Monday 17 August 2020

पद्मश्री मिळवणारा जिल्हा परीषद शाळेचा विद्यार्थी... विनीत वर्तक ©

 पद्मश्री मिळवणारा जिल्हा परीषद शाळेचा विद्यार्थी... विनीत वर्तक ©

आयुष्यात चांगल्या शाळेतून, कॉलेज मधून शिकलो म्हणजे आपण आयुष्यात चांगल्या पदावर जाऊ किंवा चांगल्या संधी उपलब्ध होतील असा मतप्रवाह जनसामान्य लोकांमध्ये आहे. काही अंशी तो खरा ही असेल पण त्यामुळे बाकीच्या शाळा, कॉलेजांच महत्व कमी होतं नाही. शिक्षण आपल्याला कुठेही घेता येतं, कसही घेता येतं. लोखंडाच सोन करणारे परीस शिक्षक चांगल्या शाळेत असतात तसे ते जिल्हा परीषद शाळेत ही असतात. चांगले विद्यार्थी घडायला त्या विद्यार्थाच्या मनात ते असावं लागते. अश्याच एका जिल्हा परीषद शाळेत शिकलेल्या विद्यार्थाने आपल्या कर्तृत्वाने भारतात एड्स / एच.आय.व्ही.च्या संशोधनात आपलं बहुमूल्य योगदान दिलं. भारतात एड्स च्या प्रसाराच्या विरुद्ध वैद्यकीय चळवळी मागचा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जाते. जिल्हा परीषदेच्या मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेऊन सार्वजनिक आरोग्यामध्ये जगातील प्रथम क्रमांकाच्या जॉन हॉपकिन विद्यापीठ,अमेरीका इकडे प्रक्षिशण घेऊन भारताच्या कोरोना विरुद्धच्या युद्धात डॉक्टरांचा चेहरा ठरलेला तो विद्यार्थी म्हणजेच डॉक्टर रमण गंगाखेडकर. 

चीन मध्ये कोरोना विषाणू ने हाहाकार माजवल्यानंतर त्याचे पडसाद जागतिक पटलावर उमटायला सुरवात झाली होती. भारताच्या वेशीपाशी आलेल्या कोरोना विषाणूची लागण आणि प्रसार कमीत कमी कसा होईल ह्यासाठी लागणाऱ्या उपायोजना आणि उपचार ह्याची सुत्र भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) च्या साथरोग व संसर्गजन्य रोग ह्या विभागाचे प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांच्याकडे होती. भारतात कोरोना चा प्रसार जसा वाढत गेला तशी भारतीय संशोधन परीषदेची जबाबदारी वाढत गेली. भारत सरकारच्या सोबत कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या. त्यामुळेच अमेरीका, इटली सारख्या देशात कोरोना हाहाकार माजवत असताना भारत त्या तुलनेत खूप सुरक्षित राहिला होता. त्यामागे प्रचंड असे परीश्रम डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचे होते. ३० जून २०२० साली ते आपल्या पदावरून निवृत्त झाले पण आपलं कार्य त्यांनी सुरु ठेवताना डॉक्टर सी.जी.पंडित नॅशनल चेअर ह्या भारतीय संशोधन परीषदेच्या अतिशय मानाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यावरून ह्या ही पुढे देशाच्या वैद्यकीय संशोधनात आपलं योगदान देण्याचं त्यांनी नक्की केलं आहे. 

१९६२ साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण जिल्हा परीषद शाळेच्या मराठी माध्यमातून त्यांनी पूर्ण केलं व आपली डॉक्टरी पदवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद इकडून मिळवली. त्यांनतर १९८९ साली त्यांनी स्वतः डॉक्टर म्हणून काम सुरु केलं. पण त्यांच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं जेव्हा त्यांनी एड्स वर संशोधनाला सुरवात केली. एड्स हा रोग तेव्हा भारतात जास्ती कोणाला माहित नव्हता न त्या बद्दल कोणती औषध, उपचार उपलब्ध होते. एड्स झालेल्या व्यक्तींना आधार देणं इतकच त्यांच्या हातात होतं. एड्स च्या भारतातील प्रसाराला आळा घालण्यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज आहे हे त्यांना समजून चुकलं होतं. रेड लाईट एरीया म्हणजे काय? हे माहित नसताना तिकडे जाऊन तिथल्या वैश्यांच जीवन अनुभवणं इथपासून त्यांनी आपल्या संशोधनाची सुरवात केली. १९९३ साली नारी म्हणजेच National AIDS Research Institute (NARI) पुणे इकडे सुरु झाल्यावर त्यांची नियुक्ती तिकडे करण्यात आली. तिकडे असताना भारतात एड्स ला प्रतिबंध करण्यासाठी देशपातळीवर सामाजिक क्षेत्राला ह्या कार्याशी जोडलं. एड्स कसा होतो? तो होऊ नये म्हणून घ्यायच्या दक्षता? झाल्यावर उपलब्ध असणारी औषधे आणि त्याची अमंलबजावणी केली. ह्यामुळे भारतात एड्स विरुद्ध एक सशक्त चळवळ उभी राहिली. 

१९९९ साली एड्स विरुद्ध च्या लढ्यात भारताने एक नवीन पाऊल टाकलं. एड्स बाधित आई- वडिलांकडून त्यांच्या मुलांकडे दिल्या जाणाऱ्या एड्स च्या विषाणू चा प्रसार थांबवण्यासाठी आणि अश्या मुलांच्या वैद्यकीय औषधांसाठी भारत सरकारने Prevention of Parent-to-Child Transmission (PPTCT) ची योजना अमलात आणली. ह्या योजनेच्या निर्मितीत आणि ही योजना सुरु करण्यात डॉक्टर गंगाखेडकर ह्यांचं अमुल्य योगदान होतं. एड्स वर अजूनही पूर्ण उपचार नसला तरी एड्स प्रभावित व्यक्तीच आयुष्यमान लांबवणारी प्रभावी औषध आलेली आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत भारतात एड्स चा प्रसार जवळपास संपुष्टात येईल. अनेक वर्ष नारी मध्ये आपलं संशोधन केल्यावर त्यांची नियुक्ती भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) च्या साथरोग व संसर्गजन्य रोग ह्या विभागाचे प्रमुख म्हणून झाली. तिकडेही आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला. कोरोना च्या संकटामध्ये भारतीय संशोधन परीषद (आय. सी. एम. आर.) चा चेहरा म्हणून डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचं नाव सन्मानाने घेतलं जाते. त्यांच्या एड्स आणि इतर संसर्गजन्य रोगावरील संशोधनासाठी भारत सरकारने २०२० साली पद्मश्री देऊन सन्मान केला. 

एड्स आणि कोरोना सारख्या भयंकर रोगांच्या लढाईत जिल्हा परीषद शाळेच्या मराठी माध्यमात शिकलेला एक मुलगा आज देशाचा चेहरा बनून समोर येतो आणि आपलं वैद्यकीय सेवेचं आपलं व्रत आजही अविरत सुरु ठेवतो. डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांचा हा प्रवास स्फूर्तिदायी तर आहेच पण एका डॉक्टरच आयुष्य समजून सांगणारा आहे. आज जिकडे राजकीय वर्चस्वासाठी डॉक्टरी पेशाची कंपाउंडर शी तुलना केली जाते तिकडे एका सर्वसामान्य घरातून देशाच्या वैद्यकीय संशोधनाचा अविभाज्य भाग बनलेल्या डॉक्टरांचा प्रवास सगळ्यांना नक्कीच स्फूर्ती देणारा आहे. त्यांच्या कार्याला सलाम आणि पुढील प्रवसासाठी खूप खूप शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


No comments:

Post a Comment