Wednesday 26 August 2020

अज्ञात उडणारी वस्तू... विनीत वर्तक ©

 अज्ञात उडणारी वस्तू... विनीत वर्तक ©

मानवाच्या उत्क्रांतीपासूनच मानवाला आपल्यासारखं कोणी ह्या विश्वात आहे का? ह्याची उत्सुकता वाटत आलेली आहे. जसजसं तंत्रज्ञान आणि अवकाशाविषयी आपलं ज्ञान तो प्रगल्भ करत गेला तसतसं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत गेला. आजतागायत तरी आपल्यासारखं दुसरं कोणी ह्या विश्वाच्या पसाऱ्यात शोधण्यात यश आलेलं नाही. पण त्याचवेळी आत्ताच्या तंत्रज्ञानाची मजल ही विश्वाच्या आकारमानापुढे धुळीच्या कणाएवढी आहे ह्याची जाणीव ही त्याला झालेली आहे. अजून जरी उत्तर मिळालं नसलं तरी आपल्या सारखं कोणी ह्या विश्वाच्या पोकळीत असेल असं अनेक वैज्ञानिकांचे मत आहे. विश्वाच्या ह्या पोकळीत अनेकवेळा ह्याच परग्रहावरील लोकवस्तीच्या अत्याधुनिक विमान अथवा तबकड्या किंवा अज्ञात उडणाऱ्या वस्तू दिसल्याच्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे. अनेकवेळा हे दावे आणि त्यासाठी सादर केलेले पुरावे वैज्ञानिक चष्म्यातून चुकीचे ठरले असले तरी काही घटनांची गाठ सुटलेली नाही. विज्ञानाच्या चष्म्यातून काही घटनांना समाधानकारक उत्तर देता आलेली नाहीत. त्यामुळेच आजही अश्या गोष्टींच कुतूहल जनमानसात ते वैज्ञानिक ह्या दोघांमध्ये तितकच आहे. 

गेल्या आठवड्यात घडलेली अशीच एक घटना सध्या जगाच्या पटलावर खळबळ माजवत आहे. कारण ज्याने ती बघितली तो कोणी साधासुधा व्यक्ती नाही न त्याची शाहनिशा करणाऱ्या संस्था. ही घटना टिपणारा व्यक्ती एक अंतराळविर आहे. ह्या अंतराळवीराच नावं आहे इवान वॅग्नर. इवान हा रशियाचा अंतराळवीर असून सोयूझ एम एस -१६ ह्या मोहीमेद्वारा एप्रिल २०२० मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर दाखल झाला आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे पृथ्वीपासून ४०८ किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित करून स्थापन केलेलं आहे. अनेक देशांचे अंतराळवीर इकडे संशोधनासाठी जात असतात आणि वास्तव्यात असतात. इवान वॅग्नर ही आय.एस.एस. वर आपलं काम करत असताना त्याला अवकाशातून दिसणाऱ्या एका सुंदर घटनेला आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही. जेव्हा त्याने अवकाशातून दिसणाऱ्या अरोरा ऑस्ट्रेलीस ला आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं तेव्हा त्यासोबत एका वेगळ्या घटनेला आपण बंदिस्त करतो आहोत हे त्याच्या ध्यानीमनी नव्हतं. 

सूर्याकडून येणारे प्रभारीत कणांची पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी होणारी टक्कर जेव्हा प्रकाशाच्या रूपाने ध्रुवीय भागात दिसते तेव्हा तो एक नयनरम्य सोहळा असतो. हा सोहळा जेव्हा इवान वॅग्नर ने बंदिस्त करून बघितला तेव्हा त्यातील एका घटनेने त्याच लक्ष वेधलं. ह्या व्हिडीओ मध्ये साधारण ९ सेकंद ते १२ सेकंद ह्या काळात ५ यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) त्याला एका सरळ रेषेत दिसून आल्या. त्याने ह्याचा शोध घ्यायचा आपल्या परीने प्रयत्न केला पण त्याला ते कळलं नाही. त्याने अवकाशातून आपला हा व्हिडीओ ट्विट केला आणि पूर्ण जगाला हे नक्की काय आहे? असा प्रश्न विचारला. टाइम लॅप्समुळे प्रत्यक्षात ५२ सेकंद दिसणारे हे ५  यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) अवघ्या ३ सेकंद त्या व्हिडीओ मध्ये दिसतात आणि नंतर अरोरा ऑस्ट्रेलीस च मनोहरी दृश्य आपण ह्यामध्ये बघू शकतो. 

इवान ने ट्विट करताना वैज्ञानिकांना हे काय असू शकेल असा प्रश्न विचारला आहे? इवान आपल्या ट्विट मध्ये म्हणतो, 

The objects “appear flying alongside with the same distance, “What do you think those are? Meteors, satellites or … ?”

त्याच्या ह्या प्रश्नावर जगभरातील संशोधक, वैज्ञानिक ह्यांनी अभ्यास करायला सुरवात केली आहे पण अजूनपर्यंत उत्तर मिळालेल नाही. इवान चा हा व्हिडीओ त्याने रशियाची स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉस कडेही सुपूर्द केला आहे. 

“It is too early to make conclusions until our Roscosmos researchers and scientists at the Space Research Institute of the Russian Academy of Sciences tell us what they think. It was decided to hand over those materials to experts, who will tell us what that was in their opinion.”

सध्या ह्या गोष्टीवर जगातील वैज्ञानिक, खगोल संशोधक अभ्यास करत असून जर इवान ला नक्की काय दिसलं ह्याच गूढ नाही सोडवू शकले तर कदाचित पुन्हा एकदा उडत्या तबकड्या, यु.एफ.ओ. (अज्ञात उडणारी वस्तू) ह्यांच्याविषयी असलेल्या गूढतेमध्ये भर पडणार आहे. नासा ने तूर्तास ह्यावर मौन बाळगलं आहे. पण ही गोष्ट पेंटॉगॉन आणि नासा च्या रडारवर असणार हे नक्की आहे. 

इवान चा हा व्हिडीओ यु ट्यूब वर उपलब्ध आहे. बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

https://www.youtube.com/watch?v=bXjikQaMjc8   

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment