एकटीचा प्रवास... विनीत वर्तक ©
दोन अपूर्णांक बनून प्रत्येकवेळी एक पूर्णांक होतोच असं नाही. कधी कधी आयुष्याच्या रस्त्यात पूर्णांक बनून पण अपूर्णांक च आयुष्य जगावं लागते तर कधी कधी तो अपूर्णांक आपली साथ सोडून देतो तर कधी सुरवात ते शेवट तो पूर्णांक होतच नाही. पण प्रत्येक वेळेस परिस्थिती वेगळी असली तरी उरलेला प्रवास मात्र एकटीने करायचा असतो. हा प्रवास वाटतो तितका सोप्पा नसतो. समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहण्यासाठी बरेच काही स्वाहा करण्याची तयारी तिला करावी लागते. कधी नाईलाजाने तर कधी जबरदस्तीने पण आवडत नसलेली गोष्ट स्वीकारणं खरच तितकं सोप्प असते का? ह्याचा विचार कोणी करते का? स्री असून सुद्धा एकट्या स्री ला किती जणी समजून घेतात तिकडे बाकी समाजाच्या प्रगल्भतेचा विचार तर बाजूला राहिला. एकटीचा प्रवास तिला एकटीला करायचा असतो आणि तो ही एकटीला सोबत घेऊन. तिच्या ह्या प्रवासाची गोष्ट तिची एकटीची असते.
समाज म्हणून आपण लग्न न केलेल्या, लग्न होऊन विधवा झालेल्या, विधवा होऊन पुन्हा समाजाच्या प्रवाहात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या सगळ्याच स्त्रियांकडे समाज कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ह्याचा विचार करण्याची गरज आहे. एक मुलगी ते एक बायको असा प्रवास झाला की समाजाचे स्रीकडे बघण्याचे सगळे संदर्भ बदलून जातात. पुरुषप्रधान संस्कृतीत आजवर आपल्या इच्छा, अपेक्षा दबून ठेवलेली ती आपल्या जोडीदाराच्या साथीने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पण असे किती प्रगल्भ जोडीदार ३६ गुण जुळवून भेटत असतील हा संशोधनाचा विषय आहे. पण हा प्रवास जर अर्धवट झाला तर सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलून जातात. एक विधवा, किंवा एक घटस्फोट घेतलेली स्री समाजासाठी किंबहुना स्री वर्गासाठी वेगळी ठरते. काल पर्यंत सगळीकडे हवी हवीशी वाटणारी स्री आज नकोशी होते किंवा तिने समाजाच्या कोणत्याच प्रवाहात येऊ नये ह्यासाठी स्रीच पुढाकार घेते. सासू, नणंद, भावजय अश्या विविध नात्यात असलेली स्री सगळ्यात आधी स्री ला एकटी असल्याची जाणीव करून देते. तिकडे पुरुषांबद्दल न बोललेलं बर.
एकटं पडलेल्या स्री च्या गरजा काही बदलत नाहीत. भावनिक, शारिरीक अश्या सगळ्याच पातळीवर. पण त्या गरजा पूर्ण करण्याचे संदर्भ मात्र सगळे बदलून जातात. खांदा द्यायला येणारे पुरुष फक्त शारिरीक गरजेसाठी येत असतात किंवा निदान तश्या सुप्त इच्छा तरी मनात ठेवून येतात. कृष्णसखा मिळणारे अपवाद असले तरी ते हिऱ्या इतकेच दुर्मिळ. त्याचवेळी निर्माण झालेल्या गोतावळ्यातून स्वतःबरोबर कुटुंबाला सांभाळण्याची कसरत ही तिलाच सांभाळायची असते. आपल्याच मुलांच संगोपन, आर्थिक स्थिती ते अनेकदा राहणाच्या घराचा शोध घेण्यापासून ही सुरवात असू शकते. तिकडे तिच्या गरजा, तिच्या इच्छा आणि तिच्या भावना ह्याकडे बघायला वेळ तरी तिला कितीसा मिळणार?. वेळ मिळाला तरी त्या इच्छा पूर्ण करणाच्या प्रयत्नांना ही दूषणं द्यायला आपला सो कॉल्ड प्रगल्भ समाज तयार असतोच.
एकदा एकटी असल्याचा शिक्का लागला की तो पुसणं पण तितकच कठीण. पुन्हा एकदा जोडीदार निवडून सुरवात करताना सुद्धा आधीच्या प्रवासात आलेल्या अनुभवांची पुन्हा उजळणी नकोशी असते तर पुन्हा सगळं विसरून कोणासोबत सगळ्याच बाबतीत एकरूप होणं किती कठीण असेल ह्याचा विचार ना कुटुंबीय करत ना समाज. अपवादांच्या काही गोष्टी असतील ही की जिकडे समाजाने प्रगल्भता दाखवलेली असेल पण अश्या गोष्टी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच. बाकी सगळ्या वेळी चार भिंतीच्या आतल्या गोष्टी चार भिंतीत दाबून ठेवायच्या असतात किंवा ठेवल्या जातात. आजही एकटी स्री दुसऱ्या पुरुषासोबत कुठे दिसली की समाजाच्या दृष्टीने ते लफडं होते तर असा पुरुष दिसला तर ती मैत्रीण ठरते. ह्या सगळ्यावर मात करत तिला करायचा असतो एकटीचा प्रवास.
लग्न करणं अथवा न करणं ही एक चॉईस आहे हे आपण कधी समजून घेणार आहोत? कोणत्याही पुरुषाने कोणत्याही स्री शी अथवा कोणत्याही स्री ने कोणत्याही पुरुषाशी कोणत्या लेव्हल वर एकरूप होणं हा त्या स्री आणि पुरुषाचा चॉईस आहे. सक्षम समाज घडवण्यासाठी केलेली लग्नसंस्था हा एक भाग असला तरी सरसकट त्याच आधारावर कोणत्याही स्री अथवा पुरुषाला गृहीत धरण हे चुकीचं आहे. एकटा पुरुष जसा अभिमानाने आपलं आयुष्य जगू शकतो आणि समाज त्याला ज्या चौकटीत तोलतो तीच चौकट एकट्या स्रीला का लागू होत नाही? लग्न करून अथवा लग्न न करता आपला प्रवास एकटीनं करणं ही सुद्धा एक चॉईस आहे हे समाज म्हणून आपण कधी समजून घेणार आहोत? प्रत्येकवेळी स्री समानतेची व्याख्या करणारे सगळेच ज्यात स्त्रीया पण सामाविष्ट आहेत त्या स्वतः ह्या प्रवासात ह्याच स्त्रियांच्या सोबत कधी उभ्या राहणार आहेत?
एकटीचा प्रवास हा जरी एकटीचा असला तरी त्यात आपल्याच समाजाचं प्रतिबिंब पडत असते. हा एकटीचा प्रवास आपण समाज म्हणून समजून घेण्यात कुठेतरी कमी पडत आहोत असं मला मनापासून वाटते.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment