#हिरोज_भाग_१... विनीत वर्तक
कॅप्टन विक्रम बात्रा
“शेर शहा” (लायन किंग) असं ज्याला पाकिस्तानी आर्मी म्हणते, ह्यातच त्या सैनिकाचा पराक्रम काय अत्युच्च असेल ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. भारतीय सेनेचा हा 'शेरशहा' म्हणजे 'कॅप्टन विक्रम बात्रा'. ९ सप्टेंबर १९७४ साली जन्मलेल्या विक्रम बात्राचं आयुष्य म्हणजे एक हिरोचं आयुष्य आहे. जुळ्या जन्मलेल्या भावंडांत विक्रम आपल्या भावापेक्षा १४ मिनिटं मोठा होता. लहानपणापासून अतिशय प्रसिद्ध असलेला विक्रम अभ्यासात तर हुशार होताच पण त्याहीपलीकडे त्याला एन.सी.सी.चा उत्तर भारतातील सर्वोत्कृष्ट कॅडेटचा बहुमानही मिळाला होता. कराटेमध्ये ग्रीन बेल्ट होल्डर आणि टेबल टेनिसमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या विक्रमला लहानपणापासून भारतीय सैन्यात जायचं होतं.
१९९५ साली पदवी घेतल्यावर त्याला हॉंगकॉंग येथील एका मर्चंट नेव्ही कंपनी मध्ये नोकरी मिळाली. पण विक्रमने आपल्या घरच्यांना सांगितल “पैसा हा सगळं काही नाही. मला माझ्या देशासाठी काहीतरी मोठं , काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे” त्याचा हा निर्णय काही काळाने इतका सत्यात उतरेल ह्याचा विचार कोणीच केला नव्हता. एका दशकानंतर भारतातील एका ऑईल कंपनीच्या जाहिरातीमधील शब्द बरंच काही सांगून जातात.
“Sometimes an ordinary Indian can make a Rs 120,000 crore company feel humble. For every step we take, there’s an inspired Indian leading the way”.
ह्यासोबत विक्रम बात्राचा फोटो दाखवलेला आहे.
१९९९ साल उजाडलं आणि कारगिल युद्धाचे पडघम वाजले. विक्रमच्या युनिटला कारगिलला जाण्याचे आदेश मिळाले. १९ जून १९९९ ला विक्रमला "पॉईंट ५१४०" घेण्याची जबाबदारी देण्यात आली. विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अतिशय शिताफीने शत्रूवर हमला केला. विक्रमने ह्या युद्धात लीडरप्रमाणे सगळ्यांच्या पुढे राहत चार आतंकवाद्यांचा एकट्याने हातघाईच्या मारामारीत खात्मा केला. हा पॉईंट आतंकवाद्यांकडून जिंकता आल्याने पुढे 'टायगर हिल' जिंकणं भारतीय सेनेला शक्य झालं. परत आल्यावर विक्रमने आपल्या कमांडर ऑफीसरला म्हटलेलं वाक्य त्याच्या असीम देशभक्तीची साक्ष देते. विक्रम म्हणाला होता “ये दिल मांगे मोअर!”. पाकिस्तानी अतिरेक्यांकडून मिळवलेल्या एन्टी एअरक्राफ्ट गन सोबत काढलेला फोटो विक्रमच्या अतुल्य पराक्रमाची साक्ष देतो. हाच विक्रम आपल्या मित्राला एकदा म्हणाला होता, जेव्हा कारगिल युद्धासाठी बोलावणं आलं होतं,
“Don’t worry. I’ll either come back after raising the Indian flag in victory or return wrapped in it, but I will come for sure.”
नसानसांत देशभक्ती भिनलेल्या ह्या भारतीय सेनेच्या शूरवीर ऑफिसरवर अजून एक जबाबदारी सोपवण्यात आली, ती म्हणजे अतिशय कठीण अश्या १७,००० फुटांवरील "पॉईंट ४८७५" वर नियंत्रण मिळवणं. १६००० फूटांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी ठाण मांडलं होतं.
विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रात्रीच तिकडे कूच केलं. विक्रम म्हणजेच पाकिस्तानी सैन्याच्या कोड वर्ड भाषेत "शेरशहा" आपला बिमोड करायला येतो आहे ह्याची कल्पना मिळाली. पाकिस्तानी सैन्याने प्रचंड गोळीबार विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या दिशेने सुरू ठेवला. पण त्याला न जुमानता विक्रम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पुढे जाणं सुरूच ठेवलं. विक्रमचे शब्द आजही आठवले की रोमांच उभे राहतात. “या तो तिरंगा फहराके आऊंगा, या तो उसमे लिपट के आऊंगा लेकीन आऊंगा जरूर”.
विक्रमने आपल्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानी अतिरेक्यांवर आक्रमण केलं. त्याने शत्रूच्या पोस्टवर ग्रेनेडने हमला केला. त्यात ५ पाकिस्तानी अतिरेक्यांना त्याने कंठस्थान घातलं. विक्रमच्या सुभेदाराने पुढे न जाण्याची विनंती त्याला केली. तुझ्याऐवजी मी पुढे जातो, असं म्हणाल्यावर विक्रमचे शब्द होते “तु बाल- बच्चे वाला हे हट पिछे” असं म्हणत विक्रमने पुन्हा एकदा शत्रूच्या दिशेने आक्रमण केलं. ह्यात त्याचा लेफ्टनंट जखमी झाला. आपल्या जीवाची पर्वा न करता विक्रमने त्याला सुरक्षित जागी आणण्यासाठी पूर्ण गोळीबारात उडी घेतली. ह्यात एक गोळी विक्रमच्या छातीत लागली. पण तोवर विक्रम बात्राने आपलं मिशन पूर्ण केलं होतं. सकाळ होता होता भारताचा तिरंगा "पॉईंट ४८७५" च्या शिखरावर मोठ्या दिमाखाने फडकत होता. पण भारताने त्याच्या सिंहाला गमावलं होतं. मला शिवाजी महाराजांचं एक वाक्य इकडं आठवतं, “गड आला पण सिंह गेला” पुन्हा एकदा भारताने आपल्या एका सच्चा सुपुत्राला गमावलं होतं. कमांडिंग ऑफिसर त्यावेळी कर्नल वाय. के. जोशी ह्यांच्या मते "पॉईंट ४८७५" वर पुन्हा कब्जा मिळवण्याचं सगळं श्रेय कॅप्टन विक्रम बात्राचं होतं. म्हणून ह्या शिखराला नंतर विक्रम बात्राचं नाव देण्यात आलं.
आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळी झेलणारा विक्रम बात्रा वेगळ्याच मातीचा होता. आपल्या सुभेदाराला 'तू बाल बच्चे वाला है' असं म्हणत मागे ठेवणाऱ्या विक्रम बात्राच्या आयुष्यात कोणी नव्हतं का? खरे तर विक्रम बात्राचं मन आधीच कोणी चोरून नेलं होतं. कारगिलवरून परत आल्यावर तो डिम्पल चिमा सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार होता. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. पण डिम्पलच्या शब्दात त्या ४ वर्षांच्या आठवणी एका आयुष्याच्या सोबतीपेक्षा जास्ती होत्या. विक्रम गेला पण तो आजही डिम्पलच्या सोबत आहे. डिम्पल पुढे सांगते, 'काही वेळेचा अवधी आहे. मी आणि तो पुन्हा एकदा भेटणार आहोत.'
कॅप्टन विक्रम बात्राविषयी लिहायला घेतलं की अंगावर रोमांच उभे राहतात. एका क्षणात अभिमानाने छाती फुलून येते तर दुसऱ्या क्षणाला भारताने काय गमावलं ह्याचा अंदाज येतो. कॅप्टन विक्रम बात्रासारखे सैनिक आहेत, म्हणून आज आपण इकडे सुखाने झोपू शकतो. पण अश्या भीमपराक्रमासाठी आणि सर्वोच्च बलिदानासाठी भारताच्या सर्वोच्च अश्या सैनिकी पुरस्काराने अर्थात परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या कॅप्टन विक्रम बात्राला किती लोक ओळखतात? इकडे फालतू तद्दन हिरो जेलमध्ये गेला की त्याच्या बातम्या होतात. कोणत्या तरी तद्दन टुकार हिरोचा मुलगा बोलला तर त्याची बातमी होते आणि त्यावर त्यांना कसं वाटलं असेल ह्यावर लोक विचार करतात. पण आपला एक २४ वर्षांचा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, त्या मातेला काय वाटत असेल ह्याचा विचार कोणीच करत नाही. विक्रमच्या आईच्या शब्दात “भगवान ने मुझे दो बेटे उसी के लिये दिये एक उसने देश के लिये रखा एक मेरे लिये” किती निःस्वार्थी भाव आहे हा!!
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कॅप्टन विक्रम बात्रासारख्या "शेरशहा"चं काळीज आपलं नसेल कदाचित, पण निदान त्याच्या ह्या अत्युच्च पराक्रमाची आठवण तरी आपण आपल्या मनात सतत तेवत ठेवायला हवी. तेव्हाच त्याच्या ह्या पराक्रमाची महती आपल्याला देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास प्रवृत्त करेल. अश्या ह्या महान सुपुत्रास माझा साष्टांग दंडवत आणि कडक सॅल्युट. जाता जाता त्याला "परमवीर चक्र" देताना केलेले शब्द इकडे नमूद करतो.
CITATION
CAPTAIN VIKRAM BATRA
13 JAMMU AND KASHMIR RIFLES (IC 57556)
“During ‘Operation Vijay’, on 20 June 1999, Captain Vikram Batra, Commander Delta Company was tasked to attack Point 5140. Captain Batra with his company skirted around the feature from the East and maintaining surprise reached within assaulting distance of the enemy. Captain Batra reorganized his column and motivated his men to physically assault the enemy positions. Leading from the front, he in a daredevil assault, pounced on the enemy and killed four of them in a hand-to hand fight. On 7 July 1999, in another operation in the area Pt 4875, his company was tasked to clear a narrow feature with sharp cuttings on either side and heavily fortified enemy defences that covered the only approach to it. For speedy operation, Captain Batra assaulted the enemy position along a narrow ridge and engaged the enemy in a fierce hand –to-hand fight and killed five enemy soldiers at point blank range. Despite sustaining grave injuries, he crawled towards the enemy and hurled grenades clearing the position with utter disregard to his personal safety, leading from the front, he rallied his men and pressed on the attack and achieved a near impossible military task in the face of heavy enemy fire. The officer, however, succumbed to his injuries. Inspired by his daredevil act, his troops fell upon the enemy with vengeance, annihilated them and captured Point 4875.
Captain Vikram Batra, thus, displayed the most conspicuous personal bravery and leadership of the highest order in the face of the enemy and made the supreme sacrifice in the highest traditions of the Indian Army”
१) कॅप्टन विक्रम बात्रा
२) पॉईंट ४८७५ वर तिरंगा फडकवताना व खाली कमांडिंग ऑफिसर वाय.के.जोशी. यांसोबत '१३ जम्मू आणि काश्मीर रायफल'चे जवान
३) कॅप्टन विक्रम बात्रा पाकिस्तान अतिरेक्यांकडून हस्तगत केलेल्या गनसोबत
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment