Monday 10 August 2020

बुडणारा देश... विनीत वर्तक ©

 बुडणारा देश... विनीत वर्तक ©


१९४७ साली भारताचं विघटन होऊन पाकीस्तान ची निर्मिती इंग्रजांनी केली. निर्मिती पासूनच इंग्रज तिथल्या राज्यकर्त्यांच्या मनात भारताविषयी विष कालवून गेले. काश्मीर प्रश्न मुद्दामून चिघळत राहील ह्याची काळजी त्यांनी घेतली अर्थात भारतातले तेव्हाचे काही राजकारणी आणि आत्ताचे ही काही राजकारणी ह्यांनी हे विष पुढल्या पिढीकडे हस्तांतरित होईल ह्याची काळजी घेतली. गेली जवळपास ७३ वर्ष पाकीस्तान काश्मीर ह्या एका मुद्द्यावर लढतो आहे. त्यात त्याची इतकी शक्ती खर्च होते आहे पण काही ना काही करून ते मिळवायचे त्यासाठी संपूर्ण देश गहाण आणि विकायला लागला तरी चालेल ह्या धोरणावर पाकीस्तान ची झालेली वाटचाल त्याला आता बुडीत खात्यात घेऊन गेली आहे. अजून जर पाकीस्तान सावरला नाही तर काश्मीर सोडाच पण त्याच अस्तित्व, त्याच्या लोकांची स्वातंत्र्यतता, त्याच सार्वभौमत्व पूर्णपणे नष्ट होणाच्या मार्गावर आहे ज्याची सुरवात झालेली आहे. 


गेल्या काही वर्षातील पाकीस्तान ची ही बुडीत खात्यात होणारी वाटचाल भारतासाठी धोक्याची घंटा आहे. आपला शत्रू स्वतःच रसातळाला जाताना आपल्याला आनंद व्हायला हवा पण आपलाच भाऊ कोणीतरी दुसऱ्याच ऐकून खड्यात जात आहे आणि आपल्या घरात एका परक्या शक्तीचा प्रभाव वाढणार आहे ही भारतापुढची सगळ्यात मोठी चिंता आहे. पाकीस्तान ची आर्थिक व्यवस्था आता शेवटच्या घटका मोजत आहे. पाकीस्तान वर असलेलं कर्ज जवळपास २५६ बिलियन अमेरिकन डॉलर आहे. हे कर्ज पाकीस्तान च्या जी.डी.पी. च्या जवळपास ९८.२% आहे. ह्यातील जवळपास १/५ कर्ज हे सिपेक ( China-Pakistan Economic Corridor.) चं आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की पाकीस्तान हळूहळू पूर्णपणे चीन च्या विळख्यात घुरफ़टत चालला आहे. कारण सिपेक मधून जे प्रकल्प उभे राहणार आहेत त्यातून नफा तर बाजूला राहिला पण प्रत्यक्षात पाकीस्तान च्या अर्थव्यवस्थेला होणारा तोटा प्रचंड आहे. 


चीन ने पाकीस्तान मध्ये सिपेक सारखा प्रकल्प उभा करण्यामागे चीन ची भारतावर किंबहुना २०५० पर्यंत सगळ्या आर्थिक महासत्तांवर अंकुश ठेवण्याचा चीन चा प्रयत्न आहे. त्यामुळेच चीन ने सिपेक च गाजर पाकीस्तान पुढे उभं केलं आणि पाकीस्तान त्यात पूर्णपणे अडकला आहे. चीन नुसता पाकीस्तान ला आर्थिक स्तरावर अपमानित करत नाही तर चीन ने पाकीस्तान च सार्वभौमत्व वेशीवर टांगल आहे. पाकीस्तान च्या सैन्यातील अधिकाऱ्यांवर चीन चे कामगार सरळ सरळ हात उगारतात पण पाकीस्तान च्या कर्नल लेव्हल च्या अधिकाऱ्याला गप्प बसावं लागते तिकडे सामान्य पाकीस्तानी नागरिकांबद्दल न बोललेलं बर. हे सगळं पाकीस्तान आणि तिथली राजवट सहन करते आहे कारण सगळ्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. पाकीस्तान मधील हजारो गरीब मुलींवर ह्याच चीन च्या लोकांकडून अत्याचार केले जातात व त्यांना वैश्याव्यवसायात ठकलण्यात येते आहे. काश्मीर च्या जनतेच्या अन्यायावर यु.एन. मध्ये बोंबा मारणारा पाकीस्तान आणि त्याची न्यायव्यवस्था ह्या सगळ्या अत्याचारावर एक शब्द बोलायला तयार नाही. 


कोरोना च्या उद्रेकामुळे पाकीस्तान ची हालत अजून खराब होणार आहे. आधीच पाकीस्तान मधील महागाई दर १०% आहे. त्यातच त्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ ही ५०% कमी होणार आहे. जवळपास ३% वेगाने सध्या होणारी वाढ २% वर पुढल्या वर्षी जाईल असा अंदाज आहे. जवळपास ६० मिलियन लोक दारिद्र्य रेषेच्या खाली असून जवळपास १८ मिलियन लोकांचा जॉब ह्या कोरोना च्या उद्रेकामुळे गेला आहे. पाकीस्तानात फक्त १% लोक कर भरतात त्यामुळे पाकीस्तान पुढे घेतलेल्या कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे हा प्रश्न आ वासुन उभा आहे. भारताशी वैर मानून सैन्यावर गरज नसताना पाकीस्तान आपल्या जी.डी.पी. च्या जवळपास २०% इतकी रक्कम खर्च करतो. शिक्षण क्षेत्रावर आणि पायाभूत सुविधांसाठी हाच वाटा २% कमी आहे. ह्यामुळे भारताबद्दलचा द्वेष किती परोकोटीचा आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. एकवेळ आपण डुबलो तरी चालेल पण भारताला शांततेनं जगून द्यायचं नाही ह्या नादात पाकीस्तान च्या मूर्ख राजकारण्यांनी आणि सैनिकी अधिकाऱ्यांनी त्याची हालत पूर्णपणे खराब केली आहे. 


भारताचा जगात वाढणारा दबदबा आणि भारताची अर्थव्यवस्था जगात मजबूत समजली जाते. कोरोनाच्या प्रभावात सुद्धा ज्या दोन देशांच्या अर्थव्यवस्था वाढ दाखवतील त्यात भारत आहे. भारताची अर्थव्यवस्था पाकीस्तान च्या जवळपास १० पट आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पंतप्रधानांनी जाहीर केलेली आर्थिक मदत २० लाख कोटी रुपये जवळपास पाकीस्तान च्या जी.डी.पी. इतकं आहे. त्यामुळे पाकीस्तान पुढली १०० वर्ष मेहनत करून सुद्धा भारताच्या आसपास पोहचू शकत नाही ही वस्तुस्थिती पाकीस्तान चे राजकारणी कधी स्विकारणार नाहीत. ह्याच मूर्खपणाचा फायदा चीन घेत आहे. काश्मीर च्या नादात पाकीस्तान आपल्या मुसलमान देशांशी शत्रुत्व घेतो आहे. नुकतेच सौदी अरेबिया ने पाकीस्तान च कंबरड मोडलं. काश्मीर प्रश्न सौदीने मुसलमान देशांच्या गटात उचलावा अशी पाकीस्तान ने गळ घातली होती. तसे न केल्यास सौदी अरेबिया ला एक वेगळा ग्रुप तयार करण्याची धमकी दिली होती. पण सौदी अरेबियाने पाकीस्तान ची लाज काढली आहे. भारताविरुद्ध काश्मीरवर एक शब्द बोलणार नाही हे सांगताना आपले उधार घेतलेले पैसे व्याजासकट लगेचच्या लगेच परत देण्यास सांगितलं ह्याशिवाय ठरलेला इंधन आणि गॅस चा पुरवठा ही दिला जाणार नाही हे ठणकावून सांगितलं. ज्यामुळे पाकीस्तान ची वाट लागली व पुन्हा एकदा चीन कडून १ बिलियन अमेरीकन डॉलर चं चढ्या भावाने कर्ज घेऊन सौदी अरेबिया चे पैसे परत करण्याची नामुष्की पाकीस्तान वर आली. 


कोणी म्हणेल की मरत आहेत स्वतःच्या कर्माने तर मरून दे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा भारतावर प्रतिकूल परीणाम होणार आहे. एकतर सगळ्या मार्गावर अडकलेला पाकीस्तान कोणतही पाऊल उचलू शकतो. गरिबीत खितपत जाणारी पाकीस्तान ची पिढी वाईट मार्गाला म्हणजे आतंकवादी रस्त्यावर नेणं तिकडच्या धर्मगुरूंना शक्य होणार आहे. ह्या शिवाय चीन चा वाढता हस्तक्षेप आणि पाकीस्तान राजकारण्यांची चीन पुढची शरणागती भारतासाठी चांगली नाही. पण एखाद्याला जीव द्यायचाच असेल तर कोणी काही करू शकत नाही. फक्त आपल्याला कमीत कमी त्रास कसा होईल ह्याची व्यवस्था आपण करू शकतो. भारताने ती येत्या काळात करायला हवी. कारण ज्या पद्धतीने पाकीस्तान रसातळाला जातो आहे ते बघता पुढल्या ५-७ वर्षात त्याच अस्तित्व जगाच्या नकाशावर नावापुरतं राहील. ह्या बुडत्या जहाजाला आता वाचवणं अशक्य आहे. त्यामुळे त्यापासून जास्तीत जास्त लांब राहणं भारताच्या हिताचं आहे. 


फोटो स्रोत :- गुगल


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment