Tuesday, 21 July 2020

आम्ही येतोय... विनीत वर्तक ©

आम्ही येतोय... विनीत वर्तक ©

'आम्ही येतोय' हे कोणतही राजकीय वाक्य नाही तर आपल्या पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह खरे तर अनेक लघुग्रह चाल करून येत आहेत. सध्या एखाद्या गोष्टीला अतिरंजित करून दाखवण्याचा जमाना आहे. त्यामुळे आपली बातमी आणि बातमीची लिंक वाचावी, बघावी म्हणून मोठ्या मोठ्या शब्दात पृथ्वीचा विनाश, पृथ्वीचा महाकाल ते सगळं नष्ट होणार वगरे स्वरूपाच्या बातम्या अनेक मिडिया तसेच सोशल मिडिया मधून पसरवल्या जात आहेत. ह्यात नासा, युरोपियन स्पेस एजन्सी, इसरो ह्यांची नावं जोडली की लोकांचा विश्वास बसेल असा एक पायंडा पडत चालला आहे. मुळात लघुग्रह,धूमकेतू जरी पृथ्वीच्या रस्त्यात येत असले किंवा येण्याची शक्यता असेल ह्याच मुल्यमापन ज्या पद्धतीने केलं जाते ते आधी आपण समजून घ्यायला हवं.

विश्वाच्या आजवरच्या इतिहासात पृथ्वी आणि इतर ग्रहांवर लघुग्रह, धूमकेतू ह्या गोष्टी आदळत आलेल्या आहेत. त्यातून कोणीच सुटलेलं नाही. पण आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आपण अश्या गोष्टींचा अंदाज आधी लावू शकतो. कदाचित जर योग्य वेळी कळलं तर मानवजातीला वाचवण्यासाठी काही करू शकतो. आपल्या नशिबाने गुरु, शनी सारखे मोठे ग्रह सौरमालेत असल्याने फार कमी गोष्टी पृथ्वीच्या वाट्याला येतात. त्या जरी पृथ्वीच्या जवळपास आल्या तरी त्यांची टक्कर होईल असं नसते. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी सारख्या संस्था अश्या लघुग्रह, धूमकेतू चा सतत शोध घेत असतात आणि त्यांच्या कक्षेत मूल्यमापन करत असतात. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की विश्वाच्या पोकळीत स्वैरपणे विहार करणाऱ्या लघुग्रह आणि धूमकेतू च्या कक्षा ह्या प्रचंड अस्थिर असतात. एखाद्या ग्रहाच्या, ताऱ्याच्या जवळून जाण्याने किंवा इतर गोष्टींमुळे त्यांच्या कक्षेत खूप मोठा बदल होऊ शकतो. ह्यामुळेच जरी अशी एखादी गोष्ट पृथ्वीला धडकणार नसेल तरी कक्षेतील बदल पृथ्वीला रस्त्यात उभं करू शकतात.

आपल्या जवळ कोण आहे आणि कोण आपल्याला धडकू शकते ह्यासाठी काही नियम आहेत. निओ ( नियर अर्थ ऑब्जेक्ट) विश्वातील कोणतीही गोष्ट जर सूर्याच्या १.३ एस्ट्रॉनॉमिकल युनिट जवळ येत असेल तर त्याला निओ असं म्हणतात. १ एस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे पृथ्वी आणि सूर्य ह्यामधील सरासरी अंतर जे साधारण १५० मिलियन किलोमीटर असते. आता सगळेच निओ काय आपल्याला धोकादायक नसतात. तर जे धोकादायक ठरू शकतील अश्या गोष्टींना पी.एच.ओ. म्हणतात. ( पोटेंशिअली हझार्डस ऑब्जेक्ट ). आपण कसं ठरवतो की एखादी गोष्ट पृथ्वीला धोकादायक ठरू शकेल तर त्या गोष्टीची कक्षा आणि त्याचा आकार. ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. एखाद्या गोष्टीची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा ह्यातील कमीत कमी अंतर जेव्हा ०.०५ ए यु (७,५००,००० किलोमीटर) कमी असेल आणि त्याची प्रकाशमानता २२ असेल. (त्याचा आकार १४० मीटर (४६० फुट)) पेक्षा जास्त असेल तर अश्या गोष्टी पृथ्वी आणि पर्यायाने मानवासाठी धोक्याचा इशारा आहे. आजवर जवळपास २१०० गोष्टी आपण शोधलेल्या आहेत ज्या पी.एच.ओ. मध्ये बसतात. ह्या सर्वांच्या कक्षांचा विचार करून जर पुढल्या १०० वर्षाच गणित केलं तर फक्त ३८ गोष्टी सगळ्यात जास्ती गंभीर आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट की हे गणित आत्ता माहित असलेल्या आकलनावरून मॉडेल बनवून मांडलेलं आहे ज्यात काही हजार किलोमीटर चा फरक पडू शकतो. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

येत्या २४ जुलै २०२० ला असाच एक पी.एच.ओ. पृथ्वी जवळून जाणार आहे. त्याच नाव आहे लघुग्रह २०२० एन.डी. हा लघुग्रह १७० मीटर लांब असून ०.०३४ ए.यु. अंतरावर म्हणजेच (५,०८६,३२८ किलोमीटर) वरून ४८,००० किलोमीटर / तास ह्या वेगाने जाणार आहे. वर सांगितलं तसं हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या तत्वांमध्ये बसत असल्याने नासाने ह्याचा इशारा आंतरराष्ट्रीय पातळीवर दिला आहे. ह्याला मिडिया आणि सोशल मिडिया पृथ्वीशी टक्कर, महाभयंकर प्रलय वगरे अशी नाव देत आहे. आत्तापर्यंत माहीत असलेल्या पी.एच.ओ. पैकी १४० मीटर पेक्षा मोठा एकही आपल्या लघुग्रह, धूमकेतू पुढल्या १०० वर्षात पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता नाही. पण काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. १ मीटरपेक्षा जास्ती मोठे असलेले जवळपास १ बिलियन लघुग्रह विश्वात आहेत. १ मीटरपेक्षा जास्त  लांब असलेले हे लघुग्रह पृथ्वीवर काही भागाच नुकसान करू शकतात. तसेच असे अनेक लघुग्रह, धुकेतू आहेत ज्यांच्या कक्षा सतत बदलत असतात. असे अनेक गोष्टी आहेत ज्या अजून आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळेच विश्वाच्या पसाऱ्यात त्यांचा शोध घेऊन त्यांची कक्षा ठरवून त्यात पृथ्वीला धोका आहे का? ह्याचा अभ्यास करण्याचं काम नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इतर खगोल वैज्ञानिक सतत करत असतात.

मिडिया मध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला घाबरून न जाता त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला की अनेक गोष्टी स्पष्ट होतात. २०२० काय किंवा अजून भविष्यात पृथ्वीला तूर्तास धोका नाही. पण आपण एक १% लक्षात ठेवायला हवं काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे ते येत असले तर अश्या १% साठीच पृथ्वीवरील अनेक वैज्ञानिकांचे डोळे सतत ह्या विश्वाच्या पसाऱ्यात त्यांचा शोध घेत असतात. त्यांच्या ह्या कामासाठी त्यांना सलाम.


फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment