#अवकाशाचे_अंतरंग भाग ४... विनीत वर्तक ©
आपण पृथ्वीवरच्या भांडणात आणि अडचणीत व्यस्त आहोत तेव्हा या विश्वाच्या दुसऱ्या ग्रहावर मानवाने घेतलेली एक उंच उडी करोडो वर्ष आधी अस्तित्वात असलेल्या दुसऱ्या ग्रहावरच्या जीवसृष्टीचा शोध घेत आहे. हा दुसरा ग्रह म्हणजेच पृथ्वीचा शेजारी 'मंगळ'. सध्या नासा च पर्सीवरंस रोव्हर डेल्टा नदीच्या पात्रात असलेल्या जेझोरो नावाच्या खड्यात सजीवसृष्टीचा शोध घेत आहे. पर्सीवरंस रोव्हर मंगळावर फेब्रुवारी २०२१ मधे उतरवलं गेलं. आपल्यापैकी अनेकांनी ते उतरताना लाईव्ह बघितलं ही असेल. तर एका वर्षापेक्षा जास्त काळ मंगळावर या रोव्हर ने जवळपास ११ किलोमीटर चा प्रवास केला आहे. आता त्यांने आपल्या महत्वाच्या कामाला सुरवात केली आहे. करोडो वर्षापूर्वी मंगळावर पाणी होतं. मंगळावर सुद्धा पृथ्वी प्रमाणे नद्या होत्या. त्यातील एक म्हणजेच डेल्टा नदी.
मंगळ हा करोडो वर्षाआधी सुर्याच्या हॅबिटायटल झोन मधे होता. ( हॅबिटायटल झोन म्हणजे सूर्यापासून असं अंतर की जिकडे तापमान खूप जास्त पण नसेल आणि खूप कमी पण नसेल. पाणी हे द्रवरूपात असू शकेल.) पण खगोलीय घटनांमुळे तो सूर्याच्या हॅबिटायटल झोन पासून लांब गेला आणि मंगळाच्या विरळ वातावरणामुळे तिथे असलेलं पाणी वाफ होऊन अवकाशात लुप्त झालं. आज मंगळावर पाणी नदीच्या स्वरूपात नसलं तरी त्या पाण्यामुळे निर्माण झालेलं नदीचं पात्र हे अस्तित्वात आहे. आपल्याला माहित आहे की पाणी आपल्या सोबत अनेक गाळ आणि अनेक गोष्टी वाहून आणत असते. ज्याला तांत्रिक भाषेत सेडीमेंट्री डिपोझिशन असं म्हणतात. त्यातच जीवन असण्याच्या शक्यता खूप जास्ती असतात. याच कारणामुळे नासाने आपलं पर्सीवरंस रोव्हर हे डेल्टा नदीच्या पात्रात उतरवलेलं आहे.
तर या पर्सीवरंस रोव्हर ने अनेक शोधांची मालिका सुरु केलेली आहे. त्याच्या या प्रवासात काही अचंबित करणाऱ्या घटना ही समोर आल्या आहेत. २८ मे २०२२ ला या रोव्हर ने एक ५ सेंटीमीटर भागातील माती बाजूला करून आत असलेल्या दगडाचा वेध घेण्यासाठी तयारी केली आहे. ( खाली दिलेल्या फोटोत ही जागा आपण बघू शकतो ) वैज्ञानिकांच्या मते इकडे सेडीमेंट्री डिपोझिशन स्पष्टपणे दिसत असून यात जीवन असण्याच्या किंवा त्याचे काही धागेदोरे मिळण्याच्या शक्यता खूप वाढलेली आहे. भारतीयांसाठी यात अभिमानाची गोष्ट अशी या मातीच्या संशोधनाचं सारथ्य एक भारतीय- ब्रिटिश वैज्ञानिक करत आहेत. संजीव गुप्ता असं या वैज्ञानिकांचे नाव आहे. त्यांचा जन्म भारतातील आग्रा इकडे झालेला असून वयाच्या ५ व्या वर्षी त्यांच कुटुंब इंग्लंड मधे स्थायिक झालं. संजीव गुप्ता हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जिऑलॉजिस्ट असून त्यांच्यावर मंगळाच्या मातीच्या नमुन्यात जीवन शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पर्सीवरंस रोव्हर हे तब्बल ३ बिलियन अमेरीकन डॉलर खर्च करून बनवलेलं मानवाच्या तांत्रिक क्षमतेचा एक अत्युच्य अविष्कार आहे. यात ४३ मातीचे नमुने भरता येतील अश्या पेन्सिल च्या आकाराच्या ट्यूब आहेत. यातील जवळपास ३० ट्यूब नासा पुन्हा पृथ्वीवर २०३० ते २०३३ पर्यंत पृथ्वीवर परत आणणार आहे. यासाठी तब्बल ५ बिलियन अमेरीकन डॉलर खर्च करून दोन यान युरोपियन युनियन च्या साह्याने बनवण्यात येत आहेत. यातील एक यान मंगळावर उतरून पर्सीवरंस रोव्हरच्या पोटात असलेल्या ३० ट्यूब घेऊन मंगळाच्या कक्षेत उड्डाण करेल. दुसरं यान जे मंगळाच्या कक्षेत असेल त्याच्याशी जुळून मग ते त्याच्याकडे सुपूर्द करेल. मग हे दुसरं यान हे अतिशय महत्वाचे मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरेल. या नमुन्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी एका भारतीय- ब्रिटिश वैज्ञानिकाकडे देण्यात आलेली आहे.
पर्सीवरंस रोव्हर ने आपल्या प्रवासात वर लिहिलं तसं काही अचंबित करणाऱ्या गोष्टी शोधल्या आहेत. त्यातील एक म्हणजे थर्मल ब्लॅंकेट चा एक तुकडा मंगळाच्या दगडांमध्ये अडकलेला पर्सीवरंस रोव्हरच्या कॅमेराने टिपला आहे. ( फोटो मधे आपण अडकलेला हा तुकडा मंगळाच्या दगडांमध्ये बघू शकतो) मंगळावर उतरताना वापरण्यात आलेल्या स्पेस सूट च्या थर्मल ब्लँकेट चा हा तुकडा असल्याचं नासा ने स्पष्ट केलं आहे. अनेकांनी मंगळावर पण माणसाने घाण करायला सुरवात केली असं म्हणून नासाची खिल्ली ही उडवली आहे. मंगळावर आज पर्यंत कोणताही मानव उतरला नसताना मानव निर्मित असा तुकडा कसा काय मंगळावर पोहचला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
पर्सीवरंस रोव्हर नुकतीच अजून एक अचंबित करणारं दृश्य टिपलेले आहे. एका दगडाच्या शिळेच्या टोकावर एक गोलाकार दगड (साधारण फुटबॉल च्या आकाराचा) रोव्हर च्या कॅमेरा ने टिपलेला आहे. ( खाली फोटोत हा दगड आपण बघू शकता ) नासाच्या मते हा दगड अश्या पद्धतीने तब्बल ३ बिलियन वर्षापेक्षा अधिक काळ तिकडे अश्या स्थितीत आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा एलियन च्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण अश्या पद्धतीने दगड नैसर्गिकरित्या राहण्याची शक्यता अतिशय विरळ आहे. अनेकांनी एलियन ने हा ठेवलेला असू शकतो हा सूर ही आवळलेला आहे. पण या सर्व शक्यता नासाने फेटाळून लावल्या आहेत. पर्सीवरंस रोव्हर ने आपल्या पोटात इंजेन्यूटी नावाचं एक छोटे हेलीकॉप्टर ही नेलेलं होत. या हेलिकॉप्टर ने २८ वेळा मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मात्र या हेलिकॉप्टर चा पर्सीवरंस रोव्हर शी संपर्क तुटलेला आहे. मंगळावर आलेल्या धुळीच्या वादळामुळे या हेलिकॉप्टर च्या सौर पॅनल धुळीने झाकला गेला आणि ऊर्जा निर्मिती थांबल्याने याचा संपर्क पर्सीवरंस रोव्हरशी तुटलेला आहे. पण तरीही या हेलिकॉप्टर ने फक्त ५ उड्डाण भरण्यासाठी याची निर्मिती केली गेली होती. प्रत्यक्षात २८ उड्डाण करून याने त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त चांगली कामगिरी केली आहे.
येत्या काळात पर्सीवरंस रोव्हर मंगळाच्या भूतकाळाचे अनेक पडदे उघडेल अशी आशा नासाने व्यक्त केली आहे. तब्बल २०२ मिलियन किलोमीटर लांबून मानवाने बनवलेल्या या गोष्टी आज जीवनाचा शोध इतर ग्रहावर घेत आहेत. यातील किचकट बाबी जरी नाही कळल्या तरी मानवाच्या या तांत्रिक क्षमतांना समजून घेऊन ती प्रत्यक्षात उतरावणाऱ्या अनेक अनाम संशोधकांच आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण या सिद्धी एका दिवसात मिळत नाहीत. त्यासाठी कधी कधी आयुष्य खर्ची घालावी लागतात. त्या सर्व अनाम संशोधकांना माझा कडक सॅल्यूट.
क्रमशः
फोटो शोध सौजन्य :- नासा - जे. पी. एल. ( Jet Propulsion Laboratory), गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment