Saturday 15 August 2020

सेवन स्टार... विनीत वर्तक ©

सेवन स्टार... विनीत वर्तक ©

कोणत्या वर्षी एखाद्या कलाकाराला किती पुरस्कार मिळाले? कोणत्या चित्रपटाने पुरस्कारांचा विक्रम केला? ते कोणत्या हिरोला अथवा हिरोईनला आजवर किती पुरस्कार मिळाले (खरं तर अनेकदा पैसे मोजून विकत घेतलेले) ह्याची नोंद ठेवणाऱ्या भारतीयांना खऱ्या हिरोंना किती पदकं मिळाली ह्याची नोंद सुद्धा नसते. मुळात भारताच्या खऱ्या हिरोंना कोणती पदके दिली जातात ह्याची पुसटशी कल्पना नसणाऱ्या प्रगल्भ भारतीयांकडून अजून जास्ती काही माहित असल्याची आशा ठेवण्याची गरज नाही. जो देशासाठी बलिदान देण्यास तयार असतो. त्याच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाही अश्या लोकांना किती लोकांनी आपल्याला लाईक केलं किंवा किती लोक आणि मिडिया आपल्याला फॉलो करते ह्याच काही नसते. ते आपलं कर्तव्य निभावत राहतात. असे करणारे इतिहासाच्या पानावर आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरून जातात. असाच एक इतिहास सी.आर.पी. एफ सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स च्या एका अधिकाऱ्याने नुकताच नोंदवला आहे. एक, दोन नाही तर चक्क सेवन स्टार मिळवण्याचा विक्रम केला आहे. 

असिस्टंट कमांडंट नरेश कुमार ह्यांना सातव्यांदा पोलीस शौर्य पदकाने गौरवण्यात आलं आहे. सातव्यांदा हा सन्मान मिळवणारे ते सी.आर.पी.एफ. चे ते पहिले आणि एकमेव अधिकारी आहेत. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी त्यांनी हा सन्मान मिळवला आहे. अवघ्या ४ वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत तब्बल ७ वेळा पोलीस शौर्य चक्राचा सन्मान त्यांनी देशासाठी जीवावर उदार होऊन केलेल्या पराक्रमाची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. नरेश कुमार ह्यांचं पूर्ण कुटुंब भारतीय सेनेशी निगडित होतं. त्यामुळे लहानपणा पासून त्यांना सैन्याची आवड होती. १२ वित असताना त्यांचे वडील भारतीय सेनेतून ऑनररी कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. त्यावेळेस त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिलं होतं की जितके स्टार (त्यांच्या खांद्यावर निवृत्ती च्या वेळेस तीन स्टार होते. ) तुम्ही खांद्यावर घेऊन निवृत्त झालात तितके स्टार खांद्यावर घेऊन मी सैन्यात प्रवेश करेन. बी.टेक. ची पदवी पंजाब मधून घेतल्यावर त्यांनी मार्च २०१३ ला सी.आर.पी.एफ. मध्ये प्रवेश घेतला. दोन वर्ष तिकडे ट्रेनिंग घेऊन २०१५ ला आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाप्रमाणे खांद्यावर तीन स्टार घेऊन पोलीस दलात प्रवेश केला. 

२०१५ ला त्यांची पोस्टिंग काश्मीर इकडे झाली. २०१६ ला सी.आर.पी.एफ. ने आतंकवादी आणि दशहतवाद्यांचा सामना, बिमोड करण्यासाठी क्वीक एक्शन टीम  ची स्थापना केली. नरेश कुमार ह्यांना त्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या युनिट ने एकापेक्षा एक पराक्रम करताना दशहतवाद्यांचा खात्मा करायला सुरवात केली. असं एकही वर्ष गेलं नाही की ज्यात नरेश कुमार ह्यांना शौर्य पदकाने गौरवण्यात आलं नाही. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत तब्बल ५५ अतिरेकी आणि दशतवाद्यांचा खात्मा त्यांनी आपल्या पराक्रमाने केला आहे. २६ जानेवारी २०२० ला त्यांना ६ व्या शौर्य पदकाने गौरवण्यात आलं होतं. आता १५ ऑगस्ट येता येता त्यात अजून एका शौर्य पदकाची भर पडली आहे. 

१३ फेब्रुवारी २०१८ ला नरेश कुमार श्रीनगर विमानतळावर उतरताच लागलीच विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे गेले. ही जबाबदारी असिस्टंट कमांडंट शितल रावत ह्यांच्याकडे होती. त्यांना एक छोटं गिफ्ट आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांनी सांगितलं की, 'संध्याकाळ पर्यंत परत आलो नाही तर तर समज की हे तुझं व्हॅलेंटाईन गिफ्ट आहे'. तडक तिथून त्यांनी एका मिशनसाठी प्रयाण केलं. नरेश कुमार ह्यांचा जीव कोणत्याही क्षणाला अतिरेक्यांच्या गोळ्यांना बळी पडू शकतो ह्याची जाणीव असताना पण देश कर्तव्य पहिलं असं समजून शीतल रावल त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. आपल्या जोडीदाराविषयी ते सांगतात, 

"I don’t have to explain why I do what I do. I am never under the pressure to seek peace postings.”

आज सेवन स्टार नरेश कुमार छातीवर विराजमान झाले आहेत. पण खऱ्या गोळ्या आपल्या छातीवर झेलणाऱ्या खऱ्या हिरोंच्या पराक्रमांना आपण भारतीय कधीच ओळखत नाही ना त्यांच्या पराक्रमाची दखल आपण घेतो आणि ठेवतो. कारण आम्हाला हिरोंची व्याख्याच कळलेली नाही तीच आमची शोकांतिका आहे. 
आपल्या पराक्रमाने देशाची रक्षा करणाऱ्या ह्या सेवन स्टार अधिकाऱ्याला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment