Saturday 24 July 2021

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©

 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'... विनीत वर्तक ©


सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एक शिकवण दिली आहे, ती म्हणजे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार". हे वाक्य समजायला मला तरी खूप वर्षं जावी लागली. आयुष्यातील कित्येक वर्षं मी स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत परिपूर्ण करण्यासाठी जगत आलो. या सगळ्या प्रवासात अनेक चांगले-वाईट अनुभव आले. काही चुका मी केल्या, तर काही वेळा न केलेल्या चुकांची शिक्षा मला मिळाली. काहींना मी दुखावलं तर काहींनी मला दुखावलं. सगळ्याची गोळाबेरीज केली तर कुठेतरी परिपूर्ण राहण्याचा अट्टाहास यामागे होता, असं मला उमजून आलं. ती परिपूर्णता ही कोणा दुसऱ्या व्यक्तींसाठी होती, ज्यांच्या गावीही नव्हतं. तसेच ज्या गोष्टींसाठी मी परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करत होतो, त्या गोष्टी माझ्याशी कधी जुळतंच नव्हत्या. स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत सिद्ध करण्यासाठी आणि त्यातून आपला आनंद शोधण्याचा माझा प्रयत्न मात्र फक्त काही क्षणांसाठीच आनंद देत होता पण खूप काही हिरावून नेत होता. मी त्या काळात अनेक गोष्टी चुकीच्या केल्या आणि चुकीचं वागलो. चांगली माणसं गमावली आणि चुकीच्या माणसांना आयुष्यात स्थान दिलं. 

अचानक काहीतरी घबाड हाताशी लागलं, की आपण ज्या पद्धतीने हावरट बनतो तशीच अवस्था माझीही झाली होती. त्या काळात अनेक चुका मी केल्या. अनेकवेळा नको त्या वादात उडी घेऊन आपणही कोणीतरी महत्वाचं असल्याचं दाखवण्याचा अट्टाहास केला. तेव्हा जाणीव होत गेली, की आपण घडवतो आहे ते शिल्प किती चुकीचं आहे. त्या शिल्पाला परिपूर्ण करण्याच्या नादात किंवा कोणाला तरी चांगलं दाखवण्याच्या नादात आपण त्याचा सगळा चेहरामोहराच बदलवून टाकला आहे. जी प्रतिमा घडते आहे त्यात मी खरा कुठेच नाही. जो आहे तो देखावा. ती वेळ होती जेव्हा त्या वाक्याचा खरा अर्थ मला उमजला. आपल्यापैकी प्रत्येकजण माझ्यासारखंच या बदलातून कधी ना कधी जातो. ती वेळ कधी तरुण असताना येते, तर कधी आयुष्याच्या संध्याकाळी, पण येते मात्र नक्की. अर्थात तिला समजून आपलं शिल्प आपण घडवायचं हे समजण्याची प्रगल्भता किती जण दाखवतात आणि त्यात ते कितपत यशस्वी होतात यावर प्रत्येकाचा आपला अभ्यास असू शकेल. 

आयुष्यात यशस्वी व्हा, चांगले व्हा, नेहमीच चांगलं वागा, दुसऱ्याला दुखवू नका, कोणाचा द्वेष करू नका, सतत चांगला विचार करा आणि अश्या आशयाच्या ढीगभर पोस्ट, पुस्तके आणि ओळी रोज आपल्या कानावर आणि डोळ्यांवर आदळत असतात. 'सतत आनंदी रहा' असं सांगणारे अनेक प्रथितयश पॉझिटिव्ह थिंकर आणि मोटिव्हेशनल स्पीकर आपल्याला नेहमीच आपल्यातच काहीतरी कमी आहे, असं नकळत दाखवून देत असतात. कारण आपण कधी ना कधी दुःखी होत असतो, कळत-नकळत कोणाला तरी दुखावत असतो, कळत-नकळत आपल्याला दुसऱ्या कोणाचा द्वेष वाटतो आणि आपला द्वेष करणारे आपल्याच आजूबाजूला असणारी आपली माणसं असतात. आपण आनंदी राहायचं म्हणजे नक्की काय? ही व्याख्याच आपल्याला समजून येत नाही. मग सुरू होतो परिपूर्णतेचा अट्टाहास, कारण तिथे पोहोचल्यावर तरी आपण आनंदी राहू असे आपल्याला वाटत असते. त्या सगळ्यांत आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जातो. 

कोण असा आहे, की जो कधी दुःखी नाही झाला? कोण असा आहे, की ज्याची स्वप्नं कधी अपूर्ण नाही राहिली? कोण असा आहे की ज्याने दुसऱ्यांना दुखावलं नाही? कोण असा आहे की ज्याच्यावर समाज बोट ठेवत नाही? अहो जिकडे गुलाबात पण त्याचे काटे मोजणारे आहेत तिकडे आपल्यासाठी वाईट बोलणारे आपल्यावर गॉसिप करणारे, आपल्याच व्यक्तिमत्वाची मज्जा घेत तिखट मीठ लावून सांगणारी माणसं सगळ्यांच्या वाटेला येतात. फरक यात आहे की आपण त्यांना कसं स्वीकारतो. सुंदर दिसणाऱ्या कमळाच्या फुलाला पण चिखलाचा संदर्भ द्यावाच लागतो. त्या प्रमाणे आपल्याही बाबतीत असं बोलणारे आणि गोष्टी चिकटवणारे असतातच की. कालच्या चुकांवर बोट ठेवून सगळ्यांना सांगता येतं पण त्या चुका बदलवून आपला आज, एक पायरी वर नेणं आपल्या हातात असतं. त्या चुका जरी आपल्याशी आयुष्यभर चिकटल्या तरी त्यानंतर आपण काय प्रवास केला, हा फरक तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शिल्पकार बनवतो. कारण ते घडवलेलं शिल्प त्याच कटू अनुभवातून आकाराला आलेलं असतं. कदाचित समाजाच्या दृष्टीने ते परिपूर्ण नसेलसुद्धा पण ते घडवण्याची जबाबदारी घेणं माझ्या मते आयुष्यात प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल असतं. 

प्रत्येकवेळी आपण सर्वांना आनंदी ठेवू हे शक्य नसते. घरातील चार माणसांना आपण एकाचवेळी आनंदी नाही करू शकत तर समाज फार लांबची गोष्ट आहे. नावं ठेवणारे नावं ठेवणार आणि वाईट बोलणारे वाईट पसरवणार, प्रश्न हा आहे की आपण या सर्वाला सामोरं कसं जातो. गौतम बुद्धाचं एक वाक्य नेहमीच मला आवडते, "अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता जास्ती महत्वाची आहे". प्रत्येकवेळी आपण प्रतिक्रिया न देणं हे केलेल्या गोष्टीचं समर्थन नसतं, तर अनेकदा आपली पायरी सोडून न देण्याची प्रगल्भता असते. आपण कोणाला अडवू शकत नाही पण आपण स्वतःला सावरू शकतो आणि तेच जर आपण योग्य रितीने केलं तर आपण एक पायरी कालच्यापेक्षा वर जातो आणि जे शिल्प उभं राहतं त्याचे शिल्पकार आपणच असतो. म्हणूनच परिपूर्णतेच्या अट्टाहासापेक्षा आपल्या कालच्या असलेल्या शिल्पात आपण काय चांगला बदल केला तेच आपल्याला एक चांगलं शिल्पकार बनवतं. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



2 comments:

  1. खूप छान सांगितलंत विनीत जी....

    ReplyDelete
  2. google ना कुठलेही फोटो वापरतो, ना कुठल्याही फोटो चा मालक असतो. google फक्त दाखवतो...त्यामुळे फोटो स्रोत google आहे असे म्हणणे पुरेसे नसते. कुठलाही फोटो पोस्ट वर टाकताना तो फोटो च्या website वरून घेतलाय त्या website ची परवानगी घ्यायला लागते, नाहीतर हा cyberspace मध्ये गुन्हा मानला जातो.

    दुसरा अतिशय सोपा पर्याय म्हणजे ब्लॉग पोस्ट वर फोटो टाकताना नेहमी free stock photos च्या website वरून टाकावेत जसे की canva , pexels , unsplash वगैरे . अशा sites वर सुद्धा licence free foto निवडल्यावर त्याचे licensing agreement नीट वाचावे ...आणि free licensing ची परवानगी असेल तरच ते वापरावे.

    जेव्हा पोस्ट viral व्हायला लागते तेव्हा या गोष्टी लोकांच्या नजरेत यायला लागतात. नियम पाळलेले नेहमीच बरे.

    बाकी विषय बरा मांडलाय तुम्ही !

    ReplyDelete