Sunday, 26 July 2020

राफेल च हॅमर... विनीत वर्तक ©

राफेल च हॅमर... विनीत वर्तक ©

येत्या २९ जुलै २०२० ला ५ राफेल विमान भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी भारतात दाखल होत आहेत. राफेल लढाऊ विमान भारताच्या ताफ्यात येण्यानं दक्षिण आशियातील एक ताकदवर देश म्हणून भारताची प्रतिमा उजळणार आहे. भारताच्या दोन्ही शत्रूंकडे राफेल विमानांना टक्कर देईल अशी लढाऊ विमान तूर्तास नाहीत. जरी चीन कडे पाचव्या पिढीतील स्टेल्थ असणार चेंगडू जे २० हे विमान असलं तरी त्याची क्षमता सिद्ध झालेली नाही. जे २० च्या वापरावर आणि एकूणच त्याच्या तांत्रिक क्षमतेवर खूप सारी प्रश्नचिन्ह उभी आहेत. जो चीन आपल्या देशातील घटना जगासमोर खऱ्याखुऱ्या सांगत नाही तिकडे तांत्रिक क्षमता कश्यावरुन खऱ्या सांगणार आहे? त्यामुळे राफेल च्या येण्याने भारताकडे ०.५ पिढी अत्याधुनिक लढाऊ विमाने पाकीस्तान आणि चीनपेक्षा उपलब्ध होणार आहेत. राफेल स्वतः एक सर्वोत्तम लढाऊ विमान तर आहेच पण त्याच्या मारक क्षमतेला अजून धार देणारी क्षेपणास्त्र राफेल ला अजून घातक बनवतात.

राफेल लढाऊ विमान स्कॅल्प आणि मेटॉर ह्या क्षेपणास्त्र सोबत सुसज्ज असणार आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्र जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रात गणली जातात. मेटॉर  तर जगातील क्रमांक १ चे Beyond Visual Range Air-to-Air Missile (BVRAAM) आहे. (BVRAAM म्हणजे असं क्षेपणास्त्र जे की ३७ किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकते. मेटॉर ची क्षमता जवळपास १०० किलोमीटर ची आहे. ते ध्वनीपेक्षा ४ पट वेगाने हवेतून प्रवास करत लक्ष्याचा खात्मा करते.) राफेल च्या जोडीला भारत हॅमर ही क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेत आहे. हॅमर क्षेपणास्त्र चा अर्थ होतो HAMMER (Highly Agile and Manoeuvrable Munition Extended Range). तर हे हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान घेतल्यामुळे राफेल ह्या तिन्ही क्षेपणास्त्रांमुळे शत्रूचा कर्दनकाळ ठरणार आहे.

हॅमर क्षेपणास्त्रापेक्षा असं तंत्रज्ञान आहे जे बॉम्ब ला डोळे देतं त्याला अचूक लक्ष्यभेद करायला मदत करते. हॅमर घेण्याची भारताला गरज का भासली? त्याच्या येण्याने नक्की काय फरक पडणार हे समजून घ्यायला हवं. जसं आधी लिहिलं आहे की हॅमर एक तंत्रज्ञान आहे जे कोणत्याही बॉम्ब हल्याची अचूकता वाढवते. असं एक तंत्रज्ञान भारताने आधी वापरलेलं आहे. बालाकोट हल्ल्याच्या वेळी भारताने इस्राईल कडून आलेले स्पाईस २००० तंत्रज्ञान असलेले लेझर गायडेड बॉम्ब डागले होते. ह्या प्रणालीमुळे बॉम्ब ची अचूकता प्रचंड वाढली. स्पाईस प्रणाली लावलेले बॉम्ब ३ मीटर च्या परीघात लक्ष्यभेद करू शकतात. बालाकोट हल्ल्याच्या वेळी अचूकता महत्वाची होती. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या १००० - २००० किमी / तास वेगाने जाणाऱ्या लढाऊ विमानातून साधारण ३०,००० ते ४५,००० फुटावरून टाकलेला बॉम्ब अचूकतेने लक्ष्यावर पडेल अशी शक्यता खूप कमी असते. त्यामुळेच आधीच्या काळात भरमसाठ बॉम्ब टाकले जायचे ज्यातील अनेक दुसरीकडे फुटायचे आणि त्याचा काहीच फायदा होत नसायचा. पण जसजसे तंत्रज्ञान सुधरत गेलं तसतसं बॉम्ब ला गाईड करणाऱ्या सिस्टीम उपलब्ध झाल्या.

स्पाईस २००० ही अशीच एक सिस्टीम आहे जी की बॉम्ब ला वर सांगितलेल्या प्रतिकूल परिस्थितीत डागल्यावर सुद्धा अचूकतेने लक्ष्यभेद करण्यास मदत करते. अश्याच बॉम्ब ला लेझर गायडेड बॉम्ब असं म्हणतात. तर अश्या एका स्पाईस बॉम्ब ची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. भारताने जवळपास १०० स्पाईस बॉम्ब ३०० कोटीला इस्राईल कडून विकत घेतलेले आहेत. आधी राफेल वर ह्याच स्पाईस बॉम्ब ना लावायचा प्लॅन होता पण राफेल च तंत्रज्ञान आणि स्पाईस २००० च तंत्रज्ञान ह्यांना जुळवून आणायला वेळ लागणार होता. त्यात स्पाईस बॉम्ब ची किंमत हा ही एक मुद्दा होता. गेल्या २ महिन्यात भारताच्या सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले आणि सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. भारताला राफेल ची गरज कधी नव्हे तितकी जाणवत आहे आणि लवकरात लवकर राफेल लडाख च्या सीमेवर भारताला हवं आहे. त्यामुळेच राफेल च्या तंत्रज्ञानाशी आधीच जुळवलेल्या हॅमर तंत्रज्ञानाला घेण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. हॅमर तंत्रज्ञानाची  अचूकता स्पाईस २००० च्या मानाने कमी आहे. हॅमर तंत्रज्ञानाची अचूकता जवळपास ३० मीटर इतकी आहे. ३० मीटर परिघात हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असलेले बॉम्ब अचूकतेने लक्ष्याचा खात्मा करू शकतात.

हॅमर तंत्रज्ञान असलेले बॉम्ब जवळपास ५० ते ७० किलोमीटर लांबून डागता येतात. ही क्षमता विमानाच्या उंचीवर ही अवलंबून आहे. जमिनी जवळून उड्डाण करताना ही क्षमता १५ किलोमीटर पर्यंत रहाते. अस असताना सुद्धा भारताने हॅमर घेण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे ह्याची किंमत. एका हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची किंमत जवळपास १ कोटी ४० लाख रुपयांच्या घरात आहे. स्पाईस पेक्षा अर्धे पैसे आपल्याला हॅमरसाठी मोजावे लागतील दुसरं म्हणजे हॅमर च तंत्रज्ञान हे राफेल च्या तंत्रज्ञानाशी आधीच जुळवलेलं असल्याने त्याचा लगेच वापर भारताला करता येणार आहे. राफेल भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यावर लगेचच मेटॉर, स्कॅल्प, हॅमर सह शत्रूशी दोन हात करण्यात सक्षम असणार आहे. भारताच्या विनंतीवरून भारतातील युद्धजन्य परिस्थिती बघता फ्रांस भारताला दुसऱ्या देशासाठी राखून ठेवलेलं आणि दिलं जाणारं हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान भारताला देणार आहे. हॅमर च्या येण्यानं राफेल च्या माऱ्याला अजून धार येणार आहे ज्याला रोखण्याची ताकद निदान सध्यातरी पाकीस्तान आणि चीनकडे नाही.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.   
 

No comments:

Post a Comment