भंगी ते पद्मश्री एका उषाचा सुलभ प्रवास... विनीत वर्तक ©
समाजात चांगल आणि वाईट यांचे ठोकताळेच मुळात चुकीचे आहेत. आपल्या आलिशान गाडीतून हळूच काच खाली करून त्यातून प्लास्टिक पिशवीतून कचरा, उरलेलं अन्न आणि अगदी व्हिस्पर सारखे वापरलेले सॅनिटरी नॅपकिन रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढणारे पांढरपेशा समाजातील लोकं. घरी येऊन स्वच्छतेचं महत्व सोशल मिडिया वर सांगत असतात. अश्या लोकांना समाज चांगल आणि प्रतिष्ठित मानतो. तर हाच कचरा उचलून स्वछता ठेवणाऱ्या लोकांना समाज भंगी म्हणून हिणवतो. त्यांच्या पासून लांब रहातो तर वेळ प्रसंगी वाळीत टाकतो. समाजातली घाण म्हणजे हेच ते कचरा उचलणारे भंगी लोक असच मत समाज बनवतो. पण आपण समाजात काय करतो याबद्दल एक अवाक्षर ही पांढरपेशा समाजातील लोक सांगत नाहीत. ही गोष्ट आहे अश्याच एका स्त्री ची जिला भंगी म्हणून समाजाने हिणवलं, त्रास दिला, अवहेलना केली. पण या सगळ्यांना बाजूला सारत तिने स्वच्छतेचं आपलं कार्य सुरूच ठेवलं आणि त्याच कार्याचा २०२० साली भारत सरकारने पद्मश्री सन्मान देऊन गौरव केला.
भारतात उघड्यावर शौचास बसणं हे परांपरागत चालत आलेली एक परंपरा होती. अगदी मुंबई सारख्या शहरात लोकल ट्रेन ने जर २०१४ आधी सकाळी प्रवास केला असेल तर हे दृश्य शेकडोंच्या पटीत दिसायचं. आपली घाण आपण स्वच्छ करायची असते ही शिकवण कधी रुजलीच नव्हती. मुंबई सारख्या शहरात ही स्थिती होती तर राजस्थान मधल्या अलवार सारख्या शहरात काय असेल याचा आपण विचार करू शकतो. याच शहरात 'उषा चौमर' ही सफाई कामगार म्हणून काम करत होती. वयाच्या १० वर्षी लग्न आणि वयाच्या १४ व्या वर्षी काही कळायच्या आधी संसाराला सुरवात केलेली उषा २००३ मधे लोकांच्या घरी जाऊन सफाई कामगार म्हणून काम करायची. १० घराची अगदी विष्ठा साफ करण्यापासून कचरा काढणं त्याची विल्हेवाट लावणं असं सगळं तिला करावं लागत असे. लोक घरात राहिलेलं अन्न, वापरलेले सॅनिटरी पॅड्स कंडोम पासून जे काही असेल ते तिच्या अंगावर फेकायचे. कारण तिला स्पर्श करणे म्हणजे आपला विटाळ. उषा समाजातील घाण होती असं या लोकांच मत होतं. तिच्या जवळ जाणं, तिला आपल्या घरात प्रवेश देणं हे समाजात मान्य नव्हतं. अगदी तिला दुकानातुन किराणा आणण्यासाठी ही दुकानात प्रवेश दिला जायचा नाही. मंदिर वगरे तर गोष्टी दूर राहिल्या.
उषा पण एक माणूस होती. तिला या सगळ्यातून किती त्रास होत असेल याचा विचार न समाज करत होता न कोणाला त्याच काही पडलं होतं. उषा च्या मते घरी आल्यावर डाळ बघितली तरी एक शिरशिरी तिच्या डोक्यातून जायची. कारण सडलेल्या अन्नाचा, कचऱ्याचा, माणसाच्या विष्टेचा तो वास, ते वातावरण हे इतकं भिनलेलं असायचं की काही खायची ही इच्छा व्हायची नाही. या भोगातून आपली कधी सुटका होईल अशी आशा पण तिची मावळली होती. पण २००३ साली एक अनपेक्षित वळण तिच्या आयुष्यात आलं. तिची भेट झाली सुलभ इंटरनॅशनल या संस्थेचे संस्थापक डॉक्टर भिंडेश्वर पाठक. त्यांनी उषा आणि तिच्या सहकाऱ्यांना हे काम करण्यापासून परावृत्त केलं आणि सुलभ संस्थेशी जोडून काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उषाने 'नई दिशा' या संस्थेच्या उपक्रमात काम करायला सुरवात केली. स्वच्छतेचं महत्व समाजात रुजवण्यापासून ते लोकांना अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कामापासून परावृत्त करण्यासाठी तिने एक चळवळ उभी केली.
२०१४ ते आजतागायत भारतात ९.६ कोटी पेक्षा जास्त शौचालय भारताच्या काना-कोपऱ्यात उभी राहिली आहेत. स्वछ्तेची सुरवात एकीकडे देशाच्या पंतप्रधानांनी टॉयलेट बांधून केली तिकडे उषा च्या चळवळीने प्रेरित होईन अनेक लोकांनी त्या स्वछतेच महत्व जाणून घेतलं. आपली घाण, आपली विष्ठा आपण साफ करणं, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी एक नागरिक आणि समाजाचा भाग म्हणून आपली आहे. हे बिंबवण्यात उषाने विशेष करून ग्रामीण भागात घेतलेल्या मेहनतीची नोंद भारत सरकारने घेताना २०२० साली पद्मश्री हा प्रतिष्ठित सन्मान देऊन तिचा गौरव केला. एकेकाळी तिला वाळीत टाकणारा, तिच्यापासून अंतर ठेवणारा हाच पांढरपेशा समाज आज तिच्या भेटीसाठी वाट बघतो हे उषाच्या जिद्दीचं फळ आहे. तिचा असा कायापालट करण्यात डॉक्टर. पाठक आणि सुलभ चा खूप मोठा भाग आहे. आज उषा सुलभ च्या सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशन ची अध्यक्ष आहे. तीच स्वछ्तेच व्रत आजही अविरत सुरु आहे.
एक भंगी म्हणून हिणवल्या गेलेल्या उषाचा पद्मश्री पर्यंतचा प्रवास सगळ्यांना खूप प्रेरणादायी तर आहेच. पण समाजा कडून मिळणाऱ्या दुहेरी वागणुकीचा आरसा आहे. सफाई कामगार हे कचरा उचलणारे नाहीत तर तेच खरे स्वछतेचे दूत आहेत. हा विचार समाजात कुठेतरी आज रुजणं आज खूप गरजेचं आहे. भारत सरकारचं खास अभिनंदन कारण अश्या लोकांना पद्मश्री सारखा सन्मान दिल्याने त्या सन्मानाची उंची आणखी वाढली आहे. उषा चौमर च्या कार्याला माझा कडक सॅल्यूट. तिच्या पुढील प्रवासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment