Thursday 27 August 2020

हवेतील डोळे... विनीत वर्तक ©

 हवेतील डोळे... विनीत वर्तक ©

भारत आणि चीन ह्या दोन्ही देशांमध्ये ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमांना सुरक्षित करण्याची गरज भारताला जास्ती वाटू लागली आहे. आपल्या देशांच्या सीमांना सुरक्षित ठेवायचं असेल तर शत्रुच्या हालचालींची माहिती आधी असायला हवी आणि त्याचसोबत त्याला प्रतिकार करण्याची आपली तयारी पण असायला हवी. अश्या दोन्ही बाजूवर भारताने आपल्या सेनेला सुरक्षित, आधुनिक करण्यासाठी काही पावलं उचलली आहेत. राफेल करार हा त्याचाच एक भाग आहे. त्याचसोबत भारताने शत्रुच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी इस्राईल तंत्रज्ञानाने बनवलेली जगातील सगळ्यात अत्याधुनिक आणि सर्वश्रेष्ठ असलेली Airborne Warning and Control System (AWACS) घेण्याच्या कराराला नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे. १ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड किंमत असलेली ही सिस्टीम आहे तरी काय? भारताकडे अशी सिस्टीम आल्यावर त्याने देशाच्या सामरिक शक्ती मध्ये कशी वाढ होणार आहे हे आपल्याला समजायला हवं. 

Airborne Warning and Control System (AWACS) म्हणजे हवेतील डोळे. शत्रूच्या कोणत्याही हालचालीचा अंदाज येण्यासाठी आपल्याकडे अतिशय उच्च क्षमतेचं रडार असणं गरजेचं आहे. शत्रूची लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र ह्याचा अंदाज जर आपल्याला वेळेत आला तर त्याला निष्प्रभ करण्यासाठी आपण आपल्या बचाव करणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करू शकतो. जमीनीवर असणाऱ्या रडार तंत्रज्ञानावर काही मर्यादा येतात. एक तर जमिनीवर ज्या ठिकाणी रडार सिस्टीम असेल त्याच्या काही अंतराचा भाग त्याच्या कक्षेत येतो. जमीनीवर असणारे रडार हे कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानांना अथवा क्षेपणास्त्र ह्यांना पटकन ओळखू शकत नाहीत. त्यांच्या अंतराच्या मर्यादेमुळे सिमारेषेजवळ ह्यांना ठेवावं लागते. जात शत्रूला ह्यांचा ठावठिकाणा लागला तर शत्रू ह्याच्यापासून लपून अथवा ह्याला टार्गेट करून हल्ला करू शकतो. अतीतटीच्या लढाईत आपण शत्रूला कुठून शोधत आहोत अथवा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहोत हे कळू न देणं युद्धाचं पारडं फिरवू शकते. आपल्याकडे कितीही शक्तिशाली लढाऊ विमान आणि क्षेपणास्त्र असली तरी त्यांच कमांड आणि कंट्रोल त्यांना घातक करत असते. ह्या सर्व गोष्टीमुळे जमिनीवरील रडार यंत्रणेवर खूप मर्यादा येतात. 

आता समजा आपल्याकडे अशी काही यंत्रणा आहे की हवेतून आपल्याला हव्या त्या ठिकाणी लक्ष ठेवता येईल आणि त्याचवेळी आपण सतत हवेत फिरत असल्याने शत्रुला आपण नक्की कुठून लक्ष ठेवतो आहे हे लक्षात न आल्याने हल्ला करण्याचा निर्णय ही घेता येणार नाही. जरी तसा निर्णय घेतला तरी आपल्या रडार वर त्याच्या हालचाली दिसल्यावर त्याचा हल्ला निष्प्रभ करण्याच्या अनेक योजना ह्याच सिस्टीम मधून लगेच कार्यान्वित केल्या जाऊ शकतील. अश्याच यंत्रणेला Airborne Warning and Control System (AWACS) म्हणजे हवेतील डोळे असं म्हणतात. भारत जी यंत्रणा इस्राईल कडून विकत घेणार आहे तिला फाल्कन किंवा EL/W-2090 (AWACS) असं म्हणतात. ह्याची निर्मिती इस्राईल आणि एलटा ह्या इस्राईल कंपनीने केली आहे. ह्या सिस्टीम ला फेडरेशन ऑफ अमेरीकन सायंटिस्ट ने सर्वोत्तम अशी मान्यता दिली आहे. ह्या सिस्टीम मध्ये  active electronically scanned array (AESA) आणि  phased array रडार सिस्टीम आहे. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर ही सिस्टीम आपलं रडार प्रत्यक्ष न फिरवता कॉम्प्युटर च्या साह्याने रडार च्या सिग्नल ३६० अंश कोनात प्रक्षेपित आणि त्याच ग्रहण करू शकते. तसेच वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी मध्ये आपला संदेश ग्रहण अथवा पाठवू शकते. हे सिग्नल शत्रूच्या रडार यंत्रणेला पकडणं अथवा त्यातील माहिती शोधणं हे खूप कठीण असते. त्यामुळेच ही यंत्रणा एखाद्या स्टेल्थ प्रमाणे रडारवर अदृश्य राहून काम करू शकते. 

फाल्कन सिस्टीम रशियाने बनवलेल्या Ilyushin Il-76 ह्या विमानावर बसवण्यात येते. हे विमान अतिशय शक्तिशाली असून ह्याच नाव जगात प्रसिद्ध आहे. जवळपास ५००० किलोमीटर पेक्षा जास्त अंतर ४० टन वजनापेक्षा जास्त वजन घेऊन हे कापू शकते ते ही जवळपास ४०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून आणि ते ही ६ तासापेक्षा कमी वेळात. काश्मीर ते कन्याकुमारी हे भारताच्या दोन टोकाचं अंतर ३६०० किलोमीटर च्या आसपास आहे. म्हणजे हे विमान ४ तासापेक्षा कमी वेळात संपूर्ण भारताच्या हवाई क्षेत्रावर नजर मारू शकते. तब्बल ४०० किलोमीटर च्या परिघातील प्रदेशावर ४०,००० फुटापेक्षा जास्त उंचीवरून ही ह्याच्या नजरेतून कोणतच विमान, क्षेपणास्त्र, शत्रूचा तळ सुटत नाही. तिकडे घडणाऱ्या सर्व गोष्टींवर नजर ठेवून गरज वाटल्यास भारताच्या क्षेपणास्त्र, लढाऊ विमान ह्यांना त्याच उंचीवरून प्रतिहल्ल्यासाठी संदेश देऊ शकते अथवा डागू शकते. फाल्कन सिस्टीम हवेत असेल तर संपूर्ण 'साऊथ ब्लॉक' सारखं कमांड आणि कंट्रोल सिस्टीम आपण हवेत सुरु केल्यासारखं आहे. जिकडून आपण सर्व यंत्रणा, युद्धजन्य परिस्थितीत शत्रूला आपलं अस्तित्व न दाखवता संपूर्ण युद्धाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवू शकते. 

उरी चित्रपटात अशीच  (AWACS) यंत्रणा पाकिस्तान ने कार्यान्वित केल्यामुळे सैनिकांना गुहेतून पाकव्याप्त काश्मीर मध्ये प्रवेश केला असं दाखवण्यात आलं होतं. पाकीस्तान आणि चीन ह्या यंत्रणेच्या बाबतीत खेदाने भारताच्या पुढे आहेत. पाकीस्तान कडे अश्या ८-१० यंत्रणा आहेत तर चीन कडे हाच आकडा ३० च्या आसपास आहे. भारताकडे मात्र सद्यस्थितीला फक्त ३ यंत्रणा आहेत. गेल्या काही वर्षातील राजकीय निष्क्रियतेमुळे अश्या यंत्रणा खरेदी करण्याचे करार खूप लांबणीवर पडले होते. अतिशय प्रगत असणारी ही यंत्रणा प्रचंड खर्चिक आहे ह्यात वाद नाही पण त्याचा उपयोग आणि त्याची गरज भारताला कधी नव्हे तितकी आता भारत- चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जाणवत आहे. गेले कित्येक वर्ष अडकलेल्या ह्या १ बिलियन अमेरीकन डॉलर खर्चाच्या यंत्रणेला आता हिरवा कंदील मिळाला असून येत्या ३ वर्षात अजून असे दोन हवेतील डोळे ( फाल्कन Airborne Warning and Control System (AWACS) भारताच्या सेवेत समाविष्ट होतील.      

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 


     

No comments:

Post a Comment