Sunday, 5 July 2020

पगडीला ढाल बनवणारा सरदार.... विनीत वर्तक ©

पगडीला ढाल बनवणारा सरदार.... विनीत वर्तक ©

वयाच्या २० व्या वर्षी आपली काय स्वप्न असतात ह्याचा विचार करायला आपण सर्वांनी स्वतःच्या आयुष्यात थोडं मागे वळून बघितलं तर असं लक्षात येईल की २० व्या वर्षी आपण प्रत्येकजण आपल्या शिक्षणात चाचपडत होतो. प्रेमाच्या भावनेला नवीन धुमारे फुटलेले होते. करीअर, नोकरी ह्यांचे विचार सतत मनात घोळत होते. हॉटेलिंग, पार्टी, ट्रेक ते स्वतःची गाडी, जागा अश्या सगळ्या गोष्टींची आतुरतेने वाट बघत होतो. उद्या सुरु होणारी क्रिकेट ची मॅच आणि ह्या आठवड्यात रिलीज होणारा चित्रपट कधी बघायला मिळणार ह्याची गणित करण्यात मग्न होतो. त्यावेळेस देशप्रेम, देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या गोष्टी तर दूरच्या. पण देश हा आपल्यासाठी फक्त पुस्तकातल्या प्रतिज्ञे पुरता आणि चित्रपटाच्या आधी सुरु होणाऱ्या राष्ट्रगाना पुरती कमी अधिक प्रमाणात मर्यादित होता. पण काही लोक वेगळ्या मातीचे बनलेले असतात. त्यांच्यासाठी मातृभूमी आणि देश हा सगळ्यात आधी येतो. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान दयायला कधीच मागे पुढे बघत नाही.

पंजाब मधला असाच एक २० वर्षाचा तरुण आपल्या काकांकडे बघून देशाच्या सेवेत जाण्यासाठी आतुर झाला होता. त्याच्या काकांनी १९९९ च्या कारगिल युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या अनुभवातून त्याच्या अंगात स्फुरण चढलं होतं. भारतीय सैनिकांनी कसं आपल्या पराक्रमाने कारगिल ची शिखरं भारताच्या ताब्यात ठेवली होती.  हे ऐकून त्याला आपण सुद्धा अश्याच पद्धतीने आपल्या देशासाठी काहीतरी करायला हवं हा निश्चय त्याने पक्का केला होता. आपले दोन्ही भाऊ नोकरी करत असताना आणि स्वतःला परदेशी जाण्याची संधी असताना पण २०१८ साली त्या २० वर्षाच्या मुलाने भारतीय सैन्यात प्रवेश घेतला. वयाच्या इतक्या कोवळ्या वयात हा मुलगा देशाच्या सिमेवर भारताच्या सरहद्दीचं रक्षण करत होता.

२०२० साल उजाडलं नेहमीच पाठीमागून आणि बेसावध क्षणी हल्ला करणाऱ्या चीन ने भारताच्या हद्दीत जाणून बुजून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशातून ह्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन्ही देशांची बोलणी सुरु झाली. पण ह्या बैठकांचा आणि भारतातील राजकारण्यांनी पूर्वी चुकीच्या पद्धतीने केलेल्या काही अटींचा आधार घेत चीन ने एक वेगळा प्लॅन आखला होता. १४-१५ जून २०२० च्या अश्याच एका बेसावध रात्री चिनी सैनिकांनी भारताच्या जमिनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला. वास्तविक बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैनिकांनी माघार घेणं अपेक्षित होतं पण नेहमीच मागून वार करणारे चिनी आज सुद्धा तसाच हल्ला करायला आले होते. त्यांनी बंदूक असूनसुद्धा बंदुकीचा वापर करायचा नाही असा आदेश मानणाऱ्या आणि तिकडे भारताच्या सरहद्दीचं रक्षण करणाऱ्या तुकडीच्या कमांडर वर उलटे खिळे आणि ताऱ्यांच्या वेटोळ्याने बनलेल्या शस्त्राने हल्ला केला. ह्या सगळ्या झटापटीत भारताचे कमांडर के. बाबू धारातीर्थी पडले. आपल्या सहकाऱ्यांची आणि आपल्या कमांडींग ऑफिसर ची अशी हत्या बघून त्या २३ वर्षीय तरुणाचा रक्त खवळलं. आपल्या कमांडर च्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो तरुण चिनी सैनिकांवर तुटून पडला.

'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल', 'वाहे गुरुजी का खालसा वाहे-गुरुजी की फतेह' आणि आपल्या रेजिमेंट च ब्रीदवाक्य 'जय बजरंगी बली' म्हणत त्याला घेरणाऱ्या ४ चिनी सैनिकांना त्याने आपल्या ताकदीने एकाच वेळी कड्यावरून खाली ढकललं. त्यांच्या सोबत दरीत पडताना त्याने स्वतःला दगडांच्या कपारीत सावरलं. पण ह्या सगळ्या झटापटीत त्याच्या डोक्याला, मानेला जखमा झाल्या होत्या. १४,००० फुटावर थंड कातळांनी शरीर सोललं गेल्यावरच्या वेदनांचा आपण विचार ही करू शकत नाही. पण तो थांबला नाही. त्या कातळावरून चढून पुन्हा तो माथ्यावर आला. ४ चिनी सैनिकांचा खात्मा त्याने केला होता. अंगातून रक्त वहात होतं पण 'बचेंगे तो और भी लढेंगे' ह्या प्रमाणे मातृभूमीचा एक इंच सुद्धा चीन ला घेऊ देणार नाही ह्या त्वेषात त्या तरुणाने असं काही केलं ज्याचा विचार कोणीच केला नव्हता. शीख संप्रदायातील सरदार लोकांसाठी पगडी म्हणजे आन, बान शान असते. त्या पगडी ला त्याने आपली ढाल बनवलं. चिनी सैनिकांकडे हत्यार होती तर ह्या सरदारकडे आपली पगडी. आपल्या पगडीला सोडवत त्या कपड्याला हाताभोवती गुंडाळत त्याने चिनी सैनिकांचे त्या टोकेरी हत्यारांचे वार परतवून लावत त्यांना भारतीय सरदारांचा इंगा दाखवायला सुरवात केली. एक निशस्त्र भारतीय सैनिक हातात काही नसताना आपल्या पगडीला ढाल बनवून त्यांच्यावर तुटून पडतो हा आवेग, ही देशभक्ती, हा पराक्रम कुठून येतो हे  चिनी सैनिकांना लक्षात येतं नव्हत. ह्या झटापटीत त्याने चिनी सैनिकांना पगडीने लोळवून त्यांच्याकडील हत्यार घेतलं. चिनी हत्याराने चिनी सैनिकांच कंबरड मोडायला सुरवात केली. एक दोन नाही तर तब्बल ७ चिनी सैनिकांचा त्या २३ वर्षाच्या तरुणाने खात्मा केला होता.

एकाकी खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे सारखा हा २३ वर्षाचा तरुण एकटा चिनी सैनिकांशी दोन हात करत होता. ११ चिनी सैनिकांचा खात्मा केल्यावर चीन चे सैनिक पूर्णतः घाबरून गेले की एक भारतीय सैनिक आपल्या ११ सैनिकांना पुरून उरतो. समोरून त्याला रोखण्याचा कोणताच मार्ग दिसत नसताना चिनी सैनिकांनी आपल्या परंपरेला जगताना त्याच्या पाठीमागून हल्ला केला. त्याच्या पाठीत चाकू खुपसला. त्या अवस्थेत ही त्या सैनिकाने पुन्हा आपल्या पगडीने त्या चिनी सैनिकाचा खात्मा केला. पण तो जमीनीवर कोसळला. त्या लढवय्या सरदार सैनिकांच नाव होतं 'शिपाई गुरतेज सिंग'. भारताने आपला गड राखला पण भारताने एका सिंहाला गमावलं.

आज मुंबई, दिल्ली सारख्या शहरात बसून सोशल मिडियावर सैनिकांच राजकारण करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या सो कॉल्ड सुशिक्षित, प्रगल्भ लोकांना काय कळणार २३ व्या वर्षी देशासाठी प्राणाची आहुती देणं काय असते? शहीद म्हणजे काय हे आम्हाला कधीच कळलं नाही? आम्ही त्याच राजकारण करणार सिमेवर शहीद झालेल्या सैनिकाची जात, धर्म शोधणार. भारतीय सेनेने काय करायला हवं काय नको ह्याचे तारे तोडणार कारण १४,००० फुटावर थंड कातळावर सोललेल्या कातडीचा आम्ही अनुभव कधी घेतलाच नाही. सैनिक बंदुकीशिवाय गेले कसे? ह्याच घाणेरडं राजकारण करणारे आम्ही आमच्याच आधीच्या पिढीनी सैनिकांच्या बंदुकीत  गोळ्या असून पण चालवता येणार नाही ह्या केलेल्या कायद्याचं समर्थन करणार. भारतीय सैनिक एकवेळ मेला तरी चालेल पण आम्हाला फोटो हवेत, आम्हाला त्याच क्रेडिट हवं. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे, आम्हाला आमचं स्थान मोठं करायचं आहे. आम्हाला सगळ्याच मुद्याच राजकारण करायचं आहे. कारण आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं ह्यात त्या सैनिकाने काय केलं ह्याचा विचारच आम्हाला शिवत नाही इतके आम्ही खालच्या पातळीला गेलो आहोत.

२३ वर्षीय शिपाई गुरतेज सिंग चं लग्न जमलेलं होतं. किती स्वप्न त्याने बघितली असतील? त्या कोवळ्या मनात किती इच्छा, आकांशा असतील पण देशाची आन, बान, शान आपल्या जिवापेक्षा, आपल्या पगडीपेक्षा सर्वोच्च मानून त्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान करणाऱ्या त्या सैनिकाला माझा कडक सॅल्यूट आणि  कोटी कोटी प्रणाम.

ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी

ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर न आये ........

जय हिंद!!!

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


7 comments:

  1. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏But this is very sad to say that an Indian cannot understand this!

    ReplyDelete
  2. आपण नेहमी महत्वाची माहिती उत्तम शब्दांत लिहुन प्रसारित करता...मला आवडते

    ReplyDelete
  3. Always proud on our Indian Army. Bharat Mata ki jai.

    ReplyDelete
  4. हे माहित नव्हते. खूप खूप अभिमान वाटला, पण तेवढंच आपल्या माणसांना असं गमावण्याचं दु:खही आहे.
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. :-(

    ReplyDelete