Saturday 10 July 2021

क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©

 क्वीन ऑफ स्पोर्ट्स... विनीत वर्तक ©


विम्बल्डनच्या इतिहासात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या खेळाची जादू आजही कायम आहे. अगदी जॉन मेकॅन्रो, मार्टीना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, बोरीस बेकर, पीट सॅम्प्रास, रॉजर फेडरर, विल्यमस् बहिणी.... अशी न संपणारी एक यादी प्रत्येकाची असेल. याच यादीत काल एक नवीन नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे 'ऍश बार्टी'. २०२१ सालची विम्बल्डन स्पर्धा जिंकून तिने एक नवीन इतिहास लिहिला आहे. विम्बल्डनच्या इतिहासातील अनेक चित्तथरारक सामन्यांपैकी एक असा कालचा सामना झाला नसला, तरी ऍश बार्टीच्या यशाची किंमत कमी होत नाही. आज तिने जिंकलेल्या सामन्यापेक्षा चर्चा होते आहे ती तिच्या अचंबित करणाऱ्या प्रवासाची. नेहमीच्या रूढी आणि परंपरांना छेद देत तिने आपल्या यशाला गवसणी घातली आहे. वर उल्लेख केलेल्या अनेक खेळाडूंपेकी किंवा इतर खेळाडूंच्या करिअरचा विचार केला, तर असं कोणी नसेल ज्यांनी आपलं टेनिसचं करिअर अर्धवट सोडून त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या खेळात तितकंच यश संपादन केलं असेल. ते करतानाच पुन्हा टेनिसला सुरूवात करून, ज्या सेंटर कोर्टवर खेळणं प्रत्येक टेनिस खेळाडूचं स्वप्न असतं, तिकडे खेळणं आणि विम्बल्डन स्पर्धाही जिंकणं हे कोणाला आजवर शक्य झालेलं नाही. म्हणूनच ऍश बार्टीचं यश हे जास्ती उजळते आहे. 

कोणत्याही खेळाडूचं करिअर हे अनेक उतार चढावांनी बनलेलं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात यश-अपयशाचे अनेक क्षण येतात. त्या प्रत्येक क्षणांना तो खेळाडू कसं घेतो, त्यावर त्याची पुढची वाटचाल ठरलेली असते. ऍश बार्टीच्या २५ वर्षांच्या आयुष्यात तिने जेवढे उतार-चढाव बघितले आहेत, असे क्वचितच कोणत्या खेळाडूच्या वाट्याला आले असतील. ऍश बार्टीच्या प्रवासाची सुरूवात ती अवघी ४ वर्षांची असताना झाली. एप्रिल २००० मध्ये तिने जिम जॉयसेच्या हाताखाली टेनिस शिकायला सुरूवात केली. खरं तर अवघ्या ४ वर्षांच्या ऍशला शिकवण्याची जिमची इच्छा नव्हती. पण त्या लहान वयात तिचं 'हॅन्ड एन्ड आय कॉर्डीनेशन' बघून तो थक्क झाला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ऍश बार्टीने आपली चमक त्या लहान वयात दाखवायला सुरूवात केली होती. 

२०१० पर्यंत तिने प्रोफेशनल टेनिस खेळायला सुरूवात केली होती, पण तिचं जे कर्तृत्व होतं त्याला साजेशी कामगिरी तिच्याकडून होत नव्हती. जून २०११ ला मात्र ऍश बार्टीने वयाच्या १५ व्या वर्षी ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धा जिंकून संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. अचानक ऑस्ट्रेलियाच्या पटलावरून जागतिक पटलावर एका नवीन टेनिस खेळाडूचा उदय झाला होता. पण म्हणतात ना, की यश पचवता पण आलं पाहिजे. अवघ्या १८ व्या वर्षी ऍश बार्टीला आपल्या कडून वाढलेल्या अपेक्षांना सामोरं जाणं कठीण होऊ लागलं. तिने अचानक प्रोफेशनल टेनिसमधून ब्रेक घेण्याचं जाहीर केलं. तिच्या शब्दात, 

“I needed some time to refresh mentally more than anything. It became a bit of a slog for me and I wasn’t enjoying my tennis as much as I would have liked to."

"I went from not being known anywhere in the world to winning junior Wimbledon and six months later playing the Australian Open. I was a victim of my own success, really.”

२०१४ ते २०१६ ऍश बार्टी टेनिसच्या पटलावरून गायब झाली. आपल्या करीअर घडवण्याच्या सर्वोत्तम काळात ऍश बार्टीला अपेक्षांचं ओझं वाटायला लागलं. कदाचित आपण जो नैसर्गिक खेळ खेळतो आणि त्याची मजा घेतो ते सगळंच कुठेतरी हरवलेलं होतं. प्रवाहासोबत जाण्यापेक्षा तिने आपल्या मनाचा रस्ता स्वीकारला. सगळं बाजूला ठेऊन ती टेनिसपासून लांब गेली. पण खेळाडू हा खेळाडू असतो. तिने त्या काळात क्रिकेटचे धडे घ्यायला सुरूवात केली आणि चक्क ब्रिस्बेन हिट संघासोबत तिने प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरूवात केली. ९ सामन्यांत तिने या संघातर्फे क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकलं आणि ६८ धावा केल्या. हा काळ तिच्यासाठी खडतर असा होता. एकेकाळी हातात टेनिसची रॅकेट धरणारी ती आता क्रिकेटची बॅट हातात घेऊन टेनिसच्या बॉलचा नाही तर सिझन बॉलचा सामना करत होती. 

फेब्रुवारी २०१७ मध्ये तिने पुन्हा टेनिसमध्ये पुनरागमन केलं. त्याच वर्षी मलेशियन ओपन स्पर्धा जिंकून तिने जागतिक क्रमवारीत १७ व्या क्रमांकावर उडी घेतली. त्याचवेळी डबल्स मध्ये पहिल्या २० जोड्यांमध्ये आपला समावेश केला. यानंतर जून २०१९ मध्ये तिने मार्केटा वोन्डरौसोवाला ६-१, ६-३ असं हरवत रोलँड गॅरोसवर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून एक इतिहास रचला. वयाच्या २३ व्या वर्षी ४६ वर्षांनंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन महिला ठरली. यशाच्या शिखरावर असताना २०२० मध्ये कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला. पुन्हा एकदा ऍश बार्टीने टेनिस मधून ब्रेक घेतला आणि ती गोल्फ खेळायला लागली. त्यात तिने ब्रुक वॉटर गोल्फ क्लब वूमन चॅम्पीयनशिप जिंकली. गोल्फच्या जागतिक क्रमवारीत क्रमांक ५ आणि ७ वर असणाऱ्या प्रोफेशनल गोल्फ खेळाडूंना तिने ही स्पर्धा जिंकताना पराभूत केलं. तिकडेच तिची भेट आपला प्रियकर गॅरी किससीक याच्याशी झाली जो की प्रोफेशनल गोल्फ खेळाडू आहे. 

जानेवारी २०२१ मधे तिने पुन्हा प्रोफेशनल टेनिसमध्ये पुनरागमन केलं. दुखापतीमुळे तिला जून २०२१ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत माघार घ्यावी लागली. पण १० जुलै २०२१ ला ऍश बार्टीने इतिहास रचताना कॅरोलिना पिल्सकोवाला ६-३, ७-६, ६-३ असं हरवत आपलं एक स्वप्न पूर्ण केलं. तब्बल ४१ वर्षांनंतर एखाद्या  ऑस्ट्रेलियन खेळाडूने विम्बल्डनच्या त्या चषकावर आपलं नाव कोरलं. ऍश बार्टीने विम्बल्डन सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं, की मला विम्बल्डन जिंकायची आहे. अर्थात प्रत्येक खेळाडूच्या मनात तेच असतं, पण ऍश बार्टीने उघडपणे हे बोलून दाखवलं होतं. तिच्या मते, 

“If it doesn’t work out, it doesn’t work out. Yeah, she’s not afraid to try. If you get it wrong, you get it wrong. If you try and fail, that’s still OK.”

And if you succeed, it’s glorious.

ऍश बार्टीचा हा प्रवास मला व्यक्तिशः खूप काही शिकवून गेला आहे. आपली आवड आपण आपल्यासाठी जपणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. पुरस्कार, बक्षीस, मानसन्मान हे येत राहिल, पण सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला जे मनापासून आवडतं तेच करणं . लोकं काय म्हणतील हा मुद्दा ऍश बार्टीने मागे ठेवला. जे तिला आवडत गेलं ते ती करत गेली. प्रत्येक ठिकाणी तिने आपली छाप सोडली आहे. टेनिस, क्रिकेट किंवा गोल्फ प्रत्येक ठिकाणी तिने सर्वोत्तम दिलं. कदाचित २०१४ साली तिने तो ब्रेक घेतला नसता तर अपेक्षांच्या ओझ्याखाली तिचं करिअर संपुष्टात आलं असतं. आज तिने ज्या यशाला गवसणी घातली, त्याचं रहस्य तिच्या त्या विचारांमध्ये आहे. काल संपूर्ण सामना बघताना कॉमेंटेटरपासून ते दर्शकांपर्यंत फक्त कॅरोलिनाचं नाव होतं. ऍश बार्टी मात्र शांतपणे आपला खेळ खेळत होती. एखादा पॉईंट जिंकला अथवा गमावला तरी तिच्या चेहऱ्यावर ना उन्माद होता ना निराशा. ती फक्त खेळत होती. अगदी दुसरा सेट टायब्रेकरमध्ये गमावल्यानंतरही पुढचे दोन्ही गेम तिने अगदी शांतपणे जिंकले. तिकडेच मला वाटते तो सामना ऍश बार्टीच्या बाजूने फिरला. 

टेनिस, क्रिकेट आणि गोल्फ अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळात आपली छाप सोडणाऱ्या ऍश बार्टीला 'क्वीन ऑफ स्पोर्ट्स' असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तिच्या विम्बल्डन यशासाठी तिचं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या अश्याच अनेक उत्तुंग शिखरांना पादाक्रांत करण्यासाठी शुभेच्छा. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment