Saturday, 31 July 2021

भावनाचोरी... विनीत वर्तक ©

 भावनाचोरी... विनीत वर्तक ©


आजवर सोशल मिडीयावर 'लेखनचोरी' हा प्रकार ऐकून होतो पण आता त्यात 'भावनाचोरी' करणाऱ्यांची पण भर पडली आहे. गेली अनेक वर्षं फेसबुकवर लिहीत असताना आपलं लिखाण दुसऱ्याच्या नावाने आपल्याला फॉरवर्ड होण्याचा प्रकार मी अनेकदा अनुभवलेला आहे. लिखाण, साहित्य कॉपीराईट करूनही अनेकदा हे प्रकार सुरू असतात. याच प्रकाराला कंटाळून अनेक चांगल्या लेखकांनी फेसबुक किंवा एकूणच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून आपलं लिखाण, साहित्य प्रकाशित न करण्याचाही निर्णय घेतला आहे. अर्थात याने नुकसान जे चांगले वाचक असतात त्यांचं झालेलं आहे. 

अनेक लेखकांनी एकत्र अथवा वैयक्तिक पातळीवर पैसे भरून स्वतःचे लेखन वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा पर्यायही निवडला आहे. तो योग्य की अयोग्य या प्रश्नात मला जायचं नाही, कारण प्रत्येकाचे लिखाण करण्यामागचे उद्देश वेगळे असतात. प्रत्येक लिखाण करणारा/करणारी हे त्याप्रमाणे त्याला योग्य वाटेल तसे निर्णय घेत असतो. ज्याप्रमाणे मॅगी दोन मिनिटात बनून तयार होते, त्याप्रमाणे दोन मिनिटात प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी लेखनचोरीचा पर्याय निवडला आहे. एखादी पोस्ट अथवा साहित्य चांगल्या दर्जाचं अथवा लोकांना आवडतं आहे असं दिसलं किंवा आपल्याला सोशल मिडीयावर मिळालं, की ते आपलंच म्हणून मागचा पुढचा विचार न करता पुढे ढकलून द्यायचं. यात सुशिक्षित आणि समाजातील प्रगल्भ समजले जाणारे लोक जास्ती पुढे आहेत. कारण भारतात या बाबतीत असलेले तकलादू कायदे, तसेच कळलं तरी आपलं कोणी काही उखाडू शकत नाही, असा एक भाव निर्माण झालेला आहे. तसेच कोणी समोर आणलं तरी मला फॉरवर्ड आलेलं मी पुढे टाकलं किंवा चोरी दाखवून दिल्यावर सांगणाऱ्या व्यक्तीला उडवून लावणारे महाभाग खूप आहेत.

आता त्यात भावनाचोरी हा प्रकार सुरू झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी एक फोटो बघून व्यक्त केलेल्या माझ्या भावना पण लोकांनी शब्दच्या शब्द उचलून आपल्याच नावावर फॉरवर्ड करायला सुरू केल्या. त्यात भरीस भर म्हणून एकांनी चक्क आपला मोबाईल नंबरही त्यात लिहून दिला. जसं काही त्या भावना वाचून लोकांना त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली तर त्यांना ते सोयीचं जावं. असो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. एका बाईंनी तर चक्क सांगितल्यावर या माझ्याच भावना आहेत, असं ठामपणे सांगितलं. कोणीतरी त्यांना ह्या भावना विनीत वर्तक यांनी लिहील्याचे पुरावे दिल्यावर त्या म्हणाल्या, 'मला व्हाट्सअपवर फॉरवर्ड आल्या आहेत' असं कारण त्यांनी दिलं. दोन मिनिटांपूर्वी आपल्याच भावना म्हणून ओरड करणारी ही व्यक्ती पुरावे देताच व्हाट्सअपचं कारण देऊन काढता पाय घ्यायला लागली. अर्थात या सगळ्या प्रकारामुळे आपण आपल्याच नजरेत पडतो, याचं कोणतंच शल्य त्यांच्या बोलण्यात जाणवलं नाही. 

लेखनचोरी, साहित्यचोरी आणि आता भावनाचोरी हा सोशल मिडीयावर एक नेहमीच चर्चेत राहिलेला विषय आहे. या विषयावर लेखकाने अथवा ज्याचं ते लेखन आहे त्याने/तिने लिहील्यावर इग्नोर करा, कशाला इतकं लावून घेता इथं पासून ते त्याच्यावर केस करा, सायबर क्राईमकडे तक्रार करा असे अनेक सल्ले दिले जातात. पण हे सगळे उपाय हे जखम झाल्यावर उपचार करण्यासारखे आहेत. जखम होऊच नये अशी वातावरण निर्मिती करण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं मला मनापासून वाटतं. जसं की एखादा फोटो, एखादा व्यक्ती, एखादी घटना जरी सर्वांसाठी सारखीच असली, तरी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि त्याची तीव्रता, प्रभाव हा व्यक्तीप्रमाणे बदलत जातो. मग जे आपल्याला जाणवते ते मांडण्यात आपल्याला कसली अडचण. त्यात पण आपण दुसऱ्याचे शब्द चोरून आपल्या नावावर टाकायला लागलो तर निदान आपल्या भावनांशी तरी आपण प्रामाणिक राहणार आहोत का? हा विचार मनात यायला हवा! पण काय आहे की या आभासी जगातील आभासी लाईक, शेअर आणि प्रसिद्धीच्या मागे आपण इतके हपापलेले आहोत की आता आपण भावनाचोर पण व्हायला लागलो आहोत. 

मी लिहीताना नेहमीच 'शब्दांकन' कॉपीराईट करतो. याचा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीने ती गोष्ट मला जाणवली आणि शब्दातून उतरली ते माझं आहे. बाकी ती वस्तुस्थिती, व्यक्ती अथवा गोष्ट यांवर अनेकांना लिहीता येऊ शकते अथवा अनेकांनी लिहीलेलं असू शकतं. कारण माहिती ही सर्वांसाठी सारखीच उपलब्ध असते. पण त्यातून आपण निवडून कश्या पद्धतीने मांडतो, हे व्यक्तीवर अथवा त्या लेखकावर अवलंबून असते. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश इतकाच की प्रत्येक घटनेवर प्रत्येकाला आपल्या पद्धतीने दृष्टिकोन, मत मांडता येऊ शकतात. जर असं आहे तर लेखनचोरी किंवा साहित्यचोरीची वेळ येऊ नये. जर आपल्याला तसं मांडता येत नसेल पण पुढे अग्रेषित करायचं असेल तर कॉपी-पेस्ट, शेअर असे अनेक पर्याय योग्य ते क्रेडिट देऊन उपलब्ध असतात. 

अर्थात असा विचार करण्याची प्रगल्भता चोरी करणाऱ्या लोकांमध्ये नसते याची जाणीवही आहे. पण कुठेतरी हे सगळं समाजातला जो एक स्तर सवंग प्रसिद्धी आणि सगळं झटपट मिळवण्याच्या नादात ढासळत चालला आहे त्याचं एक प्रतिबिंब आहे. या सगळ्यांमुळे जरी वाईट वाटत असलं तरी एक त्याने लिखाण बंद करणं किंवा सोशल मिडीया पासून दूर जाणं हा उपाय असू शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. गरुड आणि कावळ्याची एक गोष्ट अनेकांनी वाचली असेल की गरुडाच्या अंगावर बसून कावळा मस्त विहार करतो. गरुड त्यामुळे विचलित न होता आपलं उड्डाण करत राहतो. तो इतक्या उंच हवेत जातो की कावळ्याला श्वास घेणं कठीण होऊ लागतं आणि स्वतःच तो त्याच्या अंगावरून बाजूला होतो. माझ्यामते आपण आपल्या लेखनाचा दर्जा, सातत्य आणि जे मनापासून वाटते ते मांडण्याचं कसब अजून उंचावत नेलं की असे कावळे आपोआप बाजूला होतात. हे गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला वाटतं. चोरी करणाऱ्याला पण चोरी करताना दोन वेळा विचार करावा लागेल इतकं आपण उंच गेलो की चोरी करण्याच्या उद्देशापासून आपण एखाद्याला परावृत्त करू शकतो. अर्थात त्यातही काही अपवाद असतात, पण अपवाद सगळीकडे असतात त्याचं आपण काही करू शकत नाही. 

माझ्या व्यक्त केलेल्या भावनासुद्धा जर लोकांना चोरी कराव्याश्या वाटत असतील तर नक्कीच माझ्या लेखनाने ती उंची गाठल्याचं समाधान मला आहे. या गोष्टीने नाराज होऊन त्यावर आकांडतांडव करण्यापेक्षा माझी जबाबदारी लिखाणाच्या बाबतीत अधिक वाढल्याची जाणीव माझ्यासाठी जास्ती महत्वाची आहे. त्यामुळे आता भावनाचोरी हा प्रकार पण माझ्या लिखाणाला जोडला गेला आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो. अशी भावनाचोरी करून जर कोणाला प्रसिद्धी अथवा मानसिक शांती मिळाली असेल तर ते पण माझं सौभाग्य समजतो. बाकी चोरणारे भावनेतील शब्द चोरू शकतात ती भावना नाही.     

तळटीप :- ही पोस्टही कॉपीराईट करतो आहे. काय माहित थोड्यावेळाने मलाच कोणा दुसऱ्याच्या नावाने फॉरवर्ड येईल.. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

1 comment: