खारे वारे मतलई वारे ( भाग १ ) ... विनीत वर्तक ©
सध्या जागतिक स्तरावर खूप काही उलथापालथी घडत आहेत. कोरोनामुळे जसं जग पुर्णपणे थांबेल अशी कोणी कल्पना केली नव्हती त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अश्या काही गोष्टी घडून येतील ह्याचा विचार कोणी केला नव्हता. ह्या सगळ्या घडामोडींचे दुरगामी परीणाम जगाच्या नकाशावर येणाऱ्या काळात दिसून येणार आहेत. ह्या गोष्टी जरी एका रात्रीत घडल्या असल्या तरी त्याची बीज कित्येक वर्षापासून रोवली गेली होती. कोरोना हे ह्या घटनांना मूर्त स्वरूप देण्यास कारण बनलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अश्या कोणत्या घटना घडल्या आहेत ज्याचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परीणाम भारतावर आणि सामान्य भारतीयावर होणार आहे. तर त्यातला काही घटना म्हणजे पाकीस्तान आणि सौदी अरेबिया ह्यांचे बिघडलेले राजनैतिक संबंध, इस्राईल आणि युनायटेड अरब अमिराती ह्यांच्यात निर्माण झालेले राजनैतिक संबंध, पाकीस्तान ला हळूहळू विकत घेणारा चीन, साऊथ चायना समुद्र इथे चीन आणि व्हिएतनाम ह्यांच्यात होणाऱ्या घडामोडी. अमेरीका आणि चीन चा वाढता असंतोष आणि ह्या सर्व जागतिक संबंधांचा एक महत्वाचा दुवा म्हणजे भारत आणि भारतीय.
The Organisation of Islamic Cooperation (OIC) ही एक जागतिक संघटना आहे. युनायटेड नेशन नंतर ही सगळ्यात मोठी संघटना असून ५७ देश ह्याचे सदस्य आहेत. मुस्लिम लोकसंख्या जास्त अथवा मुस्लिम धर्माच प्राबल्य असलेल्या लोकांची ही संघटना आहे. ह्या संघटनेचा मुख्य देश ही संघटना १९६९ स्थापन झाल्यापासून सौदी अरेबिया हा आहे. त्यामागे काही कारण आहेत. एकतर जगाला लागणार १८%-२०% तेल ह्या एकट्या देशाकडे आहे. तेलामुळे ह्या देशात आर्थिक सुबत्ता आहे. दुसरं म्हणजे मक्का आणि मदिना ही मुस्लिम लोकांची महत्वाची धार्मिक ठिकाण ह्याच देशात आहेत. ह्यामुळे आजवर मुस्लिम देशांच प्रतिनिधित्व सौदी अरेबियाकडे आहे. पण गेल्या काही वर्षात त्याच्या ह्या अस्मितेला धक्का देणारा एक देश पुढे येत आहे. तो म्हणजे तुर्कस्थान (तुर्की). तर ह्या देशाने आपणच मुस्लिम लोकांच प्रतिनिधित्व करत असून आपला एक गट बनवायला सुरवात केली आहे. अर्थात त्याचे हे मनसुबे सौदी अरेबिया ला आवडणारे नाहीत. त्यामुळे ह्या संघटनेत आता गटबाजी सुरु झाली आहे. पाकीस्तान हा ह्या देशांमधील भिक मागणारा देश. पण ह्या देशाकडे अणवस्त्र असल्याने भाव खाणारा. कारण ह्या ५७ देशात फक्त पाकीस्तान ने चोरून आणि चीन च्या मदतीने अणुबॉम्ब बनवलेला आहे. पाकीस्तान आणि मलेशिया चा कल हळूहळू तुर्कीकडे सरकत होता तर हे सगळं सौदी ला अजिबात आवडत नव्हतं. असंतोष दोन्ही कडे खदखदून भरलेला होता आता वाट बघायची होती ती असंतोषाची ठिणगी पडायची.
गेल्या ५-७ वर्षातील जागतिक अर्थकारण बघितलं तर भारताचा उदय जागतिक राजकारणावर प्रभाव पाडायला लागला होता. आर्थिक विकासाची चावी चीन आणि भारत ह्या दोन देशांकडे असणार हा इतिहास आता प्रत्यक्षात घडायला लागला होता. त्यातच तेलावर असलेली जगाची तहान आता हळूहळू तांत्रिक प्रगतीमुळे घटत जाणार ह्याची चाहूल सौदी अरेबिया च्या नेतृत्वाला लागली होती. अमेरीकेत 'टेस्ला' सारख्या कंपन्यांना मिळणार यश आणि सोलार तसेच इतर ग्रीन एनर्जीकडे हळूहळू का होईना जगाची वळणारी पावलं येणाऱ्या एका दशकात ते दोन दशकात जगाची तेलाची भूक जवळपास शून्यावर येईल अशी स्थिती निर्माण होत होती. त्यामुळेच सौदी नेतृत्वाला आपल्या देशाची आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी तेलापलीकडे बघण्याची गरज निर्माण झाली. चीन सारख्या कम्युनिस्ट देशापेक्षा जगातील सर्वात मोठी लोकशाही असेलला भारत हा आपले पैसे आणि गुंतवणूक सुरक्षित करेल असा विश्वास भविष्य ओळखणाऱ्या सौदी, यु.ए.ई. सारख्या देशांना वाटला. त्यातच भारताने आपले संबंध मजबूत करण्यासाठी आपली दारे उघडी केली होती. ह्याचा परीणाम असा झाला की ह्या मुस्लिम राष्ट्रांचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून गेला.
सौदी अरेबिया आणि यु.ए.ई. सारख्या देशांनी भारतात गुंतवणूक करायला सुरवात केली आणि पाकीस्तान ला हे कुठेतरी पचनी पडणार नव्हतं. पण पाकीस्तान ला विरोध करणं ही शक्य नव्हतं कारण पाकीस्तान त्यांच्याच तुकड्यावर आजवर जगत आलेला होता. गेल्या वर्षी सौदी अरेबिया ने भारतात तब्बल १०० बिलियन अमेरीकन डॉलर ची गुंतवणूक सगळ्या क्षेत्रात करत असल्याचं जाहीर केलं. त्याच सोबत यु.ए.ई. ने ही ७५ बिलियन अमेरीकन डॉलर इतकी प्रचंड गुंतवणूक भारतात करण्याच सांगितलेलं आहे. हे सगळे आकडे अतिशय मोठे आहेत. ह्यामुळेच पाकीस्तान कुठेतरी चरफडत होता. त्याच्या ह्या असंतोषाला त्याने तुर्कीकडे आपलं वजन वळवायला सुरवात केली. सौदी ला हे लक्षात येताच सौदीने पाकीस्तान ला त्याची जागा दाखवली. सौदी ला वगळून The Organisation of Islamic Cooperation (OIC) च्या मिटिंग ला मलेशिया इकडे न जाण्यासाठी सौदीने पाकीस्तान ला भाग पाडलं. त्यामुळे पाकीस्तान दोन्ही बाजूने तोंडघाशी पडला. त्याची अवस्था 'धरलं चावते सोडलं तर पळते' अशी झाली. त्यातच भारताने काश्मीर मधून ३७० कलम हटवलं आणि काश्मीर भारताचा भाग असल्याचं जागतिक पातळीवर भारताने सिद्ध केलं. काश्मीर हा एकच मुद्दा घेऊन आयुष्यभर रडत असलेल्या भिकारड्या पाकीस्तान ला आपला शेवटचा जोकर पण फुकट गेला अशी भिती वाटली. त्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आरडाओरड केली. पण जागतिक पातळीवर तर सोडून द्या ओ.आय.सी. सारख्या मुस्लिम संघटने मध्ये ही पाकीस्तान ला कोणी भीक घातली नाही.
ओ.आय.सी. च्या माध्यमातून आपल्या शेवटच्या पत्याला वाचवण्यासाठी पाकीस्तान ने खूप सारे डावपेच आखले पण ह्या सगळ्यावर सौदीने पूर्णपणे पाणी फिरवलं. सौदी सोबत इतर मुस्लिम राष्ट्र ही पाकीस्तान च्या सोबत उभी राहिली नाहीत. हा आपल्याच घरातला पराभव पाकीस्तान च्या जिव्हारी लागला. काश्मीर प्रश्न मुस्लिम राष्ट्रांनी मुसलमान धर्मावर केलेली कुरघोडी आहे असं मानून त्याला जागतिक प्रश्न बनवून पाकीस्तान ला मदत करावी अशी पाकीस्तान ची इच्छा होती. पण मदत तर जाऊन दे साधी ह्याची दखल घ्यायला ही मुस्लिम राष्ट्रांना गरज वाटली नाही. चिडलेल्या पाकीस्तान ने सौदी ला डिवचण्याचे प्रयत्न सुरु केले. आपल्या डिवचण्याने सौदी आपली दखल घेईल असा त्याचा अंदाज होता. पण पाकीस्तान ची खेळी त्याच्याच इतकी अंगलट आली आहे की आता त्याची अवस्था 'तेल ही गेले तूप ही गेले आणि हाती आलं धुपाटणं' अशी झाली आहे. सौदी अरेबिया किंवा मुळातच आखाती देशांचे संदर्भ आता बदलत चाललेले आहेत. धर्मवेड राहून संबंध बनवता येतं नाहीत आणि ह्या सगळ्यात आपली शक्ती तर खर्च होतेच पण हाताशी काही लागत नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे. २१ व्या शतकात जिकडे जगण्याचे संदर्भ बदलत जात आहेत तिकडे पाकीस्तान सारखा देश अजूनही १६ व्या शतकात अडकलेला आहे. जेव्हा मुसलमान राजवटींचा उदय झाला होता. ह्या सगळ्याचे जे परीणाम होणार आहेत त्या सर्वांचा परीणाम भारतावर ही होणार आहे.
क्रमशः
पुढील भागात सौदी आणि पाकीस्तान चे बिघडलेले संबंध, चीन चा हस्तक्षेप आणि एकूणच भारताची भूमिका तसेच इतर घडामोडी.
सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
आपण ब्लॉग साठी खूप सुंदर विषय निवडला त्या बद्दल सर्व प्रथम आपले आभार , सामान्य माणसाला जागतिक घडामोडीनबद्दल एवढ्या सहज सुंदर योग्य रित्या माहिती तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीकडूनच मिळू शकते, पुढील लेखाची वाट बघत आहे, धन्यवाद
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteविनीत हा सौदी व पाकिस्तान एक अत्यंत आवश्यक व महत्वाचा असा हा विषय भारतीय संदर्भात येणे गरजेचं होतं. तुम्ही या विषयास हात घातला आहे तर त्या बरोबर चीन, तुर्कस्तान व मलेशिया या त्रिकुटाच्या संदर्भात व पुढील दशकात या संबंधांचे एकत्रित परिणाम जागतिक राजकारणात काय होणार यावर ही लिहावं अशी अपेक्षा. हा लेख उत्तम ती प्राथमिक माहिती देणारा आहे. 👍👍
ReplyDeleteअतिशय सुंदर माहिती.
ReplyDeleteVinit langali mahiti she
ReplyDeleteखूपच छान माहिती.
ReplyDeleteखूप छान माहिती आणि अतिशय सोप्या पद्धतीने केलेली मांडणी खूपच छान
ReplyDelete