Wednesday 2 February 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १९)... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १९)... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की आपण केलेल्या कर्माचे भोग आपल्याला इकडेच भोगावे लागतात. दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्यात अनेकदा आपणच अडकतो. या सर्वाचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे. जे आहे ते सांभाळायची ताकद नसताना काश्मीर घेण्याची स्वप्ने बघणाऱ्या पाकिस्तानची शकले उडण्याच्या वादळाची सुरवात झालेली आहे. मतलई वाऱ्यांनी आता खाऱ्या वाऱ्यांची दिशा घेतली आहे. या वादळाने आपलं स्वरूप दाखवायला सुरवात केली आहे. काल पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा पासून १६० किलोमीटर वर असलेल्या नोशकी भागात बलूच रिबेल आर्मी ने केलेल्या हल्यात जवळपास १०० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याच्या बातम्या आहेत. यात अगदी मेजर जनरल आयमान बिलाल सफदार यांचा मृत्यू झाल्याच्या ही बातम्या पुढे येत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैन्याची वाताहत आणि इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचा या हल्यातील मृत्यू याच वादळाची साक्ष देणारा आहे. 

काश्मीरसाठी आकाश पाताळ एक करणारा आणि आतंकवाद्यांना त्यासाठी तयार करणारा पाकिस्तान स्वतःच्या घरात माती खातो आहे. येत्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत त्यावरून बलुचिस्तान पाकिस्तान च्या हातातून निसटत चालला आहे. बलुचिस्तान च क्षेत्रफळ ३,४७,१९० स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड आहे. पाकिस्तान चा विचार केला तर संपूर्ण देशाच्या जमिनीचा हा तिसरा हिस्सा हा एकट्या बलुचिस्तान चा आहे. बलुचिस्तान हातातून निसटणं म्हणजे एक प्रकारे पाकिस्तान ची शकले उडणं त्याच्यातून पाकिस्तान कधीच पुन्हा सावरू शकणार नाही. बलुचिस्तान मधे मुळातच इतका संघर्ष शिगेला का पोहचला आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. जर बलुचिस्तान पाकिस्तान पासून वेगळा झाला तर एक प्रकारे भारत पाकिस्तान ला खिंडीत पकडून त्याचा माज एक प्रकारे उतरवणार आहे. 

गेली ७५ वर्ष बलुचिस्तान आपल्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहे. एकट्या पाकिस्तान नाही तर इराण आणि अफगाणिस्तान ने त्याच्या भूमीवर एक प्रकारे कब्जा केलेला आहे. १९४७ जेव्हा इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा बलुचिस्तान चे त्याकाळचे नेते अहमद यार खान यांनी स्वतंत्र बलुचिस्तान राष्टाची मागणी इंग्रजांकडे केली. पाकिस्तान चे तत्कालीन नेते मोहंमद अली जिना यांनी अहमद यार खान यांना पाकिस्तान सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला. जो त्यांनी स्पष्टपणे नाकारला. बलुचिस्तान एक स्वतंत्र्य देश म्हणून उदयाला येणार त्याचवेळेस पाकिस्तान ने आपल्या मातीला जागत पाठीत खंजीर खुपसला. अचानक कोणतंही कारण न देता बलुचिस्तान चे नेते अहमद खान यांनी आपण पाकिस्तान मधे समाविष्ट होत असल्याच्या करारावर स्वाक्षरी केली. असं करण्यासाठी खान यांना पाकिस्तान च्या आर्मी ने त्यांच अपहरण केलं. यानंतर बलुचिस्तान च्या क्षितिजावर सूर्य मावळला तो कायमचा. 

बलुचिस्तान मधे नैसर्गिक गॅस प्रचंड प्रमाणात आहे. गेली ७५ वर्ष पाकिस्तान त्याचा वापर करून ऊर्जा निर्मिती करतो आहे. पण बलुचिस्तान च्या वाट्याला मात्र पाकिस्तान ने काहीही दिलेलं नाही. साध्या प्राथमिक गरजा भागवण्यात सुद्धा पाकिस्तान पूर्ण करू शकलेला नाही. त्यामुळेच बलुचिस्तान च्या नागरिकांमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण या भागावर केली आहे पण पाकिस्तान ने या संपूर्ण भागाची पूर्णपणे वाट लावली आहे. शाळा, रस्ते, वीज, पाणी, हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा अश्या सगळ्या गोष्टींची वानवा आहे. एक प्रकारे हा भाग झोंबी सारखा झालेला आहे. पाकिस्तान कागदावर लोकशाही राष्ट्र आहे हे सर्वाना माहित आहे. पाकिस्तानी आर्मीच इथल्या सर्वच गोष्टींवर वचक ठेवून असते. बलुचिस्तान मधे लोकशाही अस्तित्वात नाही. इकडे पाकिस्तानी सेना इथल्या लोकांवर दडपशाही, हुकूमशाही गाजवत असते तर इथल्या स्त्रियांवर अनेक अमानवीय अत्याचार करत आहे. या सगळ्यामुळे बलुचिस्तान मधील जनता पाकिस्तान च्या जाचामुळे त्रासलेली आहे. 

बलुचिस्तान ची सिमा अफगाणीस्तान आणि इराण या देशांशी जुळते. त्यामुळे इकडे मोठ्या प्रमाणावर अफगाण आणि इराण मधील लोकांनी घुसखोरी केलेली आहे. इथले जे स्थानिक लोकं आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. ज्यावर पाकिस्तान मूग गिळून गप्प आहे. यातच २०१३ मधे चीन ने इकडे ५० बिलियन डॉलर ची गुंतवणूक करत विकासाचं गाजर दाखवलेलं होतं. पण प्रत्यक्षात ग्वादर हे एक छोटं गाव बलुचिस्तान मधे होतं. मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय होता. पण चीनने बंदर निर्मितीचं कारण देतं इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय तर बंद केलाच पण त्यांना कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केली नाही. त्यामुळे इथली संपूर्ण जनता रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळेच आज इकडे स्थानिक लोकांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. याचे लोण आता हळूहळू बलुचिस्तान च्या इतर भागात पसरत चाललेले आहेत. काल झालेली घटना हे याच वादळाचे द्योतक आहे. आज चीन लोकांच्या संरक्षणासाठी पाकिस्तान ला आपली आर्मी इकडे पुरवावी लागत आहे. इथे चीन आणि पाकिस्तानी नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 

बलुचिस्तान च्या या असंतोषाचे ताजे रूप म्हणजेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जिने कालचे हल्ले घडवून आणले आहेत. एक प्रकारे तालिबान सारखी संघटना पाकिस्तानाच्या बलुचिस्तान मधे उदयाला आलेली आहे. जिचा प्रसार वेगाने बलुचिस्तान मधे होतो आहे. पाकिस्तान आर्थिक आणि सैनिकी शक्तीच्या जोरावर कदाचित काही काळ हे वादळ थोपवू शकेल पण ज्या वेगाने त्याच्या शक्तीत वाढ होते आहे. ते बघता यात पाकिस्तान च्या समोर खूप मोठं संकट उभं राहणार आहे हे नक्की आहे. खरे तर चीन चा संपूर्ण बी.आर.ओ. प्रकल्प अडचणीत सापडेल अशी सद्यस्थिती आहे. काश्मीर मधे माती खाल्यावर बलुचिस्तान मधे ही पाकिस्तान सद्या माती खातो आहे. त्यामुळेच त्याचा त्रागा वाढतो आहे. बलुचिस्तान मधल्या या चळवळींना भारत पाठिंबा देतो आहे असा पाकिस्तान चा आरोप आहे. हा आरोप निराधार असल्याचं बलुचिस्तान आणि भारत या दोघांनी स्पष्ट केलं आहे. पण बुद्धिबळाच्या काही चाली या पडद्यामागून खेळायच्या असतात आणि सध्या यात निष्णात असलेलं नेतृत्व मग ते राजकीय असेल किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित भारताकडे आहे याची पाकिस्तान ला जाणीव आहे. त्यामुळेच या चाली काहीच स्पष्टपणे न दाखवता खेळल्या जाणार हे स्पष्ट आहे. 

काहीही असलं तरी दुसऱ्याच्या घरात हक्क सांगणारा पाकिस्तान तूर्तास आपल्याच घरातील भानगडी सोडवण्यात व्यस्त झाला आहे. ज्यात त्याला संपूर्णपणे अपयश येते आहे. या भानगडी अश्याच सुरु राहिल्या तर त्याचे तुकडे व्हायला वेळ  लागणार नाही हे बदललेल्या वाऱ्यांनी आणि घोंघावणाऱ्या वादळाने स्पष्ट केलंच आहे.

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment: