Saturday, 1 August 2020

गेमचेंजर... विनीत वर्तक ©

गेमचेंजर... विनीत वर्तक 

'गेमचेंजर' हा शब्द गेले अनेक दिवस सोशल मिडीया, राजकीय पटलावर आणि इतर सामान्य लोकांच्या आयुष्यात गाजतो आहे. भारतात नुकतीच उतरलेली राफेल लढाऊ विमान गेमचेंजर आहेत की नाहीत ह्यावरून अनेक तर्क- वितर्क वर्तवले जात आहेत. ज्यांना ह्या क्षेत्रातील किंबहुना राफेल च्या तंत्रज्ञानाविषयी किंवा एकूणच हवेतील लढाई विषयी काही कल्पना नाही. ते लोकं अगदी अश्या पद्धतीने बोलत आहेत की ते ह्या क्षेत्रातील जाणकार असावेत. भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांनी ज्याच्या पसंतीवर आपली मोहोर उमटवली, ज्याला अनेक रक्षा क्षेत्रातील जाणकारांनी सर्वोत्तम असं म्हंटल त्याला राजकीय कुरघोडी करण्यासाठी नाव ठेवण्यात आलं हे बघून ह्यावर थोडं लिहावसं वाटलं. कुठेतरी त्या सैनिकी अधिकाऱ्यांचा आणि ज्यांनी ह्या डील ला मूर्त स्वरूप दिलं त्यांचा अपमान वाटला. राफेल ची निवड का केली गेली? का भारतीय वायू दलाला ते गेमचेंजर वाटते? का चीन- पाकीस्तान च्या मनात धडकी भरली आहे? का आपण इतके प्रचंड पैसे अवघ्या ३६ विमानांसाठी मोजले? आणि का राफेल येणाऱ्या काळात भारताच्या हवाई हल्याचा कणा असणार आहे ह्याची माहिती सामान्य लोकांना असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा हे कळेल तेव्हाच राफेल गेमचेंजर आहे का नाही हे भारतातील कर भरणारा सामान्य नागरिक ठरवू शकेल ज्याच्या पैश्यातून हे विमान विकत घेतलं गेलं आहे. 

लढाऊ विमानाबद्दल ज्या सामान्य गोष्टी सांगण्यात येतात त्या बद्दल बरच काही लिहिलं गेलं आहे. राफेल चा वेग, त्याची वजन नेण्याची क्षमता आणि त्यावरील क्षेपणास्त्र पण ह्या गोष्टी एखाद्या लढाऊ विमानाला गेमचेंजर बनवत नाहीत. तर त्याला गेमचेंजर बनवण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे एकतर त्याची शत्रुविमानांच्या पासून बचाव करण्याची क्षमता आणि शत्रुला नमोहरण करण्याची त्याची शक्ती. ह्या दोन गोष्टीवर सगळा खेळ अवलंबून असतो. कारण कितीही वेग असला तरी शत्रूला आपलं अस्तित्व शेवटच्या क्षणापर्यंत न जाणवू देणं हाच खरा हुकमाचा एक्का आहे. ज्याला एक्स शो रूम किंमत म्हणतो ती राफेल ची जवळपास ६५० कोटी रुपये आहे. पण भारताने प्रत्येक राफेलसाठी साधारण १२०० कोटी रुपये मोजले आहेत. ह्यातील जवळपास ३०% रक्कम म्हणजे जवळपास ४०० कोटी रुपये फक्त राफेल वर असणाऱ्या एका सिस्टीमसाठी भारताने मोजले आहेत. ह्या सिस्टीम चं नावं आहे 'स्पेक्ट्रा सिस्टीम'. पण ह्याच सिस्टीममुळे राफेल हे गेमचेंजर बनलं आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

 स्पेक्ट्रा सिस्टीम असणारं राफेल जगातील एकमेव लढाऊ विमान आहे. ह्या सिस्टीम मध्ये असं काय आहे की भारताने ह्यासाठी इतके पैसे मोजले आहेत. स्पेक्ट्रा सिस्टीम नक्की काय करते तर सोप्या शब्दात सांगायचं तर शत्रुच्या रडार ला उल्लु बनवते. ह्या सिस्टीम मध्ये असणारे सेन्सर रडार च्या सिग्नल ला ओळखून त्या पद्धतीच्या विरुद्ध वेव्ह तयार करतात (एक्टीव्ह कॅन्सलेशन) आणि शत्रु च्या रडार ला पूर्णपणे गंडवून टाकतात. हे इतक्या सहजतेने ही सिस्टीम करते की काही काळ रडार वरून राफेल पूर्णपणे नाहीसे होते किंवा रडार वर त्याच चुकीचं ठिकाण दाखवलं जाते. जोवर शत्रुला आपण फसवलं गेलो आहेत हे लक्षात येईल तोवर राफेल शत्रुच्या ताब्यातुन पूर्णपणे निसटलेलं असते. कोणतीही वस्तु रडार वर दिसण्यासाठी एखाद्या गोष्टीच रडार क्रॉस सेक्शन महत्वाचं असते. राफेल च रडार क्रॉस सेक्शन ०.०५ ते ०. १ मीटर इतकं आहे. म्हणजे एखाद्या चिमणी एवढं. पाकीस्तान ज्या जे.एफ. १७ ब्लॉक ३ वर उड्या मारतो आहे त्याच रडार क्रॉस सेक्शन ५ मीटर आहे. म्हणजे एखाद्या कार एवढं. आता रडार वर चिमणीला ओळखणं सोप्प की एखाद्या ५ मीटर कार ला हे शेंबड मुलं पण सांगेल. समजा समोरासमोर जर ही विमान आली तर जे १७ च्या रडारवर राफेल दिसेपर्यंत राफेल च्या मेटॉर ने त्याचा वेध घेतलेला असेल किंवा त्याच्याकडे झेपावलेलं असेल. चीन च्या स्टेल्थ म्हणून जाहिरात केलेल्या जे २० ला सुखोई च्या रडार ने पकडलेलं होतं. आत्ताच चीन ने आपलं जे २० हे ४ थ्या पिढीतील आहे असं म्हणत स्वतः त्याला ५ पिढीतून ४ थ्या पिढीत आणलं आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की राफेल जे की ४.५ पिढीतील आहे ते जे २० पेक्षा सरस आणि भारतासाठी गेमचेंजर आहे. 

राफेलचा शत्रुपासून बचाव तर आपण बघितला आता शत्रुला नामोहरण करण्यात राफेल कुठे आहे ते बघूया. राफेल एका वेळी ८ लक्ष्यावर हल्ला करू शकते. इकडे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ह्याचा अर्थ काय तर समोरून शत्रूची ८ लढाऊ विमान एकदम आली तर राफेल एकाचवेळी ८ विमानांवर एकाच क्षणात क्षेपणास्त्र डागू शकते. आधी १ ल्या लक्ष्याला मारून मग दुसऱ्याकडे असं नाही तर एकाचवेळी ८ विमानांवर एकत्र हल्ला करण्याची राफेल ची क्षमता आहे. राफेल १०० किलोमीटर पेक्षा जास्त लांब असलेल्या लक्ष्यावर वार करू शकते. ह्याचा अर्थ काय तर राफेल च रडार १०० किलोमीटर परीघाच्या आधीच शत्रुच्या विमानांना आपल्या रडार मध्ये बघुन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ही विमान जर ७० किलोमीटर पर्यंत जवळ असतील तर राफेल च्या मेटॉर पासून वाचणं अशक्य आहे (नो एस्केप झोन). आता मज्जा अशी आहे की पाकीस्तान आणि चीन ह्यांच्याकडे सध्या असलेल्या कोणत्याही विमानाची क्षेपणास्त्र रेंज ही ७० किलोमीटर पेक्षा जास्त नाही. ज्याला रडार लॉक म्हंटल जाते. म्हणजे शत्रुच्या विमानांना राफेल ला लक्ष्य बनवण्यासाठी ७० किलोमीटर पर्यंत राफेल जवळ येणं गरजेचं आहे. जर का ७० किलोमीटर ते राफेल च्या जवळ आले तर त्यांचा गेम ओव्हर आहे. शत्रुच कोणतच लढाऊ विमान राफेल च्या जवळ येण्याचा मुर्खपणा करणार नाही. त्यांनी तसा केलाच तर त्यांचा खेळ खल्लास. चीन आणि पाकीस्तान ह्यामुळेच घाबरलेला आहे की राफेल चा पराभव करणं अशक्य आहे. आता राफेल गेमचेंजर आहे का नाही हे प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल. 

भारताने राफेल घेताना आपल्या प्रदेशाचा विचार केला त्यामुळे राफेल ची मागणी नोंदवताना त्यांनी ३६ विमानांन मध्ये जवळपास १३-१४ बदल केले आहेत ह्या बदलांसाठी भारताने जवळपास ३०० कोटी रुपये प्रत्येक विमानामागे मोजले आहेत. हे १३-१४ बदल कोणते तर त्यातले काही इकडे नमूद करतो. भारताची सिमा वाळवंटापासून हिमालया पर्यंत पसरलेली आहे. राफेल ५०-६० डिग्री सेल्सिअस पासून उणे -१०, -२० डिग्री सेल्सिअस मध्ये ही उड्डाण करू शकायला हवं ह्यासाठी त्याच्या इंजिनात आणि इतर कंट्रोल सिस्टीम मध्ये बदल केले गेले. ज्यामुळे राफेल आता लडाख पासून कच्छ च्या रणापर्यंत सगळीकडून भारताचं संरक्षण करण्यात सक्षम आहे. राफेल मधील यंत्रणा भारताच्या नाविक ह्या प्रणालीशी जोडली गेली आहे. इसरो ने सोडलेल्या ७ उपग्रहांशी राफेल नेहमी जोडलेलं राहील. नाविक प्रणाली राफेल ला २० मीटरपेक्षा कमी क्षेत्रात अचूकतेने भारताच्या कोणत्याही भूभागावर जोडलेलं ठेवेल. राफेल च्या रडार मध्ये डॉपलर रडार भारताने जोडलेलं आहे जे की बदलत्या हवामानाची इत्यंभूत माहिती वैमानिकाला देत राहील. भारताने स्वतःच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांना ही राफेल च्या भात्यात स्थान दिलं गेलं आहे. अस्त्र हे भारताचं मिसाईल बसवण्यासाठी राफेल मध्ये बदल केले गेले आहेत. ह्याशिवाय हेल्मेट माउंटेड डिसप्ले, राफेल च्या देखभालीसाठीच्या खर्चाचा ही ह्यात समावेश आहे. 

आता सर्वसामान्याना कळलं असेल की राफेल ची एक्स शो रूम किंमत आणि भारताने मोजलेली किंमत ह्यात तफावत का आहे. जर आपण एक्स शो रूम मधलं राफेल आणलं असतं तर ते कदाचित सुखोई ३० एम.के.आय. इतकच किंबहुना त्यापेक्षा कमी सरस राहिलं असतं.  काही लोकांनी ह्याच किमतीचं  राजकारण केलं. डसाल्ट ने ५८,००० कोटी रुपयाच्या करारामधील जवळपास ३०,००० कोटी रुपयांच काम भारताला दिलं आहे. ह्या ३०,००० कोटी रुपयांमधील ३% काम हे ज्यावरून रणकंदन झालं त्या रिलायंस ग्रुप ला दिलं आहे. मला त्या राजकारणात जायचं नाही. भारताने राफेल चं सगळ्यात टॉप क्लास मॉडेल घेऊन त्यात भारतीय यंत्रणा, भारताची सामरिक गरज ह्यांच्या गरजेनुसार त्यात बदल केले आहेत. ह्यामुळेच राफेल च्या शक्तीत कैक पट वाढ झाली आहे. जी शत्रु राष्ट्रांच्या डोळ्यात खुपते आहे. भारताचं राफेल गेमचेंजर पेक्षा ही गेमओव्हर करणारं आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येइलच. तोवर भारताच्या हवाई दलावर विश्वास ठेवणं आणि त्यांनी राफेल च्या खरेदीने आपल्या पैश्याला न्याय दिलेला आहे हे आपण समजून घ्यायला हवं. 

ता.क. :- ह्या पोस्ट चा उद्देश सामान्य लोकांना राफेल बद्दल माहिती देण्याचा आहे. ह्याचा कोणताही संबंध पक्षीय राजकारणाशी जोडू नये तसेच कोणतीही राजकीय कुरघोडी करण्याचा उद्देश ह्या पोस्ट चा नाही.  
  
फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 


No comments:

Post a Comment