Monday, 21 February 2022

#टपरीवरच्या_बातम्या ५... विनीत वर्तक ©

 #टपरीवरच्या_बातम्या ५... विनीत वर्तक ©

१) भारताने नुकताच युनायटेड अरब अमिराती सोबत एक व्यापारी करार केला आहे. ज्यामुळे या दोन्ही देशातील व्यापार संबंधांना मजबुती मिळणार आहे. येत्या ५ वर्षात तब्बल १०० बिलियन ( १ बिलियन १०० कोटी) अमेरिकन डॉलर इतक्या प्रचंड प्रमाणात हा व्यापार अपेक्षित आहे. इकडे महत्वाची गोष्ट अशी की क्रूड ऑइल सोडून इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या  देशाशी यु.ए.ई. व्यापारीक संबंध प्रस्थापित करणार असून भारत हा त्यातील सगळ्यात अग्रणी देश आहे. 

२) रॉयल सौदी लँड फोर्सेसचे कमांडर, लेफ्टनंट जनरल फहद बिन अब्दुल्ला मोहम्मद अल-मुतैर यांनी भारताचे सैन्य प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांची ऐतिहासिक भेट घेतली आहे. सौदी अरेबियाचे सैन्य प्रमुख पहिल्यांदा अश्या पद्धतीने भारतात आले आहेत आणि नक्कीच ही भेट अतिशय महत्वाची आहे. सौदी अरेबिया जगातील सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे. भारताने स्वबळावर निर्माण केलेली आकाश आणि ब्राह्मोस मिसाईल घेण्यासाठी सौदी अरेबिया उत्सुक आहे. फिलिपाइन्स ला ब्राह्मोस विकण्याचा करार केल्यानंतर सौदी अरेबिया या दिशेने पावलं टाकते आहे. त्यामुळेच या भेटीकडे भारताचा शस्त्रास्त्र विक्रीतील विक्रेता म्हणून एक उदय झाल्याचं मानण्यात येत आहे. 

या दोन्ही गोष्टींनी पाकिस्तान संपूर्णपणे हादरून गेला आहे. ही दोन्ही राष्ट्र जगातील मुस्लिम राष्ट्राचं एकप्रकारे प्रतिनिधित्व करतात. भारताशी या दोन्ही देशांनी वाढलेली जवळीक आणि सैनिकी, आर्थिक संबंध हे पाकिस्तान च्या पोटात दुखत आहेत. एकीकडे सौदी अरेबिया ने पाकिस्तान ची आर्थिक नाकेबंदी केली आहे त्याचवेळी सौदी अरेबिया ने भारताशी आपले संबंध वाढवले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता सैनिकी संबंध प्रस्थपित करण्यास सौदी अरेबिया उत्सुक आहे. काश्मीर प्रश्नावर मुस्लिम राष्ट्रांचा भारताला वाढणारा पाठिंबा हे पाकिस्तान ला खूप टोचणारं आहे. 

३) नुकत्याच भारत येऊन गेलेल्या फ्रांसच्या रक्षामंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी राफेल या अत्याधुनिक विमानांची असेम्ब्ली लाईन भारतात सुरु करण्याविषयी चर्चा केल्याची बातमी आता पुढे येते आहे. डसाल्ट या राफेल च्या निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे सध्या फक्त १ असेम्ब्ली लाईन आहे. तर जगभरातून जवळपास २०० राफेल विमानांची ऑर्डर कंपनीला मिळालेली आहे. या शिवाय भारताच्या मीडियम मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (MMRCA) २ च्या ११४ विमानांच्या शर्यतीत राफेल सगळ्यात पुढे आहे. राफेल ला मिळालेल्या महत्वाच्या ऑर्डर या यु.ए.ई. आणि इंडोनेशिया या देशांकडून आहेत. एकट्या फ्रांस मधील असेम्ब्ली लाईन च्या जोरावर या ऑर्डर वेळेत पूर्ण करणं डसाल्ट ला अशक्य आहे. त्यामुळेच भारतातील महाराष्ट्रात असलेल्या नागपूर इकडे दुसरी असेम्ब्ली लाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. वर्षाकाठी २४ राफेल विमान बनवण्याची त्याची क्षमता असेल. 

जर भारताने अजून राफेल विमानांची ऑर्डर नोंदवली तर जवळपास ७०% असेम्ब्ली, सर्व्हिस आणि मेन्टनन्स हा भारतात होणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनात बचत तर होणार आहेच पण त्याचसोबत जगात जाणारं राफेल हे 'असेम्ब्लड इन इंडिया' असणार आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.






No comments:

Post a Comment