मृत्युंजयी गोरखा... विनीत वर्तक ©
“When a man says that he is not scared of dying, he is either lying or he is a Gorkha".... फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ
भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी असं वाक्य गोरखा सैनिकांसाठी म्हटलं होतं, कारण जिकडे साक्षात मरण घाबरते, असा पराक्रम गाजवण्याची ताकद गोरखा सैनिकांकडे आहे. गोरखा रेजिमेंटची स्थापना ब्रिटीश काळात झाली. स्वातंत्र्यानंतर ६ गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याचा भाग झाल्या. त्यानंतर भारतीय सेनेचा भाग म्हणून गोरखा सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून भारतमातेच्या सरहद्दीचं रक्षण केलं आहे. गोरखा सैनिकांची ओळख म्हणजे त्यांचं स्वसंरक्षणाचं हत्यार म्हणजेच 'खुकरी'. ही गोष्ट आहे अश्या एका गोरखा सैनिकाची ज्याच्या नुसत्या खुकरीच्या पराक्रमापुढे मृत्यूनेही नांगी टाकली.
'ऑपरेशन विजय'चा भाग म्हणून 'हवालदार ग्यान बहादूर तमंग' यांना पाकिस्तानच्या एका तुकडीची रसद तोडण्याचं काम सोपवण्यात आलं. उंचावर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना मागच्या बाजूने होणारा रसद पुरवठा तोडण्याचं लक्ष्य घेऊन हवालदार ग्यान बहादूर तमंग आणि त्यांचा साथीदार आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करत होते. वर बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना त्यांचा सुगावा लागला आणि त्यांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात ते त्यांच्या साथीदारापासून विलग झाले. या गोळीबारात त्यांचा साथीदार हुतात्मा झाला तर ते मानेमध्ये गोळी लागून पाठीमागे फेकले गेले. डोंगर उतारावरून घरंगळत काही अंतर जाऊन रक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध पडले.
रात्रभर तश्याच अवस्थेत ते त्या गोठवणाऱ्या थंडीत पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शुद्धीवर ते आले तेव्हा आजूबाजूला मशिनगनमधून गोळ्यांचा वर्षाव होत होता आणि तोफेचे गोळे फुटत होते. त्यांनी ८ पाकिस्तानी सैनिकांना आपल्या जवळ येताना बघितलं. जशी त्यांची नजर पडली, तसंच पाकिस्तानी सैनिकांनाही त्यांचा सुगावा लागला. त्यांनी आपल्याकडील ए. के. ४७ मधून गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू केला. डोंगर उतारावर असणाऱ्या कातळांचा आसरा घेत त्यांनी पाकिस्तानी सैनिकांवर प्रतिहल्ला केला. मानेला लागलेली गोळी, रात्रभर उपाशी आणि नुकतंच शुद्धीत आलेल्या अवस्थेतूनपण त्यांनी ३ पाकिस्तानी सैनिकांना आपल्या अचूक निशाण्याने कंठस्नान घातलं. उरलेले सैनिक त्यांच्यावर हल्ला करायला पुढे येणार तेव्हा निसर्ग त्यांच्या मदतीला धावून आला. अचानक त्या उंचीवर धुक्याचं साम्राज्य पसरलं. अवघं १० फुटांवरचं दिसणं अवघड झालं. याचा फायदा घेत हवालदार ग्यान बहादूर तमंग हे पाकिस्तानी सैनिकांना चकमा देत तिथून निसटले.
मानेतून खूप रक्त वाहत होतं, ते थांबवण्यासाठी त्यांनी आपल्या कमरेचा पट्टा मानेला बांधला. संपलेल्या गोळ्या, खराब झालेली रायफल, वाहणारं रक्त अश्या परिस्थितीत ते कधी कातळांवरून रांगत तर कधी झाडाझुडपांच्या मधून अडखळत ते धुक्यात रस्ता शोधत होते. रक्तस्त्राव जास्ती झाल्याने पुन्हा एकदा ते बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा दोन पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना घेरलं होतं. बंदुकीच्या टोकावर त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करायला सांगितली. पण अश्या क्षणी सुद्धा त्यांनी अचानक एका दिशेने बघून जोरजोरात ओरडायला सुरूवात केली. जसं काही कोणीतरी मदतीला तिथे आलं आहे. त्या दोन्ही पाकिस्तानी सैनिकांची नजर एका क्षणासाठी तिकडे वळताच त्यांनी आपल्या खुकरीने त्या दोन्ही सैनिकांचा गळा चिरला होता आणि कोणताही आवाज न करता ते दोन्ही सैनिक तिकडेच मरण पावले. पण त्यांनी पाकिस्तानी सैनिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेल्या आवाजाने इतर पाकिस्तानी सैनिकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि ते त्यांच्यावर चाल करून आले.
गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर पुन्हा एकदा सुरू झाला. त्यातून स्वतःला बचावत ते कातळांचा आधार घेत लपून राहिले. अर्धा तास चारी बाजूने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला. गोळ्यांचा वर्षाव थांबल्यावर चार पाकिस्तानी सैनिक आपल्या ज्युनिअर कमांडर ऑफिसरसोबत त्यांच्या दिशेने आले. निसटण्याचा कोणताही मार्ग दिसत नसताना त्यांनी तिकडेच मरून पडल्याचं नाटक केलं. त्याचवेळी आपली खुकरी आपल्या अंगाखाली लपवली. जवळ आलेल्या त्या पाच सैनिकांना ते मेले आहेत असं वाटलं, पण एकाला शंका आल्याने त्याने पायाने त्यांना खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोळ्याचं पात लवते न लवते तोच "जय महाकाली आयो गोरखाली" असं आपल्या रेजिमेंटच्या ब्रिदवाक्याने हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या खुकरीने त्या पाच जणांना ढगात पाठवलं. काय होतंय कळायच्या आत त्यांनी पाच पाकिस्तानी सैनिकांचा अश्या बिकट परिस्थितीत खात्मा केला होता. पुन्हा एकदा गोळ्यांचा वर्षाव बाकीच्या उरलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांकडून त्यांच्यावर सुरू झाला. त्यांना चकवा देत लपत, छपत हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या रेजिमेंटच्या दिशेने म्हणजे उतारावर आपला प्रवास सुरू केला.
तब्बल दोन दिवस पोटात काही गेलं नव्हतं. रक्ताची संततधार अजूनही सुरू होती. अंगात ताप होता. बोचरी थंडी आणि चारी बाजूने होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावात शत्रूच्या नजरेपासून लपून राहणं अश्या न भूतो न भविष्यती अश्या परिस्थितीमध्ये मृत्यू कोणत्याही क्षणी वेध घेईल अशी शक्यता असताना मृत्यूला घाम फोडणारे ते गोरखा सैनिक होते. संपूर्ण रात्र त्या थंडीत त्यांनी झाडाझुडुपात स्वतःला लपवून घेतलं. पोटाची आग शमवण्यासाठी झाडाची पानं खाल्ली आणि त्याच स्थितीत पुन्हा एकदा बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगात त्राण नसतानाही त्यांनी उतारावरून आपल्या रेजिमेंटच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्याचवेळी त्यांना दोन पाकिस्तानी सैनिक दारुगोळा घेऊन गप्पा मारत वरच्या दिशेने येताना दिसले. स्वतःला चालायला येत नसताना, तीन दिवस उपाशी असणाऱ्या आणि रक्ताच्या थारोळ्यात आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या हवालदार ग्यान बहादूर तमंग यांच्या मनात तेव्हाही देशाचं रक्षण हे सर्वप्रथम होतं. त्यांना खरतर पाकिस्तानी सैनिकांपासून लपून राहता आलं असतं, पण तो दारुगोळा शत्रूच्या हातात पोहचला असता तर खूप मोठा अनर्थ घडला असता.
मृत्यूची टांगती तलवार असतानाही ते एका कातळाचा आडोसा घेऊन त्यांच्या जवळ येण्याची वाट बघत राहिले. जसे ते जवळ आले त्याच क्षणी त्यांनी "जय महाकाली आयो गोरखाली" असं म्हणत खुकरी हातात घेऊन त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्या आवाजातला तो जोश, साक्षात मृत्यूला घाबरवणारी नजर आणि त्यांचा आवेश यापुढे आपला निभाव लागणार नाही, याची क्षणात कल्पना आल्याने त्या दोन्ही पाकिस्तानी सैनिकांनी सर्व दारुगोळा तिकडेच टाकून तिकडून पोबारा केला. त्यांच्या त्या रौद्र रुपापुढ़े त्यांनी सपशेल शरणागती पत्कारली. हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपला पुढचा प्रवास असाच सुरू ठेवला आणि ते आपल्या साथीदारांना एल्डोर गावात मिळाले. पुढे १/११ गोरखा रायफल्सच्या सैनिकांनी हवालदार ग्यान बहादूर तमंग यांच्या रस्त्याचा शोध घेतल्यावर आपल्या खुकरीने ढगात पाठवलेल्या ७ सैनिकांचे मृतदेह भारतीय सैन्याला मिळाले. हवालदार ग्यान बहादूर तमंग यांनी आपल्या मिशनमध्ये १० पाकिस्तानी सैनिकांना ढगात पाठवण्याची कामगिरी केली.
साक्षात मृत्यू प्रत्येक क्षणी समोर असताना त्याला न घाबरता परतवून लावणाऱ्या या मृत्युंजय हवालदार ग्यान बहादूर तमंग यांना भारत सरकारने त्यांच्या पराक्रमासाठी सेना मेडल देऊन त्यांचा सन्मान केला. तब्बल तीन दिवस मानेतून वाहणारं रक्त, पोटात अन्न, पाणी नसताना नुसत्या खुकरीने समोर ए.के.४७ घेऊन गोळीबार करणाऱ्या शत्रूच्या ७ सैनिकांच्या नरड्याचा घोट घ्यायला काय जिगर लागत असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही. जेव्हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांनी ते विधान केलं त्यामागे या शूरवीर, पराक्रमी आणि मृत्युंजय अश्या गोरखा सैनिकांच्या पराक्रमाची त्यांना जाणीव होती. अश्या मृत्युंजय गोरखा सैनिक हवालदार ग्यान बहादूर तमंग यांना माझा कडक सॅल्यूट आणि साष्टांग नमस्कार.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment