Tuesday 1 February 2022

प्रेमाचं प्रतीक... विनीत वर्तक ©

 प्रेमाचं प्रतीक... विनीत वर्तक ©

आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देणाऱ्या जोडीदाराबद्दल आदर, प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांची आठवण, आपल्या प्रेमाची साक्ष आपल्या नंतर सुद्धा कायम जगापुढे राहावी यासाठी प्रेमाचं प्रतीक म्हणून काही मागे ठेवण्याची इच्छा प्रत्येकाची असते. भारतात प्रेमाचं प्रतीक काय? असा प्रश्न केला तर जवळपास सगळ्यांच्या ओठावर 'ताजमहल' हे नाव येईल. पण खरचं ते प्रेमाचं प्रतीक आहे का? आपल्या देशातील संपूर्ण पिढीला खरे तर स्वातंत्र्यानंतर तीन ते चार पिढयांना चुकीच्या गोष्टी शिकवल्या गेल्या. त्यातली एक म्हणजे भारतातील प्रेमाचं प्रतीक असणारी वास्तू 'ताजमहल'. आपल्या तिसऱ्या बायकोला म्हणजेच 'मुमताज' ला १४ व्या मुलाला जन्म देताना आलेल्या मृत्यूनंतर ताजमहाल २०,००० लोकांनी बांधला असं इतिहास सांगतो. तो बांधल्यावर त्या कामगार लोकांवर केलेल्या अत्याचाराच्या गोष्टी आजही सांगितल्या जातात. त्याला काही पुरावे नाहीत. पण खरच हे प्रेम कलेवरचं होतं का? बायकोवरचं होत का? की आपलं अस्तित्व भारताच्या भूमीवर जतन करण्याचं होतं? याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या परीने लावावा. ताजमहाल एक नितांत सुंदर कलाकृती असली तरी ते प्रेमाचं प्रतीक या व्याख्येत नक्कीच माझ्या दृष्टीने बसत नाही. 

प्रेम ही भावना सुरु होते त्यागापासून. काहीतरी आपलं असण्यापेक्षा कोणासाठी आपलं काहीतरी देणं हीच अनुभूती प्रेमाची असते. एखाद्या व्यक्तीवर असलेल्या प्रेमासाठी आपण असं प्रतीक उभारू ज्यातून निघणारा प्रेमाचा झरा त्या व्यक्तीप्रमाणेच काळाच्या ओघात त्याग, समर्पण, प्रेम या भावना वृद्धिंगत करेल आणि आपल्यामागे लोकांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी कार्यरत राहील. खेदाने आपल्याला चुकीच्या पद्धतीने इतक्या गोष्टी शिकवल्या गेल्या की असं अजोड प्रेमाचं एक प्रतीक प्रत्यक्षात आहे यावर आपला विश्वास बसत नाही. खरे तर त्या प्रतीकांची अनेक रूपं आज कल्पवृक्ष बनून प्रत्येक भारतीयांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आजही कार्यरत आहेत. आजही इकडे वर उल्लेख केलेल्या सर्व भावनांचा मेळ बघायला मिळतो. आजही ही प्रतिक आधुनिक भारताच्या प्रगतीत आणि भारतीयांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम निर्माण करण्यासाठी आपला हातभार लावत आहेत. ही गोष्ट आहे अश्याच एका प्रेमाच्या प्रतीकाची. 

१८९६ च वर्ष होतं जेव्हा साऊथ आफ्रिकेमधील जागेर्सफॉन्टेईन खाणीत त्या काळचा जगातील सगळ्यात मोठा हिरा सापडला. त्या हिऱ्याचं वजन होतं तब्बल ६५० कॅरेट (१३० ग्रॅम). त्या हिऱ्याला पैलू पाडल्यानंतर त्यातून अतिशय सुंदर हिरा जन्माला आला त्याच नाव होतं 'ज्युबिली डायमंड'. त्याच वजन होतं २४५.३५ कॅरेट (४९.०७ ग्रॅम). १९०० साल उजाडताना हा हिरा भारताच्या औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार सर जमशेदजी टाटा यांचे मोठे सुपुत्र सर दोराबजी टाटा यांनी खरेदी केला. त्या काळचा सर्वात मोठा हिरा त्यांनी आपली पत्नी मेहेरबाई भाभा यांना आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून भेट दिला. मेहेरबाई भाभा यांचे भाऊ होते जहांगीर भाभा म्हणजेच भारताच्या अणूऊर्जा कार्यक्रमाचे जनक होमी भाभा यांचे वडील. तर हा हिरा मेहेरबाई भाभा यांच्या खूप जवळचा होता. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपल्या गळ्यात ज्युबिली डायमंड ला स्थान दिलं होतं. १९३१ मधे वयाच्या ५२ व्या वर्षी अचानक ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कॅन्सर झाल्यामुळे मेहेरबाई भाभा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सर दोराबजी टाटा यांना आपल्या जोडीदाराची कमी आयुष्यात जाणवली. मेहेरबाई यांच्यावर असलेलं आपलं प्रेम अमर करण्यासाठी त्यांनी एक निर्णय घेतला. तो म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक उभं करण्याचा. 

मेहेरबाई यांच्या मृत्यूनंतर सर दोराबजी टाटांनी त्यांचे २१ दागिने आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्युबिली डायमंडचा त्यांनी लिलाव केला. त्यातून त्या काळी त्यांनी १० मिलियन रुपये उभे केले. ( १ मिलियन = १० लाख). आजच्या घडीला याची किंमत ५०० मिलियन रुपयांपेक्षा जास्त असेल. यातून त्यांनी आपल्या प्रेमाचं प्रतिमा म्हणजेच सर दोराबजी टाटा ट्रस्ट ची स्थापना केली. या ट्रस्ट मधून उभ्या राहिलेल्या संस्था आज बघितल्या की त्यांच प्रेमाचं प्रतीक किती मोठं आहे याची प्रचिती येईल. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टी.आय.एफ.आर. (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. आणि ही यादी संपत नाही. आपल्या प्रिय पत्नीला ज्या आजाराने आपल्यापासून दूर नेलं. तशी घटना किंवा प्रेमाचा विरह कोणाच्याही आयुष्यात येऊ नये यासाठी कॅन्सर रोगाच्या अभ्यास, उपचार आणि संशोधनासाठी स्थापन झालेलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल जगात नावाजलेलं आहे. 

प्रत्येक वर्षी ६०,००० ते ७०,००० कॅन्सर ने पिडीत असलेले रुग्ण टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधे उपचार घेतात. यात फक्त भारतातील नाही तर संपूर्ण आशिया खंडातून लोकं येतात. जगाच्या पूर्व भागात सर्वोत्तम कॅन्सर हॉस्पिटल पैकी एक म्हणून या हॉस्पिटल च नावं जगभर प्रसिद्ध आहे. यातील ७०% रुग्णांवर मोफत उपचार केले जातात हे विशेष आहे. दररोज १००० पेक्षा जास्ती कॅन्सर ग्रस्त रुग्ण इथल्या ओपीडी ला भेट देतात. ६५०० ऑपरेशन तर ६००० पेक्षा जास्त रुग्णांवर केमोथेरेपी, रेडिओथेरेपी ने उपचार केले जातात. जगातील कॅन्सर उपचारावरील अद्यावत तंत्रज्ञान या हॉस्पिटल मधे उपलब्ध आहे. 

यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्या प्रेमाला अजरामर करता येणं माझ्या मते शक्यच नाही. जगातील सर्वोत्तम प्रेमाचं प्रतीक कोणतं? असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर उत्तर टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि टाटा ट्रस्ट असेल. ताजमहाल च सौंदर्य कदाचित जास्ती छान असेल. त्याच रूप ही देखणं असेल पण प्रेमाची अनुभूती मात्र तिथे होत नाही. ती खरच तुम्हाला अनुभवायची असेल तर त्याचा प्रत्यय टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि टाटांनी सुरु केलेल्या इतर संस्थेतून येईल. खेदाची गोष्ट अशी गेली अनेक वर्ष अनेक भारतीयांना आणि जगातील लोकांना कॅन्सरमुक्त आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करायची संधी देणारं हे प्रतीक मात्र भारतीयांना अजून उमगलेलं नाही. आजही भारतीय फक्त पांढऱ्या संगमवरात आपली सेल्फी काढण्यात धन्यता मानतात. प्रेमाचं प्रतीक समजून घ्यायला आपण कमी पडलो हेच खरं. 

हजारो लोकांचे प्राण वाचवणारं प्रेमाचं प्रतीक निर्माण करणाऱ्या सर दोराबजी टाटा आणि मेहेरबाई यांना माझा कडक सॅल्यूट. सर्व भारतीय आणि येणाऱ्या अनेक पिढ्या तुमच्या या अजरामर असणाऱ्या प्रेमाच्या प्रतिकातून प्रेमाचा, त्यागाचा, समाजभावनेचा, निस्वार्थीपणाचा संदेश पुढे नेत राहतील याबद्दल शंका नाही.  

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment