Thursday 23 July 2020

क्वसार... विनीत वर्तक ©

क्वसार... विनीत वर्तक ©

क्वसार हा शब्द ऐकून आपण बुचकळ्यात पडू. विश्वाच्या ह्या पोकळीत आपली मती गुंग करून टाकणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजेच क्वसार. जिकडे वैज्ञानिकांना ह्यातील विज्ञान अजून पूर्णपणे कळलेलं नाही तिकडे सामान्य माणसांसाठी ही गोष्ट डोक्याच्या वरून जाणारी आहे. तरीसुद्धा क्वसार एक विश्वाच्या पोकळीत असलेली विलक्षण गोष्ट आहे म्हणून तिला समजून घेणं महत्वाचं आहे. क्वसार म्हणजे नक्की काय? तर अतिप्रचंड ऊर्जेचा एक स्रोत. ज्याच्यात पूर्ण विश्वाला आपल्या तेजाने झाकोळून टाकण्याची शक्ती असते. पुराणात देव दर्शन होताना ज्या प्रमाणे देवाच्या तेजाने बाकी सगळ्या गोष्टी त्यामागे झाकोळल्या जातात तसचं काहीसं तेजोवलय म्हणजेच क्वसार.

प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी कृष्णविवर (ब्लॅकहोल) असते. हे कृष्णविवर जेव्हा आजू बाजूच्या गोष्टी गिळंकृत करायला सुरवात करते. तेव्हा आजूबाजूच्या मॅटर  मध्ये असणाऱ्या धूळ, गॅस ह्यांच एकेमकांशी घर्षण होते आणि एक तबकडी सारखी डिस्क प्रकाशमान होते. ह्याचा प्रकाश आणि तेज इतकं प्रचंड असते की पूर्ण आकाशगंगेच्या तेजाच्या १०० पट जास्ती असते. आता उदाहरण द्यायचं झालं तर टी.ओ.एन. ६१८ नावाचं एक क्वसार आपल्यापासून जवळपास १०.४ बिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. ( आत्ता त्यातून येत असलेला प्रकाश हा १०.४ बिलियन वर्षापूर्वी तिकडून निघालेला आहे. ) तर ह्या क्वसारच्या तेजाची तुलना जर सूर्याच्या तेजाशी केली तर क्वसार टी.ओ.एन. ६१८ चं  तेज जवळपास १४० ट्रिलियन सूर्यांइतक आहे. ( १४० ट्रिलियन सूर्य मिळून जितकं प्रखर प्रकाश, तेज निर्माण होईल तितकं तेज, प्रकाश ह्या एकट्या क्वसार चा आहे.) क्वसार च्या अतिप्रचंड तेजामुळे तब्बल काही बिलियन वर्षानंतर ही त्यांच अस्तित्व आपल्याला ठळकपणे जाणवतं.

इतकं प्रखर तेज, प्रकाशमान असेल तर नुसत्या डोळ्यांनी क्वसार दिसायला हवेत पण तसं होतं नाही कारण त्यांच आपल्यापासून असलेलं अंतर. आजवर माहित असलेली जवळपास सगळीच क्वसार ही आपल्या नशिबाने काही बिलियन प्रकाशवर्ष लांब आहेत. कारण ही क्वसार जर आपल्या जवळ असती तर आपल्याला त्यांच्या प्रखर तेजामुळे विश्वातील बाकी कोणत्याच गोष्टींचं अस्तित्व दिसलं नसतं. आधी सांगितलं तसं ही क्वसार इतकं मॅटर आपल्यात ओढत असतात की त्यांच स्वतःच वस्तुमान वाढत जाते आणि त्याच बरोबर प्रचंड ऊर्जा बाहेर फेकत असतात. क्वसार च्या मध्यातून ऊर्जेचा स्रोत दोन बाजूने जेट प्रमाणे बाहेर पडतो. ह्या  जेटचा फवारा मिलियन प्रकाशवर्ष लांब जातो. आपल्याला ज्ञात असलेल्या काही मोठ्या क्वसार पैकी एक म्हणजे SDSS J1106+1939. हे क्वसार आपल्यापासून ११ बिलियन प्रकाशवर्ष लांब आहे. हे प्रत्येकवर्षी ४०० सूर्यांना गिळंकृत करत आहे. आपल्याला अंदाज येईल की किती प्रचंड वस्तुमान हे आपल्यात सामावून घेत आहे. त्यामुळेच ह्यातून निघणारी ऊर्जा किती प्रचंड असू शकेल. ८००० किलोमीटर / सेकंद वेगाने ह्यातून ऊर्जा विश्वात फेकली जात आहे. ( जेट च्या स्वरूपात) ह्याची प्रखरता, तेज जवळपास २ ट्रिलियन सूर्यांच्या तेजाइतकं आहे. ( २ ट्रिलियन सूर्य एकाचवेळी प्रकाशमान झाले तर जितका प्रकाश, तेज निर्माण होईल तितकी प्रखरता ह्याच्या तेजाची आहे.)

“quasar” हा इंग्रजी शब्द “quasi-stellar radio source” ह्या पासून बनलेला आहे. १९५०-६० च्या दशकात वैज्ञानिकांना एखाद्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या प्रचंड ऊर्जेच्या स्रोताने भांडावून सोडलं होतं. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने आपण एखाद्या क्वसार ला बघू त्या पद्धतीने ते वेगळं दिसते. म्हणजे समजा आपण समोरून बघत आहोत तर आपल्याला रेडिओ गॅलॅक्सी म्हणजेच ऊर्जेचा स्रोत असणारी आकाशगंगा दिसेल. जर आपण एखाद्या कोनातून बघितलं तर आपल्याला क्वसार आणि त्याचे दोन जेट दिसतील आणि समजा त्या जेट चा रोख आपल्याकडे असेल तर एखाद्या लेझर च्या लाईट प्रमाणे एक प्रखर ऊर्जेचा स्रोत आपल्याकडे येत असेल. वैज्ञानिकांना पडलेल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उकल एकट्या क्वसार ने केली. कारण आपल्या पृथ्वीवर विश्वाच्या पोकळीत सगळ्या बाजूने ह्या क्वसार च्या ऊर्जेचा प्रकाश बिलियन वर्षाचा प्रवास करून पोहचत आहे. क्वसार नेहमीच इतकी ऊर्जा बाहेर फेकतो असं नाही. आपल्याच आकाशगंगेच्या मध्यभागी जे कृष्णविवर आहे. ते सध्या निद्रिस्त आहे. जेव्हा त्याला अनेक सूर्याचं खाद्य मिळायला सुरवात होईल कदाचित जेव्हा मिल्की वे आणि अँड्रोमेडा आकाशगंगेची टक्कर होईल त्यावेळेस आपल्या आकाशगंगेतील क्वसार पूर्ण विश्वाला प्रकाशमान करेल.

क्वसार सारख्या अनेक गोष्टी आजही विश्वातील आपलं स्वरूप किती शुद्र आहे ह्याची जाणीव आपल्याला करून देतं आहे. त्या समजायला कठीण वाटल्या तरी त्यांचं स्वरूप, त्यांचा विस्तार, त्याचे आकडे सर्वसामान्य माणसाला त्यांच्या रूपाची नक्कीच जाणीव करून देतील.

फोटो स्रोत :- गुगल, नासा

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


2 comments:

  1. Very interesting ,inoformative,interpretation ....cosmos...!!!

    ReplyDelete
  2. शास्त्रीय माहिती मराठीत. सामान्य असामान्य होतो ज्ञान प्राप्ती ने.

    ReplyDelete