Friday, 30 April 2021

अजगर क्षेपणास्त्र... विनीत वर्तक ©

 अजगर क्षेपणास्त्र... विनीत वर्तक ©

भारताच्या तेजस लढाऊ विमानाने नुकतच क्षेपणास्त्रातील अजगराला आपल्या भात्यात यशस्वीरीत्या समाविष्ट केलं आहे. तेजस हे भारतीय बनावटीचे एक इंजिन असलेलं स्वनातीत वेगाने जाणारं लढाऊ विमान आहे. १८५० किलोमीटर लांब उड्डाण भरण्याची क्षमता असलेलं तेजस १.६ मॅक वेगाने शत्रुला चकवा देऊ शकते. एका वेळी ५३०० किलोग्रॅम वजनाची ७ क्षेपणास्त्र घेऊन उड्डाण भरू शकते. तर अश्या लढाऊ विमानात वेगवेगळ्या क्षमतेची क्षेपणास्त्र असणं अतिशय महत्वाचं असते. तेजस वर ब्राह्मोस एन.जी. हे लांब पल्याच क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे. ज्याची क्षमता ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्याचा वेध घेण्याची आहे.  पण समजा लक्ष्य अतिशय जवळ म्हणजे २० किलोमीटर ते ५० किलोमीटर च्या टप्यात असेल तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीची क्षेपणास्त्र लागतील. भारताने अश्या टप्यासाठी इस्राईल कडून क्षेपणास्त्र विकत घेतली आहेत त्यातील एक म्हणजे पायथन ५ किंवा अजगर ५. 

पायथन ५ हे क्षेपणास्त्र इस्राईल च्या राफेल एडवांस डिफेन्स सिस्टीम ने निर्माण केलं आहे. यातील ५ हा आकडा ते ५ व्या पिढीतील असल्याचं स्पष्ट करतो. पायथन  ५ हे हवेतून हवेत मारा करणारं जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रापैकी एक आहे. हे lock-on-before launch (LOBL) आणि lock-on after launch (LOAL) या अतिशय प्रगत अश्या पद्धतीने काम करते याचा अर्थ प्रक्षेपित करताच हे लक्ष्याला लॉक करते. लॉक म्हणजे लक्ष्याने आपली जागा बदलली तरी त्याचा मागोवा घेत त्याला नष्ट करण्याची क्षमता या अजगर क्षेपणास्त्राची आहे. हे क्षेपणास्त्र ३६० अंशात लक्ष्याचा वेध घेऊ शकते. लक्ष्य याच्या मागे असेल तरी त्याला नष्ट करण्याची क्षमता आहे. ह्यात यासाठी अतिशय प्रगत असं  electro-optical and image infrared homing seeker तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. यात इन्फ्रारेड सीकर बसवलेले आहेत. जे आजूबाजूच्या प्रदेशाची टेहाळणी करून आपल्या लक्ष्याला लॉक करतात. या क्षेपणास्त्राची क्षमता २० किलोमीटर मधील कोणतही लक्ष्य नष्ट करण्याची आहे.  

क्षेपणास्त्र कितीही प्रगत असलं तरी त्याच तंत्रज्ञान लढाऊ विमानाच्या तंत्रज्ञानाशी इंटिग्रेट करण अतिशय महत्वाचं असते. जेव्हा हे इंटिग्रेशन योग्य रीतीने होते तेव्हाच क्षेपणास्त्र १००% क्षमतेने काम करू शकते. २७ तारखेला तेजस लढाऊ विमानाने केलेल्या चाचणीने पायथन  ५ हे योग्य रीतीने त्याच्याशी इंटिग्रेट झालं असल्याचं स्पष्ट झालं. त्या शिवाय या अजगर क्षेपणास्त्राने अतिशय कठीण अश्या लक्ष्याचा वेध १००% अचूकतेने घेऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे. याच्या सोबत तेजस ने इस्राईल कडून घेतलेल्या डर्बी क्षेपणास्त्राची सुद्धा चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र beyond visual range टप्यातील लक्ष्य याने १००% यशस्वीरीत्या नष्ट केलं. 

अजगर क्षेपणास्त्र म्हणजेच पायथन ५ आणि डर्बी च्या यशस्वी चाचणीमुळे तेजस ने आपल्या भात्यात अचूक आणि सर्वोत्तम क्षेपणास्त्रांची भरती केली आहे.  दिवसांपूर्वीच Hindustan Aeronautics Limited ला भारतातील सगळ्यात मोठी ४८,००० कोटी रुपयांची ८३ तेजस लढाऊ विमान भारतीय हवाई दलासाठी देण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. येत्या काळात भारताला मिळणारी तेजस विमान याचं अजगर क्षेपणास्त्राने भारताच्या संरक्षणासाठी सज्ज असणार आहेत. हे क्षेपणास्त्र तेजस सोबत इंटिग्रेट करणाऱ्या सर्व टीम चे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday, 27 April 2021

खारे वारे मतलई वारे (भाग ९)... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे (भाग ९)... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत अचानक बदल झालेला दिसून येतो आहे. हा बदल आंतरराष्ट्रीय कूटनीती किंवा चाणक्य नितीचा भाग म्हणून इतिहासाच्या पानावर नोंदला जाईल. गेल्या एका महिन्यात भारतात कोरोना च्या दुसऱ्या त्सुनामी ने हल्ला केला आहे. गेले वर्षभर कोरोना च्या तावडीतून भारतीय अर्थव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्ह दिसत असताना दुसऱ्या त्सुनामी चा तडाखा बसलेला आहे. जगभरात आलेल्या पहिल्या त्सुनामी मधे अमेरिकेचं नुकसान सगळ्यात जास्ती झालं होतं. त्यावेळेस कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अमेरिका संपूर्णपणे कोलमडत असताना या रोगाविरुद्ध ढाल म्हणून हायड्रोऑक्सीक्लोरोक्वीन ह्या गोळीला महत्व प्राप्त झालं होतं. त्या वेळेस तडफडणाऱ्या अमेरिकेला भारताने मदतीचा हात दिला होता. दुसऱ्या त्सुनामी च्या लाटेत भारत गटांगळ्या खायला लागल्यावर अमेरिकेने मात्र काढता पाय घेतला.

हा पाय मागे घेण्यामागे कारणीभूत होता तो ६ फेब्रुवारी २०२१ चा दिवस जेव्हा भारताने अतिशय महाग असणाऱ्या फायझर कंपनीच्या लसीला मान्यता दिली नाही. ही लस जवळपास ३००० रुपये ते ४००० रुपयाला पडणार होती. फायझर कंपनीला अमेरिकेत केलेल्या चाचण्यांवर भारतात लस विकण्याची मुभा हवी होती पण भारताने ती मान्य केली नाही. भारतातल्या लोकांवर या लसीचा काय परिणाम होतो तो बघितल्या नंतर आपण मान्यता देऊ असं भारताकडून सांगण्यात आलं. फायझर ने तयार केलेल्या लसीमुळे अनेक जणांना रक्ताच्या गुठळ्या तसेच इतर सिरीयस कॉम्प्लिकेशन झाल्याच्या घटना अमेरिकेत समोर आलेल्या होत्या. त्यामुळे भारताने भारतीयांवर याच्या चाचण्या झाल्यावर आपण भारतात ती विकण्यासाठी परवानगी देऊ असं भारताने कळवलं. या गोष्टी न पटल्याने पैश्याच्या जोरावर भारतीय मार्केट काबीज करू इच्छिणाऱ्या फायझर च्या स्वप्नांना तडा गेला. त्यातून त्यांनी सपशेल माघार घेतली. 

अमेरिका मधे अधिराज्य करणाऱ्या या कंपनीला भारतीय मार्केट हातातून गेल्याच कुठेतरी टोचलं होत त्यामुळेच याची एक लॉबी अमेरिकेच्या प्रशासनावर भारतातील लसी रोखण्यासाठी दबाव टाकत होती. भारतात तयार होणाऱ्या लसीसाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिकेतून जात होता. साहजिक त्यावर अंकुश ठेवला की भारतातील लसीच उत्पादन थांबेल आणि भारताला फायझर आणि जॉन्सन एन्ड जॉन्सन च्या लसीला मान्यता देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्या संधीची अमेरिकेतील एक लॉबी वाट बघत होती. सिरम इन्स्टिट्यूट ला होणारा कच्चा मालाचा पुरवठा अमेरिकेने Defense Production Act (DPA) ह्या कायद्याचा आधार घेऊन थांबवला. तो थांबताच एक लॉबी प्रचंड सक्रिय झाली. भारतातील केसेस झपाट्याने वाढू लागल्या आणि भारत सरकारवर सगळीकडून दबाव वाढू लागला. भारतातील विकला गेलेला मिडिया आणि आपली पिल्लावळ याचा फायदा घेत भारताने कशी चूक केली असं दाखवण्यात ही लॉबी यशस्वी झाली. 

पण भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही हे समजण्यास अमेरिकन लॉबीला उशीर झाला. तिकडे पद्धतशीरपणे भारताची गळचेपी करून अमेरिका फर्स्ट चा नारा बायडेन आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी दिला. यातून जगाला आणि अमेरिकेला कुठेतरी आपण योग्य पावलं अमेरिकेच्या भल्यासाठी उचलल्याचे दाखवून द्यायचं होतं पण मागच्या दराने वेगळाच गेम सुरु होता. हे सगळं करताना ही लॉबी विशेष करून फायझर आणि जॉन्सन आणि जॉन्सन सारखी बलाढ्य कंपन्या ज्या लसीच्या जीवावर उड्या मारत होत्या त्या हे विसरल्या की आपला लगाम भारतीय कंपनीच्या हातात आहे. मुंबई मधील VAV Lifesciences & VAV Lipids ही कंपनी फायझर आणि जॉन्सन आणि जॉन्सन च्या लसी बनवण्यासाठी लागणार अतिशय महत्वाचं असं highly purified 'synthetic phospholipids' (gene-based lipid nanoparticles (LNPs) देत होती. जे महाराष्ट्रातील रत्नागिरी इकडे बनवलं जात आहे. 

अमेरिका च्या भारतीय वंशज असलेल्या कमला हॅरिस यांनी अमेरिका फर्स्ट चा नारा दिल्यावर तीन दिवस गोष्टी अतिशय शांततेत गेल्या. भारत सरकारने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती पण बुद्धिबळाच्या चाली पडद्यामागून खेळल्या जात होत्या. भारत सरकारने तातडीने सिरम आणि भारत बायोटेक ला ४५०० कोटी रुपयांचा निधी कच्चा माल भारतात तयार करण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्या शिवाय भारताने गेले वर्षभर जगातील प्रत्येक छोट्या, मोठ्या देशाला मदत मग ती औषधांच्या स्वरूपात, लसींच्या स्वरूपात केलेली होती. त्यामुळे अमेरिका सोडून जगातील सगळेच देश भारतासाठी उभे राहिले. रशिया, फ्रांस,युनायटेड किंगडम , युरोपियन युनियन, सिंगापूर, यु.ए.ई., इस्राईल, जर्मनी अशी सगळी अमेरिकेची मित्र राष्ट्र भारताच्या उपकारामुळे किंवा मित्रत्वाच्या नात्याने भारतासाठी उभी राहिली. त्यामुळे अमेरिका फर्स्ट ची जागतिक स्तरावर नाचक्की झाली. ते नाही होत तोवर आपल्याच पक्षातील लोकांच्या विरोधी भावनांना सामोरं जाण्याची नामुष्की बायडेन सरकारवर आली. भारतीय-अमेरिकन लॉबी, अमेरिकन थिंक टॅंक अश्या सगळ्याच बाजूने बायडेन प्रशासनावर त्यांनी भारताविरुद्ध टाकलेल्या पावला विरुद्ध नाराजीचा सूर उमटायला सुरवात झाली. आपण सोडलेला बाण वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे उलट फिरून आपल्याच दिशेने येत असल्याचं बायडेन आणि हॅरिस दोघांना स्पष्ट झालं. 

भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी अमेरिकेला तुम्ही आमचा लगाम खेचला तर तुमचा लगाम आमच्या हातात आहे हे विसरू नका हे स्पष्ट केलं. इकडे महत्वाचं होत की ही समज अमेरिकेला भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी दिली न की कोणत्या राजकीय नेत्याने. त्याचा परिणाम स्पष्ट होता आम्ही शेरास सव्वाशेर आहोत ती वेळ येऊ देऊ नका. त्यानंतर लगेच बायडेन आणि हॅरिस यांना आपलीच लाज वाचवण्यासाठी तातडीने पावलं टाकली. बायडेन यांच्या ट्विट नंतर हॅरिस यांनी ट्विट केलं पण झालेलं नुकसान जास्ती झालं आहे हे आल्यावर बायडेन यांनी स्वतःहून भारताच्या पंतप्रधानांना फोन करून आपण भारताला मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं. 

इकडे हे खूप महत्वाचं आहे की भारताने हाजी हाजी केली नाही. अमेरिका आणि त्यांच्या प्रशासनाने आपल्या वागण्याने स्वतः स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. एकतर भारताच्या हद्दीत भारताला न सांगता आपली नौका नेणं  त्या नंतर अमेरिका फर्स्ट च्या नावाखाली भारताची गळचेपी करणं भारत- अमेरिका संबंधांना गालबोट लावून गेलं आहे हे नक्की आहे. या वेळेस अमेरिका स्पष्टपणे बॅकफूट आणि डॅमेज कंट्रोल मोड मधे आहे. सध्या भारतासाठी कोरोना च्या त्सुनामी ला आटोक्यात आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या या नुकसानीचे काय दूरगामी परिणाम भारत- अमेरिका संबंध आणि एकूणच जागतिक स्तरावर होतात हे बघण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. पण एक मात्र नक्की मतलई वाऱ्यांनी आता खाऱ्या वाऱ्याची दिशा पकडली आहे आणि अमेरिकेला येत्या काळात ते बोचणारे असतील.  

फोटो स्रोत :- गुगल   

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Monday, 26 April 2021

एका 'ॐ' ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका 'ॐ' ची गोष्ट... विनीत वर्तक ©

'ॐ' ह्या शब्दाला हिंदू धर्मात खूप महत्वाचं स्थान आहे हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे. पण ते का? आणि त्या अक्षरातील प्रत्येक वळणाचं महत्व आहे, याबद्दल अनेकांना काहीच माहिती नाही. तसेच जपमाळेतील असलेले १०८ मणी किंवा १०८ वेळा 'ॐ' या शब्दाचा जप नक्की का करायचा, हे पण अनेकांना माहीत नसते. तर 'ॐ' या शब्दामध्ये उच्चार करताना तीन शब्दांचा भास होतो, ती तीन अक्षरे म्हणजे अ, उ आणि म. यातील 'अ' म्हणजे निर्मिती(सृष्टी), 'उ' म्हणजे प्रकटीकरण (चालू स्थिती), 'म' म्हणजे नाश(लय). जेव्हा आपण 'ॐ' चा उच्चार करतो, तेव्हा आपण विश्वातील तिन्ही स्थितींना एका शब्दात मांडतो. मानवी स्वरूपाशी याचं साधर्म्य म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं एक स्वरूप म्हणजे 'ॐ'. 'ॐ' हे अक्षर ज्या पद्धतीने लिहीले जाते त्यालाही अर्थ आहेत. ह्यातील प्रत्येक वळण हे जाणिवेशी निगडीत आहे. खालचे डावीकडे जाणारे वळण म्हणजे आपली जागृतावस्थेतली जाणीव, वरून डावीकडे जाणारे वळण म्हणजे आपली सुप्तावस्थेतली (अचेतन अवस्थेतील) जाणीव, उजवीकडे जाणारे वळण म्हणजे अर्धजागृतावस्था (स्वप्नवत अवस्था) ज्यात आपण जागेपणाच्या आणि अचेतन होण्याच्यामध्ये असतो. वर असलेले अर्धचंद्र म्हणजे माया, भ्रामक कल्पना आणि त्यावर असणारे टिंब म्हणजे परिपूर्ण आनंद. तर अश्या सगळ्या जाणिवाना जोडून या अक्षराची निर्मिती झाली आहे. 'ॐ' या अक्षराचा उच्चार १०८ वेळा केला जावा असा संकेत आहे. तर या १०८ आकड्यामागे काय महत्व आहे, ते मी या आधीच्या लेखात लिहिलं होतं, ते इकडे देतो आहे. १०८ या आकड्याचा संबंध आपल्याशी निगडित असणाऱ्या पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्याशी आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या १०८ पट सूर्याचा व्यास आहे, तर सूर्य आणि पृथ्वी ह्यामधील अंतर १०८ पट सूर्याच्या व्यासाइतके आहे. चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या १०८ पट आहे.(मी गणित करून बघितलं, तर सूर्याचा व्यास आहे १३,९१,००० किमी. ह्याला १०८ ने भागल्यास उत्तर येते १२,८७९ किमी. पृथ्वीचा व्यास आहे १२,७४२ किमी. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील अंतर आहे १४९.६ मिलियन किलोमीटर. जर सूर्याच्या व्यासाला १०८ ने गुणले तर उत्तर येते १५० मिलियन किलोमीटर. चंद्राचा व्यास आहे ३४७४ किमी. त्याला १०८ ने गुणल्यास उत्तर येते ३ लाख ७६ हजार किलोमीटर. प्रत्यक्षात चंद्र आणि पृथ्वी ह्यामधील सरासरी अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर) ह्याशिवाय हिंदू धर्मात १०८ पुराणे आहेत तर १०८ उपनिषदे आहेत. संस्कृत भाषेत ५४ अक्षरे असून ती शिव आणि शक्ती रुपात लिहीता येतात. 'ॐ' हे अक्षर संपूर्ण विश्वाचं प्रतिनिधित्व करते, म्हणून संस्कृतमध्ये प्रत्येक श्लोक म्हणण्यापूर्वी त्याचा उच्चार केला जातो. तसेच हिंदू धर्माप्रमाणे सगळ्यात शक्तिशाली असणाऱ्या आणि विश्वाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शंकरापुढे 'ॐ' हे लिहीले जाते. याच 'ॐ' च्या शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे एक मंदिर राजस्थान मधील पाली जिल्ह्यात आकाराला येत आहे. २५० एकरात हे मंदिर वसलेलं आहे. शंकराला केंद्रस्थानी ठेवून या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. ह्यात शंकराच्या १००८ वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. ह्यात १०८ खोल्या असून 'ॐ' या अक्षरातील बिंदू दर्शवण्यासाठी टॉवर उभारला जाणार आहे, ज्याची उंची १०८ फूट आहे. यात १२ देवळे बांधण्यात येणार आहेत. १९९३ पासून या मंदिराची निर्मिती केली जात असून आत्तापर्यंत त्याचे ९५% काम पूर्ण झालेले आहे. २०२१-२२ पर्यंत हे मंदिर सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. मंदिर बांधणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे आणि त्यातल्या प्रतिमांचे पूजन हा प्रत्येकाच्या आस्थेचा विषय आहे. ज्याची श्रद्धा आहे त्याने ते करावं, ज्याची नाही त्याने सोडून द्यावं. पण 'ॐ' या शब्दात असलेली शक्ती विज्ञानातही सिद्ध झालेली आहे. त्यातील काही फायदे इकडे देत आहे. Helps to Improve Concentration. Reduces Stress and Anxiety. Rejuvenating & Pacifying. Gives Strength to Spinal Cord. Detoxifies Body. Improves Functioning of Heart & Digestive System. Ensures Sound Sleep. Makes You Emotionally Stable. हिंदू धर्मासोबत जैन, शीख, बौद्ध या सगळ्या धर्मांतसुद्धा 'ॐ' ला सर्वोच्च स्थान दिलं गेलं आहे. योगासनात 'ॐ' चा उच्चार श्वास आणि शरीर आणि मनाच्या नियंत्रणासाठी केला गेला आहे. त्यामुळे या शब्दाला एक वेगळं वलय आहे. ज्याला पटेल त्या प्रत्येकाने याचा उच्चार केला तर नक्कीच काही चांगले बदल घडतील. फोटो स्त्रोत :- गुगल सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday, 25 April 2021

वळवाचं प्रेम... विनीत वर्तक ©

 वळवाचं प्रेम... विनीत वर्तक ©

एका संध्याकाळी आकाश निरभ्र असताना अचानक मळभ भरून येते आणि मग हळूहळू काळोख होतो. इतका वेळ शांत असणारं सगळं काही अचानक आपला सूर बदलतं. आकाश काळ्या ढगांनी भरून जातं. वाऱ्याचा जोर वाढतो. अचानक निसर्ग कूस बदलून एका वेगळ्या रंगात येतो. वारा आता सरळ न वाहता चक्राकार वहायला लागतो. धुळीची छोटे भोवरे अचानक निसर्गाच्या ह्या उधाणात पिंगा घालू लागतात. आकाशाच्या त्या काळ्या नभातून मग विजेचा खेळ सुरु होतो. कडाडणारा आवाज आणि चिरत जाणारा प्रकाश दोन्ही वातावरणात एक भय निर्माण करतात आणि काही क्षणात जलधारा कोसळतात ते त्या जमिनीला तृप्त करण्यासाठीच. त्यांचा आवेग वाढत जातो. क्षणाक्षणाला आधी छोटे वाटणारे थेंब टपोरे होतात आणि मग त्याचं रुपांतर होते ते गारांमध्ये. अचानक गरम असलेल्या वातावरणात त्या गारांचा पसारा निसर्गाचा पूर्ण रंग एका क्षणात बदलवून टाकतो. सगळीकडे पांढरी चादर ओढली जात आहे असं वाटतानाच अचानक सगळं थांबतं. पाऊस, हवा सगळं एका क्षणात शांत होतं. तो आवेग कुठेतरी संपून जातो. काळ्या नभांनी भरलेलं ते आकाश पुन्हा एकदा निरभ्र होतं. आकाशात ते काळे मेघ पुढे जात असताना आपल्याला काही देऊन जाताना आपल्यातलं जणूकाही घेऊन जातात आहेत असा भास होतो. निसर्गात होणारा काही क्षणांचा बदल पण तो त्या धरणीचं रूपच बदलवून जातो.
आयुष्यात एका अनोळख्या वळणावर येणारं प्रेम पण असचं असतं नाही का? आपलं सगळं आयुष्य सुरळीत सुरु असते. काही कमी नसते. पण अचानक काही नसताना ती व्यक्ती समोर येते. कूस बदललेल्या निसर्गासारखी.... शांत असलेलं मन मग कुठेतरी अशांत होतं. काहीतरी वेगळं होते आहे ह्याची जाणीव होई पर्यंत हातातून काहीतरी निसटलेलं असतं. पण ते सगळंच आवडत असतं. क्षणभर भीती तर वाटतेच ,आपल्याला वाटणाऱ्या भावना जेव्हा आपल्या आयुष्याच्या चौकटीत बसवण्याचा विचार करतो तेव्हा चुकल्यासारखं वाटतंच पण ती ओढ तरी हवीहवीशी वाटते. हे सगळं चालू असताना अचानक जेव्हा भावना शब्द घेऊन बाहेर येतात तेव्हा त्यात धुंद होण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. अगदी काही क्षण असेच बेधुंद करणारे असतात त्या गारांप्रमाणे... सगळीकडे जशी पांढरी चादर पसरते अगदी ,अगदी तसंच त्या क्षणांच्या आठवणीत आपण सगळंच विसरून जातो..
कुठेतरी काहीतरी आपल्याला ओढत असते. सगळी बंधनं तोडून टाकण्यासाठी. हेच ते जे मला हवं होतं, हीच ती व्यक्ती जिच्यामुळे मी संपूर्ण होतो. असं वाटत असताना अचानक सगळं थांबतं. तीच काही क्षण सर्वस्व वाटणारी व्यक्ती दूर जाते. कारण काही असो पण ते जाणं मनाला चटका लावून जातं. जाणारे मेघ जसे जाताना मागे वळून बघत नाही, तसेच ती व्यक्ती पण मागे वळून बघत नाही. येताना रिकामी आलेली व्यक्ती जाताना मात्र आपल्यातलं खूप काही घेऊन जाते. पण त्या सोबत खूप काही देऊनही जाते. भकास असलेलं आयुष्य अचानक त्या वळवाच्या पावसात नाहून निघालेल्या मातीसारखं सुंदर होते. त्याचा सुगंध पूर्ण आसमंतात दरवळायला लागतो. त्यात अनेक नवीन गोष्टींचे अंकुर फुटतात. पावसाचा शिडकावा झाल्यावर नकोशी वाटणारी जमीन आता सुंदर वाटायला लागते.
आपल्या बाबतीत ही तेच होते नाही का? ज्यांची कधी नजर पण आपल्यावर पडत नव्हती त्यांना आपल्यात झालेले बदल सुखावणारे असतात. अचानक काय झालं, ह्याची जाणीव जशी जमिनीला होतं नाही तशी आपल्याला काय झालं हे आपलं आपल्यालाच माहित असतं.
वळवाचा पाऊस जसा अनेक प्रश्न निर्माण करून पुढे जातो; तशी अनेक उत्तरे ही देऊन जातो.पाण्याला तरसलेल्या जमिनीला हा वळवाचा पाऊस जसं एक वेगळंच आयुष्य देतो तसचं वळवाचं प्रेम...अचानक आयुष्याच्या वाटेवर ते कधी कोणाकडून मिळेल काही माहित नसते. अचानक कोण कसं आपल्या आयुष्यात प्रवेश करतं हेच आपल्याला कळत नाही. जोवर कळायला लागतं तोवर ते निघून पण गेलेलं असतं एका असीम आनंदाचा शिडकावा करून, ज्याचा सुगंध येणारे कित्येक क्षण आपल्याला आपल्या आतच भिजवत राहतो. जाताना खूप सारे प्रश्न निर्माण करून जाणार हे प्रेम अनेक उत्तर ही देऊन जातं.
आयुष्य म्हणजे गणित नाही. सगळचं जमा खर्चात बसवता येतं नाही. कोण कशासाठी आपल्या आयुष्यात येतं? किती काळासाठी? आणि का? ह्याची उत्तर कधीच मिळत नाही. फक्त मिळतात ते वळवाच्या पावसाचे क्षण जे आपल्या मनाच्या कुपीत फक्त वेचायचे, त्या पडलेल्या गारांसारखे ! कारण, पुन्हा कधी वळवाचा पाऊस येईल हे न निसर्गाला माहीत असतं न आपल्याला...

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Saturday, 24 April 2021

संकटातील मित्र... विनीत वर्तक ©

संकटातील मित्र... विनीत वर्तक ©

भारतात सध्या कोरोनारूपी त्सुनामी सुरु आहे. या त्सुनामी चा कहर अजून कमी झालेला नाही. अश्या कठीण परिस्थितीत भारताचे मित्र मदतीला उभे राहिले आहेत. त्याचवेळी आपल्या वंशाच्या म्हणून ज्यांची अनिवासी भारतीयांकडून वोट मिळवण्याकरिता प्रसिद्धी झाली त्यांनी आणि त्यांच्या सरकारने अश्या काळात भारताकडे पाठ फिरवून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तात्या ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहून भारतीय असल्याचा ढोल पिटणाऱ्या कमला हॅरिस आणि त्यांच्या सरकारने भारतासाठी सद्यस्थितीमधे अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कोरोना लसीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा थांबवला आहे. जेव्हा अमेरिकेकडे त्यांच्या लोकसंख्येच्या तिप्पट लसी उपलब्ध असताना आठमुठे पणाचे धोरण सो कॉल्ड भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपतीनी अंगिकारले आहे. भारत कधीच दुसऱ्या देशांच्या मदतीवर अवलंबून नव्हता पण संकटाच्या काळात भारतीय वंशज म्हणून निवडून येणाऱ्या आणि टांग देणाऱ्या या लोकांना भारतीय विसरणार नाहीत हे त्यांनी पण संपूर्ण लक्षात ठेवावं. त्यांची हुजरेगिरी भारतात करणाऱ्या लोकांचे डोळे निदान आतातरी उघडले असतील ही अपेक्षा आहे.

अमेरिकेच्या या पावलांची चाहूल आधीच लागल्याने भारत सरकारने भारतात लस बनवणाऱ्या दोन्ही कंपन्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांना पायाभूत सुविधा म्हणजेच कच्चा माल भारतात तयार करण्यासाठी गेल्या आठवड्यात तब्बल ४५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्यायोगे अमेरिकेच्या मदतीची कोणतीही गरज लागणार नाही. पण अश्या बेभरवशाच्या मित्रांसोबत भारताने जगात केलेल्या व्हॅक्सिन मैत्री ला जागून अनेक भरवशाचे मित्र मदतीला आले आहेत. 

सिंगापूर ने ऑक्सिजन वाहून नेणारे टँकर उपलब्ध केले असून भारतीय वायू दलाच्या सी १७ विमानाने भारतात आणण्यात आले आहेत. भारतासोबत आम्ही या काळात खांद्याला खांदा लावून सोबत असल्याचं सिंगापूर एम्बसी ने ट्विट केलं आहे. 

“We stand with India in its fight against Covid-19,” Singapore’s Embassy 

सौदी अरेबिया ने तातडीने ८० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध केला असून तो लवकरच भारतात आणण्यात येईल. जर्मनी ने २३ मोबाईल ऑक्सिजन प्लांट भारताला दिले असून ह्यातील प्रत्येक प्लांट २४०० लिटर ऑक्सिजन प्रत्येक तासाला उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. ज्यातून २०-२५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो. ह्याशिवाय लसी च्या निर्मितीसाठी लागणार सहाय्य देण्याचं स्पष्ट केलं आहे.  

“We will continue working with German partners to resolve supply chain bottlenecks faced by companies manufacturing Covid vaccine and medicines. India’s uninterrupted vaccine production capacity is central to the success of global vaccination efforts and global economic recovery,” 

 German Embassy 

त्याच सोबत भारताचा मित्र फ्रांस सगळ्या आघाड्यांवर भारता सोबत असल्याचं फ्रांस राष्ट्रपती नी  स्पष्ट केलं आहे. 

"I want to send a message of solidarity to the Indian people, facing a resurgence of COVID-19 cases. France is with you in this struggle, which spares no-one. We stand ready to provide our support," 

 French President Emmanuel Macron  

भारताचा सगळ्यात भरवश्याचा मित्र रशियाने सुद्धा सर्वोतोपरी मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. या सोबत युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम यांनी सुद्धा भारताला सर्वोतोपरी मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबत अनेक छोट्या राष्ट्रांनी भारताला त्यांच्या कुवतीप्रमाणे मदत देण्याचं स्पष्ट केलं आहे. 

भारताच्या या मित्रांसोबत भारताच्या शत्रूंनी मदत करण्याची तयारी दाखवली आहे. चीन आणि पाकिस्तान दोन्ही राष्ट्रांनी भारताला कोरोना विरुद्ध च्या लढ्यात मदत करण्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान मधील ऐदी फाउंडेशन च्या फैझल ऐदी यांनी भारताच्या पंतप्रधानांना पत्र लिहून ५० एम्बुलन्स ची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत ही मदत घेईल का नाही हा मुद्दा नंतरचा आहे. पण निदान मदत करण्याची दानत नक्कीच दिलासा देणारी आहे. 

जिकडे भारताचे शत्रू भारताच्या मदतीसाठी उभे राहतात तिकडे भारतीय वंशंज म्हणून ढोल पिटणारी व्यक्ती भारताची मदत थांबवते हे कुठेतरी बोचणारे आहे. प्रश्न हा नाही की भारताला गरज आहे की  नाही पण ज्या पद्धतीने अमेरिका मधील आत्ताच सरकार वागते आहे त्यांची दानत स्पष्ट करणारे आहे. आता सर्व कडून असंतोषाचा वणवा पेटल्यावर काही ट्विट केले जातील पण म्हणतात न, "बंद से जाती हैं वो हौद से नही आती". त्यामुळे आता अमेरिकेकडून झालेल्या आणि होणाऱ्या मलमपट्टीचा फायदा काहीच होणार नाही. तूर्तास भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या सगळ्या राष्ट्रांचे आभार व्यक्त करतो. 

जय हिंद!!!  

फोटो स्रोत :- गुगल   

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



पुन्हा एकदा तुम्हाला साकडं... विनीत वर्तक ©

 पुन्हा एकदा तुम्हाला साकडं... विनीत वर्तक ©

आता पुन्हा एकदा तुम्हाला साकडं घालत आहोत कारण आम्ही हतबल झालो आहोत. कोरोना च्या त्सुनामी समोर सर्व यंत्रणा कमी पडताना दिसत आहेत. ज्यांनी सगळ्यात पुढे उभं राहून लढायचं असतं तेच सगळे बिळात लपून बसले आहेत. बोटं दाखवायला नाही म्हंटल तरी आम्ही समोर येतो. त्यांनी करायला हवं आणि आम्ही काय केलं याची उजळणी करण्यापलीकडे आम्ही काही करू शकत नाही. कारण लढण्याची मानसिकता आम्हाला परंपंरेने मिळालेली नाही. कोण गेलं? आणि कोण मेलं? या आकड्याना लपवण्यात आमचा वेळ जातो. जीवाची काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही नाहीतरी प्रत्येकावर सोपवली आहे. आता सगळ्या गोंधळाला सांभाळायला पुन्हा तुम्हाला एकदा साकडं घालतो आहे. 

दररोज आकड्यांचे विक्रम आम्ही करतो आहोत. सगळीकडे सगळ्याचा बाजार उठला आहे. याला आम्ही सगळेच जबाबदार आहोत. लग्न, सभा, मतदान, मेळावे सगळच आमच्यासाठी महत्वाचं आहे. खुर्ची च्या खेळात लंगडी खुर्ची पण आम्हाला हवी आहे. तुम्ही त्यावर बसताना पडलात तरी चालेल पण आम्हाला खुर्ची मिळाली पाहिजे हा आमचा मंत्र आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी आम्ही कोरोनाच्या त्सुनामी मधे आंघोळ करू पण देव प्रसन्न झाला पाहिजे. भले त्यासाठी लाखांची कुर्बानी देऊ पण त्याच्या पर्यंत सकाळच्या बांगेचा आवाज मात्र पोहचला पाहिजे. देऊळ असो वा मशीद बंदीला जुगारून आम्ही धर्म रक्षण केलच पाहिजे. आता सगळं हाताबाहेर गेल्यावर आम्हाला तुमचाच आधार आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा साकडं.

पक्षाचा झेंडा आणि पक्षाचं राजकारण या पलीकडे आम्हाला काहीच दिसत नाही कारण आम्ही सगळे एकाच माळेचे मणी. कोण चांगला आणि कोण वाईट  ठरवायला आमची हद्दच नाही. कारण शेकडो मेले आणि लाखो आजारी पडले तरी आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. पण चुकी आमचीच कारण आम्हीच तुम्हाला निवडून दिलं आणि छुपे खेळ करून तुम्ही आम्हाला पाणी पाजलं. चुकी आमचीच कारण कोरोना ला हलके आम्हीच घेतलं. घराबाहेर पडताना मास्क ला नाकाच्या खाली लावलं. आठवड्याचा बाजार, सकाळचे ताजे मासे आणि संध्यकाळची पाव शेर आम्हाला जास्ती महत्वाची होती. ट्रेन मधून प्रवास करण्याची खुमखुमी आम्हालाच स्वस्थ बसून देत नव्हती. 

लॉकडाऊन ला आम्ही हलकं घेतलं. नफातोट्याच्या बिझनेससाठी नियमांना दावणीला बांधल. चुकी कोणाची ह्याचा उपापोह करण्यात काहीच अर्थ नाही कारण भुकेल्या पोटाची आग विझवण्यासाठी दुसरा कोणता मार्ग नाही. आता सगळं चुकलंच. परिस्थिती गेली आहे हाताबाहेर. शेकडो श्वास अडखळले आहेत. ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत. इंजेक्शन, लस आणि औषध सगळ्याचा तुटवडा आहे पण आमच्या नेत्यांना मात्र लंगड्या खुर्ची ची काळजी आहे. तेव्हा आता तुम्हाला पुन्हा एकदा साकडं घालतो या आम्हाला मदत करा. 

गेल्या काही दिवसात तुमच्या मदतीचे परीणाम  दिसायला लागले आहेत. ऑक्सिजन घेऊन ट्र्क आता आकाशातून पोहचत आहेत. पण खूप लांबचा पल्ला बाकी आहे. तुमच्या आधाराची आज खूप गरज आहे. सोशल मिडियावर बसून स्वतःला अतिशहाणे समजणारे अनेक आहेत. पैश्यासाठी तुम्ही नोकरी करता असा टॅग लावणारे पण तेच आहेत. आम्ही चुकलो की तुमची आठवण येते. बाकी कितीतरी वेळा आमच्या खिजगणतीत तुमचं योगदान नसते. पण तुम्ही नेहमीच राष्ट्रसर्वप्रथम ठेवता. देशाच्या एका हाकेवरती आपला प्राण तळहातावर घेऊन लढता. आता पुन्हा एकदा लढाई सुरु झाली आहे. कोरोनाला तुमच्याशिवाय हरवणं अशक्य आहे. तुम्ही यातून राष्ट्राला या संकटातून बाहेर काढतील याच आशेवर पुन्हा तुम्हाला एकदा साकडं घालतो. 

एका भारतीय नागरिकाकडून त्या अनाम सैनिकांना... 

जय हिंद!!!

तळटीप :- पोस्ट चा आशय भारतीय सैन्य दलाशी निगडित आहे. त्याला कोणत्याही राजकीय, पक्षीय आणि वयक्तिक चढाओढीसाठी वापरू नये ही विनंती. 

फोटो स्रोत :- गुगल   

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Thursday, 22 April 2021

एका हेलिकॉप्टर च उड्डाण... विनीत वर्तक ©

 एका हेलिकॉप्टर च उड्डाण... विनीत वर्तक ©

१९ एप्रिल २०२१ रोजी एका हेलिकॉप्टर ने एक उड्डाण केलं आणि मानवाच्या तांत्रिक प्रगतीने अजून एक मैलाचा दगड गाठला. कारण त्या दिवशी केलेलं उड्डाण हे पृथ्वीवर केलेलं उड्डाण नव्हतं तर पृथ्वीपासून लांब असणाऱ्या मंगळ ग्रहाच्या जमिनीवरून केलेलं उड्डाण होतं. नासाच्या मिशन मार्स २०२० या मोहिमेचा भाग असलेल्या इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या पृष्ठभागावरून यशस्वी उड्डाण केलं आहे. १८ फेब्रुवारी २०२१ ला नासाच पेर्सेव्हरन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं. याच रोव्हर च्या खालच्या भागात इंजेनुइटी हेलिकॉप्टर बसवलेलं होतं. ६० दिवस रोव्हर सोबत राहिल्यानंतर ३ एप्रिल २०२१ ला  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्यात आलं. त्याला उतरवल्या नंतर रोव्हर त्याला मागे सोडून १०० मिटर सुरक्षित अंतरावर गेल्यावर तो क्षण समीप आला ज्याची जगातील वैज्ञानिक आणि अभियंते वाट बघत होते. 

१९ एप्रिल २०२१ ला  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं. जमिनीपासून ३ मीटर उंचीवर त्याने ३० सेकंद हॉवर केलं. (हॉवर म्हणजे जागी उड्डाण करत राहणं ). त्या नंतर पुन्हा ते मंगळाच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरलं. २२ एप्रिल २०२१ ला पुन्हा एकदा  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ने मंगळाच्या वातावरणात उड्डाण केलं आणि या वेळेस त्याने १६ फूट उंची गाठली. त्यानंतर ५ डिग्री एका बाजूला ते झुकलं आणि ७ फूट अंतर गाठलं. आपल्यावर असणाऱ्या रंगीत कॅमेराला चालू करून मंगळाच्या त्या विराण पृष्ठभागावर नजर टाकली. पुन्हा आपल्या मूळ जागेवर ते उतरलं. आपलं महत्वाचं मिशन सुरु करण्याआधी अश्या पाच चाचण्या  इंजेनुइटी हेलिकॉप्टरच्या होणार आहेत. त्या यशस्वी झाल्यावर  इंजेनुइटी हेलिकॉप्टर मंगळाच्या कधी काळी अस्तित्वात असलेल्या जीवनाच्या खुणा शोधण्यासाठी डेल्टा नदीच्या पात्रात उड्डाण भरेल. 

वाचायला हे सोप्प वाटलं तरी मंगळाच्या पृष्ठभागावर अश्या पद्धतीने हेलिकॉप्टर उडवणं हे अतिशय कठीण आहे. मंगळाच  वातावरण विरळ आहे. पृथ्वीपेक्षा मंगळवार १/१०० इतकी हवा आहे. त्यामुळे उड्डाणासाठी लागणार बल निर्माण करायला हेलिकॉप्टर च्या पात्यांचा वेग खूप जास्ती आणि त्याचवेळी हेलिकॉप्टर च वजन हे कमीत कमी असणं गरजेचं होतं. त्यात ह्यातल्या सगळ्या यंत्रणा या स्वयंचलित असणं गरजेचं होत. नासाने अश्या पद्धतीचं उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तब्बल ८५ मिलियन अमेरीकन डॉलर मोजलेले आहेत. ज्यातील ८० मिलियन हे हेलिकॉप्टर च्या निर्मितीसाठी आणि ५ मिलियन हे उड्डाणासाठी मोजलेले आहेत.  इंजेनुइटी हेलिकॉप्टर ची पाती प्रत्येक मिनिटाला २४०० वेळा गोल फिरून त्याला उड्डाणासाठी लागणारं बल निर्माण करतात. (हे बल म्हणजे पृथ्वीवर ३०,००० मीटर उंचीवर उड्डाण भरण्यासाठी हेलिकॉप्टर ला सक्षम करणं जे आज जगातील कोणतंही हेलिकॉप्टर निर्माण करू शकत नाही.) यावरील कॉम्प्युटर याच्या उड्डाणाच्या सगळ्या यंत्रणा नियंत्रित करतो.याच संपूर्ण वजन अवघे १.८ किलोग्रॅम आहे. हे हेलिकॉप्टर ५० मीटर उंची पर्यंत उड्डाण भरण्यास सक्षम असून आपल्या रेडिओ केंद्रापासून १००० मीटर अंतरा पर्यंत उड्डाण भरू शकते. 

नासाचे हे उड्डाण अनेक अर्थाने महत्वाचं ठरलं आहे. आत्तापर्यंत मानवाच्या संशोधनाच्या मर्यादा या एखाद्या परग्रहावर रोव्हर पाठवून त्याच्या पृष्ठभागाचे  संशोधन आणि तिथल्या दगड मातीच संशोधन करण्यापर्यंत मर्यादित होत्या पण आता या संशोधनासाठी अजून एक मार्ग शक्य झाला आहे. रोव्हर च्या वेगामुळे त्याची मर्यादा ही काही क्षेत्रापर्यंत मर्यादित होती पण इंजेनुइटी सारख्या हेलिकॉप्टरच्या तंत्रज्ञान निर्मितीने वातावरणातून ग्रहाचा अभ्यास करण्याचा मार्ग खुला झाला आहे.  इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या पुढल्या ३ चाचण्या २६ एप्रिल, २९ एप्रिल आणि २ मे रोजी प्रस्तावित आहेत. या चाचण्यांना आपण घर बसल्या थेट मंगळावरून बघू शकतो. नासाने ती यंत्रणा सगळ्यांसाठी उपलब्ध केली आहे. मानवाच्या या एका अदभूत क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी न गमावता आपण त्याचा आनंद या लॉकडाऊन च्या काळात नक्कीच घ्यायला हवा. 

इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या निर्मितीमागे असणाऱ्या अभियंते आणि वैज्ञानिक यांच अभिनंदन आणि  इंजेनुइटी हेलिकॉप्टर च्या पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा. 

फोटो स्रोत :- गुगल     

 सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 





Friday, 16 April 2021

'रेमडेसिव्हिर' लक्ष्य चुकलेला एक बाण... विनीत वर्तक ©

'रेमडेसिव्हिर' लक्ष्य चुकलेला एक बाण... विनीत वर्तक ©

रेमडेसिव्हिर हे नाव सध्या घराघरात बोललं जाते आहे, अनेक बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. त्याशिवाय राज्य आणि केंद्र अश्या दोन्ही सरकारच्या रडार वर आहे. कोरोना चा उद्रेक जसा वाढतो आहे तसतसं रेमडेसिव्हिर या औषधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. अनेक ठिकाणी त्याचा तुटवडा जाणवतो आहे. कित्येक ठिकाणी याचा काळा बाजार केला जातो आहे. याची मागणी गेल्या काही आठवड्यात इतकी वाढली आहे की केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पण ज्या पद्धतीने लोक वेड्यासारखी या औषधासाठी धावता आहेत ते बघून अनेक प्रश्न मनात उभे राहिले आहेत. नक्की हे औषध काय आहे? कोरोनावर हे औषध लागू पडते का? याने जीव वाचतो का? कोणाला हे औषध देण्याची गरज आहे? अर्थात ह्या सगळ्या प्रश्नांवर निष्णात डॉक्टरी पेश्याशी निगडित लोक उत्तर देऊ शकतील. पण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून यातील काही प्रश्नांची उत्तर आपण समजून घेतली तर खूप प्रमाणात होणाऱ्या हावरट वृत्तीला आपण आळा घालू. 

रेमडेसिव्हिर या औषधाची निर्मिती २००९ साली केलिफोर्निया, अमेरीका  इकडे स्थित गिलेड सायन्स ने केली. त्यावेळी हे औषध 'हेपॅटिटिस सी' या प्रकारच्या काविळीवर मात करण्यासाठी बनवलं गेलं. पण अपेक्षित परिणाम न दिसल्याने ह्या औषधाला मान्यता मिळाली नाही. पुन्हा ह्या औषधाच्या २०१४ साली इबोला या व्हायरस वर मात करण्यासाठी चाचण्या केल्या गेल्या. त्यावर काही चांगले परिणाम दिसल्याने हे औषध चर्चेत आलं. तेव्हापासून हे औषध Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) अश्या दोन प्रकारच्या व्हायरस ला मात देण्यासाठी वापरलं जाते आहे. आता कोरोना व्हायरस हा सुद्धा वर उल्लेख केलेल्या जातीतील असल्यामुळे रेमडेसिव्हिर हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. 

रेमडेसिव्हिर नक्की काय करते? तर कोणत्याही व्हायरस मधे DNA or RNA हे जेनेटिक मटेरियल असते. कोणताही व्हायरसला आपली संख्या वाढवण्यासाठी एंझाइम ची गरज लागते. आपल्या शरीरातील एंझाइम वापरून व्हायरस आपली संख्या वाढवत नेतात. कोरोना व्हायरस ला आपली आवृत्ती काढण्यासाठी RNA-dependent RNA polymerase (RdRp) हे एंझाइम लागते. जर हे मिळालं नाही तर कोरोना व्हायरस आपल्या आवृत्या निर्माण करू शकत नाही आणि त्याचवेळी शरीरातील त्याचा लोड कमी होतो आणि आपल्या शरीरातील इम्यून सिस्टीम त्याला लढा देऊ शकते. इकडेच रेमडेसिव्हिर कामाला येते. हे औषध हे एंझाइम कोरोना व्हायरस ला मिळू देत नाही आणि त्याचा प्रसार थांबतो. (कोणत्याही सैन्याला युद्ध करण्यासाठी रसद महत्वाची असते. रसद तोडलीत तर अर्ध युद्ध आपण जिंकल हा युद्धाचा नियम आहे. कोरोना च्या लढाईत रेमडेसिव्हिर नेमकी रसद तोडण्याची भूमिका बजावते.)

रेमडेसिव्हिर हे खरच तसं करते का? या प्रश्नाचं उत्तर मात्र गोंधळ उडवणार आहे. त्यामुळेच अनेक देशात याच्या उपयोगावर बंदी आणली गेली आहे. अमेरिकेच्या (Food and Drug Administration) ने २८ ऑक्टोबर २०२० ला रेमडेसिव्हिर चा वापर कोरोना रोगावर करण्यास मान्यता दिली. अमेरिकेत घेतलेल्या चाचण्यांमध्ये कोरोना रोग्यांना हे औषध दिल्यावर जवळपास ५ दिवस लवकर रोगी बरे झाले. त्यामुळे कुठेतरी हे औषध कोरोना विरुद्ध काम करते आहे असं दिसून आलं आणि याचा वापर जवळपास ५० देशात सुरु झाला. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने केलेल्या चाचण्यांमध्ये मात्र रेमडेसिव्हिर हे कोणत्याही प्रकारे कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्यास अथवा रुग्णांना लवकर बर करण्यास यशस्वी ठरत नसल्याचं दिसून आलेलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी याचा वापर संपूर्णपणे बंद केला आहे. रेमडेसिव्हिर खरच उपयोगी आहे का नाही? हा प्रश्न अनुत्तरित म्हणता येईल. 

रेमडेसिव्हिर वापरल्याने शरीराला इजा पोहचू शकते. याचे काही साईड इफेक्ट आहेत. ज्यात लिव्हर खराब होऊ शकते, ब्लड प्रेशर, हार्ट रेट यावर त्याचा प्रभाव पडतो आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय हे औषध खरेदी करणं तसेच ते शरीरात टोचणे जीवघेणं ठरू शकते. वर सांगितलं त्या प्रमाणे रेमडेसिव्हिर रसद तोडण्याचं काम करते पण त्या बदल्यात आपल्या शरीराला काहीतरी मोबदला मोजावा लागतो. जर रसद तोडण्याचं काम ते करू शकत नसेल तर ते घेऊन आपल्या शरीराचा मोबदला आपण का द्यायचा? त्यामुळे गुगल डॉक्टर न होता त्याच्या वापरासाठी योग्य तो वैद्यकीय सल्ला घेणं अपेक्षित आहे. रेमडेसिव्हिर हे कोरोना रोगामुळे अतिशय गंभीर असणाऱ्या रोग्याला देण्याची गरज असते. त्याचा निर्णय हे डॉक्टर घेतात. तेव्हा गरज नसेल तर उगाचच घरात साठवून ठेवण्यासाठी रेमडेसिव्हिर खरेदी करू नका. तुमच्या घाईमुळे एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ शकतो. 

"Remdesivir is to be used only in those who require hospitalization and are on oxygen support. There is no question of its use in the home setting and for mild cases, and it is not to be procured from chemist shops". 

NITI Aayog member (Health) Dr VK Paul

रेमडेसिव्हिर हे औषध भारतात ७ औषधी कंपन्या बनवत असून ३९ लाख डोस प्रत्येक महिन्याला बनत आहेत. पण आता कोरोनाचा प्रसार बघता त्याची संख्या निश्चितपणे वाढली असेल. 

रेमडेसिव्हिर चा इतिहास बघितला तर तो लक्ष्य चुकलेला बाण आहे. जे आधी वेगळ्या कारणासाठी बनवलं गेलं आणि आता वेगळ्याच कारणासाठी उपयोगात येत आहे. त्यामुळे हा बाण दुसऱ्या लक्ष्याचा भेद करतो की नाही याबद्दल संभ्रम आहे. अश्या सगळ्या परिस्थितीत आपलं डोकं न लावता योग्य त्या वैद्यकीय सल्याच पालन करणं हाच आपला योग्य बचाव आहे. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Thursday, 15 April 2021

'मायक्रो ॲग्रेशन' एक उघड गुपित... विनीत वर्तक ©

'मायक्रो ॲग्रेशन' एक उघड गुपित... विनीत वर्तक ©
काल
Sulakshana Varhadkar
सुलक्षणा वऱ्हाडकर यांचा मायक्रो ॲग्रेशनवर केलेला व्हीडिओ पाहिला, आणि अनेक दिवस मनात असलेल्या भावना समोर आल्या. "मायक्रो ॲग्रेशन"चा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीवर मोठ्या समुदायाकडून नकारात्मक टिप्पणी. ही टिप्पणी एखाद्या व्यक्तीला अथवा काही व्यक्तींना उद्देशून केलेली असते आणि जी मुद्दामहून किंवा नकळत केली जाते. 'मायक्रो ॲग्रेशन' हा एक प्रकारचा भेदभाव आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या जाती, धर्म, रंग किंवा व्यक्तिमत्व ते त्याचा प्रांत, भाषा अनेक गोष्टींवरून केला जातो. याची झळ नकळत त्या व्यक्तीला लागते, ज्याच्यामुळे मानसिक स्ट्रेस होतो. 'मायक्रो ॲग्रेशन' चा परिणाम हा फक्त नकारात्मक भावनेपुरती उरत नाही तर तिचे दूरगामी परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिक आणि कधी शारीरिक क्षमतेवर दिसून येतात ज्यातून ती व्यक्ती कधी संपूर्ण खचून जाऊ शकते किंवा कधी कधी आयुष्याचा शेवट करेपर्यंत या गोष्टी जाऊ शकतात.
फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर तर 'मायक्रो ॲग्रेशन' अनेकदा अनुभवायला येतं. अनेकदा ते दिसतं अनेकदा पडद्यापाठी असतं. तुमचं आडनाव, शिक्षण, तुमच्याकडे असलेलं स्टेटस या सगळ्यावर ठरवून टार्गेट केलं जातं. यासाठी व्यूहरचनाही ठरवल्या जातात. अर्थात या सगळ्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च करण्याची कित्येक लोकांची मानसिकता असते. त्यासाठी मग एखाद्याच्या चारित्र्याचा बाजार उठवायलाही लोक मागे पुढे बघत नाहीत. झुंडशाही हाही 'मायक्रो ॲग्रेशन' चा एक भाग. झुंडीने आपली मतं म्हणजेच सर्वोपरी, आणि बाकी जणांच्या मतांना किंवा ते मांडणाऱ्या लोकांना तुम्ही आमच्यातले नाहीत, हे जाणूनबुजून दाखवून देणं हाही प्रकार इकडे अनेकांनी इकडे अनुभवला असेल. हो ला हो करत एखाद्याला वेगळं पाडून त्याला सर्व बाजूने घेराव टाकून त्याला एकतर मैदान सोडायला लावणं अथवा त्याला पूर्णपणे जमीनदोस्त करणं हे फेसबुकवर उघडपणे सुरू असतं.
कोणी याच्या विरोधात बोललं तर त्याला जातीच्या, धर्माच्या आणि रंग-रूपाच्या तराजूत तोलून आपण कसे बरोबर हे सिद्ध करण्याचा अट्टाहासही केला जातो. आपल्याच सारखे विचार, धर्म, जात आणि स्टेटस असणाऱ्या लोकांची वाहवा करून त्यापेक्षा कोणीतरी वेगळी प्रतिभा दाखवत असेल तर त्याला आपल्या पुढे जाऊ न देण्याची मांडणी म्हणजेच 'मायक्रो ॲग्रेशन'. एक तर नवीन केलेल्या एखाद्या गोष्टीवर अथवा लिहिलेल्या विषयावर आक्षेप नोंदवला जातो मग आक्षेप येतात त्यातल्या लिखाणावर वर मग त्यावरती आलेल्या कमेंट वर आणि मग आपण करत असलेल्या रिप्लायवर आक्षेप नोंदवले जातात. टीका केली जाते, ठरवून, झुंडीनं येऊन असं मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग करून हे लोक मैदानात उतरत असतात, जो कुणी यांच्यापेक्षा थोडासा वेगळं काही करत असेल, अथवा त्यांच्यापेक्षा पुढे जातो आहे, हे दिसलं की ही सगळी लॉबी ऍक्टिव्ह होते. एखाद्याला, जो कुणी वेगळी चुणूक दाखवेल त्याला संपवायला पद्धतशीर पणे ही लॉबी कार्यरत असते. हे सगळं इतक्या टोकाला जाऊ शकतं की माणूस आयुष्यातून उठू शकतो इतकं याचं भयावह स्वरूप आहे. आम्ही त्यातले नाहीच म्हणत आम्ही त्यातलेच हे दाखवून देणं म्हणजे पण 'मायक्रो ॲग्रेशन'. अर्थात हे सगळं फेसबुकपुरतं मर्यादीत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा अश्या अनेक विविध पातळीवर आपल्यापैकी प्रत्येकाने ते अनुभवलं असेल.
कामाच्या ठिकाणी तर हे जास्ती प्रमाणात जाणवते. जेव्हा तुम्ही मल्टीनॅशनॅलिटीजच्या लोकांसोबत काम करत असता तेव्हा ह्याचं स्वरूप खूप प्रखरतेने समोर येतं. तुमच्या रंगावरून तुम्हाला मिळणाऱ्या वागणुकीत फरक पडतो. हा फरक फक्त चालण्या-बोलण्यात नाही तर अगदी आर्थिक पातळीवरही दिसून येतो. आता जिकडे मी काम करतो तिकडे सध्या १८ वेगवेगळ्या देशांची नागरिकता असलेले लोक एकत्र काम करत आहेत. प्रत्येक खंडाचे नेतृत्व करणारे लोक जेव्हा बरोबर काम करतात, तेव्हा या 'मायक्रो ॲग्रेशन'चा अनुभव मला पदोपदी येतो. एखादा व्यक्ती कुठून आला ह्यावर त्याची कार्यकुशलता ठरवली जाते. एखाद्या व्यक्तीच्या इंग्रजी भाषेवर असलेल्या प्रभुत्वावरून त्याच्याबद्दल मत बनवले जाते. एखाद्या व्यक्तीच्या खाण्याच्या सवयीवरून त्याची पत ठरवली जाते. हे सगळं एखादा विशिष्ट लोकांचा समूह कधी नकळत तर अनेकदा जाणूनबुजून करत असतो.
या सर्वाचा जी व्यक्ती याला बळी पडते, तिच्यावर खूप परिणाम होतो. माझ्या पाहण्यात कित्येक लोक असे आहेत, ज्यांचं आयुष्य फेसबुकवरच्या 'मायक्रो ॲग्रेशन' मुळे उध्वस्त झालेलं आहे किंवा होता होता वाचलेलं आहे. ती व्यक्ती ज्या पद्धतीने तुटून जाते, त्याला नकळत कुठेतरी भयावह किनार आहे. आपण समाज म्हणून कुठेतरी या सगळ्याला कारणीभूत आहोत. या घोळक्यांकडून अशी काही वातावरण निर्मिती होत असते की आपणही आपल्याच नकळतपणे कित्येकदा अश्या केल्या जाणाऱ्या छळाला छुपं समर्थन मायक्रो एग्रेशन करणाऱ्या घोळक्याला करत असतो. आपण अनेकदा इच्छा असूनही ग्रुप किंवा घोळक्यामुळे त्यात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी अथवा त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहण्यासाठी पुढे येत नाही. उलटपक्षी झालेल्या प्रकाराला अजून मीठ मसाला लावून त्याचं गॉसिप करण्यात धन्यता मानतो. हे सगळं करणारा तो घोळका सगळं करून सवरून नामानिराळा राहतो, आणि भोगणारा हे भोगत राहतो इतकं भोगतो की कधीकधी त्यातून बाहेरही निघू शकत नाही .
फेसबुक किंवा सोशल मिडीयावर 'मायक्रो ॲग्रेशन' करणाऱ्या अश्या ग्रुप आणि मनोवृत्तीच्या माणसांना आपल्या जवळ न येऊ देणं हा सगळ्यात सोप्पा उपाय आहे. अनेकदा आपण आपली प्रतिभा अश्या मानसिकतेच्या लोकांच्या प्रतिक्रियेवरून ठरवत असतो. त्यामुळे तेच आपलं जग अशी आपली अवस्था करून टाकतो. कारण झुंडीने फिरणारे हे लोक आपण कोणीतरी मोठे असा टॅग लावून फिरत असतात किंवा त्यांच्या प्रतिभेचा त्यांना माज असतो. त्यामुळेच याचा विरोध आणि प्रतिकारसुद्धा त्याच पद्धतीने पण आपली पत न घालवता केला जायला हवा. कारण अनेकदा आपण रागाच्या भरात एक पायरी खाली येतो आणि समोरच्याला अजून टार्गेट करण्यासाठी संधी देतो.
'मायक्रो ॲग्रेशन' हा मॅनेजमेन्टचा विषय आहे आणि तो खूप मोठा आहे. पण निदान सोशल मीडियाच्या बाबतीत एकतर अनुल्लेखाने टाळणं, योग्य शब्दात प्रतिकार करणं आणि आपल्या संवेदनाना त्यामुळे ठेच पोहचू न देणं आपल्याला शिकावं लागेल. आपण लोकांना किंवा 'मायक्रो ॲग्रेशन' करणाऱ्या ग्रुपना बदलू शकत नाही. कारण ते तुमच्या, आमच्या फ्रेंडलिस्ट,ग्रुपमध्ये सगळीकडे आहेत. समोर आपलं गुणगान करून आपल्यामागे आपल्याला बदनाम करण्यासाठी व्यूहरचना रचणारे आहेत त्यांना ओळखून त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर द्यायला शिकणं हे आपण सोशल मिडिया वर असताना शिकायला हवं. स्वतःच्या प्रतिभेची जाण आणि आवाका स्वतःला माहीत असणे, कोणताच न्यूनगंड अथवा इन्फेरिओरिटी कॉम्प्लेक्स न बाळगता वावरायला शिकणे. कितीही वेळ आली तरी अश्या झुंडशाही ला सामोरे जाण्यासाठी आपलीही तितकीच तयारी असणे, आपलाही तेवढाच मोठा लोकसंग्रह वाढवणे, हे लोक त्यांच्या कुटनितीत यशस्वी होत राहतात कारण ते कळप बनवतात. त्याला संलग्न आपल्याशी आपल्या विचारांशी मिळताजुळता जमाव आपणही जमवला तर अश्यांची आपसूक नसबंदी आपण कायमस्वरूपी नक्कीच करू शकू आणि एका प्रगल्भ समाजाच्या जडणघडणीला हात भर लावू.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Saturday, 10 April 2021

एका इंजेक्शन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका इंजेक्शन ची गोष्ट... विनीत वर्तक ©

२०२० वर्षाने संपूर्ण जगाचे संदर्भच बदलवून टाकले. एकीकडे लॉकडाऊन, कोरोना विषाणू चा कहर यामुळे जिकडे उद्योगधंद्यांच कंबरड मोडलं तिकडे दुसरीकडे काही उद्योगांनी कात टाकली. स्वतःच्या वैद्यकीय अवस्थेबद्दल जागरूक नसलेले देश खडबडून जागे झाले. यात सगळ्यात अग्रक्रम लागतो तो भारताचा. भारतात वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक उद्योगांनी कात टाकली. या विषाणूचा फैलाव जसा जगभर झाला तसं जगातील सर्व देशांना या उद्योगांकडून भरीव योगदानाची गरज भासू लागली. आता प्रश्न पैश्याचा नव्हता तर पुरवठ्याचा होता. इतके वर्ष संपूर्ण जगाला गपचूप निरोगी करणारे भारतीय उद्योग ज्यांची कल्पना भारतीयांना नव्हती अचानक त्यांचा उदय जागतिक पटलावर झाला. यातील एक नाव म्हणजे एच.एम.डी. हिंदुस्थान सिरींज एन्ड मेडिकल डिव्हाइसेस. ( Hindustan Syringes & Medical Devices (HMD). 

एच.एम.डी. ची स्थापना २ ऑगस्ट १९५७ मधे नरेंदर नाथ यांनी केली. ते एक केमिस्ट होते. या क्षेत्रात काम करताना त्यांच्या चाणाक्ष नजरेला इंजेक्शन, सुया आणि इतर वैद्यकीय सामानाच्या बाबतीत भारतात खूप मोठी पोकळी जाणवली. त्याकाळी भारतात ही सगळी उत्पादन विदेशातून आयात केली जात होती. भारताला या बाबतीत स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच एका नव्या उद्योगात भारताचा तिरंगा रोवण्यासाठी त्यांनी एच.एम.डी. ची स्थापना केली. आपल्या ६५ वर्षाच्या इतिहासात ही कंपनी एका घराण्या पुरती मर्यादित राहिलेली आहे. नरेंदर नाथ नंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच आजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव नाथ यांनी कंपनीला एका वेगळ्या स्तरावर नेलं.

२०२० साल उजाडलं आणि कोरोनाचा वणवा संपूर्ण जगात पेटला. कोरोनावर अनेक कंपन्यांनी संशोधन करून लसीची निर्मिती केली. एका अंदाजाप्रमाणे जगात १० बिलियन लस जगातील संपूर्ण लोकसंख्येला कोरोनमुक्त करण्यासाठी लागणार आहेत पण ती लस माणसाच्या शरीरात टोचण्यासाठी लागणार इंजेक्शन कुठून आणणार? भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट कडे आज संपूर्ण जगाच लक्ष लसीसाठी लागलं आहे. त्याचवेळी संपूर्ण जग इंजेक्शनसाठी पुन्हा एकदा भारताकडे आशेने बघत आहे. आशियातील सगळ्यात जास्ती इंजेक्शन बनवणारी कंपनी म्हणजेच एच.एम.डी. आज नरेंदर नाथ यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचा कल्पवृक्ष झाला आहे. फरिदाबाद इथल्या कंपनीच्या फॅक्टरी मधे मिनिटाला तब्बल ६२५० पेक्षा जास्ती इंजेक्शन बनवली जात आहेत. या वेगाने तब्बल ३ लाख ७५ हजार इंजेक्शन प्रत्येक तासाला तयार होत आहेत. जुलै २०२१ पर्यंत कंपनी प्रत्येक वर्षाला तब्बल ३ बिलियन इंजेक्शन बनवण्याची क्षमता निर्माण करेल.  

आज एच.एम.डी. भारत सरकारला सप्टेंबर २०२१ पर्यंत ४४० मिलियन इंजेक्शन कोरोना लसी भारतीयांना देण्यासाठी पुरवत आहे. यातील १७७ मिलियन इंजेक्शन एकट्या एप्रिल महिन्यात भारत सरकारला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की या प्रत्येक इंजेक्शन ची किंमत अवघी २ रुपये असणार आहे. भारतीयांसाठी अतिशय कमी किमतीत आणि जातीत जास्त पुरवढा करण्याचं कंपनीने ठरवलं आहे. या सोबत एच,एम.डी. २४० मिलियन कोजॅक इंजेक्शन कोवॅक्स मार्फत युनिसेफ ला देणार आहे. ७९ मिलियन इंजेक्शन ब्राझील या देशाला देणार आहे. १५ मिलियन इंजेक्शन जपान ला देणार आहे. याशिवाय तब्बल १२० देशांना इंजेक्शन देण्याच्या ऑर्डर एच,एम.डी.ला मिळालेल्या आहेत. हे फक्त कोरोना साठी झालं ह्याशिवाय इतर लसी आणि औषध देण्यासाठी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटल आणि संस्था यांच्या ऑर्डर ही एच,एम.डी. वेळेत पूर्ण करणार आहे. 

हे आकडे डोळे विस्फारणारे आहेत. जगाच्या पाठीवर एका भारतीय उद्योगाने विश्वासाने, सचोटीने आणि सर्वसामान्यांना परवडेल अश्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध करून भारताची शान आज वाढवली तर आहेच पण त्याही पलीकडे एका नव्या आत्मनिर्भर भारताच्या उदयाची नांदी जगाच्या पाठीवर केली आहे. एकेकाळी जिकडे भारत या क्षेत्रात काही बनवू शकेल का अशी शंका होती तिकडे आज भारत नेतृत्व करत आहे. राजीव नाथ यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रम यामुळेच आज एच,एम.डी. या पातळीवर पोहचली आहे. 

“India is our priority and comes first but we do have to honor our global commitments and play a balancing role. So, for now, we are allocating two-thirds capacity of KOJAK AD syringes to the government and one-third to our regular global UN clients. We are happy to complement Vaccines Diplomacy with Syringes Diplomacy and raise the Brand India flag in over 120 countries worldwide.” 

Rajiv Nath.  

मार्च २०२० मधे एच.एम.डी. ची क्षमता ८०० मिलियन कोजॅक इंजेक्शन बनवण्याची होती. भविष्यात काय होणार आहे याचा विचार करून राजीव नाथ यांनी कंपनीची क्षमता वाढवण्यासाठी १०० कोटीची गुंतवणूक केली. ज्यात इंजेक्शन बनवणाऱ्या मशीन, लोक, तंत्रज्ञान यांचा समावेश होता. त्याच दूरदृष्टीमुळे आज एच.एम.डी. जवळपास १.२ बिलियन कोजॅक इंजेक्शन वर्षाला बनवण्याच्या वेगाने काम करून अनेकांचे प्राण वाचवत आहे. 

एका छोट्या उद्योगातून भारताचा तिरंगा अटकेपार नेणारे राजीव नाथ आणि संपूर्ण एच.एम.डी. ला माझा नमस्कार. तुमच्या पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

 फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



Thursday, 8 April 2021

सामाजिक जबाबदारी... विनीत वर्तक ©

 सामाजिक जबाबदारी... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसात कोरोना आजाराचा वेग प्रचंड वाढला आहे. गेल्या २४ तासात भारतात १,३१,९६८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. एकट्या महाराष्ट्रात २४ तासात ५६,२८६ नवीन रुग्ण नोंदले गेले आहेत. कोरोना फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे हातपाय पसरतो आहे. नक्कीच महाराष्ट्रात त्याचा वेग प्रचंड आहे याबद्दल दुमत नाही. पण या सगळ्याला कारणीभूत कोण? या प्रश्नावर सोशल मिडिया किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्म वर सर्वच जण आपल्या पक्षांचे झेंडे घेऊन उभे राहतील. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यावर आरोपाची गरळ ओकली जाईल. लसी आणि त्यांच्या प्रत्येक राज्याला होणारा पुरवढा यांच्या आकड्यांच गणित मांडलं  जाईल. त्यावरून एकमेकांची जात, धर्म ते शिवागीळ करण्यापर्यंत सगळ्यांची मजल जाईल. मला त्यात जायचं नाही. 

मुळात यात दोष कोणाचा आहे? तर एक सशक्त समाज म्हणून आपण कमी पडलो आहोत. आज कोरोना ज्या वेगाने वाढतो आहे त्याला आपण समाजाचा भाग म्हणून कारणीभूत नाही का? गेले वर्षभर प्रत्येक माध्यमातून कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी कितीतरी सूचना केल्या गेल्या आहेत. आपण काय करायला हवं आणि काय करायला नको याचा उपापोह गेले वर्षभर आपण करत आलेले आहोत. आज प्रत्येक माणसाला कोरोना मधे आपण कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती आहे. पण ती घेण्याची जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यात एक समाज म्हणून आपण सपशेल अयशस्वी राहिलेलो आहोत. 

गेल्या वर्षी हा आजार नवीन होता त्यामुळे खूप सारे संभ्रम सगळ्यांच्या मनात होते पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज डॉक्टर पासून पेशंट पर्यंत लहान मुलापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत, श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सगळ्यांना आपण काय केलं पाहिजे हे माहित आहे. पण आपण काय वागतो? आपण काळजी घेतो का? आपण योग्य रीतीने मास्क घालतो का? आपण सोशल डिस्टंसिंग च पालन करतो का? आपण आपल्या सोबत इतर लोकांना याच पालन करावयास भाग पाडतो का? कारण आपण कितीही काळजी घेतली तरी समोरचा एक जरी काळजी घेत नसेल तर तो काळजी घेणाऱ्या सगळ्यांना कोरोना आजाराचं संक्रमण करू शकतो हे आपण लक्षात कधी घेणार आहोत? 

नाकाच्या खाली घातलेला मास्क, रस्त्यावर शिकणं, थुंकणे, एकमेकात योग्य ते अंतर न राखण यामुळे आजची स्थिती आलेली आहे. याला कोणतं सरकार जबाबदार नाही तर तुम्ही,आम्ही आणि आपण सर्वच जबाबदार आहोत. बेड वाढवा, व्हेंटिलेटर ची संख्या वाढवा, ऑक्सिजन वाढवा हे सगळे आजार झाल्यानंतरचे उपाय आहेत. पण आपण आजार टाळण्यासाठी काय करत आहोत? जगातील कोणतीही लस ही कोरोना होण्यापासून वाचवू शकत नाही. लस ही फक्त जीवन आणि मृत्यू यातील अंतर वाढवते. लस घेतल्यामुळे फारतर मृत्यू तुम्हाला कवटाळू शकणार नाही पण ती कोरोनाला रोखू शकत नाही. लस घेतल्यामुळे तुम्हाला जरी मृत्यूने हुलकावणी दिली तरी तुम्ही त्या काळात दुसऱ्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरणार आहात त्या पापाच शल्य आपल्याला आहे का?

सामाजिक जाणीव आणि जबाबदारी फक्त आणि फक्त कोरोनाला थोपवू शकते. लग्न, मुंज, वाढदिवस, पार्टी, सिनेमा, सभा, आंदोलन हे आपल्या जिवापेक्षा महत्वाचे आहेत का? त्याने केलं म्हणून मी पण करणार याच न्यायाने आपण पुढे जाणार आहोत का? जर जाणार असू तर ही सुरवात आहे येत्या काळात २-३ लाख / प्रति दिवस रुग्णसंख्येचा आकडा गाठायला फार वेळ लागणार नाही. आपण का म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करू शकत नाही? आज ठरवू की माझ्यासोबत मी प्रत्येकाला कोरोना संबंधीच्या काळजी घेण्याचं शिवधनुष्य उचलेन. ती व्यक्ती सांगून ऐकत नसेल तर योग्य त्या रीतीने पोलीस, नायायालयीन यंत्रणा किंवा राजकीय पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्या व्यक्तीला ती काळजी घेण्यास भाग पाडीन. कारण कोरोनाचा प्रसार मी एकटा थांबवू शकत नाही. मी एकटा अपुरा आहे. आम्ही, एक समाज म्हणून जेव्हा त्याच्या विरुद्ध उभे राहू तेव्हा आणि तेव्हाच कोरोना हा थांबेल. 

 बाकीच्यांच मला काय? हा आपला विचार जर आपण लवकरात लवकर बाजूला केला नाही तर आपलं आणि आपल्या लोकांचंही आयुष्य टांगणीला लागलेलं आहे. सरकारवर खापर फोडण्यात अर्थ नाही. आज तहान लागल्यावर सगळेजण लस घ्यायला धावत आहेत. इतके दिवस लस घ्या म्हणून आवाहन करावं लागत होतो तेव्हा आपण सोशल मीडिया वर राजकारणाचे आणि कोणती लस चांगली आणि वाईट याच बिगुल वाजवण्यात मग्न होतो. आता जेव्हा आपल्या दाराशी कोरोना आला तेव्हा सगळ्यांना लस घेण्याची घाई झाली आहे. एवढ्या लोकसंख्येला पुर  पडण्याची क्षमता कोणत्याच देशाकडे अथवा सरकारकडे नाही. तेव्हा समाज म्हणून आपली जबाबदारी ओळखून कोरोनाला आपल्या वेशीवर थांबवायची गरज आहे. हे शक्य करायचं असेल तर आपण आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण क्षमतेने पूर्ण केली पाहिजे. 

तळटीप :- कोणतेही राजकीय मुद्दे या पोस्ट शी जोडू नयेत. कोणत्या राज्याला काय लस दिली? आणि कोणी काय केलं? या राजकीय गोष्टींचा संबंध पोस्ट शी नाही किंवा पोस्ट चा उद्देश तो नाही . 

 फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

     


Tuesday, 6 April 2021

चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©

चिनाब आर्च ब्रिज... विनीत वर्तक ©

कमानीचा पूल बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे. जगातील सगळ्यात जुना कमानीचा ब्रिज साधारण ३३०० वर्षांपूर्वी (Mycenaean Arkadiko Bridge) ग्रीस इकडे निर्माण केला गेला आहे, जो आजही आस्तित्वात आहे. जावळीच्या खोऱ्यात पार्वतीपूर इकडे बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूल आजही जवळपास ३५० वर्षांनंतर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्यामुळेच कमानी पद्धतीने एखादा पुलाचे निर्माण करणे, हे काळाच्या कसोटीवर उतरलेले तंत्रज्ञान आहे असे आपण म्हणू शकतो. कमानी पूल हा संकुचन (compression) पद्धतीने त्यावर पडणारा भार विस्थापित करतो. भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे जम्मू आणि काश्मीरला मुख्य भारताशी दळणळणाच्या सोयींनी संलग्न करणे. त्याचाच भाग म्हणजे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्प (USBRL:- Udhampur-Srinagar-Baramulla rail link project)   

या प्रकल्पाचा हिस्सा म्हणून चिनाब या नदीवर एक आर्च ब्रिज म्हणजेच कमानीचा पूल बांधण्यात येतो आहे. हिमालयाच्या कुशीत साकार होणारा हा पूल स्थापत्यशास्त्राच्या आणि अभियांत्रिकीच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. हिमालयाचा हा भाग अतिशय उंच पर्वतरांगांनी वेढलेला आहे. त्यात इथली जी जमीन आहे ती अतिशय भुसभुशीत किंवा भूस्खलन होणारी आहे. इथलं हवामान, वारे आणि एकूणच सगळी भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल अशी आहे. त्यामुळेच अश्या परिस्थितीमध्ये रेल्वे मार्ग बांधणं हे खूप कठीण काम आहे. अश्या प्रतिकूल परिस्थितीमधे रेल्वे मार्ग बांधण्याचा अनुभव भारतातील कोकण रेल्वे महामंडळाला आहे. त्यामुळेच हे काम कोकण रेल्वे महामंडळाकडे सोपवण्यात आलं आहे. चिनाब नदीवर बांधण्यात आलेला चिनाब आर्च ब्रिज हा अनेक गोष्टींनी विशेष आहे. त्यातील काही विशेषता खालीलप्रमाणे,

१) चिनाब आर्च ब्रिज हा जगातील सगळ्यात उंचीवरचा रेल्वे ब्रिज आहे. चिनाब नदीच्या तळापासून या ब्रिजची उंची तब्बल ३५९ मीटर आहे. ही उंची जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पेक्षा ३५ मीटरने जास्त उंच आहे.    

२) हा ब्रिज १३१५ मीटर लांब (१.३५ किलोमीटर)असून याच्या आर्चची लांबी तब्बल ४६७ मीटर आहे. हा ब्रिज १३.५ मीटर जाड असून यावर दोन रेल्वेमार्ग बसवता येणार आहेत.

३) हा ब्रिज तब्बल २६६ किलोमीटर/तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करण्यास समर्थ आहे. (इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की चेनाब नदीचं हे खोरं हे अतिशय लांब आणि ब्रिजची असलेली उंची यामुळे वाऱ्याचा ब्रिजवर पडणारा दबाव हा सगळ्यात कठीण भाग या ब्रिजच्या डिझाईनमध्ये महत्वाचा होता.)

४) या ब्रिजचं निर्माण करताना झोन ५ (साधारण ८ रिश्टर स्केल) मधल्या भूकंपाचा सामना करेल अश्या पद्धतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच हा भाग दशहतवादी कारवायांनी धुमसत असल्याने डी.आर.डी.ओ. च्या सहकार्याने याला ब्लास्ट प्रूफ बनवण्यात आलं आहे. जेणेकरून कोणत्याही साधारण बॉम्ब स्फोटात याच्या स्ट्रक्चरला इजा होणार नाही.

५) यावरून तब्बल १०० किलोमीटर/तास या वेगाने  पुढील १२० वर्षं रेल्वे धावू शकणार आहे. उणे १० डिग्री ते ४० डिग्री सेल्सिअस अश्या कोणत्याही तापमानात याच्या स्टीलच्या प्रॉपटीमध्ये फरक पडणार नाही.  

६)  या ब्रिजच्या निर्मितीमध्ये  २८,६६० मेट्रिक टन स्टील, ६००,००० नट- बोल्ट, ६६,००० क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर केला गेला आहे. याच्या नुसत्या आर्चचं वजन तब्बल १०,६१९ मेट्रिक टन आहे. (१ टन = १००० किलोग्रॅम) 

या पुलाच्या निर्मितीमधील आकडे डोळ्याचं पारणं फिटवणारे आहेत पण त्याहीपलीकडे भारतीय अभियंत्यांनी, कामगारांनी स्वबळावर याचं निर्माण केलं आहे. या पुलाचं काम खरे तर २००९ मध्ये पूर्ण व्हायला हवं होतं, पण अनेक कारणांनी ते पुढे ढकललं गेलं. ५ एप्रिल २०२१ ला त्याच्या आर्चचं काम संपलेलं आहे. एकूणच सगळ्यात खडतर टप्पा याच्या निर्मितीमधला संपलेला आहे. अजून हा ब्रिज पूर्ण व्हायला अजून काही वर्षं लागणार आहेत. याच्या निर्मितीसाठी जवळपास १४८६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा ब्रिज झाल्यामुळे इतके वर्षं विकासापासून अलिप्त राहिलेल्या जम्मू आणि काश्मीर भागाचा विकास होणार आहे. याच्या निर्मितीमध्ये  योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, वैज्ञानिक, कामगार यांचं विशेष अभिनंदन. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज उभारताना भारताने अजून एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे टाकलेलं आहे.

जय हिंद!!!

व्हिडीओ स्त्रोत :- इंडिया टुडे न्यूज 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.







Sunday, 4 April 2021

ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©

 ज़रा आँख में भर लो पानी... विनीत वर्तक ©

आज हा फोटो बघितला आणि एकाच वेळी दोन्ही डोळ्यातून वेगळ्या कारणांसाठी अश्रू आले....  

एकीकडे काल झालेल्या हमल्यात २२ जवान हुतात्मा झाले आहेत तर ३१ जवान जखमी झाले आहेत. एकाचवेळी तिन्ही बाजूने जवळपास ४०० नक्षल आतंकवादी आपल्या जवानांना घेरून मशिनगन ने हल्ला करतात. त्यांच्यासमोर हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता लढा देतात आणि धारातिर्थी पडतात. काल  झालेला हल्ला हा भारताच्या बाहेरच्या शत्रूंनी केलेला नाही तर घरातील घरभेदी लोकांनी केलेला आहे म्हणून त्याची तीव्रता जास्त आहे. या नक्षल लोकांना पाठिंबा देणारे आणि त्यांच्या नावाने टाहो फोडणारे सगळेच आज गुपचूप लपून बसले आहेत. आज त्यांना रक्ताचा पडलेला सडा दिसणार नाही. आज त्यांना त्या जवानांच्या घरच्यांचा आक्रोश दिसणार नाही, आज ते लोक त्या जवानांची जात, धर्म शोधायला जाणार नाहीत. आज ते लोक मेणबत्ती चा मोर्चा काढणार नाही. आज ते लोक या गोष्टीचा निषेध करणार नाहीत. आज ते लोक कोण्या आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्याला भारताची परिस्थिती सांगून ट्विट करायला सांगणार नाहीत. आज मानवाधिकार समितीचे लोक यावर काही बोलणार नाहीत. आज ना कोणी याचा निषेध करणार. ना आज कोणी आपले पुरस्कार परत करणार. कारण शांतीची कबुतरे उडवणारे आज आपले डोळे, कान आणि तोंड त्या ३ माकडांसारखे बंद करून बसले आहेत. 

हे घरभेदी लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत. छुप्या पद्धतीने राजकारण करून समाजात तेढ वाढवायची आणि मग मी नाही त्यातलाच म्हणत आपलं तोंड लपवायचं हीच पद्धत आजतागायत ते वापरत आलेले आहेत. एकाने कोणीतरी आत्महत्या केली म्हणून त्याची जात शोधून त्याला भेटायला जाणारे राजकारणी लोकशाही मेली म्हणून सुतक मनवतात पण तेच लोकशाही चे रक्षणकर्ते आज साधं निषेध करू शकत नाही हाच त्यांचा खरा चेहरा आहे. काल आर.आय.पी. आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहून अनेकांनी एक पान पुढे केलं असेल. कारण ते २२ कोण हे जाणून घ्यायची जाणीव होण्याइतपत ना आम्हाला गरज आहे ना आमची तशी तयारी आहे. लढलेले तिकडेच निघून गेले आणि जखमी झालेले पुन्हा येतील पण आम्हाला त्याच काहीच नाही. संवेदना आणि दुःख हे आमच्या अंतर्मना पर्यंत कधी जात नाही. याला कारण आमचा तिकडे फायदा नाही. आज या न त्या कारणासाठी मोर्चा ते काढणार नाहीत. आज ते उपोषणाला बसणार नाहीत. आज सरकारला त्या बद्दल जाब विचारणार नाहीत. कारण जिकडे जीव टांगणीला तिकडे आम्हाला काहीच देणं घेणं नाही.

इतका मोठा हल्ला हा घरभेदी लोकांशिवाय शक्यच नाही. पण उद्या त्याचा बदला घेतला तर हेच आज लपलेले साप फुत्कारत बिळातून बाहेर येतील. संविधानाची पुंगी वाजवत आणि मानवी हक्कासाठी लढा उभारतील. जातीचं, धर्माचं जे हत्यार उपसता येईल ते म्यानातून बाहेर काढतील. कारण आमच्या संवेदना या सुद्धा आजकाल फायदा, राजकारण, आणि पैसे बघून निर्माण होतात. लाल झेंडा घेऊ की भगवा की  हिरवा हे आजकाल विचारांनी नाही तर आमच्या फायद्याने ठरवतो. त्यामुळे त्या २२ जवानांन बद्दल आम्ही काही वाटून घेण्याचं कारण नाही. 

पण या सगळ्यात ते मात्र वेगळे आहेत..... 

डेप्युटी कमांडंट संदीप द्विवेदी सरांसारखे आमचे जवान आणि ऑफिसर वेगळे आहेत. अंगावर दोन गोळ्या झेलून सुद्धा त्याच आम्हाला कसलीच भीती नाही. आज त्यांचा फोटो बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरअसणार ते स्मित हास्य खूप काही सांगून जाते. मी जखमी आहे पण मी लढलो आहे. मी पुन्हा लढेन या आशेवर थम्प्स अप करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आत्मविश्वास दिला आहे. काही भारतीयांच्या घाणेरड्या राजकारण आणि विचारांना बळी न पडता या घरभेदी शत्रुंना ठोकूच हा तो आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास बघून आज माझ्या दुसऱ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आज गरज आहे ती प्रत्येक भारतीयांनी हा आत्मविश्वास दाखवण्याची आणि जे कोणी अश्या पिलावळीच समर्थन करतात त्यांच्या विचारांना जागीच ठेवण्याची. बंदुकीच्या गोळ्यांनी याचा बदला घेतला जाईलच पण शब्दांनी या कुत्सित विचारांना ठोकण्याची जबाबदारी एक भारतीय म्हणून आपण स्विकारायला हवी. त्यासाठी कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेण्याची गरज नाही. विचारांना विचारांनी ठेचायचं असते ते समजण्याची प्रगल्भता जरी आपण आत्मसात केली तर त्या २२ जवानांना ती श्रद्धांजली असेल असं मला वाटते. 

वीरगतीला प्राप्त होऊन हुतात्मा झालेल्या त्या २२ जवानांना माझा कडक सॅल्यूट. 

"We didn't start this war, but we will bloody hell finish it,” 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



Friday, 2 April 2021

टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©

 टी.ई.डी.बी.एफ. भारताचा पुढला एक्का... विनीत वर्तक ©

मुख्य भारताला जवळपास ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर भारताचा भाग असलेली लक्षद्वीप, अंदमान- निकोबार बेट लक्षात घेतली तर त्यांना सुमारे ५४२२ किलोमीटर ची किनारपट्टी लाभलेली आहे. या शिवाय बंगाल चा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने वेढलेल्या पाण्यावर भारताचं अधिराज्य आहे. जगातला मुख्य व्यापार हिंद महासागरातून होतो आणि इकडे लक्ष ठेवण्यासाठी भारताला एका सक्षम नौदलाची गरज आहे. ब्लु वॉटर नेव्ही म्हणून भारताचं नौदल जगातील काही मोजक्या नौदलात समाविष्ट आहे. पण याच नौदलाकडे भारताने मधल्या काळात काही प्रमाणात दुर्लक्ष केलं हे नाकारून चालणार नाही. ज्या वेगाने चीन ने आपलं नौदल सक्षम केलं आहे आणि महासागरातील आपल्या कारवाया वाढवल्या आहेत ते बघता भारताला नौदल शक्तीत खूप वेगाने भर घालण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

आय.एन.एस. विराट सारखी विमानवाहू नौका निवृत्त झाल्यावर त्याची पोकळी भरून काढणारी विमानवाहू नौका नसल्याने भारताने रशिया कडून बाकू नावाची विमानवाहू नौका विकत घेतली व तिचं नामकरण आय.एन.एस. विक्रमादित्य असं केलं. सध्या भारताकडे ही एकच विमानवाहू नौका आहे. पण भारताने दुसऱ्या विमानवाहूनौकेची बांधणी पूर्ण केली असून येत्या काही काळात आय.एन.एस.विक्रांत या नावाने भारताच्या संरक्षणासाठी सिद्ध होईल. कोणत्याही विमानवाहू नौकेला संहारक बनवणारा हुकमाचा एक्का म्हणजेच त्यावर असलेली लढाऊ विमान. जमिनीवरून एखाद्या लढाऊ विमानाने उड्डाण अथवा लँडिंग करणं आणि एखाद्या विमानवाहू नौकेच्या डेक वरून तीच कसरत करणं यात जमीन आकाशाएवढं अंतर आहे. विमानवाहू नौकेच्या डेक वर उड्डाणासाठी असलेली धावपट्टी  अतिशय छोटी असते. त्या तेवढ्या अंतरात लढाऊ विमानाने उड्डाणाचा वेग घेणं अपेक्षित असते. त्याच सोबत त्या छोट्या धावपट्टीवर तितक्या कमी कालावधीत विमानाचा वेग कमी होणं अपेक्षित असते. या शिवाय सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही धावपट्टी स्थिर नसते. पाण्यातून प्रवास करत असताना या सगळ्या हवाई कसरती योग्य रीतीने होणं अपेक्षित असते. 

एखाद्या कुशल वैमानिकासोबत लढाऊ विमानामध्ये सुद्धा अश्या अडचणीच्या जागे मधे उड्डाण भरण्यासाठी आणि लँडिंग करण्यासाठी अनेक बदल गरजेचे असतात. एखाद्या विमानाचं इंजिन इतकं सक्षम असायला हवं की त्याने इतक्या कमी वेळात उड्डणांसाठी लागणार बल निर्माण करायला हवं. त्याचसोबत क्षेपणास्त्र, दारुगोळा आणि इतर साहित्य त्यावर बसवण्यासाठी जागा हवी. त्याचवेळी उतरताना त्याच छोट्या धावपट्टीवर त्याचा वेग शून्य व्हायला हवा. तसेच जागा ही प्रमुख अडचण असल्याने जास्तीत जास्त विमान त्यावर राहण्यासाठी त्याचे पंख हे दुमडता यायला हवेत. असं सगळं क्लिष्ठ तंत्रज्ञान युक्त विमान असेल तेव्हाच एखादी विमानवाहू नौका शत्रूच्या गोटात अस्वस्थता निर्माण करू शकते. 

भारतात येत्या काळात दोन विमानवाहू नौका कार्यरत असणार आहेत. त्यावर वर उल्लेख केलेल्या तंत्रज्ञानाने सुसज्ज अश्या लढाऊ विमानांची गरज लागणार आहे. आजवर भारत अश्या पद्धतीची विमान रशिया कडून विकत घेत आला आहे. पण आत्मनिर्भर भारताने स्वबळावर अश्या एका लढाऊ विमानाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याच नाव म्हणजेच टी.ई.डी.बी.एफ. (Twin Engine Deck Based Fighter (TEDBF). या वर्षी झालेल्या ऐरो शो मधे एच.ए.एल. ने याच मॉडेल सादर केलं आहे. हे नावाप्रमाणे दोन इंजिन असलेलं कनार्ड विंग असलेलं तेजस च पुढलं व्हर्जन असणार आहे. विमानवाहू नौकेच्या छोट्या धावपट्टीवरून उड्डाण करण्यासाठी यात अनेक तंत्रज्ञान समाविष्ट केलं गेलं आहे. भारताचं हे पाहिलं पाचव्या पिढीतील जवळपास स्टेल्थ असणारं लढाऊ विमान असणार आहे. याचे पंख हे दुमडणारे असणार आहेत. मॅक १.६ वेगाने उड्डाण भरण्यास सक्षम असणार असून यावर विविध क्षेपणास्त्र ठेवण्यासाठी ११ हार्ड पॉईंट असणार आहेत. (हार्ड पॉईंट म्हणजे जिकडे आपण क्षेपणास्त्र विमानात भरू शकतो. जितके जास्ती हार्ड पॉईंट तितकी जास्ती क्षेपणास्त्र लढाऊ विमान एका उड्डाणात नेऊ शकते.) यावर ASRAAM (Advanced Short Range Air-to-Air Missile) आणि Astra beyond-visual-range (BVR) त्याशिवाय भारताने निर्माण केलेली Rudram-1 आणि Rudram-2 anti-radiation missiles नेऊ शकणार आहे. यातील अनेक गोष्टी या सध्या लोकप्रिय असलेल्या राफेल-एम या लढाऊ विमानाच्या जवळ जाणाऱ्या असून त्यापेक्षा हे विमान ०. ५ पट पुढल्या पिढीतील आहे असा एच.ए.एल. चा दावा आहे. 

गेल्या वर्षी जून २०२० मधे  भारत सरकारने या विमानाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला आहे. जवळपास २०२६ मधे याच पहिलं उड्डाण अपेक्षित असून हे विमान नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हायला २०३० उजाडेल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. प्रत्यक्षात येईल तोवर दोन विमान नौदलाच्या पसंतीस उतरली आहेत. यातील एक म्हणजे  F/A-18E/F Super Hornet (-E is single seat, -F is two seat) आणि Rafale-M carrier fighter ही दोन्ही विमान ४.५ पिढीतील असून दोन्ही अतिशय अत्याधुनिक आहेत. पण राफेल-एम ला जास्ती पसंती मिळत आहे याच कारण राफेल एफ ३ व्हर्जन आधीच भारतीय वायू सेनेत दाखल झालं आहे. त्यावर उड्डाणाचा आणि देखभालीचा अंदाज भारताकडे आहे. शिवाय राफेल एम हे जवळपास त्याच्या भावांसारखं आहे. सध्या टी.ई.डी.बी.एफ. दाखल होईल तोवर ह्यातील एक विमान भारताच्या सुरक्षतेसाठी दाखल होईल. भारताचं टी.ई.डी.बी.एफ. सज्ज झालं की टप्प्याटप्प्याने या दोन्ही विमानवाहू नौकांवर सध्या असलेल्या मिग २९ विमानांना निवृत्त करण्यात येईल. टी.ई.डी.बी.एफ.ची निर्मिती भारताचा पुढला एक्का असणार आहे कारण हे विमान राफेल किंवा सुपर हॉर्नट पेक्षा एक पाऊल पुढे असणार आहेच त्याशिवाय आपण अश्या विमानांसाठी आत्मनिर्भर होणार आहोत. टी.ई.डी.बी.एफ. निर्माण करणाऱ्या टीम ला या भारतीयाकडून खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




Thursday, 1 April 2021

पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग ३)... विनीत वर्तक ©

पुढलं लक्ष्य - मित्र तारा (अल्फा सेंटौरी) (भाग ३)... विनीत वर्तक © 

आधीच्या भागात आपण बघितलं की अल्फा सेंटौरी सिस्टीम आपल्यासाठी का महत्वाची आहे? त्यातील प्रॉक्सिमा सेंटौरी बी हा ग्रह आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण प्रश्न असा येतो की आपण तिथवर जाणार कसं? सध्या उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर आपण खूप मागे आहोत. मानवाने सोडलेलं व्हॉयेजर १ हे यान सध्या १७ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे तर व्हॉयेजर २ हे यान सध्या १५ किलोमीटर/ सेकंद वेगाने दूर जाते आहे. साधारण एवढा वेग आपल्याला डीप स्पेस मिशन १ मधे यानाला देता आलेला आहे. जो जवळपास ५६,००० किलोमीटर/ तास इतका आहे. जर ह्या वेगाने आपण अल्फा सेंटौरी वर गेलो तर आपल्याला तिथवर पोहचायला जवळपास ८१,००० वर्ष लागतील म्हणजेच मानवाच्या २७०० पिढ्या झाल्यानंतर आपण तिकडे पोहचू जे आपल्या काही कामाचं नाही. याचा सरळ अर्थ आहे की उपलब्ध तंत्रज्ञानापेक्षा एखादं नवीन तंत्रज्ञान जर आपण मिळवलं तरच हा प्रवास शक्य आहे. 

गेली कित्येक वर्ष संशोधक प्रकाशाच्या वेगाच्या निदान २०% वेगाने जाणार तंत्रज्ञान निर्माण करता येईल का याचा शोध घेत आहेत. आपण जर इतका वेग गाठला तर कदाचित १०० वर्षापेक्षा किंवा अगदी ५० वर्षात आपण अल्फा सेंटौरी च अंतर पार करू शकू. सध्या उपलब्ध असलेल्या रॉकेट तत्रंज्ञान किंवा इंधनाचे प्रज्वलन करून हा वेग गाठता येणं अशक्य आहे. तेव्हा प्रकाशाच्या वेगाचा आणि त्याच्या बलाचा आपण वापर करून एखादं यान अंतराळात पाठवलं तर हे शक्य आहे. प्रकाश हे सर्वकाळ मिळणार इंधन आणि त्याचा वापर करून गाठलेला वेग याच गणित आपण सोडवू शकू. अंतराळात गेलेल्या कोणत्याही यानाला सौर दाबाचा प्रभाव सहन करायला लागतो. तब्बल ३ लाख किलोमीटर / सेकंद  वेगाने वाहणारे प्रकाशकण हे कोणत्याही वस्तूवर एक दाब निर्माण करतात. एखाद्या ८०० मीटर X ८०० मीटर सौर पॅनल वर पडणारा दाब ५ न्यूटन किंवा १.१ पाउंड फूट असतो. आता वाचताना हा दाब सूक्ष्म वाटेल पण एखाद्या मंगळाकडे निघालेल्या यान या दाबामुळे तब्बल १००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराने आपलं लक्ष्य चुकू शकते. त्यामुळे या दाबाचा विचार कोणत्याही अंतराळ मोहिमेत केला जातो. 

आता समजा आपण या दाबाचा वापर एखाद्या यानाला हाकण्यासाठी केला तर? जसं शिडांचं जहाज वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या दाबाचा वापर करत वेग घेतं तसंच एखादं शिड यानाभोवती उभारलं तर त्या शिडाच्या पृष्ठभागावर पडणारे प्रकाशाचे किरण ऊर्जेसोबत आपली गती त्याला देतील. ही गती प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास १५%-२०% झाली (साधारण ६०,००० किलोमीटर / सेकंद ) तर आपण अल्फा सेंटौरी वर अवघ्या २० वर्षात दाखल होऊ शकू. याच तंत्रज्ञानाला सोलार सेल्स / लेझर सेल्स असं म्हणतात. वर सांगितलं तस गणिताने हे शक्य आहे पण प्रत्यक्षात उतरवणं प्रचंड कठीण काम आहे. कारण वर सांगितलं तसं सौर दाब हा खूप सूक्ष्म असतो त्यामुळे २०% प्रकाशाचा वेग गाठण्यासाठी आपल यान किंवा उपग्रह अतिशय हलकं असलं पाहिजे. अवघ्या काही ग्रॅम मधे जर आपण नॅनोटेक्नोलॉजी चा वापर करून उपग्रह बनवला तर हे शक्य आहे. याच कल्पनेला पंख देण्यासाठी २०१६ मधे युरी मिलर, स्टीफन हॉकिंग आणि फेसबुक चा सर्वसेवा मार्क झुकेरबर्ग यांनी ब्रेकथ्रू स्टारशॉट ची घोषणा केली. ब्रेकथ्रू स्टारशॉट या मोहिमेतील तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी या तिघांनी मिळून १०० मिलियन डॉलर देण्याचं कबूल केलेल आहे.            

ब्रेकथ्रू स्टारशॉट मधे ४ मीटर X ४ मीटर आकाराचा सौर आरसा आणि काही सेंटीमीटर आकार असणारे तसेच अवघ्या काही ग्राम च वजन असणारे जवळपास १००० उपग्रह अंतराळात सोडण्यात येतील. अंतराळात गेल्यावर त्यांना पृथ्वीवरून लेझर ने वेग देण्यात येईल. यासाठी तब्बल १०० गिगावॅट एकत्रित शक्तीचा वापर करण्यात येईल. इतकी शक्ती निर्माण करण्यासाठी लेझर च जाळ पृथ्वीवर निर्माण करण्यात येईल. या लेझर ने प्रकाशाच्या वेगाच्या १५%-२०% वेग प्रत्येक उपग्रहाला दिल्यानंतर अल्फा सेंटौरीकडे हे १००० उपग्रह झेपावतील. जवळपास २० वर्ष याच वेगाने प्रवास करून प्रॉक्सिमा सेंटौरी बी ग्रहाच्या जवळून प्रवास करतील. त्यावेळी यावर असलेले कॅमेरे या ग्रहाचा वेध घेऊन ते संदेश पृथ्वीवर पाठवतील. हे संदेश पृथ्वीवर पोचायला जवळपास ४ वर्षाचा कालावधी लागेल. 

हे वाचायला उत्कंठा वाढवणारं  वाटलं तरी प्रत्यक्ष अश्या पद्धतीचे सौर आरसे, नॅनो उपग्रह आणि लेझर हे सगळं तयार करणं एक मोठं आव्हान आहे. त्या पलीकडे वेगाने जाणाऱ्या या उपग्रहांच्या रस्त्यात येणारे अंतराळातील विविध घटक, गुरुत्वीय बल तसेच विश्वाच्या पोकळीत रेडिएशन चा होणारा मारा, अतिशय थंड तपमान या सगळ्या मधे यावरील कम्प्युटर आणि तंत्रज्ञान टिकणं गरजेचं आहे. यात न्यूक्लिअर पॉवर सेल चा ही वापर केला जाणार आहे. त्यामुळे अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचं असणारं हे तंत्रज्ञान प्रथम तर निर्माण करणं हेच एव्हरेस्ट इतकं मोठं आव्हान आहे. हे सगळं केल्यावर लेझर ने तेवढा वेग गाठून देणं गरजेचं आहे. यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर संशोधक काम करत आहेत. २०३६ पर्यंत हे सगळं तंत्रज्ञान मिळवून हे नॅनो उपग्रह प्रॉक्सिमा सेंटौरी बी या ग्रहावर पाठवण्याची ही मोहीम आहे. ज्याला तब्बल ५ ते १० बिलियन अमेरिकन डॉलर चा खर्च अपेक्षित आहे. 

 ब्रेकथ्रू स्टारशॉट यशस्वी होईल का? याच उत्तर आत्ता देणं शक्य नाही. पण जर ते यशस्वी झालं तर मानवाने अंतराळातील एका मोठ्या अडचणीवर मात केली असच म्हणावं लागेल. इतके पैसे खर्च करून नक्की काय मिळणार असे बाळबोध प्रश्न अनेकांना पडू शकतील. पण सगळ्याच खर्च झालेल्या पैश्यांचा हिशोब जमा खर्चात मांडता येत नाही. या सगळ्यातून जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते मानवाच्या प्रगती मधला एक मैलाचा दगड असेल हे नक्की आहे. त्यामुळेच येत्या काळात अल्फा सेंटौरीकडे ब्रेकथ्रू स्टारशॉट चा होणारा प्रवास बघणं रोमांचित करणार असणार आहे. 

समाप्त. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.