Thursday, 30 July 2020

पाऊले चालती मंगळाची वाट... विनीत वर्तक ©

पाऊले चालती मंगळाची वाट... विनीत वर्तक ©

मंगळ ग्रह नेहमीच मानवासाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. पृथ्वीशी अनेक प्रकारे साधर्म्य असणाऱ्या मंगळावर कोणे एके काळी सजीव सृष्टी होती. इकडे पाणी, ऑक्सिजन असल्याचे पुरावे सापडले आहेत. मंगळाचे वातावरण विरळ असल्याने तसेच पाणी लुप्त झाल्याने मंगळावर सजीव सृष्टीसाठी गरजेच्या असणाऱ्या ऑक्सिजन च अस्तित्व नष्ट झालं आणि मंगळ एक दगड धोंड्यांचा ग्रह बनून राहिला. मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगती नंतर मंगळाच्या ह्या भूतकाळाची कहाणी शोधण्यासाठी आणि मंगळाकडे मानवाने आपलं भविष्यातील स्थान म्हणून बघायला सुरवात केली. १९९७ साली अमेरीकेच्या नासा ने पहिल्यांदा मंगळावर पाथफाईंडर हे मिशन पाठवून त्यातून सोजोरनेर रोव्हर मंगळाच्या भूभागावर उतरवलं. ह्या नंतर २००३ मध्ये स्पिरीट आणि ऑपरच्युनिटी  हे रोव्हर तर २०१२ मध्ये क्युरीसिटी हे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी उतरवलं. ह्या सगळ्यांकडून येणाऱ्या माहितीचा अभ्यास नासा मानवाच्या भविष्यातील वस्तीसाठी करत आहे.

काल नासाने पुन्हा एकदा मंगळाकडे आपल्या पर्सीवरंस ह्या मोहिमेद्वारे उड्डाण केलं आहे. तर हे पर्सीवरंस रोव्हर नक्की काय आहे? ह्यातून नासा काय साधणार आहे? नासा सोबत अजून दोन देशांच्या मोहिमा मंगळाकडे झेपावल्या आहेत. चीन ची टिणवेन १ तर यु.ए.इ. चं होप ऑरबिर्टर. चीन ची मोहीम ही मंगळाच्या पृष्ठभागावर रोव्हर उतरवू शकतो ह्या तांत्रिक क्षमतेचा अभ्यास करणारी आहे. तर अरब देशांच पाहिलं मिशन म्हणून होप ऑरबिर्टरकडे बघितलं जात आहे. ह्या तिन्ही मोहिमा वेगवेगळ्या उद्देशाने जात असल्या तरी ह्या सगळ्यातून एक बाब निश्चित आहे ती म्हणजे पाऊले चालती मंगळाची वाट....

पर्सीवरंस ही नासा ची मोहीम सगळ्यात महत्वाची आणि मानवाच्या तांत्रिक क्षमतेला एक पाऊल पुढे नेणारी ठरणार आहे. नासाच्या इतिहासाप्रमाणे एखाद्या मिशन नंतर पुन्हा तिकडेच मिशन पाठवताना ते सगळ्या बाबतीत दोन पावलं पुढे असेल हे बघितलं जाते आणि पर्सीवरंस ही त्याला अपवाद नाही. पर्सीवरंस रोव्हर हे नासाच्या पुढल्या पिढीतील एक रोव्हर असून ह्यात एका नव्या तंत्रज्ञानाची चाचणी ही नासा घेणार आहे. पर्सीवरंस रोव्हर आपल्या पोटात इंज्युनिटी नावाचं एक ड्रोन घेऊन जाते आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यावर हे ड्रोन मंगळाच्या पृष्ठभागावर ठेवून त्याच उड्डाण नासा मंगळाच्या वातावरणात करणार आहे. ह्यात जर नासा यशस्वी झाली तर मानवाच्या इतिहासात पहिल्यांदा एका दुसऱ्या ग्रहावर असं उड्डाण केलं जाणार आहे. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की मंगळाचे वातावरण अतिशय विरळ आहे. त्यामुळे एखाद्या उड्डाणासाठी लागणारं बल आपण पृथ्वीवर सहज निर्माण करू शकतो पण मंगळाच्या वातावरणात ते निर्माण करणं हे अतिशय कठीण आहे. त्यामुळेच इंज्युनिटी च उड्डाण हे अनेक कारणांसाठी वैशिष्ठपुर्ण ठरणार आहे. इंज्युनिटी वर असलेल्या कॅमेरा आणि इतर संशोधन करणारी उपकरणं मंगळाच्या पृष्ठभागावर अश्या ठिकाणी जाऊ शकणार आहेत जिकडे रोव्हर ने जाणं शक्य नाही. 

पर्सीवरंस मंगळाच्या पृष्ठभागावर उतरून नक्की काय करणार तर मंगळवार अमाप असलेल्या कार्बन डायऑक्सइड ला ऑक्सिजन मध्ये रुपांतरीत करणार आहे. मंगळाच्या वातावरणात जवळपास ९५% कार्बन डायऑक्सइड आहे. ऑक्सिजन च प्रमाण अत्यल्प म्हणजे ०. १७४% इतकं नगण्य आहे. जर आपण कार्बन डायऑक्सइड चं विघटन करू शकलो तर मानवाच्या भविष्यातल्या सफारी चा मार्ग मोकळा होणार आहे. पृथ्वीवरून ऑक्सिजन, अन्न, पाणी, इंधन घेऊन मंगळवार २ वर्षाचा प्रवास करणं प्रचंड खर्चिक आणि जवळपास अशक्य आहे. पण समजा आपण तिकडे ऑक्सिजन ची निर्मिती करू शकलो तर सगळ्याच गोष्टी अतिशय स्वस्त आणि सुलभ होणार आहेत. नासा च्या पर्सीवरंस वर मॉक्सि नावाचं एक उपकरण आहे जे की मंगळवार ऑक्सिजन निर्मिती चा प्रयत्न करणार आहे. जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर भविष्यातल्या मोहिमांमध्ये ह्यातलं तंत्रज्ञान मोठ्या स्वरूपात वापरून मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन ची निर्मिती शक्य होणार आहे. ऑक्सिजन उपलब्ध झाल्यामुळे सजीवांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न तर मार्गी तर लागतीलच पण त्याशिवाय परतीच्या प्रवासासाठी इंधन ही उपलब्ध होणार आहे. 

पर्सीवरंस आपल्या पोटात मंगळावरील दगडाचे आणि मातीचे नमुने जतन करून ठेवणार आहे. हे नमुने पृथ्वीवर परत आणण्यासाठी येत्या दशकात पुन्हा एकदा एक वेगळं मिशन मंगळावर स्वारी करेल. मंगळवार माणसांची वसाहत सुरु करण्याच्या दृष्टीने स्पेस एक्स ही एलोन मस्क ह्यांची कंपनी जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. 'स्टारशिप' नावाची एका मोहिमे अंतर्गत सध्या स्पेस एक्स २०२४ पर्यंत मंगळवार स्वारी करणाच्या तयारीत आहे. ह्या स्टारशिप मोहिमेबद्दल एका वेगळ्या लेखात सविस्तर लिहेन. तुर्तास नासा ला पर्सीवरंस ह्या मोहिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पर्सीवरंस १८ फेब्रुवारी २०२१ ला मंगळाच्या पृष्ठभागावर उतरेल तेव्हा मानवाच एक नवीन पाऊल मंगळाच्या पृष्ठभागावर पडलेलं असेल. 

फोटो स्रोत :- नासा ( खालील फोटोत पर्सीवरंस रोव्हर आणि इंज्युनिटी ड्रोन) 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



No comments:

Post a Comment