Monday, 28 February 2022

केसांची गोष्ट...विनीत वर्तक ©

 केसांची गोष्ट...विनीत वर्तक ©

केस हा खरे तर स्त्रीच्या सौंदर्याचा एक दागिना. या केसांना अनेक गितातून ही सौंदर्याचा एक भाग म्हणून शब्दबद्ध केलं गेलं आहे. मग ते 'ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु' पासून 'ये रेशमी झुल्फे' अश्या अनेक गितांमधून, भाषेमधून त्याला सौंदर्यांशी नकळत जोडलं गेलं आहे. त्यामुळेच स्री च्या आयुष्यात केसांना अनन्यसाधारण महत्व आहे. केस कापले  अथवा त्यांचा शेप, रंग, लांबी बदलली तरी एकूणच स्त्री च्या व्यक्तिमत्वावर त्याचा खूप प्रभाव पडतो. हा प्रभाव दोन्ही बाजूने अतिशय तीव्र असा असतो. जसा एखाद्या स्त्री ला तो आधार देतो तसा दुसरीकडे तीच आयुष्य उध्वस्थ करून टाकण्याची ताकद पण केसांमध्ये असते. पुरुषसत्ताक समाजात त्यामुळेच या केसांना अजून जास्ती महत्व असते. पण एखाद्या क्षणी हा दागिनाच जर स्त्री चा गळून पडला तर? या विचाराने प्रत्येक स्त्री च्या अंगावर काटा उभा राहील. मी आता सुंदर नाही दिसणार? समाजात वावरू कशी? घरातल्या आणि बाहेरच्या नजरांना सामोरी कसं  जाऊ? असे अनेक प्रश्न तिच्या समोर उभे राहतील. या सगळ्यात तिची जी मानसिक पिळवणूक होईल त्यातून ती उभी राहू शकेल का? अश्या अनेक प्रश्नांना उत्तर देणारी आजची 'केसांची गोष्ट'. 

गोष्ट सुरु होते काही वर्षापूर्वी जेव्हा जन्माने गुजराती पण पुण्याच्या संस्कृतीत वाढलेल्या 'केतकी जानी' यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण येते. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात संसार करणाऱ्या केतकी च्या आयुष्यात नैराश्याच्या काळ्या ढगांची गर्दी होते. आधी थोडे थोडे जाणारे डोक्यावरील केस आता पुंजक्याने जायला लागतात. एकेकाळी अगदी दाट केस असणारं कपाळ आता उघड- बोडकं दिसायला सुरवात झाली. हे काय होते आहे समजण्याआधीच आपल्याला टक्कल पडलेलं आहे हा विचारच तिला संपूर्णपणे नैराश्याच्या खोल गर्तेत घेऊन गेला. पुढल्या ४-५ वर्षात तिच्या डोक्यावर असलेला सौंदर्याचा दागिना 'ऍलोपेशिया' म्हणजेच ज्याला मराठीत 'चाई पडणे' म्हणतात त्याने हिरावून नेला होता. या रोगाने केसांपेक्षा सगळ्यात जास्ती आपल्यासोबत काय नेलं तर तिचा आत्मविश्वास. एकेकाळी आई, बायको, स्वतःच्या पायावर उभी असलेली एक स्त्री हा तिचा आत्मविश्वास तिच्या केसांपेक्षा जास्ती महत्वाचा होता तो कुठेतरी संपला होता. 

अश्या निराशेच्या खोल गर्तेत असताना समाजाने अजून तिच्या मनाच्या जखमांवर मीठ चोळायला सुरवात केली. एक टक्कल पडलेली स्त्री हा विचार, अश्या स्त्रियांकडे बघणाऱ्या पुरुषी नजरा, त्या नजरेत असणारा एक तिरस्कार, एक सौंदर्य नसलेल्या स्त्रीचा अपमान करणारा दृष्टिकोन, समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यास असलेला संकोच हे सगळं कुठंतरी तिला एक पाऊल टाकायला भाग पाडत होतं. ते पाऊल म्हणजे आयुष्याचा शेवट करण्याचं. पण आपल्या मुलीचे शब्द तिला कुठेतरी एक आशेचा किरण दाखवून गेले.ती म्हणाली, "आई तू माझ्यासाठी आजही सुंदर आहेस. तुझे केस असले किंवा नसले तरी त्यामुळे तुझ्याबद्दल किंवा तुझ्या सौंदर्यात त्याने काहीच फरक पडत नाही". तिकडून सुरु झाला एका फिनिक्स पक्षाचा राखेतून उड्डाण घेण्याचा प्रवास. आपले गळणारे केस थांबवण्यासाठी एलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, भूत पिशाच्च, मंत्र- तंत्र, ते खांदा द्यायला येणाऱ्या प्रत्येकाचे सल्ले ऐकून उपचार केलेल्या केतकी ने पहिल्यांदा परिस्थिती स्विकारायच ठरवलं. जे आपण बदलू शकत नाही ते स्विकारुन त्यालाच आपली यशाची शिडी बनवायचं हे तिने ठरवलं. पण हे सगळं वाचताना जितकं सोप्प वाटते तितकं सोप्प नव्हतं. पहिल्यांदा तर आरशात बघताना स्वतःला स्वतःबद्दल वाटत असलेली घृणा वाटण बंद करणं ही पहिली पायरी होती. कारण आपण स्वतःला स्विकारलं तर लोकं आपल्याला स्विकारणार हे मनाशी उतरवणं हे खूप कठीण होतं. 

लहानपणापासून केतकी ला आपल्या अंगावर काहीतरी गोंदवून घ्यायचं होतं. कुठे गोंदवून घ्यावं याच उत्तर मात्र ती शोधत होती. आयुष्यात अनपेक्षितपणे आलेल्या या वळणाने जगात कोणाकडे नसलेला कॅनवास तिला देवाने उपलब्ध करून दिला होता. तो होता तिचं टक्कल पडलेलं डोकं. तिने त्या कॅनवस वर आपल्याला आवडणाऱ्या रंगाची उधळण केली. नंतर समोर आला सौंदर्याचा एक नवीन अविष्कार. तिचा गेलेला आत्मविश्वास तिला कित्येक पटीने परत मिळाला पण त्याचसोबत ज्यामुळे ती निराशेच्या गर्तेत लोटली गेली त्याच आजाराने तिला एक अभिजात सौंदर्याच एक कोंदण दिलं जे फक्त तिच्याकडे होतं. जागतिक पटलावर केतकी जानी या नावाने मॉडेलिंग च्या क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला गेला. एक टक्कल असलेली स्त्री एका वेगळ्या रूपात समाजाने, भारताने आणि पर्यायाने जगाने बघितली. आज केतकी जानी यांच्या कपाटात जागा नसेल इतकी प्रशस्तीपत्रक आणि पुरस्कार जमा झालेले आहेत. ज्या समाजाने तिच्याकडे तिरस्कार आणि सौंदर्य नसलेली स्त्री या दृष्टिकोनातून बघितलं आज तोच समाज तिच्या सौंदर्याच कौतुक करण्यासाठी शब्द शोधतो आहे. केतकी जानी यांचा हा प्रवास प्रेरणादायी तर आहेच पण त्या पलीकडे समाजाच्या दुहेरी दृष्टिकोनाचा बुरखा फाडणारा आहे. 

काल पुण्यात त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अनुभवण्याची, त्यांच्याशी व्यक्तिशः बोलण्याची आणि ऍलोपेशिया विरुद्ध त्यांनी उभारलेल्या चळवळीची माहिती घेण्याचा योग आला. त्यांच्या प्रवासापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेला ऑरा मला प्रभावित करून गेला. त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात असलेला सहजपणा, आत्मविश्वास, समोरच्याला काही सेकंदात आपलस करण्याची हतोटी आणि त्याचवेळी समोरच्या नजरांना निर्भीडपणे उत्तर देण्याची ताकद माझ्यामते त्यांच खरं सौंदर्य आहे. स्त्री शारीरीक सुंदर दिसण्यापेक्षा तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा जास्ती सुंदर असतो हे पुन्हा एकदा मला त्यांच्याशी भेटताना जाणवलं. मेधा पुरकर यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या मैत्र ग्रुप ने त्यांच्या वार्षिक मेळाव्यासाठी मला खास आमंत्रण दिलं होतं त्या निमित्ताने केतकी जानी यांच्यासारख्या अतिशय स्फूर्तिदायक व्यक्तिमत्वाला भेटण्याची आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याची संधी मिळाली यासाठी मैत्र ग्रुप चे आभार. तसेच केतकी जानी आपल्या काही मिनिटाच्या संवादात तुमची ऍलोपेशिया ला आणि या आजाराने ग्रस्त लोकांना मदत करण्याची तळमळ जाणवली. तुमच्या या चळवळीत मला खारीचा वाटा उचलायला संधी मिळाली तर तो माझा खूप मोठा सन्मान असेल. 

केसांची गोष्ट संपली नाही तर आता त्याची सुरवात झाली आहे. माझी सर्व वाचकांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला जर कोणती स्त्री ऍलोपेशिया आजाराने ग्रस्त असेल तर त्यांना कमी लेखू नका. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्या. ऍलोपेशिया हा शारीरीक आजार आहे मानसिक नाही. पण त्याला आपल्या वर्तनाने मानसिक आजार बनवू न देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे याची जाणीव आपण ठेवू या. 

केतकी जानी आणि मैत्र यांच्या पुढल्या प्रवासाला माझ्या खूप शुभेच्छा. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: