Monday 24 August 2020

खारे वारे मतलई वारे ( भाग २ ) ... विनीत वर्तक ©

 खारे वारे मतलई वारे ( भाग २ ) ... विनीत वर्तक ©

भारत ज्या गतीने आर्थिक, लष्करी सामर्थ्य ह्यामध्ये प्रगती करत होता त्याच वेगाने पाकीस्तान चा प्रवास कर्जाच्या दरीत सुरु झाला. पाकीस्तानी जनतेला तिथल्या हुकूमशहांनी काश्मीर च गाजर दाखवून इतके वर्ष आपली अधोगती लपवली होती. पण कलम ३७० हटल्यावर पाकीस्तान चा काश्मीर प्रश्नावर पूर्णपणे हरला असल्याची भावना एकूणच तिथल्या जनतेत झाली. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची कोंडी करणं अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पाकीस्तान ने निदान ओ.आय.सी. च्या माध्यमातून भारतावर धर्मावर आधारीत विश्वास संपादन करण्याचा मनसुबा आखला. कारण तिथल्या जनतेला तोंड दाखवायला काश्मीर प्रश्नी काहीतरी करून दाखवणं हे सध्याच्या नेतृत्वाला गरजेचं होतं. कर्जाच्या खाईत डुबलेल्या पाकीस्तान ला आंतरराष्ट्रीय स्तरावर भिक मागण्यासाठी अतिरेकी आणि त्यांना घडवणाऱ्या संस्था ह्यावर कुठेतरी निदान अंकुश ठेवला आहे हे दाखवणं गरजेचं होतं तर त्याचवेळी भारताने ऑफेन्सिव्ह डिफेंस ही निती बाळगल्याने गोळीच उत्तर गोळ्यांनी भारत देणार हे स्पष्ट झालं होतं. 

सगळ्याच आघाड्यांवर पाकीस्तान एक एक करून माती खात होता आणि त्याचा शेवटचा आशेचा किरण ओ.आय.सी. हे होतं. पण सौदी अरेबिया ने त्याच्या ह्या मनसुब्यांवर पूर्णपणे पाणी फिरवलं. सौदी अरेबिया विरुद्ध समोरून काही करता येतं नसल्याने पाकीस्तान ने सौदी विरुद्ध आखाती देशांना चिथवायला सुरवात केली. सौदी नाही तर मुस्लिम धर्माच्या विरुद्ध भारताने काश्मीर मध्ये केलेल्या कारवाई चा निषेध आपण करायला हवा असं त्याच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वक्तव्य करायला सुरवात केली. पण सौदीने पाकीस्तान चा आवाज ऐकून न ऐकल्यासारखा केला. ह्या सगळ्या गोष्टी सौदी अरेबिया च्या तत्कालीन नेतृत्वाला अजिबात पसंद पडल्या नव्हत्या. असंतोषाची धग दोन्हीकडे जाणवत होती. अवकाश होता तो एका ठिणगीचा. जुलै महीन्यात पाकीस्तान च्या परराष्ट्र मंत्र्यांनी एका टी.व्ही. वहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा तोच राग आवळला. ह्या नंतर सौदी अरेबिया ने आपला संयम तोडला. सतत एकच विषय सगळीकडे बोलला की त्याने समोरच्यावर दबाव निर्माण होतो हा काश्मीर प्रश्नी आलेला अनुभव पाकीस्तान ला पुन्हा येईल असं वाटलं. पण समोर आता भारत नव्हता तर सौदी अरेबिया होता. 

सौदी अरेबिया च्या नेतृत्त्वाने तात्काळ पाकीस्तान ला कर्ज रूपाने दिलेली सगळी मदत रोखण्याची घोषणा केली. २०१८ मध्ये सौदी अरेबियाने पाकीस्तान ला ६.२ बिलियन अमेरीकन डॉलर ची मदत जाहीर केली होती. त्यात ३ बिलियन अमेरीकन डॉलर स्वस्त दराने कर्ज तर उरलेल्या ३.२ बिलियन डॉलर च ऑईल आणि गॅस क्रेडिट त्यांनी दिलं होतं. (क्रेडिट म्हणजे ३.२ बिलियन अमेरीकन डॉलर च तेल आणि गॅस पाकीस्तान उधारीवर खरेदी करू शकतो. कोणतही व्याज न देता.) सौदी ने करार रद्द तर केलाच पण आपले सर्व पैसे आणि उधारी आत्ताच्या आत्ता चुकवण्याचा आदेश पाकीस्तान ला दिला. असं काही होईल ह्याची जाणीव पाकीस्तान ला होई पर्यंत खुप उशीर झाला होता. सौदीने पाकीस्तान ची जागा एका झटक्यात त्याला दाखवली होती. आधीच नाकापर्यंत कर्जात डुबलेल्या भिकारड्या पाकीस्तान ला जगात कर्ज द्यायला कोणी उभं करत नव्हतं. शेवटी चीन कडून चढ्या भावाने १ बिलियन डॉलर च कर्ज मिळालं. पण त्यासाठी लागणार व्याज ही चीन वसूल करणार हे ओघाने आलं. 

१ बिलियन तर दिले. पुढले २ बिलियन अमेरीकन डॉलर आणायचे कुठून हा प्रश्न आ वासून समोर उभा आहे. पाकीस्तान ची आर्थिक स्थिती सध्या अतिशय नाजूक आहे. पाकीस्तान कडे फक्त १२.५ बिलियन अमेरिकन परकीय गंगाजळी आहे. (भारताकडे त्याच तुलनेत जवळपास ५३८ बिलियन अमेरिकन डॉलर ची परकीय गंगाजळी आहे.) ह्या पैश्यात पाकीस्तान सरकार फक्त ३ महिने देश चालवू शकते. (आयात आणण्यासाठी लागणारे पैसे). त्यात सौदी अरेबिया आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी पाकीस्तान वर दबाव टाकत आहे. सौदीच्या रागाला शांत करण्यासाठी पाकीस्तान आर्मी चे प्रमुख जनरल बजवा आणि आय.एस.आय. चे प्रमुख तातडीने सौदी नेतृत्वाची समजूत काढायला गेले. पण सौदी च्या नेतृत्त्वाने त्यांना भेट नाकारत आता फक्त उरलेले पैसे परत द्या असं स्पष्टपणे बजावलं. ह्या शिवाय ३.२ बिलियन डॉलर च उधारीच खात ही बंद झाल्याचं निक्षून सांगितलं. आधीच भिकारी बनलेल्या पाकीस्तान ची अवस्था आता न घर का न घाट का अशी झाली आहे. बेजबाबदारपणे वक्तव्य केल्यामुळे पाकीस्तान वर आज ही वेळ आली आहे. 

एकाकी पडलेल्या लाचार पाकीस्तान चा फायदा घेणार नाही तो कसला चीन. चीन ने त्वरित १ बिलियन अमेरीकन डॉलर च कर्ज पाकीस्तान ला देऊन आपण मित्र असल्याचं दाखवलं पण हे कर्ज चढ्या भावाने दिलं हे मात्र लपवलं. पाकीस्तान ज्या वेगाने चीन च्या जाळ्यात अडकत जातो आहे ते भारतासाठी धोक्याची घंटा निश्चित आहे. पाकीस्तान आपलं कर्ज फेडू शकणार नाही हे चीन ला पक्के ठाऊक आहे. ह्या पैश्याच्या मोबदल्यात चीन पाकीस्तान च्या सार्वभौमत्वावर आपलं वर्चस्व स्थापन करत आहे. एकदा की पाकीस्तान ची आर्थिक नाडी त्याच्या हातात आली की चीन पाकीस्तान चा वापर भारताविरुद्ध हवा तसा करणार आहे. म्हणजे लढणार भारत आणि पाकीस्तान पण जिंकणार चीन. कारण दोघांच ह्यात नुकसान होणार आणि चीन आपलं सैन्य सहभागी न करता युद्ध जिंकणार. चीन स्वतः ज्या पद्धतीने मुस्लिम धर्मावर अत्याचार करत आहे त्या बद्दल पाकीस्तान मुग गिळून गप्प आहे. जवळपास ३ मिलियन उयघूर्स आणि तुर्की मुसलमान लोकांवर अत्याचार केले आहेत. हे अत्याचार नाझी कॅम्प पेक्षा भयंकर आहेत. पण ह्यावर न पाकीस्तान काही बोलत आहे न मुस्लिम धर्माचा आव आणणारी राष्ट्र. 

भारताच्या दृष्टीने पाकीस्तान चा जो काही ऱ्हास चालू आहे तो चांगला नाही. चीन ज्या पद्धतीने हिमालय, पाकव्याप्त काश्मीर ह्यावर सीपेक च्या मदतीने कब्जा करत आहे. ते भारतासाठी चांगल नाही. कोणी म्हणेल की पाकव्याप्त काश्मीरवर भारताने हमला करून तो आपला ताब्यात घ्यावा पण ते तितकं सोप्प नाही. पाकीस्तान ची सेना भारतीय सैन्याला मात देऊ शकत नाही हे पाकीस्तान ला ही चांगल माहिती आहे. प्रश्न आहे तो माकडाच्या हातात कोलीत असण्याचा. २-३ दिवसांपूर्वी पाकीस्तान च्या एका मंत्र्यांनी दिलेले विधान ह्याच सुचक आहे. आपण भले पाकव्याप्त काश्मीर घेऊ पण त्या नादात पाकीस्तान अणुबॉम्ब टाकण्याचा मुर्खपणा करू शकतो. अर्थात भारत त्याला उत्तर देईल आणि पाकीस्तान चा नकाशा पुसला जाईल हे खरं असलं तरी त्या सोबत भारताला मोजावी लागणारी किंमत प्रचंड मोठी असू शकते. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर घ्यायचा असेल तर जागतिक मंचावर पाकीस्तान ला एकटं पाडून किंवा तिकडे असणाऱ्या बलोच लोकांना मदत करून भारत पाकीस्तान चे तुकडे करून ह्या भागावर आपला हक्क प्रस्थपित करू शकतो. अर्थात ह्या सगळ्या जर तर च्या शक्यता आहेत. ज्या पद्धतीने जागतिक वारे बदलत आहेत ते बघता पाकीस्तान वेगाने विनाशाकडे जात आहे. प्रश्न इतकाच आहे की ह्या सगळ्यात भारत आपलं कमीत कमी नुकसान कसं होईल ह्याच्या उपाययोजना करू शकतो. 

क्रमशः

पुढल्या लेखात इस्राईल- यु.ए.इ. राजनैतिक संबंध, साऊथ चायना सी मधील बदलणाऱ्या घडामोडी आणि इतर. 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 

No comments:

Post a Comment