#आयुष्य_जगलेली_माणसं...भाग ११ (डॉक्टर अभय अष्टेकर)... विनीत वर्तक ©
लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात आपण आर्किमिडीज आणि सर आयझॅक न्यूटन च्या गोष्टी वाचल्या होत्या. युरेका, युरेका म्हणून ओरडत येणारा आर्किमिडीज आणि झाडावरून पडलेलं सफरचंद बघून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणारा न्यूटन. अर्थात या गोष्टी खरोखर घडल्या होत्या का याचा काही सबळ पुरावा आज उपलब्ध नाही. या कथा काल्पनिक आहेत असं अनेक जण आज म्हणतात. काहीही असलं तरी याच गोष्टींनी भारतातील अनेक तरुण विद्यार्थ्यांच मन प्रज्वलित आजवर केलेलं आहे. विज्ञानाची गोडी आणि त्याच्या बद्दल कुतूहल कुठे पहिल्यांदा उत्पन्न होत असेल तर याच गोष्टींमधून. अश्याच विद्यार्थ्यांमध्ये एक होते महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 'अभय अष्टेकर'.
मुंबई मधील मराठी माध्यमाच्या शाळेतून आपलं शिक्षण घेताना सर आयझॅक न्यूटन च्या सफरचंदाने त्यांच्या मनात घर केलं ते कायमचं. त्यांच्या असं लक्षात आलं की सफरचंद झाडावरून पाडणारं ते गुरुत्वाकर्षण अमेरिका असो वा भारत सगळीकडे सारखच असते. मात्र या दोन्ही ठिकाणी भाषा, संस्कृती, विचार, समाज या सर्व गोष्टी बदलत जातात. मग या बदलणाऱ्या गोष्टींपेक्षा स्थिर असलेल्या गोष्टीचा अभ्यास करणं जास्ती चांगल. आपलं उच्च माध्यमिक पर्यंतच शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यावर त्यांनी पदवी शिक्षणासाठी उडी घेतली ती थेट अमेरिकेतील ऑस्टिन येथे असलेल्या टेक्सास विद्यापीठात. तिथून पुढे मूलभूत भौतिकशास्त्राला आपल्या शिक्षणाच लक्ष्य ठेवून त्यांनी शिकागो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली.
अल्बर्ट आईनस्टाईन ने मांडलेल्या थेअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी ने त्यांच्या डोक्यात आणि मनात घर केलं होतं. भौतिकशास्त्रामधील मूलभूत दोन गोष्टी म्हणजेच स्पेस आणि टाइम यांचा संबंध त्यांच कुतूहल अजून जागृत करत होता. लहानपणी मनात घर केलेलं गुरुत्वाकर्षण आणि त्याचा विश्व स्वरूपाशी संबंध अश्या विषयांवर त्यांनी संशोधन केलं. लूप क्वांटम ग्रॅव्हिटी च प्रमेय सिद्ध करताना त्यांनी व्हेरिएबलस शोधून काढले ज्यांना आज 'अष्टेकर व्हेरिएबलस' म्हणून ओळखलं जाते. ( लूप क्वांटम ग्रॅव्हिटी ही क्वांटम मेकॅनिक्स आणि जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी यांना जोडणारा एक दुवा आहे.) डॉक्टर अष्टेकर यांनी केलेल्या संशोधनामुळे अल्बर्ट आईनस्टाईन ने मांडलेल्या थेअरी ला समजण सोपं झालेलं आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण संशोधनासाठी अमेरिकन फिजिकल सोसायटी ने त्यांचा आईनस्टाईन पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
मुंबई मधील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून आज जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा अटकेपार रोवणारे डॉक्टर अभय अष्टेकर आज मराठी अस्मितेचा झेंडा गल्लोगल्ली घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या खिजगणतीत ही नाहीत हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. फक्त दाढी वाढवून, फेटा बांधून, कपाळावर टीळा लावून किंवा अस्मितेचा भगवा झेंडा मिरवून मराठी अस्मिता टिकत नसते. अर्थात हे कळण्याइतपत आपल्या समाजाची प्रगल्भता नाही. आज आपल्या संशोधनाने जगात अतिशय मान सन्मान मिळवणाऱ्या डॉक्टर अभय अष्टेकर यांच्या या कार्यामागे त्यांना प्रेरणा मिळाली आहे ती भगवतगितेमुळे. आज डॉक्टर अष्टेकर संशोधन क्षेत्रात अतिशय मानाच्या असणाऱ्या नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्स चे मानद सदस्य आहेत. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन सुद्धा जगाच्या क्षितिजावर त्यांनी आपली छाप पाडली आहे.
भारताचा आणि मराठी अस्मितेचा गौरव मूलभूत भौतिकशास्त्रात आपल्या संशोधनाने करणाऱ्या डॉक्टर अभय अष्टेकर यांना माझा कडक सॅल्यूट. त्यांच्या पुढील संशोधनासाठी आणि प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment