एक आशेचा किरण... विनीत वर्तक ©
कोरोनाची दुसरी लाट आता थोडी ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. भारत सोडून भारताच्या साऊथ ईस्ट एशिया असणाऱ्या देशांमध्ये मात्र कोरोना ने हाहाकार माजवला आहे. सध्या अश्याच कठीण परिस्थिती मधे मी काम करत आहे. कोरोना चे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत आणि ते आधीच्या विषाणूपेक्षा जास्ती वेगाने प्रसार होण्यास कारणीभूत ठरत आहेत. एकूणच कोरोना विषाणू आणि त्याचा शरीरावर होणारा परीणाम, त्याला विरोध करण्यासाठी शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती, तसेच या सगळ्यात कोरोना लसी च मिळणारं पाठबळ या सर्वांचा अभ्यास सध्या जगात सुरु आहे. त्यातून काही निष्कर्ष पुढे आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या अभ्यासावरून जे निष्कर्ष पुढे आले आहेत त्यात आशेचा एक किरण दिसून येत आहे. तर काय आहे हा अभ्यास आणि त्याचे निष्कर्ष?
युनायटेड किंगडम मधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाची अस्रझेनेका ही लस कोरोना चे धोके कमी करण्यासाठी जगभरातील ८० पेक्षा देशात दिली जात आहे. भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच लसीची निर्मिती 'कोव्हीशील्ड' नावाने करत असून आजवर भारतातील ज्या ४० कोटी पेक्षा जास्त भारतीयांच लसीकरण झालं आहे. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा याच लसीचा आहे. तर यु.के. मधे जो अभ्यास या लसीवर सुरु आहे. त्यातून काही चांगले निष्कर्ष पुढे आलेले आहेत. या लसी घेतल्यानंतर आपल्या शरीरात अँटीबॉडी ची निर्मिती होते. याच अँटीबॉडी कोरोना विषाणू विरुद्ध शड्डू ठोकून त्याचा नायनाट करतात. पण या अँटीबॉडी काही विशिष्ठ काळ आपल्या शरीरात राहतात. त्याचसोबत ही लस शरीरात 'टी सेल्स' ची निर्मिती करण्यासाठी शरीराला प्रशिक्षण देतं राहते. संपूर्ण शरीरात या 'टी सेल्स' च जाळ निर्माण करून कोरोना पासून आपलं संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.
आपल्या शरीरात नक्की कश्या पद्धतीने कोरोना च्या विषाणू ला मारलं जाते त्यासाठी शरीराची कोणत्याही विषाणू च्या विरुद्ध लढण्याची प्रक्रिया सोप्या शब्दात समजून घ्यावी लागेल. कोणत्याही विषाणू, जिवाणू, अँटीजेन च आपल्या शरीरात आगमन झालं की आपल्या पांढऱ्या रक्त पेशीत असणारे 'बी सेल्स' हे काम करायला सुरवात करतात. हे बी सेल्स आपल्या हाडांच्या मधे म्हणजे बोन मॅरो मधे जन्माला येतात आणि तिथे त्यांची वाढ होते. हे बी सेल्स आणि वर सांगितलेले टी सेल्स मिळून प्लास्मा सेल बनवतात ज्या पुढे अँटीबॉडी बनवून विषाणूंचा खात्मा करतात. हे दोन्ही सेल्स आपल्या इम्यून सिस्टीम चा भाग आहेत जी अश्या विषाणू आणि जिवाणू सोबत लढा देऊन शरीराला निरोगी ठेवते. (ही प्रक्रिया तशी गुंतागुंतीची आहे. त्यामुळे त्यातील वैद्यकीय भाषेला सोपं करून सांगितलेलं आहे.). यातील टी सेल्स शरीरात जास्त काळ रहात नाहीत पण बी सेल्स मात्र शरीरात राहतात. पुन्हा समजा जर अश्या कोणत्याही विषाणू, जिवाणू च आक्रमण जर शरीरावर झालं तर शरीराच्या इम्यून सिस्टीम ला संदेश देऊन पुन्हा त्यांच्यावर आपल्या साथीदारांच्या म्हणजेच टी सेल्स च्या मदतीने हल्ला करतात.
एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड या ज्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की यांनी आपल्या शरीरात खूप काळ वास्तव्य करणाऱ्या फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल मधे प्रवेश केलेला आहे. हेच सेल टी सेल्स प्रमाणे काम करण्यास सक्षम आहेत. याचा असा निष्कर्ष निघतो की शरीरातले टी सेल जरी काही काळाने नष्ट झाले तरी लसीमुळे आपल्या शरीरात खूप काळ राहणारे फायब्रोब्लास्टिक रेटिक्युलर सेल हे टी सेल्स प्रमाणे कार्यरत राहतात. त्यामुळे एडेनोव्हायरस लसी घेतलेल्या लोकांना कदाचित आयुष्यभर कोरोना पासून लढण्याची शक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. अर्थात हा काही प्रयोगात समोर आलेला निष्कर्ष आहे. अजून यावर संशोधन किंवा या निष्कर्षाला वेगवेगळ्या पद्धतीने पडताळून बघणं हे संशोधन अजून सुरु आहे. पण तूर्तास समोर आलेला हा निष्कर्ष दिलासा देणारा आहे.
अजून याच विषयावर जो वेगवेगळा अभ्यास सुरु आहे त्यातून आलेले काही निष्कर्ष समाधान देणारे आहेत. अजून एक महत्वाचा निष्कर्ष जो समोर येतो आहे तो म्हणजे लसींच मिक्स एन्ड मॅच चा. एडेनोव्हायरस लसी म्हणजेच अस्रझेनेका / कोव्हीशील्ड आणि एम आर एन ए बेस वर असलेल्या फायझर आणि मोडेना लसींचे डोस जर मिक्स केले तर जास्ती चांगल्या पद्धतीने कोरोना विषाणू च्या विरुद्ध इम्युनिटी निर्माण होतं असल्याचं पुढे येत आहे. चार आठवड्यांच्या अंतराने या लसी दिलेल्या होत्या. तसेच आधी कोव्हीशील्ड आणि मग फायझर ची लस घेतल्यास सगळ्यात जास्ती इम्युनिटी निर्माण होतं असल्याचा निष्कर्ष ही या संशोधनातून पुढे आला आहे. दोन कोव्हीशील्ड लसींच्या डोसा पेक्षा अश्या पद्धतीने मिक्स-मॅच केल्यास कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यास आपलं शरीर अतिशय चांगल्या पद्धतीने तयार होत असल्याचं पुढे आलं आहे. या दोन्ही लसीमधील अंतर १२ आठवडे केल्यावर काय होते यावर पुढील संशोधन सुरु आहे. कोव्हीशील्ड लसीचा तिसरा बूस्टर डोस घेतल्यास तयार झालेल्या अँटीबॉडी अल्फा, बीटा आणि डेल्टा अश्या सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंना लढा देण्यास समर्थ असल्याचं ही या प्रयोगातून समोर आलं आहे.
हे सगळे निष्कर्ष कुठेतरी आशेचा किरण असले तरी कोणतीच लस कोरोना चा संसर्ग थांबवू शकत नाही. त्यामुळे 'ऑफेन्सिव्ह डिफेन्स' हेच आपलं मुख्य शस्त्र बनवण्याची गरज आहे. मास्क वापरणे, गर्दी ची ठिकाण शक्य होतील तितकी टाळणे तसेच इतर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणि न होण्यासाठी घ्यावा लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्याला कसोशीने पाळाव्या लागणार आहेत. तूर्तास आपल्यासोबत इतरांची काळजी आपल्या वागण्यातून घेणं हे सगळ्यांनी अंगिकारण्याची गरज आहे.
तळटीप:- वरील लिहलेल्या गोष्टी या प्रयोगातून समोर आलेल्या आहेत. त्या सर्वमान्य होण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे लसींच्या बाबतीत पुढे जाताना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे तसेच कोरोना टाळण्यासाठी मास्क, अंतर आणि हात वरचेवर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे.
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment