Sunday 5 June 2022

आत्मनिर्भर भारत... विनीत वर्तक ©

 आत्मनिर्भर भारत... विनीत वर्तक ©


अवकाश संशोधनात भारत हा इतर देशांच्या तुलनेत गेली काही दशके मागे होता. त्याला योग्य अशी कारणे ही नक्कीच आहेत. पण येत्या काळात भारत निर्माण झालेली ही दरी झपाट्याने कमी करत आहे. नक्कीच अजून खूप मोठा पल्ला बाकी आहे. नेहमीप्रमाणे नको त्या विषयांच भांडवल करण्यात रमलेल्या मिडीयाला अश्या गोष्टी कधीच दृष्टीक्षेपात येत नाही ही खेदाची बाब आहे. अवकाशाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी भारताने आता एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे पुढे टाकलं आहे. आशियातील पहिला आणि सगळ्यात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप भारतात कार्यंवित झाला आहे. एक भारतीय म्हणून आपल्याला नक्कीच याचा अभिमान असायला हवा. त्याच सोबत हा लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणजे काय? त्याचा काय उपयोग? त्यातून भारत अवकाशाच्या अंतरंगात कसे शोध लावणार आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे.

लिक्विड मिरर टेलिस्कोप म्हणजे काय? त्याचे नफे आणि तोटे?

अवकाशाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी गरजेचा असतो तो टेलिस्कोप. टेलिस्कोप अवकाशाच्या अनंत पोकळीतून येणारे प्रकाश किरण एका ठिकाणी परावर्तित आणि केंद्रित करून त्याला मोठं करून मग त्यात आपल्याला डोकावता येते. हे आपण शाळेत शिकलो आहोत. यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आरसा. अवकाशातून येणारे हे प्रकाशकिरण परावर्तीत करण्यासाठी त्याला एका ठिकाणी केंद्रित करण्यासाठी आरसा हा अतिशय महत्वाचा आहे. साधारण टेलिस्कोप जे जगात आहेत. त्यात काचेपासून आरसा बनवला जातो. याचा पृष्ठभाग अतिशय समतल आणि ज्याला स्मूथ म्हणता येईल असा असणं गरजेचं असते. तसेच हा आरसा पॅरॅबोलिक असतो. कारण पॅरॅबोलिक पद्धतीत प्रकाशकिरण एका ठिकाणी आपण केंद्रित करू शकतो.

काचेपासून अतिशय अचूकतेने बनवलेल्या आरश्यांवर अल्युमिनियम किंवा चांदीचं आवरण देण्यात येत. तपमान आणि इतर घटकांमुळे एकसंध काच न वापरता त्याचे तुकडे एकत्र जुळवून एक मोठा आरसा तयार केला जातो. आता या सगळ्या तुकड्यांवर वातावरण, तापमान, आद्रता या सर्वांचा परिणाम होत असतो. त्यामुळेच हा आरसा बनवणं, त्याची देखभाल करणं अतिशय खर्चिक काम आहे. थोडीशी चूक आणि तुमचा टेलिस्कोप अक्षरशः आंधळा होतो. (जगप्रसिद्ध हबल दुर्बिणीत अशीच एक चूक झाली. या चुकीची जाडी आपल्या एका केसाच्या जाडी इतकीच होती. पण त्यामुळे हबल अक्षरशः आंधळी झाली. त्यावर मिशन पाठवून मग ही चूक दुरुस्त केल्यावर हबल ने विश्वाचा वेध घ्यायला सुरवात केली. ) साधारण  अश्या पद्धतीच्या टेलिस्कोप चा खर्च १० मिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात जातो. ( १ मिलियन = १० लाख). इतका खर्च करून यात जर काही त्रुटी राहिली तर सगळी मेहनत पाण्यात जाते. मग यावर उपाय काय?

१८५० मधे इटालियन खगोलशास्त्रज्ञ एर्नेस्टो कॅपोसी याने न्यूटन आणि इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनाला धरून एक नवीन संकल्पना मांडली. त्याने असं म्हंटल की कोणत्याही द्रवरूपात असणाऱ्या गोष्टीचा पृष्ठभाग हा नेहमीच इक्विलिब्रियम मधे असतो. (आपण शाळेच्या भौतिकशास्त्रात हे शिकलेलो आहोत.) आता समजा तुम्ही त्या द्रवरुपाला गोल फिरवायला सुरवात केली. तर त्या लिक्विड वर दोन बल काम करतात. एक म्हणजे गुरुत्वाकर्षण ज्यामुळे त्या लिक्विड चा पृष्ठभाग खाली दाबला जातो. दुसरं म्हणजे केंद्रप्रसारक बल ( सेन्ट्रिफ्युगल फोर्स) यामुळे ते बाजूकडे ढकललं जाते. याचा अर्थ काय तर एखाद्या भांड्यात आपण लिक्विड भरून त्या भांड्याला जर गोल गोल फिरवत ठेवलं तर एक अतिशय अचूक आणि समतल असा पॅरॅबोलिक पृष्ठभाग तयार होतो. जो आपल्याला कोणत्याही टेलिस्कोप साठी अतिशय गरजेचं आहे. समजा आपण यात पारा ठेवला तर आपल्या दोन्ही गोष्टी अतिशय सहजतेने शक्य होतात. एक म्हणजे पॅरॅबोलिक पृष्ठभाग आणि दुसरं म्हणजे प्रकाशाचं परावर्तन करणारा पृष्ठभाग. यालाच म्हणतात 'लिक्विड मिरर टेलिस्कोप'.

लिक्विड मिरर टेलिस्कोप मुळे अतिशय उच्च क्षमतेचा टेलिस्कोप सर्वसाधारण काचेच्या क्षमतेचा अवघ्या १/१० किमतीत तयार होऊ शकतो. भारतीय वैज्ञानिकांनी समुद्र सपाटीपासून २४५० मीटर हिमालयाच्या शिखरांवर बेल्जीयम, कॅनडा, उझबेकिस्तान, पोलंड या देशांच्या साह्याने  Devasthal Observatory campus इकडे  Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES), नैनिताल, उत्तराखंड इकडे कार्यंवित केला आहे. वर्षातले दोन महिने सोडले तर पुढली ५ वर्ष हा टेलिस्कोप अवकाशाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. लघुग्रह, सुपरनोव्हा, अवकाशातील कचरा अश्या सगळ्या गोष्टी याच्या नजरेत बंदिस्त होणार आहेत. हिमालयाच्या उत्तुंग शिखरावरून आत्मनिर्भर भारताची पहिली नजर अवकाशात पडणार आहे.

लिक्विड मिरर टेलिस्कोप चे काही तोटे ही आहेत. वर सांगितलं तसं यात पारा एका भांड्यात ठेवून त्याला गोल फिरवत ठेवावं लागते. आता आपण ते भांड किती तिरकं करू याला मर्यादा आहेत. कारण जास्ती तिरप केलं की त्यातील पारा हा बाहेर सांडणार. याचा अर्थ हा अवकाशातील त्याच्या डोक्यावर असणाऱ्या भागाचा फक्त वेध घेऊ शकतो. आजूबाजूचं, क्षितिजावरच आकाश याच्या टप्यात येणार नाही. पारा हा अतिशय विषारी धातू आहे. त्यामुळे त्याच्या सोबत काम करताना अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे. खूप वर्ष पाराच्या सानिध्यात राहिल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. भारताच्या लिक्विड मिरर टेलिस्कोप मधे साधारण ५० लिटर म्हणजे ७०० किलोग्रॅम वजनाचा पारा वापरण्यात आलेला आहे.

आशियातील सगळ्यात मोठा लिक्विड मिरर टेलिस्कोप उभारणं, त्याच तंत्रज्ञान आत्मसात करून भारताच्या भूमीवरून अवकाशाचा वेध घेता येणं ही घटना नक्कीच समस्त भारतीयांसाठी अभिमानाची आहे. त्यामुळेच या कार्यात आपला सहभाग देणाऱ्या सर्व वैज्ञानिक, संशोधक, संस्था यांच मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment