Thursday, 2 June 2022

जरा हटके... विनीत वर्तक ©

 जरा हटके... विनीत वर्तक ©

कालच कोणीतरी स्वतःशी लग्न केल्याची बातमी वाचली. खरे तर अश्या बातमी आणि गोष्टी वाचल्या की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. अश्या गोष्टी प्रतिक्रिया देण्याच्या लायकीच्या ही नसतात. समाज किंवा एकूणच त्याचे प्रतिनिधित्व करणारी आपल्या सारखी माणसं 'जरा हटके' करणाच्या नादात स्वतःला हरवत चाललो आहोत असं मनापासून मात्र वाटत रहाते . कालच उदाहरण समाजात सद्य स्थितीला घडणाऱ्या अश्या अनेक गोष्टींपैकी एक होतं. काहीतरी वेगळं, हटके करणाच्या नादात आपण एकूणच आपल्या आयुष्यात गुंता वाढवत चाललेलो आहोत याच भान त्या व्यक्तींना आणि एकूणच समाजाला राहिलेलं नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. 

लग्न ही संकल्पना समाजात दोन विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीने एकत्र राहण्यासाठी केलेली एक समाजमान्य रचना आहे. त्यात काळाप्रमाणे बदल झाले आणि होत आहेत. त्यात चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही बाजू आहेत. पण त्या संकल्पनेला छेद देऊन स्वतःशी लग्न करण्याचा प्रकार मला व्यक्तिशः हास्यास्पद वाटला. लग्न या संकल्पनेवर एकतर विश्वास असतो किंवा नसतो. या दोन्ही बाजू बरोबर ही असतात. त्यात काही वावगं नाही. पण स्वतःशीच लग्न करून नक्की काय दाखवण्याचा अट्टहास होता हे मात्र समजलं नाही. लग्न या संस्थेवर विश्वास नसेल तर अजून अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एकटं राहणं, लिव्ह इन, म्युच्युअल रिलेशन आणि इतर. पण जर लग्न ही संकल्पना मान्य असेल तर त्या संकल्पनेत बसणाऱ्या व्याख्येशी म्हणजेच विरुद्ध लिंगी व्यक्तीशी किंवा अगदीच वेगळं हवं असेल तर समलिंगी व्यक्तीशी ते करणं इथवर समजू शकतो. पण स्वतःशीच लग्न करण्याची संकल्पना मला मात्र विकृत आणि जरा हटके च्या पठडीमधील वाटली. 

आजकाल समलिंगी होणं हा जरा हटके चा भाग झाला आहे. समलिंगी असणं आज स्टेटस सिम्बॉल किंवा लक्षवेधी म्हणून प्रसिद्ध झालं आहे. त्यात मोठेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा गर्व आणि माज एक प्रकारे दिसून येतो आहे. समलिंगी असणं हे नैसर्गिक दृष्ट्या काही लोकांच्या बाबतीत होऊच शकते. त्यात कमीपणा अथवा त्या बद्दल न्यूनगंड बाळगण्याचं कारण ही नाही. पण आजकाल जरा हटके म्हणून समलिंगी होण्याकडे स्वतःला प्रगल्भ म्हणवणारा पांढरपेशा समाज वाटचाल करत आहे. आधी थ्रिल म्हणून गुरुद्वारातून शारिरीक संबंध मग त्याचा ही कंटाळा आला की समलिंगी संबंध आणि आता तर तसं असणं हे स्टेटस सिम्बॉल बनत आहे. गे किंवा लेस्बियन असणं म्हणजे आपण कोणीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा अट्टाहास आता केला जात आहे. त्यासाठीच तश्या पार्टीज, हॉटेल, क्लब आणि मिटिंग हळूहळू समाज व्यवस्थेचा भाग बनलेल्या आहेत. हे आपल्यापासून खूप लांब नाही. अगदी हाकेच्या अंतरावर या गोष्टी आपल्या घरापासून येऊन पोहचलेल्या आहेत. 

दारू आणि सिगरेट आता सवयीची झालेली आहे. त्यामुळेच जरा हटके म्हणून गांजा ओढण्याची फॅशन आता नावारूपाला आलेली आहे. कधीतरी मज्जा तर मज्जेची व्याख्याच आजकाल ड्रग्स, एल.एस.डी., कोकेन या गोष्टी झालेल्या आहेत. एका सिगरेट ने अथवा एका पफ ने काही होत नाही म्हणून झालेली सुरवात जरा हटके म्हणून अंगवळणी पडलेली असल्याचं चित्र आता स्पष्ट होते आहे. सुट्टी किंवा मजेची व्याख्या आता दारू पिऊन नशेत झिंगण आणि त्यात कोणाला तरी त्रास देणं किंवा अगदी बलात्कार सारख्या गोष्टी सहजरीत्या करणं हे स्टेटस सिम्बॉल बनू पाहत आहे. दारू पिण्याची मज्जा आता तुम्ही किती रिचवू शकता यावर उभी रहात आहे. एक खंबा ते दोन खंबे रिचवणं आज एखाद्याला त्याची प्रतिष्ठा किंवा पुरुषार्थाची व्याख्या वाटत आहे. हे सगळं जरा हटके पद्धतीने दाखवण्याची झिंग चढलेली आहे. 

प्री वेडिंग फोटो, प्री प्रेग्नन्सी फोटो किंवा अगदी मधुचंद्राचे फोटो काढणं ते सोशल मिडिया वर शेअर करून त्याची एक प्रकारे जाहिरात करणं किंवा मी आणि माझा जोडीदार किती आनंदात आहोत आणि एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आहोत याचं समाधान लोकांच्या लाईक आणि कमेंट वरून शोधण्याचा एक नवीन प्रकार जरा हटके म्हणून प्रसिद्धीला आलेला आहे. खरे तर वरील सर्व घटना आणि क्षण हे खूप खाजगी किंवा फारफारतर आपल्या कुटुंबा पर्यंत मर्यादित असायला हवेत. पण आज ते लोकांना आणि समाजाला दाखवून देण्याची अहमिका नक्की कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करते हा प्रश्न मला अनेकदा पडतो. एका फेसबुक सेलिब्रेटी ने मध्यंतरी आपल्या घटस्फोटाची बातमी मोठ्या अभिमानाने प्रसिद्ध केली होती. अर्थात त्यामागे त्यांचे काही ठोकताळे असतील पण आपल्या खाजगी आयुष्यामधील चांगल्या आणि वाईट क्षणांचा बाजार भरवण्याची वृत्ती आणि जरा हटके म्हणून प्रसिद्ध होण्याची शर्यत नक्की आपल्याला किती खोल गर्तेत घेऊन जाते आहे याचा अंदाज आणि त्याच अनुमान काढण्याची गरज कोणालाच जाणवत नाही. 

जरा हटके ही एक प्रवृत्ती आहे. अगदी पुरस्कारापासून ते लग्न सोहळ्या पर्यंत, स्पर्धेत यशस्वी झाल्याचा आनंद ते अपयश झाल्याचं दुःख हे सगळच जरा हटके म्हणून दाखवण्याची वृत्ती कुठेतरी समाजाला एक पायरी खाली घेऊन जात आहे. क्षणिक आनंदासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावत सुटलो आहोत याच भान आज राहिलेलं नाही. आज आपल्या आयुष्यात नसलेल्या आभासी लोकांना खुश, आनंदी, त्यांची सहमती, नकार किंवा एकूणच त्यांच्या मताची किंमत आपल्यासाठी जास्ती महत्वाची झालेली आहे. आपलं माणूस आपल्यासाठी दुय्यम झालेलं आहे. जरा हटके ही प्रवृत्ती दुसऱ्या बाजूनेही दाखवता येऊ शकते जिकडे आपल्या माणसाची जागा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवून देऊ शकतो. पण असं खूप कमी वेळा होतं. वर लिहलेली काही प्रातिनिधिक उदाहरण आहेत. अश्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला जरा हटके म्हणून सुरु असतात. पण प्रत्येकवेळी त्या हटके असतील असं नाही. अनेकवेळा अश्या गोष्टी आपलच हस करतात. तेव्हा आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे. 

ता.क. :- वरील मते माझी वयक्तिक आहेत. सर्वांची मते अशीच असावीत असा माझा कोणताही आग्रह नाही. नाण्याला दोन बाजू असतात. माझी मते माझ्यापुरती योग्य वाटतात म्हणून ती या पोस्ट मधून मांडलेली आहेत. त्यातून कोणाचाही अपमान अथवा त्यातून दुखावण्याचा हेतू नाही. तसं जाणवल्यास त्यासाठी आधीच क्षमस्व. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment