Thursday 17 February 2022

जगायचे क्षण... विनित वर्तक ©

 जगायचे क्षण... विनित वर्तक ©

गेल्या आठवड्यात जगातील सगळ्यात उंच असणाऱ्या 'स्टॅचू ऑफ युनिटी' ला भेट दिली. माझ्यासारखेच भारताच्या आणि जगाच्या पाठीवरून अनेक लोकं इकडे भेट द्यायला आले होते. जगातील त्या सगळ्यात उंच पुतळ्यासमोर उभं राहून आणि त्याच्या आतून साधारण ४५० फूट उंच जाऊन एकूणच त्या प्रतिमेचा आनंद जो घेता आला आणि ज्या काही भावना मनात आल्या त्यावर वेगळं लिहे.न पण एक गोष्ट जी एकूणच कमी अधिक प्रमाणात जाणवली ती म्हणजे आपण जगणं विसरत चाललो आहोत. अनेकदा आपण भेट देतो ती ठिकाण, ती वेळ, तो काळ पुन्हा येत नाही. आयुष्याच्या थोड्याफार लाभलेल्या काळात ते क्षण जपून ठेवावे असेच असतात. पण आजकाल आपण जे जगायला विसरत चाललो आहोत तर ते क्षण जपणार तरी कसे?

जगातील कोणतंही ठिकाण असो मग तो समुद्र, उंच इमारत, ऐतिहासिक वास्तू, धार्मिक वास्तू, अगदी एव्हरेस्ट असो. आपण जेव्हा अश्या ठिकाणी जातो तेव्हा सगळ्यात महत्वाचं असते ते क्षण अनुभवणं खरे तर आधी जगणं. कारण ते साठवून ठेवायला आधी ते जगावे लागतात, त्यांच्या आठवणी तयार व्हाव्या लागतात आणि मग कुठे जाऊन ते कधी आपल्या आत तर कधी तंत्रज्ञानाच्या मदतीने आभासी जगात बंदिस्त होतात. पण आपण असं जगतो का? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आणि त्या साठवणीचा आनंद घेण्यासाठी आपण ते जगायचे सोडून देतो. गेल्या आठवड्यात हेच आजूबाजूला बघायला मिळत होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आलेले जवळपास ९०% लोकं एकतर सेल्फी, फोटो काढण्यात, व्हिडीओ बनवण्यात, फेसबुक, इंस्टाग्राम अपडेट करण्यात आणि उरलेले व्हिडीओ कॉल करून बाकीच्यांना आम्ही कुठे आहोत हे सांगण्यात व्यस्त होते. या सगळ्यात त्या स्टॅच्यू किंवा एकूणच त्या क्षणांना बंदिस्त करण्यात आपण जगायचे मुकतो आहोत हे कोण्याच्याही ध्यानीमनी येत नव्हतं. 

संध्याकाळी तिकडे होणारा लेझर शो प्रसिद्ध असल्याने आधीच त्याच तिकीट घेऊन त्याचा अनुभव घेण्यासाठी बसलो होतो. लेझर शो चालू होत नाही तोवर त्याचे फोटो, व्हिडीओ काढण्याची चढाओढ बघून जे समोर सुंदर रीतीने समोर चालू आहे त्याचा आनंद घ्यायचा सोडून आणि जे बघण्यासाठी आपला अमूल्य वेळ, पैसे घालवून आलो आहोत तेच जर अनुभवायचं नसेल तर इकडे येण्याची काय गरज असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. फोटो आणि व्हिडीओ करण्याच्या नादात मधेच उभं राहून जे काही लोकं मागे बसले आहेत त्यांना आपण अडचण ठरतो आहोत याचेही कोणतेच सयोरसुतक त्या सर्वाना नव्हतं. बरं हे सगळं कश्यासाठी तर नंतर कधीतरी या आठवणी बघण्यासाठी. पण खरच असे फोटो आणि असे व्हिडीओ आपल्या मोबाईल फोन मधून आपण किती वेळा बघतो? ते बघताना खरच त्याचा आनंद मिळतो का? जर याच उत्तर नाही असेल तर जे समोर अनुभवयाला मिळते आहे त्याचा असा विपर्यास करून आपण काय मिळवतो आहोत? 

बर जगण्याची ही गोष्ट फक्त फिरण्यापुरती मर्यादित नाही तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आज ती लागू आहे. आपले खाजगी क्षण हे खाजगी असायला हवेत. प्री वेडिंग शूटिंग किंवा फोटो त्याचसोबत आजकाल गरोदरपणाचं शूट ही प्रसिद्ध आहे. हे सर्व आपल्या माणसांसाठी मर्यादित असायला हवं असं माझं तरी स्पष्ट मत आहे. लग्नाआधी बागेत सोबत मारलेला फेरफटका, समुद्राच्या किनाऱ्यावर घालवलेली एक सुंदर संध्याकाळ, व्हॅलेंटाईन दिवशी किंवा वाढदिवसाच्या दिवशी एकत्र घालवलेले क्षण, एखादा सोबत बघितलेला चित्रपट ते केलेली लॉंग ड्राइव्ह याच्या आठवणींची तुलना त्या प्री वेडींग शूट मधील कृत्रिम रित्या व्यक्त केलेल्या प्रेमाशी होऊ शकते का? नसेल होत तर मग आपल्या प्रेमाच उदात्तीकरण करण्याचा हेतू काय? हे एक उदाहरण झालं. अश्या कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपण जगायला विसरत चाललेले आहोत. घरातील प्रत्येक आनंदाच्या क्षणांना कॅमेरात बंदिस्त न करता ही जपता येतं. त्यासाठी कॅमेराच्या लेन्स आणि पिक्सेल पेक्षा मनाचं नात आणि आपुलकी जास्ती गरजेची असते नाही का? पण आपण हे सगळं विसरून गेलेलो आहोत. 

फोटो काढणं, सेल्फी काढणं किंवा एकूणच व्हिडीओ, फोटो शूटिंग याला विरोध नाही किंवा नक्कीच त्याचा सहभाग आपल्या अश्या क्षणांमध्ये असावा. त्यात दुमत नाही. पण तो कधी, केव्हा, किती हे ठरवण्याची प्रगल्भता आपण अंगी बाणवायला हवी. एखाद्याला आपल्या खाजगी आयुष्यात किती डोकावायला द्यायचं याचे आराखडे आपल्याला माहित असायला हवेत. आपल्या सिमा ठरलेल्या असल्या की मग क्षण जगता ही येतात आणि त्यांना कॅमेराच्या लेन्स मधे बंदिस्त ही करता येते. अश्या आठवणी दुहेरी आनंद देतात कारण ते क्षण आपण जगलेले असतात आणि जपलेले असतात. आभासी जग एकीकडे आणि आपलं आयुष्य दुसरीकडे याच्यातील धुसर रेषा आपल्याला कळायला हवी. 

आयुष्यात खूप कमी क्षण असे असतात की जे जगायला मिळतात. ते जगणं हेच आपण जाताना आपल्यासोबत घेऊन जातो बाकी कॅमेराच्या लेन्स मधे अडकवलेले क्षण इकडेच सोडून जायचे असतात तेव्हा मला मनापासून वाटते की आपल्याला क्षणांना जगायचं शिक्षण देण्याची खरी गरज आहे. आपण आज सतत जगत आहोत ते आभासी जगासाठी. स्वतःसाठी नाही. जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हा हातातून ते क्षण आणि ती वेळ कधीच निसटलेली असेल. तसं होऊ द्यायचं नसेल तर आज, आत्तापासून जगायचे क्षण जगून घ्या. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 

No comments:

Post a Comment