Friday 7 August 2020

After every Monday, there will be a Tuesday... विनीत वर्तक ©

After every Monday, there will be a Tuesday... विनीत वर्तक ©


२० जून २०२० ला भारतीय सेनेच्या नॉर्दन कमांड ने एक ट्विट केलं होतं. चित्रपट कलाकारांच्या उठण्या बसण्या पासून त्यांच्या मुलांच्या चालण्या बोलण्याची नोंद ठेवून ब्रेकिंग न्युज करणाऱ्या अनेक मिडिया हाऊस च लक्ष ना तिकडे गेलं ना राजकीय नेत्यांवर, खेळांडूंवर शाब्दिक राजकारण करणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांच. कारण असले ट्विट ना आमच्या नजरेत येत ना ते कधी महत्वाचे वाटतात. भारतीय सेनेचं कोणतही कमांड अथवा अधिकारी ट्विट किंवा माहिती सांगतात तेव्हा त्यात खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तर ह्या ट्विट मधील काही वाक्य इकडे देतो. 


"Born to fight.They are not the bats. They are the Batman."


"After every Monday, there will be a Tuesday. Bajrang Bali Ki Jai"  


भारताच्या नॉर्दन कमांड ने केलेल्या ह्या ट्विट मध्ये दडलेला आहे तो १६ बिहार रेजिमेंट च्या जवानांचा पराक्रम. ज्याची तुलना जगाने विश्वयुद्धातील पराक्रमाशी केली तर आमच्या काही राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांनी कोणत्या तरी प्रांताचे नाव सैनिकांचा पराक्रम करताना घेतलं ह्याच राजकारण करण्यात धन्यता मानली. नक्की त्या सोमवार आणि मंगळवारी काय घडलं होतं ज्यामुळे जगाच्या पुढच्या वाटचालीचा रोख पूर्णपणे बदलून गेला? 


भारत चीन विवादित सिमारेषेच्या जवळपास २ किलोमीटर च्या परीसरात दोन्ही देशांना कोणत्याही तात्पुरत्या अथवा कायमच्या चौक्या बनवण्यास मज्जाव आहे. ह्या शिवाय ह्या परीसरात दोन्ही देशांचे सैनिक गस्त घालू शकतात पण कोणत्याही बंदुकीविना. असा करार भारत आणि चीन दरम्यान झालेला आहे. ह्या कराराचे उल्लंघन करून चीन ने पी.पी.१४ जवळ चीन च्या क्षेत्रात पण २ किलोमीटर च्या आतमध्ये एका छोट्या टेकडीच्या टोकावर एक तात्पुरती पोस्ट तयार केली. ह्या पोस्टमुळे दौलत बेग ओल्डी त्या शिवाय त्याला जोडणारा भारताचा रस्तावरची वाहतूक, भारतीय सैन्याच्या हालचाली ह्या स्पष्टपणे दिसू शकत होत्या आणि ग्रह पडल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येणं ही शक्य होणार होतं. भारताने ह्या तात्पुरत्या चौकीला आक्षेप घेतं ती हटवण्याची मागणी केली. ह्या वाटाघाटींसाठी भारताचे १६ बिहार रेजिमेंट चे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि चीन चे अधिकारी ह्यांच्यात १५ जून २०२० म्हणजे सोमवारी सकाळी बैठक झाली. चीन च्या अधिकाऱ्यांनी ही चौकी खाली करण्याचं बैठकीत मान्य केलं. भारताने आपले सैनिक ठरल्या प्रमाणे मागे हटवले. चीन आपल्या शब्दाला जागत नाही ह्याची कल्पना असल्याने कर्नल संतोष बाबू ह्यांनी एका मेजर अधिकाऱ्याच्या हाताखाली १२ जणांची एक तुकडी चीन ने आपली पोस्ट खाली केली की नाही ह्याच निरीक्षण करण्यासाठी पाठवली. 


चीन च्या सैनिकांनी हत्यार न घेता आलेल्या त्या भारतीय जवानांना आपलं बंधक बनवलं. ह्याची खबर लागताच कर्नल संतोष बाबू आपल्या दोन सैनिकांसह चीन च्या त्या पोस्टवर धडकले. कराराचा मान ठेवताना कोणतही हत्यार घेऊन भारताचे कोणतेच सैनिक गेले नव्हते. तिकडे पोस्टवर शाब्दिक चकमकी झाल्या. ह्या नंतर चीन च्या सैनिकांनी धोका देताना भारताच्या कमांडिंग ऑफिसर आणि २ जवानांवर तिक्ष्ण हत्यार, दंडुके घेऊन हल्ला केला. ह्यात भारताचे कर्नल के. संतोष बाबू आणि ते २ जवान मृत्युमुखी पडले. ह्या सगळ्या घटनेत मध्यरात्र उलटून गेली होती. सोमवार नंतर येणारा मंगळवार सुरु होतं होता. पण ह्या येणाऱ्या मंगळवार ने संपूर्ण जगाचा दृष्टीकोन बदलला जाणार होता ह्याची कल्पना ना चीन ला होती ना त्याच्या सैनिकांना. 


कर्नल संतोष बाबू ह्यांच्या हत्येची बातमी १६ बिहार रेजिमेंट मध्ये येताच सगळ्या सैनिकांच रक्त खवळल. कोणत्याही रेजिमेंटचा कमांडिंग ऑफिसर हा वडिलांसारखा असतो. आपल्या वडिलांचा दगाबाजीने केलेली हत्या सगळ्याच १६ बिहार सैनिकांच्या खूप जिव्हारी लागली. सूर्योदय व्हायची वाट न बघता सेकंड इन कमांड ऑफिसर आणि कॅप्टन स्तरावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या हाताखाली ३०० भारतीय सैनिकांनी चीन च्या त्या पोस्टवर हल्ला केला. भारतीय सैनिक काहीतरी करतील ह्याचा अंदाज चीन च्या सैनिकांनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी दंगलीच्या वेळी घालतात तसे सुरक्षा कवच परीधान केले होते. भारतीय सैनिकांना हत्याराशिवाय त्या टेकडीवर येताना बघून त्यांनी वरतून दगड फेकायला सुरवात केली. पण भारतीय सैनिक त्या दगडांना घाबरणारे थोडीच होते. त्यांच्यात बॅटमॅन ची विरश्री संचारली होती. 'जय बजरंग बली' म्हणत त्यांनी चिनी सैनिकांवर हल्ला केला. ह्यात भारतीय सैन्याचे घातक कमांडो समाविष्ट होते. चिनी सैनिकांना दंडुके माराचा काही परीणाम होणार नाही हे बघताच त्यांनी आपल्या हाताने चिनी सैनिकांच्या नरड्याचा घोट घ्यायला सुरवात केली. दगडांनी त्यांना चिरडून टाकायला सुरवात केली. ह्या सगळ्या लढाईत चीन ची पोस्ट तग धरू शकली नाही. ती तुटून बाजूच्या गाल्वान नदीत पडली. त्याच सोबत कित्येक भारतीय आणि चिनी सैनिक टेकडीवरून खाली फेकले गेले. ह्या लढाईत चीन च्या ४० सैनिकांना जागीच खात्मा झाला तर जवळपास १५० च्या आसपास सैनिक गंभीर जखमी झाले. कित्येक सैनिकांच मृत शरीर मिळवण्यासाठी चीन ला गाल्वान नदीचं पाणी थांबवावं लागलं. ह्या सगळ्या लढाईत २० भारतीय सैनिक हुतात्मा झाले. 


मंगळवारचा सूर्योदय झाला तोवर चीन ला भारतीय सेनेने केलेल्या पराक्रमाची जाणीव झाली. चीन ची ती तात्पुरती पोस्ट नष्ट झाली. चीन ला अंदाज नव्हता की एकही गोळी न चालवता भारतीय सैनिक चीन चं इतकं नुकसान करू शकतात. भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे आकलन करण्यात चीन आणि चीन चे सैनिक कमी पडले. सोमवारी केलेल्या दगाबाजीचे उत्तर भारताने मंगळवारी चीन ला व्याजासकट परत केलं होतं. ह्या पराक्रमाने पूर्ण जगाचा चीनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. चीन च्या महत्वकांक्षेला भारतीय सैनिकांनी सुरुंग लावून उध्वस्थ केलं होतं. भारताच्या त्या पराक्रमी सैनिकांची आठवण ठेवताना भारताच्या नॉर्दन कमांड ने ते ट्विट केलं होतं की चीन ने विसरू नये, 


 'After every Monday, there will be a Tuesday'... 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment:

  1. भारतीय सेनेचा हिमालयापेक्षा उत्तुंग पराक्रम...

    या मुळेच चीन जगासमोर उघडा पडला.


    भारतीय सेनेचा आम्हाला अभिमान आहे.

    जय जवान...

    ReplyDelete