Thursday, 24 February 2022

तिसरं महायुद्ध खरच होईल का?... विनीत वर्तक ©

 तिसरं महायुद्ध खरच होईल का?... विनीत वर्तक ©

युक्रेन आणि रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढे काय? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या युद्धाचा घेतलेला मागोवा. 

युक्रेन आणि रशिया या मधील नक्की विवाद काय आहे? 

१९९१ मधे रशियाचे विभाजन झाल्यावर अमेरीकेने पुन्हा एकदा नको तिकडे तोंड खुपसून खपल्या काढायला सुरवात केली. North Atlantic Treaty Organization (NATO) ची स्थापना युरोपिअन देशांनी १९४९ मधे रशियाचं वर्चस्व कमी करण्यासाठी केली होती. सहाजिक अमेरीका या गटाचं नेतृत्व आजवर करत आलेली आहे. खरं तर रशिया वेगळा झाल्यावर आणि शीत युद्ध संपुष्टात आल्यावर या गटाची गरज तशी नव्हती. पण अमेरीकेने युरोपियन देशांना हाताशी धरून जे १५ देश रशियापासून वेगळे झाले त्यांना नाटो चा सदस्य बनवायला सुरवात केली. यातील काही देश हे नाटो चे सदस्य झाले. रशियाने याला आक्षेप घेऊन अमेरीका नको तिकडे तोंड खुपसते आहे याचा इशारा दिला होता. जेव्हा युक्रेन च्या राजकारण्यांनी नाटो मधे जाण्यासाठी पावलं टाकायला सुरवात केली तेव्हा मात्र रशिया आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा राग शिगेला पोहचला. 

युक्रेन आणि रशिया यांचे खूप जुने घनिष्ठ संबंध आहेत. त्याचा इतिहास कित्येक शतकाआधीचा आहे. युक्रेनच्या संस्कृतीवर रशियाचा प्रभाव खूप आहे. युक्रेन क्षेत्रफळाच्या मानाने युरोपात रशियाच्या खालोखाल आहे. युक्रेनची २२९५ किलोमीटर इतकी प्रचंड लांब सीमा रशियासोबत जोडलेली आहे. युक्रेन नैसर्गिक साधनांच्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. युरेनियम, नैसर्गिक गॅस चे खूप सारे साठे युक्रेन मधे आहेत. आज जरी युक्रेन रशियाचा भाग नसला तरी युक्रेनमधील अनेक लोकांना रशियाचा भाग होण्याची आजही इच्छा आहे. त्यामुळेच पूर्वेकडील युक्रेनच्या भागात आज बंडखोर लोकांचं वर्चस्व आहे. हे बंडखोर लोक युक्रेन सरकार विरुद्ध रशियात जाण्यासाठी आजही युद्ध आणि उठाव करत आहेत. युक्रेन जर नाटो चा सदस्य झाला तर रशियाची राजधानी मास्को ही अवघ्या ४९० किलोमीटर अंतरावर आहे. याचा अर्थ सरळ आहे की नाटो च्या नावाखाली अमेरिकेचं सैन्य, गुप्तचर संघटना आणि मिसाईल अगदी मास्को च्या नाकावर टिच्चून रशियावर वचक ठेवणार. 

हेच पुतीन यांना नको आहे. समजावून सांगूनही युक्रेन च्या राजकारण्यांनी अमेरीका आणि नाटो सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही झालं तर अमेरीका आहे सांभाळून घ्यायला अशी वक्तव्य करून अमेरीकेने युक्रेन च्या राजकारण्यांना आश्वस्त केलं, जागतिक मंचावर रशिया अन्याय करतो आहे असं चित्र उभं केलं. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची तुलना हिटलर शी करून एकूणच रशियाच्या आर्थिक मुसक्या आवळण्यासाठी जगाला एकत्र येण्याचं आव्हान केलं. जर हे घडणार आहेच तर मग निदान युक्रेनला ताब्यात घेऊन या आर्थिक नुकसानीला सामोरं गेलं तर युक्रेन ला आणि पर्यायाने रशियाच्या सुरक्षिततेसाठी असणारा धोका आपण तूर्तास दूर केल्याचा विजय आपला असेल हे पुतीन यांना चांगल माहित होतं. सरहद्दीवर सैन्य जमवून त्यांनी एक प्रकारे युक्रेन ला होणाऱ्या परिणामांचा इशारा दिला. पण अमेरिका आणि नाटो ने खेळलेल्या चाली युक्रेन च्या राजकारण्यांना समजल्या नाहीत. नाटो आणि अमेरिका युद्ध झालं तर सगळ्यात पहिले बाजूला होणार हे न कळण्या इतपत त्यांच्या डोळ्यावर अमेरीकेने झापडं लावली होती. शेवटी तेच झालं जे कोणालाच नको होतं  ते म्हणजे रशियाने काल युक्रेनवर केलेलं आक्रमण. 

युक्रेन आणि रशिया या मधील युद्ध तिसरं महायुद्ध असेल का? या युद्धाची व्याप्ती किती काळ असेल? त्याचे संभाव्य परीणाम काय असतील? 

रशिया आणि युक्रेन मधील युद्धाची व्याप्ती त्या दोन देशांपर्यंत मर्यादित राहील असं माझं स्पष्ट मत आहे. त्याला कारण असं की दोघांच्या भांडणात जो कोणी तिसरा घुसेल त्याला सगळ्यात जास्ती नुकसान होण्याची शक्यता आहे. रशिया च्या विरुद्ध युद्धात उतरण्याची ताकद युरोपियन देशांकडे नाही. त्या शिवाय अमेरीका ने आधीच आपण सैन्य उतरवणार नाही म्हणून आपलं अंग बाजूला काढलं आहे. कारण रशियाच्या विरुद्ध जो कोणी उतरेल त्याला त्याची जागा दाखवण्याची ताकद रशियाकडे निर्विवाद आहे. जगातील सगळ्यात जास्ती आण्विक मिसाईल आणि हत्यार रशियाकडे आहेत. यातील कोणतेही हत्याराचा वापर रशिया अश्या परिस्थितीत करताना मागे पुढे बघणार नाही. रशियात लोकशाही नाही. त्यामुळे तिकडे डावं - उजवं यांच्या मताला काडीची किंमत नाही. भारतात ५-६ पंतप्रधान आले आणि गेले. पण पुतीन आजही त्याच जागेवर आहेत. त्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचा अंदाज जगाला आहे. रशिया विरुद्ध कोणी लढत देऊ शकेल तर ती अमेरिका आहे पण इतका मोठा धोका अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणि एकूणच अमेरिकेला परवडणारा नाही.

काल भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात २५ मिनिटे चर्चा झाली. यात काय बोलणं नक्की झालं हे बाहेर येणार नाही. पण जे आलं आहे त्यावरून हे नक्की स्पष्ट होते की रशियाला एका काळात युद्ध समाप्त करायचं आहे. ती लिमिट माझ्यामते पुढचे २४ ते ४८ तास असू शकतात. कारण त्यापेक्षा जास्त काळ युद्ध सुरु ठेवल्यास भारताला ही रशियाची सोबत करण्यास कठीण जाईल हे भारताच्या पंतप्रधानांनी पुतीन यांना स्पष्ट सांगितलं असेल असा लपलेला अर्थ त्यांच्या संभाषणातून पुढे येतो आहे. भारतासाठी नाही पण एकूणच रशियाला ही ते चालू ठेवणं परवडणारं नाही. त्यामुळे येत्या २-३ दिवसात युद्धविराम होऊ शकेल असं मला वाटते. 

या युद्धाचे संभाव्य परीणाम म्हणजे रशियाची अर्थवाव्यस्था अजून खिळखिळी होणार. त्याचे चटके संपूर्ण जगाला भोगावे लागतील. युरोपियन देशांना सगळ्यात मोठा चटका नॅचरल गॅस च्या रूपात लागेल. तर भारतासारख्या देशाला याचा चटका इंधन दरवाढीने लागेल. भारतात इंधनाचे भाव येत्या काळात १०-१५ रुपयांनी वाढण्याची दाट शक्यता आहे कारण क्रूड तेलाचा भाव आज १०३ $ प्रति बॅरल वर गेलेल्या आहेत. या सोबत रशिया सोबत संरक्षण करार न करण्यासाठी किंवा झालेले करार बंद करण्यासाठी अमेरिका आणि नाटो देशांकडून दबाव वाढू शकतो. पंतप्रधानांनी काल केलेला फोन कॉल हा फ्रांस कडून हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या विनंतीचा भाग होता. म्हणून मी वर लिहिलं की जितके दिवस हे युद्ध चालेल भारतावर युरोपियन देश, अमेरिका यांच्याकडून हा दबाव येणार आहे. 

युक्रेन आणि रशिया वादात भारताची भूमिका योग्य आहे का? 

भारताचा या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताच संबंध नाही. भारताचा संबंध येतो तो रशियाशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे. रशिया भारताच्या प्रत्येकी प्रश्नावर एकतर सोबत किंवा जिकडे बाजू घेणं शक्य नसेल तिकडे तटस्थ राहिलेला आहे. त्यामुळेच आज भारताची भूमिका एकदम बरोबर आहे. काही फेसबुक   तज्ञ भारताने रशियाची उघड भूमिका घ्यावी आणि हे सरकार गुळचेपी भूमिका घेते किंवा अमेरिकेचा दबाव आहे म्हणून भारत गप्प वगरे अशी विधान करतील. पण वर लिहिलं आहे तसं कीं भारताचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध या गोष्टींशी नसताना मुळात भारताने भुमिका घेणं किंवा ती अपेक्षा ठेवणं हास्यास्पद आहे. हे म्हणजे आपल्या घराच्या बाजूच्या दोन्ही शेजाऱ्यांमध्ये भांडण सुरु आहे तर आपण त्यावर विचारलं नसताना कोण योग्य आणि कोण अयोग्य हे मत देणं. अश्या मताला काडीचीही किंमत नसते. उलट असं मत प्रदर्शित करून आपण आपली किंमत कमी करत असतो. त्यात दोघांचा रोष ओढवून घेतो. यापेक्षा सगळ्यात योग्य भूमिका हीच की कोणाच्या बाजूने कोणतीच भूमिका न घेणं. आपल्याला त्यात मध्यस्ती करण्यासाठी विचारलं जाईल तेव्हा आपण दोन्ही शेजाऱ्यांना शांतपणे आपलं भांडण सोडवण्याचा सल्ला देणं. नेमकी हीच भूमिका भारताने घेतलेली आहे. 

अमेरिका आणि नाटो च्या विरुद्ध जाऊन उगाच आम्ही रशियाच्या बाजूने आहोत हे सांगणं म्हणजे आपल्या या सर्व देशांशी असलेले संबंध खराब करून घेणं. उद्या युक्रेन रशियाचा भाग होईल किंवा त्यांच्यात तह होऊन युद्ध संपेल. पण आपले संबंध मात्र खराब होतील ते कायमचे. अमेरिका, युनायटेड किंगडम , फ्रांस, जर्मनी अश्या सर्व देशांशी भारताचे अतिशय उत्तम संबंध आहेत. त्याच सोबत रशियाशी आपले अतिशय जुने आणि घट्ट मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भारताने कोणाचीही बाजू न घेता या प्रश्नाचं मूळ काय आहे ते स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसरीकडे काल फोन कॉल करून भारताने आपल्यावर येणाऱ्या दबावाची तसेच या युद्धातून निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या हत्येबद्दल आणि एकूणच युद्धाबद्दल थेट पुतीन यांना आपली काळजी कळवलेली  आहे. ज्याचा पुतीन यांनी विचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. माझ्यामते यापेक्षा अजून निर्णायक भूमिका दुसरी कोणती असू शकत नाही. 

युक्रेन ला भारताने मदत करावी का? भारताच्या पंतप्रधानांनी मध्यस्ती करावी हा युक्रेन ने सल्ला योग्य का?

युक्रेन ला कोणताच नैतिक अधिकार भारताबद्दल बोलण्याचा नाही. कारण याच युक्रेन ने १९९८ साली अणू चाचण्यांनंतर भारताच्या विरुद्ध मत दिलेलं होतं. पाकिस्तान ला हत्यार आणि रणगाडे यांचा पुरवठा केलेला आहे. तसेच काश्मीर प्रश्नात मध्यस्ती करण्यासाठी युनायटेड नेशन मधे हो म्हणजे भारताच्या विरुद्ध मतदान केलेलं आहे. मग भारताने मध्यस्ती करण्यासाठी केलेलं आवाहन किती हास्यास्पद आहे. काल भारताच्या पंतप्रधानांनी फोन कॉल केला तो फ्रांस च्या सांगण्यावरून न की युक्रेन च्या सांगण्यावरून. फ्रांस भारताचा अतिशय जवळचा मित्र आहे. त्या नात्याने तसेच युक्रेन मधील अडकलेल्या भारतीय विद्यार्थी , नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी हा फोन कॉल केलेला आहे. ज्यात पुतीन यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी रशिया कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे. मला खात्री आहे की येत्या काही दिवसात युक्रेन मधे अडकलेल्या १८,००० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं जाईल. 

तूर्तास इकडे थांबतो. येत्या काही दिवसातील घडामोडीनंतर पुढलं चित्र स्पष्ट होईल. तेव्हा पुन्हा एकदा यावर लिहेन. 

जय हिंद!!!

तळटीप :- यात लिहलेले मुद्दे आणि मत माझी आहेत. ती कोणावर लादण्याचा किंवा तीच योग्य आहेत असं सांगण्याचा माझा अट्टहास नाही. जितकं आपल्या बुद्धीला पटेल तितकं घ्यावं आणि नाही पटत असेल तर सोडून द्यावं. ही नम्र विनंती. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment