Friday 14 August 2020

स्कायरूट... विनीत वर्तक ©

 स्कायरूट... विनीत वर्तक ©

१५ ऑगस्ट १९६९ रोजी म्हणजे बरोबर ५१ वर्षापूर्वी इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रीसर्च इन्स्टिट्यूट ची स्थापना झाली. गेल्या ५१ वर्षात भारताच्या अवकाश क्षेत्राने खूप मोठा पल्ला गाठला आहे. सायकल वरून रॉकेट आणि बैलगाडीवरून उपग्रह नेणारा भारत मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नात उपग्रह स्थापन करणारा जगात पहिला देश ठरला. भारताचा गेल्या ५० वर्षातील अवकाश क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा आहे. स्वतःच्या बळावर उपग्रह पाठवणारा ते अवकाशातील उपग्रह जमिनीवरून नष्ट करणाऱ्या काही मोजक्या देशात आपला समावेश होतो. आज इसरो ह्या भारताच्या संस्थेला जगात मानाचं स्थान आहे. इसरो ने नेहमीच भारताचा तिरंगा अवकाशात तेजाने तळपता ठेवला आहे. पण गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. भारताला ह्या बदलांशी जुळवून घेणं हे काळाची गरज बनली आणि जून २०२० ला भारताने एक क्रांतिकारी पाऊल टाकलं. 

जून २०२० साली भारताने जे क्रांतिकारी पाऊल टाकलं त्याची दखल सामान्य माणसाने घ्यावी तितकी घेतली गेली नाही. जून २०२० मध्ये भारताने असं काय पाऊल टाकलं तर भारतातील अवकाश क्षेत्र जे इतकी वर्ष सरकारी अधिपत्याखाली होतं ते आता खाजगी क्षेत्रासाठी खुलं केलं आहे. ह्याचा अर्थ इसरो विकायला काढली असा नाही तर इसरो च्या सहकार्याने अनेक खाजगी संस्था, खाजगी कंपन्या, संशोधक ह्यांना भारताच्या अवकाश प्रगतीत भागीदार होता येणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा, कर्तृत्वाचा फायदा भारताला करून घेता येणार आहे. आजतागायत अवकाश क्षेत्र असं होतं की जिकडे काहीतरी नवीन करण्यासाठी इसरो शिवाय कोणताच दुसरा पर्याय नव्हता. सगळ्यांनाच इसरो मध्ये जाता येतं असं नाही. जेव्हा इसरो ची स्थापना झाली तेव्हा भारताला संदेश वहन, उपग्रह प्रणाली हाच तिचा मुख्य उद्देश होता किंबहुना आजही तोच आहे पण त्यात आता भर पडली आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकाशाचा वेध घेण्याची. 

सगळ्याच वैज्ञानिकांना, संशोधकांना इसरो मध्ये प्रवेश मिळतो असं नाही. त्यामुळे ज्यांना ह्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांना आजवर ह्या क्षेत्रात संधी नव्हती त्यामुळेच अश्या लोकांना संधी देण्यासाठी भारताने एक पुढलं पाऊल टाकलं आहे. ज्या प्रणाली इसरो ने बनवलेल्या आहेत त्यांची पुनःनिर्मिती किंवा त्याच मास प्रोडक्शन ह्यात इसरो चा वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा ते काम खाजगी क्षेत्राकडून घेऊन इसरो नवीन लक्ष्यावर अधिक चांगल्या रीतीने वाटचाल करू शकेल हा विचार ठेवून जून २०२० मध्ये इन- स्पेस ची घोषणा केली. इन- स्पेस म्हणजे Indian National Space Promotion and Authorization Center (IN-SPACe). ह्याच्या अंतर्गत खाजगी क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांना अवकाश क्षेत्रात संधी योग्य ते मूल्यमापन करून संधी दिली जाणार आहे. ज्या प्रमाणे अमेरीकेतील नासा ने खाजगी क्षेत्राला संधी दिली आणि त्याचमुळे आज स्पेस एक्स, ब्लु ओरीजिन सारख्या कंपन्या अवकाश क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत आहेत. नासा वैज्ञानिक संशोधनावर लक्ष केंद्रित करत आहे. भारताने ही ह्याच पावलावर पाऊल टाकत आपल्या अवकाश संशोधनाचे दरवाजे सर्व भारतीयांसाठी खुले केले आहेत. अवघ्या २ महिन्यांच्या काळात ह्या ह्याची फळे दिसायला लागली आहेत.

स्कायरूट नावाच्या एका खाजगी कंपनीने नुकतेच रामन हे १००% ३ डी प्रिंटेड असलेलं इंजिन यशस्वीरीत्या चालवून दाखवलं. हे इंजिन ते बनवत असलेल्या विक्रम-१ ह्या रॉकेट च्या शेवटच्या टप्यात वापरलं जाणार आहे. विक्रम-१ हे रॉकेट डिसेंबर २०२१ पर्यंत उड्डाणासाठी तयार होणार असून २५० ते ७०० किलोग्रॅम वजनाचे उपग्रह लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये प्रक्षेपीत करण्यास सक्षम असणार आहे. रामन ह्या इंजिनाच नाव भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन ह्यांच्या सन्मानार्थ ठेवलेलं असुन १००% ३ डी प्रिंटेड तंत्रज्ञानातून निर्माण झालेलं भारतातील पहिलं इंजिन आहे. ह्या इंजिनाच वजन हे इतर इंजिनांपेक्षा ५०% कमी असून ह्यात वापरण्यात येणाऱ्या सुटे भागाच्या मर्यादेमुळे ह्याची निर्मिती ८०% जास्त वेगात होणं शक्य आहे. स्कायरूट भारताच्या अंतरीक्ष कामाचे शिल्पकार विक्रम साराभाई ह्यांच्या सन्मानार्थ 'विक्रम' नावाच रॉकेट कुटुंब बनवत आहे. विक्रम १ पाठोपाठ विक्रम २ आणि विक्रम ३ वर ही त्यांनी काम करायला सुरवात केली आहे. 

स्कायरूट प्रमाणे अग्निकुल, बेलाट्रिक्स सारख्या भारतीय खाजगी कंपन्या सुद्धा ह्या क्षेत्रात वेगाने पुढे येतं आहेत. रॉकेट किंवा तंत्रज्ञान निर्माण केलं तरी ह्या सगळ्यांना रॉकेट प्रक्षेपण, त्याच नेव्हीगेशन ह्यासाठी इसरो ची मदत लागणार आहे. इथेच इसरो इन- स्पेस च्या माध्यमातून त्यांच्या तंत्रज्ञानाचं, रॉकेट च मूल्यमापन करून त्यांना आपल्या कामात सहभागी किंवा त्यांना सहकार्य करणार आहे. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार पुढल्या १० वर्षाच्या काळात जवळपास १०,००० लहान मोठे उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत. ह्या सर्वाना अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी लागणारी रॉकेट बाजारपेठ ही तितकीच प्रचंड मोठी असणार आहे. ज्यातून खूप मोठं परकीय चलन उपलब्ध होणार आहे. अमेरीकेचा हिस्सा ह्यात वरचढ राहणार असला तरी भारताचा हिस्सा ही त्या सोबत असावा त्या दृष्टीने इन- स्पेस प्रयत्न करणार आहे. ह्या सर्वांची सुरवात म्हणजेच स्कायरूट च विक्रम रॉकेट आणि त्याला प्रक्षेपित करणारं रामन इंजिन. 

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment: