Wednesday 8 June 2022

#टपरीवरच्या_बातम्या ८... विनीत वर्तक ©

 #टपरीवरच्या_बातम्या ८... विनीत वर्तक  ©


भारताने दोन दिवसांपूर्वी अग्नी ४ या आय.आर. बी. एम. म्हणजेच intermediate-range ballistic missile (IRBM) ची यशस्वी चाचणी केली. अग्नी ४ च्या या चाचणीने नक्की काय साधलं? मुळात अग्नी सिरीज मधील क्षेपणास्त्र का महत्वाची आहेत? हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

अग्नी मिसाईल सिरीज ची सुरवात होण्यामागे चीन ने या क्षेत्रात केलेली प्रगती कारणीभूत होती. ६० च्या दशकात चीन ने रशियाच्या साह्याने आण्विक क्षमता मिळवली होती. भारताला आण्विक क्षमता मिळवायला ७० च दशक उगवावं लागलं. चीन ने तोवर या क्षेत्रात चांगल्या नेतृत्वामुळे खूप प्रगती केली होती. भारत मात्र शांतीचा पुरस्कर्ता म्हणून या बाबतीत गाफील राहिला. त्यामुळेच जेव्हा चीन ने १९८० ते ९० च्या दशकात मिसाईल तंत्रज्ञानात उंच उडी घेतली. तेव्हा भारताचे धाबे दणाणले. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह द्यायचा असेल तर भारताने ही सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून पुढे येण्याची गरज होती. भारतासमोर असलेलं हे आव्हान डी.आर. डी.ओ. चे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ओळखलं. त्यांनी राजकीय नेतृत्वाला याची जाणीव करून दिल्यावर भारताने मिसाईल तंत्रज्ञानावर काम करायला सुरवात केली. भारताच्या या प्रोजेक्ट ला निसर्गातील ५ तत्वांपैकी एक असणाऱ्या 'अग्नी' च नाव दिलं गेलं.

अग्नी मिसाईल तंत्रज्ञान हे टप्याटप्याने विकसित करण्यात आलं. या सिरीज मधील पहिलं मिसाईल अग्नी १ ची पहिल्यांदा १९८९ मधे चाचणी करण्यात आली. सुरवातीला याची क्षमता ७०० ते २००० किलोमीटर च्या टप्यात मारा करण्याची होती. याच्या नंतरच्या स्टेज मधे अग्नी २, अग्नी ३, अग्नी ४, अग्नी ५ आणि अग्नी ६ सोबत अग्नी प्राईम विकसित करण्यात येत आहेत. अग्नी मिसाईल हे पारंपरिक वॉरहेड सोबत आण्विक वॉरहेड नेण्यास सक्षम आहे. त्यामुळेच चीनवर अंकुश ठेवण्यासाठी अग्नी सिरीज ची मिसाईल ही भारतासाठी अतिशय महत्वाची आहेत.

दोन दिवसांपूर्वी भारताने अग्नी सिरीज मधील अग्नी ४ या मिसाईल ची रात्री चाचणी घेतली. ही चाचणी युझर ट्रायल चा एक भाग होती. याचा अर्थ हे मिसाईल जी लोक आणि ज्या संस्था वापरणार त्यांना त्याच्या क्षमता बघण्यासाठी आणि मिसाईल कितपत चाचण्यात खरं उतरते हे बघण्यासाठी होती. अग्नी ४ हे मिसाईल वर लिहिलं तसं intermediate-range ballistic missile (IRBM) आहे. हे मिसाईल ८००-१००० किलोग्रॅम वजनाच पारंपरिक किंवा आण्विक वॉरहेड ४००० किलोमीटर वर नेण्यास सक्षम आहे. आता झालेल्या चाचणीत या मिसाईल ने ४००० किलोमीटर वरील आपलं लक्ष्य १०० मीटर अंतराच्या आत वेधलं आहे. या शिवाय या मिसाईल मधे फक्त आण्विक वॉरहेड नव्हतं. बाकी सगळ्या प्रणाली या खऱ्या होत्या. रात्रीच्या वेळी अंधारात यातील सर्व प्रणालींनी अचूक काम करत ही चाचणी यशस्वी केली आहे. हे मिसाईल मधे आधीपेक्षा अनेक बदल करण्यात आले होते. यात कंपोझिट मटेरियल तसेच आधुनिक मोटर प्रणाली आणि लेझर गायडेड नेव्हिगेशन प्रणाली पहिल्यांदा वापरण्यात आली होती. यामुळे याच वजन तर कमी झालच पण त्याचसोबत त्याच्या अचूकतेत वाढ झाली आहे.

अग्नी ५ हे मिसाईल सुद्धा डिप्लॉयमेंट च्या एडव्हान्स स्टेज मधे आहे. याच्या पण युझर ट्रायल लवकरच सुरु होतील. अग्नी ५ ची क्षमता जाणून बुजून भारत कमी सांगतो आहे. अनेक रक्षा विशेतज्ञ खाजगीत हे सांगतात की अग्नी ५ तब्बल ८००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे. डी.आर.डी.ओ. अग्नी ६ च ही निर्माण करत असून याची क्षमता तब्बल १२,००० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची असणार आहे. ३००० किलोग्रॅम वजनाचे १० वेगवेगळे (Multiple Independent Reentry Vehicle) आण्विक वॉरहेड नेण्याची याची क्षमता असणार आहे.  एक मिसाईल डागल्यावर आपण १० वेगवेगळ्या लक्ष्यांवर आण्विक हल्ला एकाच वेळी करू शकणार आहोत.

अग्नी च्या चाचणीने भारताने आपण कोणत्याही स्थितीसाठी तयार असल्याचं जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. गेले काही महिने भारत सातत्याने मिसाईल च्या चाचण्या करत आहे. ब्राह्मोस, अग्नी अश्या जगातील सर्वोत्तम मिसाईल तंत्रज्ञानाच्या या चाचण्या भारताचं जागतिक स्थान अधिक मजबूत करत आहेत. या चाचण्यांमागे असणाऱ्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कर्मचारी, डी.आर.डी.ओ., भारत डायनॅमिक लिमिटेड तसेच त्यांच्या उपकंपन्या, कन्सल्टन्ट आणि इतर कंत्राटदार यांच खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या पुढल्या कार्याला शुभेच्छा

जय हिंद !!!

 
फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



 

No comments:

Post a Comment