्याला फायनल क्लिअरन्स म्हणतात तो मिळाला. या २८ वर्षात तेजस अनेक बदलातून अजून तेजोमय होत गेलं आणि २०२२ येईपर्यंत त्याच्या श्रेणीतील एक तुल्यबळ असं लढाऊ विमान म्हणून त्याच नाव आज जागतिक बाजारपेठेत घेतलं  जाते.  

तेजस विमानांच्या तीन श्रेणी आज बनत आहेत. त्यात तेजस एम. के. १, तेजस एम. के. १ ए आणि ट्रेनर. तेजस ची निर्मिती भारताने मुख्यतः मिग २१ विमानांना बदलण्यासाठी केली गेली आहे. भारतीय वायू सेनेने ४० एम. के. १, ७० एम. के. १ आणि १० ट्रेनर विमानांची ऑर्डर एच.ए.एल. दिलेली आहे. भारतीय वायू सेनेची गरज पूर्ण करताना आता तेजस ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या कर्तृत्वाची छाप सोडायला सुरवात केली आहे. भारताने आपलं तेजस विमान हे लढाऊ विमानांच्या बाजारात पूर्ण क्षमतेने उतरवताना तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याचा पर्याय ही उपलब्ध केला आहे. 

याचाच एक भाग म्हणून एच.ए.एल. ने इजिप्त मधे तेजस विमान निर्मितीचा कारखाना उघडण्याची तयारी दर्शवली आहे. इजिप्त सध्या त्याच्या जुन्या झालेल्या ट्रेनर विमानांना बदली करण्यासाठी जवळपास ७० विमानांच्या खरेदीसाठी उत्सुक आहे. यात भारताचं तेजस सगळ्यात पुढे आहे. गेले काही महिने इजिप्त चे अधिकारी आणि भारताचे अधिकारी यांच्यात या बद्दल चर्चा होत असून येत्या काही दिवसात इजिप्त एअरफोर्स चे बडे अधिकारी या निमित्ताने भारतात एच.ए.एल. च्या तेजस असेम्ब्ली लाईन ला याच निमित्ताने भेट देणार आहेत. त्यांना तिकडे एकूणच तेजस ची निर्मिती कश्या प्रकारे केली जाते आणि त्याचा मेन्टनन्स कश्या प्रकारे केला जातो हे दाखवण्यात येणार आहे. एच.ए.एल. ने तेजस सोबत Advanced Light Helicopter (ALH) आणि Light Combat Helicopter (LCH) ची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ही इजिप्त पुढे ठेवला आहे.

इजिप्त ला भारताच लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर केंद्र बनवण्याच्या दृष्टीने भारताने ही पावलं टाकली आहेत. एकीकडे ७० लढाऊ विमानांची ऑर्डर मिळवायची आणि त्याच सोबत इजिप्त मधून मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिकन देशांच्या बाजारात शिरकाव करून तेजस ला हुकमी एक्का बनवण्याची ही चाल आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीत अमेरिका, फ्रांस, रशिया आणि युरोपियन देश पुढे असले तरी जगातील प्रत्येक देशाला त्यांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. चीन कडून घेतलेल्या विमानांचा भरवसा नाही अश्या वेळी स्वस्त पण त्याच वेळी जागतिक दर्जाची लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर जर कोणी देत असेल तर तो भारत आहे. अशी स्वस्त पण भरवसा असणारी विमान आणि हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी अनेक आफ्रिकन आणि मिडल ईस्ट देश तयार आहेत. साधारण ४२ मिलियन अमेरिकन डॉलर किंमत असणारं तेजस हे त्याच्या श्रेणीतील सगळ्यात स्वस्त लढाऊ विमान आहे.  Uttam AESA Radar, DARE Unified Electronic Warfare Suite (UEWS), self protection jammer (SPJ),  instrument flight rules (IFR) आणि त्याच्या जोडीला  Astra BVRAAM and ASRAAM सारखी जागतिक दर्जाची मिसाईल घेऊन येणाऱ्या तेजस तेज अजून तेजोमय झालं आहे. 

मलेशिया आणि भारत यांच्यामध्ये सुद्धा तेजस खरेदी कराराची बोलणी अंतिम टप्यात असल्याचं बोललं जात आहे. मलेशियासाठी भारताने संपूर्ण पॅकेज डील दिलेलं असून तेजस विमानांची देखभाल, त्यांचा मेन्टनन्स सोबत सुखोई ३० विमानांचे सुटे भाग देण्याचं ही स्पष्ट केलेलं आहे. मलेशिया ला जवळपास ३६ लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हवे आहेत. भारताचं तेजस आणि तुर्की च हुरजेट यांच्यात मुख्य लढत आहे. तुर्कीच्या विमानाने अजूनही आपल्या क्षमता दाखवलेल्या नाहीत. त्या कागदावर आहेत. त्याचवेळी भारताच्या तेजस ने सिंगापूर एअर शो मधे आपला जलवा दाखवलेला आहे. भारतासोबत करार करण्याची अजून एक जमेची बाजू म्हणजे मलेशिया च्या सुखोई ३० विमानांची देखभाल करण्याची जबाबदारी ही भारत उचलणार आहे. भारताला गेलं दशकभर सुखोई ३० विमानांची देखभाल करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मलेशिया च्या सुखोई ३० विमानांना हवेत उडत राहण्यासाठी भारताची मोलाची मदत होणार आहे. भारत एक तेजस मलेशिया ला जवळपास ५० मिलियन अमेरिकन डॉलर मधे विकणार आहे. तर संपूर्ण करार हा ९०० मिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. 

तेजस च्या निर्मितीत भारताने अनेक वर्ष वाया घालवली असली तरी त्याच आंतरराष्ट्रीय बाजारात केलेलं योग्य सादरीकरण तेजस च तेज हळूहळू वाढवत आहे. मलेशिया आणि इजिप्त सोबत जर हे करार झाले तर तेजस ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे याबद्दल कोणाचं दुमत नसेल. तसेच या करारांमुळे भारताला खूप मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन तर उपलब्ध होणार आहेच पण त्याच सोबत आत्मनिर्भरतेकडे भारताने अजून एक पाऊल पुढे टाकलेलं असेल. तेजस च्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व अभियंते, वैज्ञानिक, कर्मचारी या सर्वाना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment