Sunday 13 February 2022

व्यर्थ ना हो बलिदान... विनीत वर्तक ©

 व्यर्थ ना हो बलिदान... विनीत वर्तक ©

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तान मधील जैशे मोहम्मद च्या अतिरेक्यांनी सी.आर.पी.एफ. च्या जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात ४० सैनिकांना वीरमरण आलं. या भ्याड हल्याचा बदला भारताने २६ फेब्रुवारी २०१९ ला जैशे मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या बालाकोट इथल्या तळावर हवाई हल्ला घेतला. यात ३०० पेक्षा जास्ती पाकिस्तानी अतिरेकी मारले गेले. (संदर्भ :- पाकिस्तान चे निवृत्त राजदूत 'आघा हिले' यांनी हा आकडा एका मुलाखतीत मांडला आहे.) 

पुलवामा हल्यानंतर एकट्या जम्मू  काश्मीर मधे गेल्या ३ वर्षात ५०० पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा भारताच्या सुरक्षा दलांनी केलेला आहे. संपूर्ण अतिरेकी नेटवर्क भारताने उद्धवस्थ केलं आहे. ज्यात पडद्यामागून मिळणारा राजकीय आश्रय, पैश्याचा पुरवठा, हत्यांराचा पुरवठा, ड्रग्स आणि इतर माध्यमातून उभा राहणारा पैसा या सर्वांवर भारताने अंकुश ठेवला आहे. त्यामुळेच अतिरेकी हल्यात भारतात कमी आलेली आहे. भारत जास्त सुरक्षित झाला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिस्तान च्या मुसक्या आवळल्या तर दुसरीकडे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी योग्य ती पावलं टाकली आहेत. 

या गोष्टींमुळे पाकिस्तान सुधारेल अशी आशा नक्कीच नाही. पण या सगळ्या गोष्टींनी पाकिस्तान च्या आणि तिथल्या अतिरेकी घडवणाऱ्या लोकांच्या मनात भारताचा दबाव वाढला आहे. त्यामुळे असे अतिरेकी हल्ले भारतात होणार नाहीत हे स्पष्टपणे नक्कीच सांगता  येणार नाही पण एक मात्र नक्की की त्या नंतरचे परिणाम खूप गंभीर असतील हे पाकिस्तान ला पण कळून चुकलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर कोणते संदर्भ बदलले असतील तर ती आहे भारताची प्रतिमा. एकेकाळी फक्त तोंडाने हल्याचा निषेध करणारा भारत आपल्याला घरात घुसून मारायला मागे पुढे बघणार नाही. हीच ती प्रतिमा आहे. 

भारतातल्या घरभेदी राजकारण्यांनी बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागितले होते. कोणत्याही गोष्टीचा संदर्भ राजकारणाशी जोडताना आपण वीरगती प्राप्त झालेल्या त्या ४० जवानांचा अनादर करतो आहोत हा विचार करण्याची पातळी सुद्धा त्यांनी यात गमावली होती. अर्थात तोंडघाशी पडल्यावर तोंड लपवायला जागा उरली नसताना पुन्हा येरे माझ्या मागल्या करत तेच भारतातील प्रमुख नेते म्हणून आज निवडुका लढवत आहेत हीच एकप्रकारे भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. असं माझं स्पष्ट मत आहे. 

आजही त्या ३ वर्षा पूर्वीच्या आठवणींनी अंगावर शहारे उभे राहतात. अजूनही त्या ४० वीर जवानांच्या अंगावर लपेटलेला तो तिरंगा डोळ्यासमोरून जात नाही. या हल्याचा प्रमुख आजही पाकिस्तान मधे लपून बसला आहे. त्याला साथ देणारे घरभेदी आजही भारतात पांढऱ्या रंगाचे कपडे घालून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेसमोर लोकशाही चा आधार घेऊन मोकाट फिरत आहेत. आपल्या सारखे सामान्य लोक झालं गेलं विसरून आपापल्या आयुष्यात व्यस्त झालो आहोत. देशाच्या रक्षणासाठी जाणारे गेले आणि त्यांच्या आठवणींची धार पण आता आपल्या मनात बोथट झालेली आहे. पण त्यांच्या बलिदानाची ज्योत आपण आपल्या मनात सतत ठेवली पाहिजे. आज त्यांच्या कुटूंबियांची काय स्थिती आहे? त्यांची मुलंबाळं आपल्या वडिलांची किती आठवण काढत असतील? याचा विचार जरी आपण क्षणभर केला तरी मला वाटते ते आजच्या दिवशी खूप काही असेल. 

आज प्रेमाचा दिवस संपूर्ण जग साजरा करत असताना देश प्रेमासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केलं त्यांची आठवण आज आपण काढली पाहिजे. आज १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस नक्कीच साजरा करा पण आपल्या प्रेमाचे दोन क्षण त्या ४० जवानांसाठी नक्की राखून ठेवा. कारण त्यांच बलिदान व्यर्थ न होऊ देणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment