Friday 17 June 2022

अग्निपथ... विनीत वर्तक ©

 अग्निपथ... विनीत वर्तक ©

भारतीय सेनेने नव्याने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेवरून देशभर आंदोलन उभं राहिल्यानंतर नक्की कश्यामुळे इतका वादंग केला जात आहे? नक्की या योजनेने काय बदल होणार आहेत? या योजनेत असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा काय परीणाम होणार आहे? खरच हा वाद योग्य आहे का? 

अग्निपथ योजना नक्की काय आहे? ती लागू करण्याची कारण? 

भारतात सैन्यात प्रवेश घेणं हे ऐच्छिक ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात आपल्या संविधानात ते सगळ्या नागरिकांना अनिवार्य करण्याची तरतूद केलेली आहे. पण त्याचा वापर करण्याची गरज आजवर आपल्याला भासलेली नाही. आजवर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी अनेक पराक्रमी लोकांनी आपलं रक्त सांडल आहे. देशाच्या सुरक्षितेत आपलं योगदान देणं ही भावना आजही अनेक भारतीयांच्या मनात आहे. पण गेल्या काही वर्षात सैन्यात प्रवेश घेणं हे एखाद्या सरकारी नोकरी प्रमाणे झालं होतं. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभर नोकरी जाण्याची चिंता मिटली असा एक प्रवाह आहे. तोच प्रवाह सैन्यातील प्रवेशाबाबत निर्माण झाला. साहजिक देशभावनेपेक्षा कायमस्वरुपी नोकरी ज्यात सरकारी फायदे, पेन्शन मिळते अश्या दृष्टीने सैन्यातील प्रवेशाकडे कल सुरु झाला. 

जेव्हा इतर सरकारी नोकऱ्यांमधून पेन्शन हा प्रकार हद्दपार झाला तेव्हा भारतीय सेना अशी एकमेव हक्काची जागा राहिली की तिकडे पेन्शन मिळण्याची सोय होती. त्याचसाठी सैन्यात प्रवेश घेण्यासाठी अनेक इन्स्टिट्यूट उभ्या राहिल्या. ( महाराष्ट्रातील चाटे कोचिंग क्लासेस प्रमाणे )  जिकडे सैन्यात प्रवेश मिळवून देणं  हा एक धंदा झाला. त्यात लाखो रुपये भरून प्रवेश घेणारा एक नवीन वर्ग अस्तित्वात आला. एकीकडे हे होत असताना दुसरीकडे सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शन आणि इतर स्वरूपात कराव्या लागणाऱ्या खर्चाचा आकडा हा ३.३ लाख कोटी रुपयां पलीकडे गेला. २०२२ पर्यंत हा खर्च ५.२५ लाख कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. भारताच्या एकूण रक्षा क्षेत्रासाठी दिलेल्या पैश्यातील फक्त पेन्शन साठी होणारा खर्च हा तब्बल २२% आहे. याचा अर्थ भारताच्या सुरक्षिततेसाठी भारतीय सैन्याकडे फक्त ७८% उरतात. त्यामुळे कुठेतरी या पेन्शन च्या आकड्याला कात्री लावणं हे गरजेचं बनलं आहे. 

तिसरी एक बाजू काळाच्या प्रवाहात समोर येत होती ती म्हणजे युद्ध करण्याच्या स्थितीत झालेला बदल. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसांची युद्ध भूमीवरील गरज कमी होत जाणार आहे. ड्रोन, मिसाईल आणि इतर तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होते आहे त्याने येत्या १० वर्षात एकूणच सरहद्दीवर लागणाऱ्या सैनिकांची गरज यामुळे कमी होत जाणार आहे. अश्या सर्व परिस्थितीचा विचार करून कुठेतरी भारतीय सैन्याला त्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने 'अग्निपथ' नावाची योजना समोर आणली गेली आहे. ही योजना कशी असणार आहे या बद्दल आधीच खूप लिहिलं गेलं आहे. त्यामुळे वेगळ त्यावर विस्ताराने लिहीत नाही. 

अग्निपथ योजनेला विरोध का होतो आहे? 

भारतीय सैन्यात समाविष्ट होणं म्हणजे नोकरी करणं नाही. असं विधान भारताचे पहिले सी. डी. एस. जनरल बिपीन रावत यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं. हे विधान त्यांनी खूप विचारांती केलं होतं. भारतीय सैन्यात प्रवेश घेण्यासाठी उगवलेल्या प्रत्येक टपरीची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच देशभक्ती ची ओढ, देशाचं सैन्यबळ आणि त्याची संख्या तसेच त्यावर होणारा खर्च या सर्वांचा विचार करून अग्निपथ योजना समोर आलेली आहे. अग्निपथ योजनेची वैशिष्ठ विचारली की आत्तापर्यंत त्यात भाग घेतलेल्या लोकांना किती पैसे मिळतील याची आकडेवारी समोर येते. यावरून भारतीय सैन्यात जाणं म्हणजे नोकरी करणं ही भावना किती प्रबळ आहे हे सिद्ध होते. 

जसं वर म्हंटल की भारतीय सैन्यातील प्रवेश आयुष्यभरासाठी असणार का? याच उत्तर आता भारतीय सैन्यातील तुमचा ४ वर्षाचा प्रवास ठरवणार आहे. त्यामुळेच चाटे क्लासेस सारख्या नाक्यावर उघडलेल्या आणि १००% यशाची खात्री देणाऱ्या क्लासेस च्या हातातून यशाची गुरुकिल्ली हरवणार आहे. तसेच लाखो  रुपये भरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता आपला प्रवेश स्पर्धा करून मिळवावा लागणार आहे. याच सोबत पेन्शन ची सोय असलेली एक पक्की सरकारी नोकरी हातातून जाणार आहे. त्यामुळेच हा रोष अश्या प्रकारे दंगली करून व्यक्त केला जात आहे. भारतीय सेना म्हणजे नोकरी नव्हे इकडे सुरु झालेला प्रवास अनेकांच्या पचनी पडणारा नाही. 

अग्निपथ योजनेमुळे काय चांगल वाईट होणार आहे? 

अग्निपथ योजनेतून एकाचवेळी अनेक उद्दिष्ठ साध्य होणार आहेत. तरुण वयात एकूणच भारतीय सेना काय असते? सैन्यात भरती होणं म्हणजे काय? त्यातून शिकल्यानंतर तरुणांच्या व्यक्तिमत्वात त्याचा नक्कीच एक चांगला फरक पडणार आहे. वयाच्या १७ ते २१ व्या वर्षी आणि पुढल्या प्रवासासाठी शिक्षणासोबत, देशसेवा आणि पैश्याची तजवीज आपोआप होणार आहे. जवळपास ११ ते १२ लाखांच्या दरम्यान जमा होणारी रक्कम त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी नक्कीच फायद्याची आहे. तरुणांना या सेवेतून मिळालेल्या सर्टिफिकेट चा फायदा इतर अनेक क्षेत्रात घेता येणार आहे. लक्षात घ्या मुंबई, पुण्यात बसून अमेरिकेत जायची स्वप्न बघणारा आणि देशाच्या गप्पा मारणारा तरुण भारतीय सेनेत जात नसतो. त्यामुळे ज्या कुटुंबातली मुलं आणि मुली यात जातात त्यांना या योजनेमुळे नक्कीच फायदा होणार आहे. 

देशाच्या दृष्टीने बघायला गेलं तर पेन्शन चा अधिभार कमी होणार आहे. त्यामुळे जास्त पैसे देशाच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचवेळी दरवर्षी नवीन रक्ताची आणि तरुणांची भरती योग्य रीतीने सैन्यात होणार आहे. ४ वर्ष त्यांच्यावर नजर ठेऊन चांगल्यात चांगल्या लोकांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच एकूण सैन्याचा दर्जा वाढणार आहे. देशप्रेमाची भावना वाढीला लागणार आहे. सैन्याचा अनुभव हा प्रत्येक अग्निविराच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करणारा असणार आहे यात शंका नाही. 

अग्निपथ या योजनेची दुसरी बाजू आहे. एक सैनिक घडवायला साधारण ७-८ वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे ४ वर्षात दाखल होणारा सैनिक कितपत समृद्ध असेल याबाबतीत अनेक रक्षा विश्लेषकांच्या मनात शंका आहे. आपली नोकरी ही कायम स्वरूपी नसल्याने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या संख्येत घाट तसेच त्यांच्या देशप्रेमाच्या भावनेत घट होऊ शकेल असा एक मत प्रवाह आहे. अग्निपथ योजनेतून त्या २५% तरुणात प्रवेश मिळवण्यासाठी लॉबिंग होण्याची शक्यता ही दाट आहे. पण या सगळ्या शक्यता जर तर च्या आहेत. 

एकूणच अग्निपथ ही योजना भारतीय सैन्याला आणि भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक नवी उभारी देणारी असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- वरील पोस्ट मध्ये मांडलेले मुद्दे माझे वैयक्तिक आहेत. कोणत्याही पक्ष, व्यक्ती  अथवा राजकारणाशी पोस्ट मधे आलेले मुद्दे संबंधित नाहीत.  

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment