Monday, 10 August 2020

लढाऊ विमानांच्या पिढ्या... विनीत वर्तक ©

 लढाऊ विमानांच्या  पिढ्या... विनीत वर्तक ©


भारताने राफेल ही लढाऊ विमान खरेदी केल्यानंतर अनेक प्रश्नांचा धुराळा उडाला होता. त्यातील एक प्रश्न म्हणजे लढाऊ विमानांच्या पिढ्या. चीन कडे ५ व्या पिढीतील जे २० सारखं विमान आहे मग ४.५ पिढीतील राफेल कसं काय टक्कर देऊ शकेल? मुळात सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे की लढाऊ विमानांच्या पिढ्या म्हणजे काय? एखाद विमान कोणत्या पिढीतील आहे कसं ठरवतात? भारताकडे असलेली लढाऊ विमानं कोणत्या पिढीत येतात. तर ह्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न इकडे करणार आहे. लढाऊ विमानांची पिढी ही ते विमान बनवण्यात वापरलेलं तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र, विमान विज्ञान ( एव्हीओनिक्स) ह्यावर अवलंबून आहे. ह्याशिवाय एखाद्या पिढीतून नवीन पिढी कधी सुरु होते तर एखादं नवीन तंत्रज्ञान जेव्हा आधीच्या पिढीतील विमानात बदल किंवा त्यांच्या श्रेणीत सुधार जेव्हा शक्य होतं नाही तेव्हा एक नवीन पिढी सुरु होते. सध्याच्या काळात लढाऊ विमानांच्या ५ पिढ्या अस्तित्वात आहेत. 


१ ली पिढी (१९४०-१९५०) :- ह्या श्रेणीतील विमानात अतिशय साधारण दर्जाचं विमान विज्ञान वापरलं गेलं होतं. ह्या पिढीतील विमानात रडार नव्हतं. तसेच ह्या पिढीतील विमानात मशीन गन, सर्वसाधारण बॉम्ब बसवलेले होते. ह्या पिढीतील काही विमान म्हणजे एफ-८६, मिग-१५, मिग-१६. 


२ री पिढी (१९५०-१९६०) :- ह्या पिढीतील विमानात रडारचा वापर सुरु झाला. तसेच इन्फ्रारेड आणि सेमी गायडेड मिसाईल चा वापर ह्यात केला गेला. ह्या पिढीतील विमानांच्या तंत्रज्ञानात बदलांमुळे ह्या विमानांना सुपर सॉनिक वेग गाठणे शक्य झालं. ह्या पिढीतील विमान म्हणजे एफ-१०४, एफ-५, मिग-१४ आणि भारताकडे अजून वापरात असलेलं मिग-२१. (भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष न दिल्याने भारताला अजूनही ह्या पिढीतील विमान वापरावी लागत आहेत. ) 


३ री पिढी (१९६०-१९७०) :- ह्या पिढीतील विमानात सगळ्यात मोठा बदल म्हणजे शत्रूच्या विमानांना शोधण्याची जबाबदारी आता एकट्या पायलट ची राहिली नव्हती तर  रडार आणि विमान विज्ञान इतकं प्रगत झालं होतं की शत्रूच्या विमानांना रडार च्या साह्याने पकडता येणं शक्य झालं. ह्या शिवाय ह्या पिढीतील विमान ही वेगवेगळ्या पद्धतीचे मिशन पूर्ण करण्यास सक्षम झाली ज्यांना मल्टिरोल फायटर असं म्हंटल जाते. ह्या पिढीतील विमान दिसण्यापलीकडे लक्ष्यभेद करण्यास सक्षम झाली. (beyond visual range). ह्या पिढीतील विमान म्हणजे मिग-२३, एफ ४, मिराज-३ 


४ थी पिढी (१९७०-१९८०) :- ह्या पिढीतील विमानात फ्लाय बाय वायर सिस्टीम चा वापर करण्यात आला.ह्याचा अर्थ काय तर ह्यात कॉम्प्युटर सिस्टीम चा वापर केला गेला. सेन्सर कडून येणारे संदेश कॉम्प्युटर ने अभ्यास करून विमान कंट्रोल करणं शक्य झाल. ह्या पिढीतील विमान हवेतून हवेत तर हवेतून जमिनीवर अश्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मिशनसाठी स्वतःमध्ये बदल करून घेण्यास सक्षम समजली जातात. ह्या श्रेणीतील विमान म्हणजे मिग-२९, सुखोई-२७, एफ-१५, एफ-१६, मिराज-२०००. 


४.५ पिढी (१९८०-१९९५) :- लढाऊ विमानांच्या निर्मितीत आणि त्यांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीत लागणाऱ्या पैश्यावर ह्या काळात अंकुश आल्याने दोन पिढ्यांच्या मधली लढाऊ विमान बनवण्याची मागणी जगभर होऊ लागली. त्यामुळेच ४ थ्या पिढीतील विमानांवर आधुनिक तंत्रज्ञान लावून ह्या पिढ़ीतील विमान निर्मिती केली जात आहे. भारताचं सुखोई एम.के.आय. ३० हे लढाऊ विमान ४++ पिढीतील गणलं जाते. ४.५ पिढीतील विमानात सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे Active Electronically Scanned Array (AESA) हे रडार काय करते तर ह्याची अँटेना न फिरवता हे रडार वेगवेगळ्या दिशेला रेडिओ व्हेव पाठवू शकते. हे रडार स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमानाला ओळखू शकते. तसेच ह्या प्रकारातील विमानांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून विमानाचं रडार सिग्नेचर ही कमी केलं आहे. ह्या पिढीतील विमान म्हणजे राफेल, युरोफायटर टायफून, ग्रीपेन 


५ पिढी (२००५ -सध्या) :- ह्या पिढीतील सगळ्यात मोठा फरक म्हणजे त्यांची रडार वरून अदृश्यता. स्टेल्थ तंत्रज्ञान. ह्याशिवाय ह्यातील वैमानिकाला विमान न फिरवता ही ३६० अंशात बघण्याचं तंत्रज्ञान ह्या पिढीतील जमेच्या बाजू आहेत. पण रडार वरून पूर्णपणे अदृश्य होणं इतकं सोप्प नाही. तसेच ह्यात वापरलेलं इलेक्ट्रॉनिक आणि कॉम्प्युटर तंत्रज्ञान खूप किचकट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एफ ३५ च्या सॉफ्टवेअर मध्ये जवळपास ७ मिलियन लाईन ऑफ कोड आहेत. ह्यामुळेच ह्या पिढीतील लढाऊ विमान सर्वोत्तम समजली जातात. ह्या पिढीतील विमान म्हणजे एफ २२, एफ ३५, जे -२० (चीन च्या ह्या पिढीतील विमानाबद्दल शंका आहे. ), ह्या शिवाय भारत आणि रशिया निर्माण करत असलेले सुखोई पी.ए.के. एफ.ए . 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 


2 comments:

  1. आपले क्षितिज विस्तीर्ण असल्याने त्याची अनुभूती आपल्या लेखातून होत असते. धन्यवाद...

    ReplyDelete
  2. अतिशय महत्वपूर्ण आणि ज्ञानात भर घालणारी माहिती. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे फार आवश्यक आहे.

    ReplyDelete