Tuesday 21 July 2020

गो करोना गो... विनीत वर्तक ©

गो करोना गो... विनीत वर्तक ©

सगळी काळजी घेऊन सुद्धा करोना ने मला गाठलेच. ज्या पद्धतीने त्याची घोडदौड सुरु आहे ते बघता जवळपास सर्वाना तो व्यापून टाकेल अशी मला शंका आहे. करोना बद्दल माहिती असल्याने त्याची लक्षण मला आधीच जाणवली होती. तोंडात अल्सर, वास घेण्याची क्षमता नाहीशी होणे, तोंडाची चव जाणे, डायरीया तसेच घशाला खवखव अश्या अनेक लक्षणांपैकी आपल्यात काही आढळत असतील तर करोना च संक्रमण आपल्या शरीरात झालं असण्याची शक्यता आहे पण त्याची तीव्रता कमी असल्याने ही प्राथमिक किंवा स्टेज १ ची लक्षण दिसून येतात. काही दिवसापूर्वी माझ्या घशाला थोडी खवखव जाणवली आणि वास ओळखण्याची क्षमता पूर्णपणे नाहीशी झाली तेव्हाच मला करोनाच संक्रमण झालं असावं अशी शंका आली. करोना ची चाचणी केल्यावर ती खरी निघाली.

एक गोष्ट माझ्यासाठी चांगली होती की माझी लक्षण अगदी प्राथमिक होती. मला जेव्हा लक्षात आलं तेव्हाच चाचणी ची वाट न बघता मी स्वतःला सगळ्यांपासून विलग केलं होतं. घरी असणारे माझे आई- वडील आणि लहान मुलगी ह्यांच्यापासून विलग राहणं सगळ्यात जास्ती महत्वाचं होतं. कारण जरी मला करोना प्राथमिक अवस्थेत असलेला असला तरी मी दुसऱ्यांसाठी ट्रान्समीटर नक्कीच बनू शकत होतो. अगदी जेवणाच्या ताटापासून ते झोपणाच्या गादीपर्यंत सगळ्या गोष्टी विलग केल्या होत्या. चाचणी निष्कर्ष समोर आल्यावर मी क्वारंटाईन सेंटर अथवा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हावं असा सल्ला शासकीय डॉक्टर नी मला दिला.  क्वारंटाईन सेंटर ची अवस्था लपलेली नाही. मुळात बेड जरी वेगळे असले तरी टॉयलेट हे तिकडे कॉमन असल्याने कोरोना सोबत इतर आजारांचं संक्रमण होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे प्रायवेट हॉस्पिटल ला जायचा निर्णय मी घेतला. खरे तर कोरोनावर कोणतही औषध उपलब्ध नसताना हॉस्पिटल जवळपास १५ हजार ते २० हजार रुपये दर प्रत्येक दिवसासाठी आकारत आहेत. ज्यामध्ये रोग्याला जर आय.सी.यु. मध्ये ठेवण्याची गरज पडली तर हाच दर रुपये ३० हजार प्रति दिवस इतका प्रचंड आहे. सगळीकडे लुटालूट चालू आहे हे वास्तव मला स्विकारण्याशिवाय दुसरा पर्याय समोर नव्हता.

कोरोना मध्ये घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही त्याचवेळी निष्काळजी होण्याची गरज नाही. व्यवस्थित काळजी घेतली तर कोरोनाला आपण हरवू शकतो. कोरोना चे विषाणू शरीरात गेल्यावर आपलं शरीर युद्ध सुरु करते. विषाणूंचा किती प्रभाव आपल्या शरीरावर आहे ह्यावर आपल्याला जी लक्षण दिसतात त्यातून कळून येते. विषाणूंचा प्रभाव जर कमी असेल तर वर सांगितलेली लक्षणे दिसतात. थोडा जास्ती असेल तर ताप आणि थकवा जाणवतो. अति तीव्र असतील तर शरीरातील ऑक्सिजन कमी होतो (ऑक्सिमिटर वर जेव्हा ऑक्सिजन कमी झालेला दिसतो तेव्हा कोरोना च्या विषाणूंनी आधीच आपल्या फुफुसावर हल्ला केलेला असतो त्यामुळे ऑक्सिमिटर फक्त अतितिव्र संक्रमणात आपल्याला सुचित करते.) आणि प्रसंगी ऑक्सिजन ते व्हेंटिलेटर ची गरज पडू शकते. सध्या जे उपचार कोरोना वर केले जात आहेत ते १००% प्रभावी नाहीत. ह्या विषाणूंना निष्प्रभ करणारी यंत्रणा आपलं शरीर निर्माण करत असतं. ती यंत्रणा किती प्रभावी आणि भक्कम हे आपल्या रोग प्रतिकारकशक्ती वर अवलंबून असते. ह्यासाठी आपण आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी जे काही करता येतील ते उपाय (अगदी वाफ घेण्यापासून, गरम पाणी, हळदीचं दूध आणि इतर) आणि उपचार करायचे मग ते आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा ऍलोपॅथी वाले असोत. आपल्या शरीराची यंत्रणाच ह्या विषाणूंचा खात्मा करू शकते हे अंतिम सत्य आहे. कोरोना वर सध्या डॉक्टर एच.सी.क्यू. ,टॅमी फ्लू आणि इतर औषधांचा वापर करत आहेत. ज्याने कितपत फयदा होतो ह्या बद्दल कोणीच खात्री देऊ शकत नाही. तसेच ह्या औषधांचे इतर परीणाम ही शरीरावर होऊ शकतात. पण सध्याच्या घडीला ह्या पलीकडे डॉक्टरांकडे पर्याय उपलब्ध नाहीत.

शरीराने आपली सर्व शक्ती विषाणूंना नष्ट करण्यासाठी वापरावं असं वाटत असेल तर आपण जास्तीत जास्त आराम करायला हवा. जेव्हा शरीर आणि मन शांत असते तेव्हा शरीर पूर्ण ताकद पणाला लावून कोरोना च्या विरोधात आघाडी घेते. त्यामुळे आपण मनातून स्वस्थ राहणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. बिथरलेलं मन आणि शरीर लवकर रोगमुक्त होणार नाही हे सांगायला कोणत्या डॉक्टर ची गरज नाही. कोरोना च्या चाचणी सोबत आपल्या रक्ताच्या चाचणीतून सुद्धा कोरोनाने किती हातपाय पसरला आहे हे कळू शकते. सी.आर.पी. टेस्ट ( सी रिऍक्टिव्ह प्रोटीन ) तसेच डब्लू.बी.सी. वरून डॉक्टर ह्याचा अंदाज लावू शकतात. मी ह्यातला तज्ञ नाही त्यामुळे ह्यावर जास्ती भाष्य करणार नाही. पण ह्या अंकावरून आपण कोरोनाला ठरवण्यात किती बाजी मारत आहोत ह्याचा अंदाज येऊ शकतो. आपण कोरोना संक्रमित झाल्यावर घरी विलग झालो काय किंवा हॉस्पिटल आणि क्वारंटाईन सेंटर मध्ये राहिलो तरी आपण आपल्याकडून दुसऱ्याला तो रोग संक्रमित होणार नाही ह्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याकडून रिक्षावाल्या पासून ते नर्स, डॉक्टर पर्यंत तो पसरू नये ह्यासाठी आपण स्वतः ती काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती असो वा बाहेरची आपण कोणाच्या आयुष्यात अंधार आणत नाही आहोत ह्याची जाणीव आपल्याला झाली की आपण स्वतःहून काळजी घेऊच. आज कोरोनाला हरवल्या नंतर सुद्धा मी घरी विलग राहतो आहे. कारण अजून पूर्ण धोका टळलेला नाही त्यामुळेच काळजी घेणं गरजेचं आहे.

एकदा कोरोना झाल्यावर पुन्हा कोरोना होण्याची शक्यता धुसर आहे. पण ह्याचा अर्थ आपण चिंता करू नये असा नाही. कोरोना युद्धात शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीची हानी होते आणि ती भरून यायला काही आठवड्यांचा कालावधी लागतो. तसेच जरी शरीराला आता माहित असलं किंवा शरीरात अँटी बॉडी तयार झाल्या असल्या तरी त्या फक्त काही आठवडे शरीरात राहतात. शरीरात ह्या विषाणू विरुद्ध लढण्याची माहिती जरी माहित झाली असली तरी ह्याच पुन्हा होणार संक्रमण किती घातक असेल? त्याला शरीर कितपत प्रभावी उत्तर देऊ शकेल? ह्यावर अजून संशोधन सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही फेसबुक,व्हाट्स अप च्या फॉरवर्ड वर विश्वास न ठेवता आपण आपली आणि त्याच सोबत आपल्या कुटुंबाची आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची काळजी करणं आणि आपल्या स्वतःचा बचाव करणं हा सगळ्यात सोप्पा उपाय आहे.

कोरोना संक्रमित असलेल्या माणसाकडे समाज एक गुन्हेगार प्रमाणे बघतो. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाळीत टाकायला ही समाज मागेपुढे बघत नाही. पण खरच अशी गरज आहे का? हा विचार प्रगल्भ समाजतील प्रत्येकाने करायला हवा. आज तो असेल तर उद्या मी ह्यातून जाणार आहे हे समाजाने विसरू नये. कोरोना एक आजार असेल पण विकृती नाही. विकृतीला पण पाठीशी घालणाऱ्या प्रगल्भ समाजाने कोरोनाच्या सारख्या आजारात भक्कमपणे पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. पण तसं होताना दिसत नाही हे सत्य आहे. कोरोना येईल आणि जाईल पण समाजातील विचारसरणी बदलणं अत्यंत गरजेचं आहे. गो कोरोना गो हे नुसतं बोलून तो जाणार नाही तर एक समाज म्हणून आपण जर अजुन जास्त सुरक्षित आणि प्रगल्भ झालो तर तेवढ्या लवकर ह्या संकटातून आपण एक समाज आणि राष्ट्र म्हणून लवकर बाहेर पडू.

तळटीप :- ह्या लेखात मला आलेले अनुभव आहेत. ह्याचा संबंध कोणत्याही प्रकारे राजकारण, पक्षीय राजकारणाशी लावू नये ही विनंती.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment