Wednesday 8 June 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २३)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २३)... विनीत वर्तक ©

“No country in the world is giving us money for fuel and coal. Only India is giving"... Ranil Wickremesinghe, Sri Lankan PM

काल श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी केलेलं हे विधान भारताची वसुधैव कुटुंबकम भुमिका पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर अधोरेखित करत आहे. श्रीलंका सध्या अतिशय बिकट परिस्थितीतून जात आहे. पुढल्या ६ महिन्यात श्रीलंकेला देश चालवण्यासाठी ६ बिलियन अमेरिकन डॉलर ची गरज आहे. त्यातील ३.५ बिलियन डॉलर पुरवण्याची जबाबदारी एकट्या भारताने उचलली आहे. ही मदत श्रीलंकेला औषध, डिझेल, खत, कोळसा आणि इतर जीवनावश्यक्य वस्तूंच्या स्वरूपात भारत करणार आहे. जेव्हा संपूर्ण जगाने श्रीलंकेकडे पाठ फिरवली आहे. तेव्हा एकटा भारत आपल्या शेजारील देशासाठी उभा आहे. श्रीलंकन पंतप्रधानांनी पुढे जाऊन असं म्हंटलेलं आहे की, भारत किती मदत करू शकतो यावर मर्यादा आहेत. भारतात लोक विचारत आहेत की जेव्हा आपल्या देशात अडचण आहे तेव्हा आपण श्रीलंकेला मदत का करत आहोत? हे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी श्रीलंकन जनतेला ऐकवलं आहे. 

कोणत्यातरी पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या विधानाचा आधार घेत अरब राष्ट्रांनी भारताविरुद्ध एक अजेंडा सध्या राबवला आहे. मुळात एका पक्ष प्रवक्त्याच्या विधानाला इतकी हवा मिळण्यामागे वेगळं राजकारण जागतिक पटलावर खेळलं जात आहे. यात भारतातील काही राजकीय नेत्यांचा हात आहे. भारताची प्रतिमा कशी मालिन होईल आणि त्यातून आपला राजकीय फायदा कसा होईल यासाठी या सर्वानी देव पाण्यात ठेवले आहेत. देश बुडाला तरी चालेल पण आपला पक्ष मोठा झाला पाहिजे अशीच भूमिका अनेक राजकीय नेत्यांची बघायला मिळत आहे. अरब राष्ट्रांनी ही भूमिका घेण्यामागे खरं कारण आहे ते तेलाचं राजकारण. 

भारत त्याला लागणाऱ्या रोजच्या तेलाच्या गरजेपकी जवळपास ७०%-८०% क्रूड ऑइल आयात करतो. साहजिक इतकी गरज भागवण्यासाठी त्याला आजपर्यंत अरब राष्टांवर अवलंबून राहावं लागत होतं. भारत जवळपास ५०%-६०% ऑइल अरब राष्ट्रांकडून ज्यात इराण, सौदी अरेबिया, ओमान, यु.ए.ई  सारख्या देशांचा  सहभाग आहे त्यांच्याकडून घेत होता. या नंतर उरलेली गरज आफ्रिकन राष्ट्र, अमेरिका आणि साऊथ अमेरिकन देशांकडून भागवत होता. रशिया चा हिस्सा या सगळ्यात अवघा १% इतका होता. असं असलं तरी भारतात जगातील सगळ्यात मोठ्या रिफायनरी आहेत. कच्या तेलापासून पेट्रोलियम प्रॉडक्ट तयार करण्याच्या बाबतीत जगातील कोणताच देश भारताचा हात धरू शकत नाही. भारताच्या रिलायन्स कंपनीची जामनगर इकडे असलेली रिफायनरी जगात सगळ्यात मोठी आहे. रिलायन्स च्या या रिफायनरीत रोज १.२ मिलियन बॅरल ऑईल प्रोसेस केलं जाते. ( १२ लाख बॅरल, १ बॅरल म्हणजे १५८ लिटर). यातून निर्माण झालेले ८०% प्रॉडक्ट म्हणजेच डिझेल, पेट्रोल जगात निर्यात केलं जाते. या खालोखाल नायरा रिफायनरी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तिची क्षमता ही जागतिक तुलनेत खूप मोठी आहे. या शिवाय इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अश्या अनेक कंपन्यांच्या रिफायनरीज भारतात कच्या तेलापासून बाकीचे प्रॉडक्ट तयार करत असतात. 

आत्तापर्यंत या कंपन्या अरब राष्ट्रांकडून कच्च तेल घेऊन त्यावर प्रक्रिया करून ते भारतात आणि जगात निर्यात करत होत्या. पण रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी जागतिक पटलावर बदलल्या. जगातील अनेक राष्ट्रांनी रशियाच्या कच्या तेलावर निर्बंध घातले. भारत हा नेहमीच रशियाचा मित्र राहिला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय दबावाला न दबता रशिया बद्दल सगळ्या स्तरावर तटस्थ भूमिका घेतली. रशियाने आपल्या मित्राची या मदतीची जाणीव ठेवताना भारताला आणि भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कच्या तेलाच्या किमतीपेक्षा ४० डॉलर स्वस्त भावाने तसेच रुपया आणि रुबेल मधून कच्च तेल विकत घेण्याची सूट दिली. अर्थात यात रशियाचा फायदा आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण युरोप, अमेरिकेसह, ऑस्ट्रेलिया आणि जपान च मार्केट गमावलेल्या रशियन तेलाला कोणी गिऱ्हाईक मिळत नव्हता. त्यामुळेच रशियाने जगातील सगळ्यात मोठे दोन देश चीन आणि भारताला हे तेल स्वस्तात विकण्याचा निर्णय घेतला. 

भारताला आणि भारतीय कंपन्यांना याचा फायदा असा झाला की जिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव १३० डॉलर प्रति बॅरल जात असताना भारताला यापेक्षा जवळपास २/३ किमतीत रशियन कच्च तेल उपलब्ध झालं. भारताने आणि भारतीय तेल कंपन्यांनी मग रशियन कच्च तेल मोठ्या प्रमाणावर आयात करायला सुरवात केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत निष्पक्ष असल्यामुळे तसेच भारताचं वजन असल्याने जगातील कोणतीच राष्ट्र भारताला हे तेल विकत घेण्यापासून रोखू शकलेली नाहीत. एकट्या मे महिन्यात भारताने रशियाकडून ८,४०,६४५ बॅरल / प्रति दिवस ऑईल रशियाकडून आयात केलं. एप्रिल मधे हाच आकडा ३,८८,६६६ बॅरल / प्रति दिवस इतका होता. आता एका महिन्यात भारताने रशियाकडून आपली आयात दुपटीपेक्षा जास्त केली आहे. मे २०२१ मधे हाच  आकडा १,३६,७७४ बॅरल / प्रति दिवस इतका होता.  यावरून स्पष्ट होते आहे की कश्या पद्धतीने भारत अतिशय वेगाने रशियाच्या कच्च्या तेलाकडे वळतो आहे.  जून २०२२ मधे भारत जवळपास १०,५०,००० बॅरल / प्रति दिवस ऑईल आयात करेल तर त्या नंतरच्या महिन्यात यापेक्षा जास्ती प्रमाणात कच्च्या तेलाच्या ऑर्डर भारतीय कंपन्यांनी रशियाला दिलेल्या आहेत. 

आता अरब राष्ट्रांची दुखरी नस समोर आली असेल. ज्या वेगाने भारत रशियन ऑईल कडे वळतो आहे. त्या वेगाने त्याच अरब राष्ट्रांच्या तेलावर असलेलं अवलंबित्व कमी होते आहे. अरब राष्ट्रांना इतका मोठा ग्राहक गमावणे परवडणारं नाही. त्याच सोबत भारतीय तेल कंपन्या या कच्च्या तेलापासून तयार झालेली प्रॉडक्ट इतर देशांच्या तुलनेत स्वस्त विकू शकणार आहेत. ( लक्षात घ्या प्रत्येक बॅरल मागे रशिया घसघशीत ४० डॉलर ची सूट देतो आहे.) भारतीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्यात प्रचंड वाढ होते आहे. भारत ही प्रॉडक्ट अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपसह संपूर्ण जगाला विकतो आहे. भारतीय कंपन्यांनी एकट्या मार्च महिन्यात ३.३७ मिलियन बॅरल डिझेल जगात निर्यात केलेलं आहे. भारतीय तेल कंपन्या ज्यांच्या रिफायनरीज आहेत त्या एका वर्षात तब्बल ४० बिलियन अमेरिकन डॉलर चा नफा या वर्षी कमावतील असा अंदाज आहे. भारतीय कंपन्यांची प्रॉफिट मार्जिन जास्ती असल्यामुळे साहजिक भारतीय कंपन्या इतर देशांच्या तुलनेत स्वस्तात ती विकू शकत आहेत. याचा फटका अरब राष्ट्रांना होतो आहे. भारताला रोखण्यासाठी भारताची प्रतिमा मालिन करण्याची चाल अरब राष्ट्रांनी खेळली आहे. त्याला साथ देणारे आपलेच राजकीय नेते काही देशातून तर काही विदेशातून पाठिंबा देत आहेत. या गोष्टींमुळे भारताच्या प्रतिमेला धक्का बसला नसला तरी भारताविषयी बोलण्याची संधी मात्र या देशांना मिळाली हे वास्तव नाकारून चालणार नाही. 

धर्माच्या आधारावर राजकारण हे दोन्ही बाजूने वाईट आहे. त्यात एक देश म्हणून आपलीच प्रतिमा डागाळते याच भान सर्व राजकारणी, पक्ष कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्या वक्तव्यावरून फायदा तर काही झाला नाही पण अरब राष्ट्रांना भारता विरुद्ध फुत्कार करायला संधी मिळाली. अर्थात भारताने योग्य रीतीने आपला ही निषेध नोंदवला आहे. पण एकूणच या सर्व वादामध्ये धर्मापेक्षा आर्थिक बाजू जास्त महत्वाची आहे. भारतीय वाऱ्यांचा रशियन क्रूड कडे वेगाने होणारा प्रवास अरब राष्टांच्या पोटात दुखतो आहे. जागतिक पेट्रोलियम मार्केट मधे खाऱ्या वाऱ्यांची जागा आता मतलई वाऱ्यांनी घेतली आहे. जे आपल्यासोबत एक वादळ आणणार आहेत. ज्याच्या शक्यतेमुळे अरब राष्ट्रांनी आत्तापासून मोर्चेबांधणी ला सुरवात केली आहे. 

येत्या काळात भारताची प्रतिमा मालिन करण्याचे आणखी जोरदार प्रयत्न झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण पैसा बोलता हैं. एकट्या क्रूड ऑइल च्या जिवावर संपूर्ण देशाचं अर्थकारण करणाऱ्या अरब राष्ट्रांना या बदललेल्या वाऱ्यांचा फटका सगळ्यात जास्ती बसणार आहे. त्याची प्रगती थांबवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतील असा माझा अंदाज आहे. 

क्रमशः 

जय हिंद !!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment