#मंदिरांचे_विज्ञान - एक बाजूला झुकलेल्या मंदिराची गोष्ट... विनीत वर्तक ©
पिसा, इटली इथल्या झुकलेल्या मनोऱ्याबद्दल आपण सगळ्यांनी वाचलेच असेल. ११७३ साली बांधण्यात आलेला पिसा इथला मनोरा त्याकाळी ३ऱ्या मजल्याचे काम झाल्यावर एका बाजूला झुकू लागला. तरीपण कारागिरांनी आपलं काम सुरू ठेवलं. कारागिरांनी वरचे मजले लहान करून त्याचा झुकण्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आलं नाही. आज पिसा इथला मनोरा ४ अंशातून झुकलेला आहे. हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच की याला मागे टाकेल असं एक मंदिर भारतात आहे. जे तब्बल ९ अंशातून एका बाजूला झुकलेलं असून हे पिसाच्या मनोऱ्यापेक्षा दुप्पटीहून जास्ती आहे. ही गोष्ट आहे त्याच एका बाजूला झुकलेल्या मंदिराची.
हिंदू धर्माचं प्रसिद्ध पवित्र क्षेत्र असलेल्या काशीमधल्या गंगातीरावरच्या मणिकर्णिका घाटावर बांधलेलं आहे 'रत्नेश्वर शिव मंदिर'. या मंदिराचा इतिहास बघितला तर साधारण १८२० ते १८२५ या काळात या मंदिराची उभारणी झालेली आहे. हे मंदिर कोणी बांधलं याबद्दल अनेक मतांतरं आहेत. पण त्यातल्या त्यात याचं बांधकाम राणी बायजाबाई, ग्वाल्हेर यांनी केल्याचे पुरावे आहेत. या मंदिराचं सगळ्यात मोठ्ठं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर ९ अंशात एका बाजूला झुकलेलं आहे. आज जेव्हा आपण मंदिर बघतो, तेव्हा अश्या पद्धतीने मंदिराचं बांधकाम कसं केलं गेलं असेल? असा प्रश्न पडतो. हे मंदिर अश्या पद्धतीने झुकण्यामागे अनेक पौराणिक कथांचा संदर्भ दिला जातो, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा विचार केला तर अनेक शक्यता समोर येतात.
रत्नेश्वर शिव मंदिर हे जेव्हा बांधलं गेलं, तेव्हा ते सरळच होतं. त्याचा पुरावा देणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक आहे १८२८-१८३० मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी काढलेलं या घाटाचं चित्र ज्यात हे मंदिर स्पष्टपणे सरळ असल्याचं दाखवलं गेलं आहे. त्याचसोबत १८६५ साली घेतल्या गेलेल्या एका फोटोतही हे मंदिर स्पष्टपणे सरळ असल्याचं दिसत आहे. (तो फोटोग्राफ पोस्टमध्ये जोडत आहे.) मग असं काय झालं, की आज २०२१ मध्ये हे मंदिर चक्क ९ अंशात झुकलेलं आहे. कोणाच्या शापामुळे किंवा कोणाच्या वरदानामुळे हे मंदिर असं झुकलेलं नाही, तर त्यामागे आहे या मंदिराची निवडलेली जागा आणि ज्यावर हे मंदिर उभं आहे त्याचा पाया.
पिसाचा मनोरा झुकण्यामागे कारण आहे, की त्याचा पाया हा मऊ जमिनीवर बांधण्यात आला. जसं बांधकाम होतं गेलं, तसं त्याच्या वजनाचा भार सहन न झाल्याने हा मनोरा एका बाजूला झुकत गेला. मग पुढचा प्रश्न येतो की तो पडत का नाही? याचं उत्तर लपलं आहे गुरूत्वाकर्षणाच्या एका नियमात ज्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हटले जाते. याच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे हा मनोरा आजही झुकलेल्या स्थितीत उभा आहे. अर्थात त्याला काही मर्यादा आहेत. ५.४४ अंशानंतर मनोऱ्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याचं वजन पेलू शकणार नाही आणि मनोरा कोसळेल. आता हीच गोष्ट रत्नेश्वर मंदिराच्या बाबतीत घडली आहे. पण इकडे गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने एकत्र आल्या, ज्यामुळे एकेकाळी सरळ उभं असणारं मंदिर अचानक एका बाजूला झुकायला लागलं आहे.
पावसाळयाच्या दिवसात जेव्हा गंगा नदीला उधाण येतं, तेव्हा सगळे घाट हे पाण्यात बुडून जातात. त्यामुळे इथली बहुतांश मंदिरं ही उंचावर बांधलेली आहेत. अपवाद आहे रत्नेश्वर मंदिराचा. हे मंदिर जवळपास वर्षभर पाण्यात बुडलेले असते. पावसाळ्यात तर गंगेचे पाणी याच्या शिखरापर्यंत पोहोचते. विचार केला तर हे मंदिर आणि त्याचा पाया हा पाण्यात बुडलेला असतो. स्थापत्यशास्त्राच्या भाषेत ज्याला 'सिंकिंग फाउंडेशन' म्हणतात ते मंदिराच्या झुकण्यामागे कारण असू शकते. सतत पाण्यात राहिल्यामुळे पायाची जमीन भुसभुशीत होऊन असे होऊ शकते. जेव्हा मंदिर बांधलं गेलं असावं तेव्हा गंगेचं पात्र अरुंद असण्याचीही शक्यता आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे गंगा नदीच्या पात्रात झालेले बदल पाण्याची पातळी बदलवण्यात झाले. रत्नेश्वर मंदिर पाण्याखाली जायला हे एक कारण असू शकेल.
मंदिर बांधताना जर ते पाण्यात संपूर्णपणे पाण्यात बुडत असेल, तर अश्या जागेची निवड करण्यामागे कोणतीही शास्त्रीय भूमिका दिसून येत नाही. मंदिर हे आधी सरळ होतं, म्हणजे त्याचा पाया मजबूत होता हे स्पष्ट करते. नदीच्या पात्रात आणि त्यात वाहणाऱ्या पाण्याच्या वेगात झालेल्या बदलांमुळे मंदिर एका बाजूला झुकत चालले आहे. वर सांगितलं तसं मंदिर एखाद्या बाजूला किती झुकू शकतं याला मर्यादा आहेत. आज हे मंदिर तब्बल ९ अंशात झुकलेलं आहे. कदाचित अजूनही त्याची झुकण्याची प्रक्रिया निश्चित सुरू असेल. आज रत्नेश्वर मंदिर जरी आकर्षणाचा केंद्रबिंदू झालं असलं तरी उद्या ते अस्तित्वात राहील का नाही हे कोणीच सांगू शकत नाही. इटलीच्या झुकत्या मनोऱ्याचं झुकणं थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत. जो भाग वर आहे त्याच्या पायाखालची माती काढून त्याच्या झुकण्याला जवळपास २०० वर्षं मागे नेलं गेलं आहे. आजही तो जगातील आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे आणि येणारी अनेक वर्षं राहील.
रत्नेश्वर मंदिराच्या बाबतीत मात्र सगळंच उदासीन आहे. ना त्याचा शास्त्रीय अभ्यास करण्याची कोणाची तयारी आहे, ना त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रशासन काही मेहनत घेते आहे. जेव्हा एखाद्या दिवशी ते ढासळेल तेव्हा सर्वांना जाग येईल. देवाचा कोप झाला म्हणून अजून एक कथा जोडली जाईल. प्रश्न हा आहे की श्रद्धेची ही स्थानं फक्त कथा सांगण्यासाठी नाहीत. त्यांच्या निर्मितीत विज्ञान आहे. त्यामुळे मंदिरांचं हे विज्ञान प्रत्येक भारतीयाने समजून घेतलं तर अश्या मंदिरांचं संवर्धन होऊ शकेल आणि जागतिक आकर्षणाची केंद्रबिंदू बनतील. नाहीतर देवदेव करत गाभाऱ्यात असलेला देव कुठे गायब होईल कळणार पण नाही.
फोटो स्त्रोत :- गुगल (पहिल्या फोटोत १८६५ सालचं मंदिर आणि दुसऱ्यात आत्ता असलेली मंदिराची स्थिती)
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment