Monday 12 July 2021

जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक ©

जंटलमन प्रेक्षक आणि पूर्वग्रह मिडिया... विनीत वर्तक 


जगाला जंटलमन गेम देणाऱ्या इंग्रजांच्या देशात दोन दिवसांपूर्वी झालेल्या युरो कप फायनलच्या दरम्यान झालेल्या प्रेक्षकांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. ते व्हिडीओ बघताना प्रक्षकांनी खेळाला युद्धाचं मैदान आणि आपल्या आत धुमसत असलेल्या वर्णद्वेष, असंतोषाला वाचा फोडण्याचं एक हक्काचं व्यासपीठ बनवल्याची जाणीव होते आहे. फूटबॉल, क्रिकेटसारख्या सांघिक खेळांत देशभावना तीव्र असतात हे आधीपण अनेकदा दिसून आलं आहे. पण ज्या पद्धतीने त्याला जागतिक पटलावर मांडण्यात येतं ते कुठेतरी आपण समजून घेण्याची गरज आहे. भारतात क्रिकेटमधील तीव्र भावनांना भारताच्या लोकांचा बेशिस्तपणा, तिथल्या लोकांची हुल्लडबाजी आणि सरकारची निष्क्रीयता असा मुलामा दिला जातो. तर इंग्रजांच्या देशात याला देशभावना आणि स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्या कोणीतरी केलेल्या वर्णद्वेषाचा संबंध दाखवला जातो. स्वतःला जागतिक दर्जाचे पत्रकार म्हणवणाऱ्या अश्या अनेक मिडिया हाऊ चा असं चित्र उभं करण्यात खूप मोठा हात असतो. 

१९९६ च्या विल्स वर्ल्ड कप मधील भारत-श्रीलंका संघांदरम्यान उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना भारतीय प्रेक्षकांनी भारताच्या निराश कामगिरीमुळे चिडून स्टेडियममध्ये आग लावणे, नासधूस करणे तसेच खेळात व्यत्यय आणला होता. शेवटी हा सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला. आजही त्याच्या चर्चा आणि त्याचे अनेक व्हिडीओ आपल्याला बघायला मिळतील. त्यावर आजही परदेशातील मिडिया हाऊस रकाने भरून चर्चा करतील. पण स्वतःच्या घरात काल-परवा झालेल्या हिंसाचाराची एक घटना किंवा बातमीसुद्धा आपल्या पेजवर येऊ देणार नाहीत. बातमी नाईलाजाने टाकावीच लागली तर तिला वर्णद्वेषाचा रंग देऊन नागरिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करण्याचा डावही सुंदर खेळला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवरून भारताच्या काही धार्मिक कार्यक्रमांवर आक्रोश करणारे हे मिडिया हाऊस आणि त्यांचे खंदे समर्थक युरो कपसाठी स्टेडियममध्ये कोरोना काळातील सर्व नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या गर्दीचं समर्थन करण्यासाठी लसीकरण झाल्याचं तत्वज्ञान पाजळतात. बरं हेच लोक सांगत असतात की, जगातील कोणतीही लस कोरोनाचं संक्रमण रोखू शकत नाही. फक्त लसीमुळे कोरोना झाल्यावर होणारा त्याचा त्रास कमी होऊ शकतो.  

'आपलं ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं ते वाकून' अशी वृत्ती ठेवून आजवर हे लोक भांडवल करत आलेले आहेत. युरोकप फुटबॉलच्या वेळचे प्रेक्षकांच्या प्रक्षोभक प्रतिक्रिया बघितल्या तर भारतातील प्रेक्षक त्यामानाने खूपच संयमित किंवा जंटलमन म्हणता येतील. कारण निदान दुसऱ्याला लाथा बुक्यांनी एकमेकांना रक्तबंबाळ केल्याची उदाहरणं युरोप किंवा इतर देशांच्या तुलनेत भारतात क्वचितच असतील. भारतीय एकवेळ आपल्या खेळाडूंना शिव्या आणि घाण शब्द बोलतील किंवा आपल्या घरचा टी.व्ही. फोडतील पण दुसऱ्यांना रक्तबंबाळ करून आपला राग व्यक्त करण्याची पद्धत तितकी तरी भारतात माझ्या बघण्यात नक्कीच नाही. पण हीच गोष्ट ज्या पद्धतीने मिडिया हाऊसकडून मांडली जाते, त्यावर प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. 

याच इंग्रजांच्या देशात त्याचवेळी विम्बल्डन स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेच्या दरम्यान असलेल्या प्रेक्षकांकडून किंवा त्या स्पर्धेच्या इतिहासातून आपण खूप काही शिकण्यासारखे आहे. जेव्हा खेळाडू सर्विस करायला सुरूवात करतात, मग ते कोणत्याही देशाचे असोत, तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षकात 'पिन ड्रॉप सायलेन्स' हा असतो, कोणावरही जबरदस्ती न करता आपसूक हा नियम पाळला जातो. कोणताही खेळाडू हरतो अथवा जिंकतो त्याचा त्याने केलेल्या खेळासाठी योग्य सन्मान ठेवला जातो. त्यामुळेच अश्या वेळी हार -जीत ही फक्त औपचारीकता राहते आणि जिंकतो तो खेळ! कदाचित भारतीयांना हे गुण शिकण्याची खूप गरज आहे असे मला मनापासून वाटते. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या युरो कप स्पर्धेत इंग्लंड स्पर्धा हरली पण फुटबॉल एक खेळ म्हणून, आणि इंग्लंडचे लोक एक प्रेक्षक म्हणूनपण हरले. अर्थात ब्रिटिश मिडियाला हा दिव्याखालचा अंधार नक्कीच दिसणार नाही. कारण त्यांचं लक्ष जगात पुढे जाणाऱ्या भारतीयांना कश्या पद्धतीने खाली दाखवलं जाईल याकडेच जास्ती असते. पण एक गोष्ट त्याचवेळी ही मान्य करावी लागेल, की विम्बल्डनसारख्या स्पर्धांनी टेनिस एक खेळ म्हणून नक्कीच जिंकतो. भारतीयांनीसुद्धा क्रिकेटच्या बाबतीत एक सुजाण प्रेक्षक बनण्याची गरज आहे. किंबहुना क्रिकेटपेक्षा इतर खेळांमधूनपण देशाचा तिरंगा उंचावला जातो, ह्याचं भान ठेवलं पाहिजे. जगातील सगळ्यात मोठ्या आणि प्रतिष्ठित अश्या ऑलम्पिक स्पर्धा येत्या काही आठवड्यांत सुरू होत आहेत. अर्थात तिथेही हा बायस मिडिया चांगल्या गोष्टी बाजूला ठेवून भारतीय कसे अपयशी ठरतात, ह्यावर अनेक चर्चा घडवून आणेल. पण जर भारतीयांनी क्रिकेट सोडून आपल्या इतर खेळाडूंना पाठिंबा दिला नाही, तर हेच होणं अपेक्षित असेल. तेव्हा भारतीयांनी कुठेतरी आता जंटलमन प्रेक्षक होण्याची गरज आहे, जे यश अथवा अपयश त्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारतील आणि आपल्या देशाच्या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहतील. 

फोटो स्त्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment